Sunday, May 8, 2011

घाण्याचा बैल आणि शोभेची शिंगं (मेजरसाब)


`मी एक मध्यम प्रतीचा- सामान्य (मिडिऑकर) नट आहे.' माननीय अमिताभ बच्चन महोदयांनी काही काळापूर्वी हे उद्गार काढले होते तेव्हा त्यांच्या चाहत्यांचं हृदय भरून आलं होतं. एवढय़ा मोठय़ा माणसाची केवढी ही नम्रता, म्हणून गदगदून गेली होती ही मंडळी.
  त्यांच्या दुर्दैवानं अमिताभ त्यावेळी खरं बोलत होता.
आपल्या या वक्तव्यावर चाहत्यांचा विश्वास बसावा म्हणून की काय, त्यानं `मृत्युदाता'सारखा तद्दन बंडल सिनेमा करून दाखवला. आता `मेजरसाब'नं उरलीसुरली शंकाही फोडून टाकली.
  याचा अर्थ अमिताभनं `मेजरसाब'मध्ये अगदीच काही केलेलं नाही, असं नाही. खर्जातल्या आवाजातली अचूक टायमिंगची डयलॉगबाजी, हाणामारीतला- नृत्यातला जोश, चाहत्यांचं दिल खुश करणारी ती नजर आणि पडदा व्यापून टाकणारा वावर ही अमिताभची लोकप्रिय वैशिष्टय़ं आजही, या वयातही शाबूत आहेत. पण, एखाद्या नटाचं, विशेषत: ज्याच्यावर गुणवान `अभिनेता' असल्याचा `संशय' घेता येतो, अशा नटाचं एवढंच काम असतं का? दिग्दर्शकानं सांगितलेलं सर्व काही `बाबा वाक्यम् प्रमाणम्' अशा निर्बुद्धपणे करून दाखवणारा तो नट, अशी व्याख्या आहे का? एखाद्या नटानं भूमिका स्वीकारताना कथा-पटकथा आपल्या भूमिकेमध्ये असलेला- नसलेला दम याचा कशाचाच विचार करायचा नसतो का?
  मग सिनेमातला नट आणि घाण्याचा बैल यात फरक काय राहिला?
 हा फरक असा आहे, की अमिताभला मिळते ती वैरण कोटय़वधी रुपयांची असते. त्याच्या गळ्यात सोन्याची छुमछुमणारी घुंगरं असतात, पाठीवर सुपरस्टारपदाची झगमगती झूल. त्यामुळं घाण्यातून तेल निघतं ते फक्त आपल्या चाकोरीतल्या फिरण्यामुळंच, असा त्याला भ्रम झालाय. तेल काढण्यासाठी घाण्यात दाणे टाकावे लागतात हे तोही विसरलाय आणि त्याला हाकणारे निर्माते-दिग्दर्शकही.
  नाहीतर त्याचं नाव वापरून व्यवसाय करणाऱया. त्याच्या मालकीच्या `एबीसीएल'कडून इतका भंपक सिनेमा कसा तयार झाला असता? अभिनेता म्हणून सोडा, पण निर्माता म्हणून त्याला या सिनेमाची कथा-पटकथा तपासावीशी वाटली नाही? असं झालं असेल तर ते दुर्दैवी आहे. पण, कथा-पटकथा पाहून, वाचून अमिताभनं हा सिनेमा स्वीकारला असेल तर हे भयानकच आहे. चित्रपट व्यवसायातत दीड तपाहून अधिक काळ शिखरावर राहिलेल्या या नटाच्या समजशक्तीविषयी शंकाच निर्माण होते `मेजरसाब' पाहिल्यावर.
  लष्करी प्रशिक्षण देणाऱया एका संस्थेतला प्रशिक्षक मेजर (अमिताभ बच्चन) सगळी कामंधामं सोडून एका उर्मट कॅडेटचं (अजय देवगण) त्याच्या भुक्कड प्रेमपात्राशी (सोनाली बेंद्रे) लग्न लावून देण्यासाठी जिवाचा कसा आटापिटा करतो, याची संतापजनक आणि हास्यास्पद कहाणी म्हणजे `मेजरसाब.'
  ही कहाणी संतापजनक अशासाठी की, ती लष्करी प्रशिक्षणासाठीच्या देशातल्या सर्वोच्च संस्थेमध्ये खडकवासल्याच्या `राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिके'(एनडीए) घडते. लक्षात घ्या, एखाद्या सिनेमात `एनडीए'चा परिसर चित्रणासाठी वापरणं वेगळं आणि एखादा सिनेमा `एनडीए'मध्ये घडतोय, असं दाखवणं वेगळं! चित्रणस्थळ म्हणून `एनडीए' वापरली (तशी परवानगी मिळणं अशक्यच!) तर सिनेमात घडणाऱया घटना काल्पनिक संस्थेत घडतात, असं मानता येतं. पण, जेव्हा `एनडीए'चा सिनेमातही `एनडीए' म्हणून उल्लेख आणि दर्शन घडतं तेव्हा काही पथ्यं पाळायलाच हवीत. चित्रणात सच्चेपणा असायलाच हवा.
  तो नसल्यामुळंच लष्करी अधिकाऱयांनी `मेजरसाब'ला आक्षेप घातला आणि `एबीसीएल'ला सिनेमाच्या प्रारंभी एक स्पष्टीकरण जोडावं लागलं. या स्पष्टीकरणात म्हटलंय, की सिनेमातल्या काही घटना काल्पनिक आहेत, त्या `एनडीए'मध्ये घडत नाहीत. यातली मख्खी अशी की कॅडेटस्च्या कवायतींची दीड-दोन मिनिटांची दृश्य वगळली तर बाकीच्या तीन तासांच्या संपूर्ण `मेजरसाब'मधलं काहीच `एनडीए'मध्ये घडू शकत नाही.
  वास्तवातल्या `एनडीए'मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱयातले बुद्धिमान युवक कमालीची कठीण प्रवेशपरीक्षा देत असतात. इथे कोटय़धीश बापाचा वाया गेलेला मुलगा (अजय देवगण) मनात इच्छा नसताना केवळ संपत्तीचा वारसा लाभावा म्हणून सहजगत्या शिट्टी मारत `एनडीए'मध्ये प्रवेश मिळवतो. जणू `एनडीए' म्हणजे `आओ जाओ घर तुम्हारा'.
  बरं, कडक शिस्तीच्या एनडीएमध्ये हे चिरंजीव आपल्या मेजरला दुरुत्तरं करतात. `चार दिवसात एनडीएतून तुम्हीच मला हाकलाल, असं बेताल वागून दाखवतो' म्हणून सुनावतात. त्यांच्या पार्श्वभागी चार लत्ताप्रहार करून गेटाबाहेर हाकलून देण्याऐवजी `मेजरसाब' त्याच्याशी `प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत कसा जातोस बाहेर तेच पाहतो' अशी पैज घेतात. जणू  असल्या बेमुर्वतखोर कॅडेटवाचून एनडीएचं लष्कराचं आणि देशाचं प्रचंड नुकसानच होणार आहे!
  `मेजरसाब' हे सगळे अनाकलनीय धंदे करतो त्याचं कारणही तितकंच अनाकलनीय. बायकोच्या (नफिसा अली) बाळंतपणातच वारलेल्या आपल्या मुलाला तो म्हणे या उद्दाम पोरात शोधतोय! दुसरं कुणी (त्याच्याशिवाय आणि आमच्याशिवाय) भेटलं नाही काय? मग हे कारटं नसते चाळे करतं. त्याबद्दलची शिक्षा भोगताना कढी पातळ होऊन हॉस्पिटलात भरती होतं. तिथं डॉक्टरीण बाई म्हणजे `मेजरीण' बाईच! तिलाही याचा लळा(?) लागतो. हा तिथूनही पळून जायचा प्रयत्न करतो. त्यात त्याला गावातली एक तंगवस्त्रांकित टंगाळी (म्हंजे उंच) छम्मकछल्लो दिसते. हा तिच्या ताबडतोब प्रेमात पडतो.
  दररोज रात्री एनडीएतल्या गटारातून गावात येऊन तिच्यावर लाईन मारतो. ती आधी नखरे करून मग त्याच्या प्रेमात पडते. तिचा गुन्हेगारसम्राट भाऊ (आशिष विद्यार्थी) त्याचा गुन्हेगारसम्राट क्र. 2 मित्र (मोहन जोशी) वगैरे खलनायक प्रेमात बिब्बा घालू पाहतात. आधी मेजरच्या शिस्तीमुळं हॉस्पिटलात पडलेला हीरो आता खालनायकांचा मार खाऊन पुन्हा हॉस्पिटलात! हा निम्मा वेळ हिरॉईनमागे गोंडा घोळण्यात घालवणार; निम्मा मार खाऊन हॉस्पिटलात, मग प्रशिक्षण घेतो कधी?
  पण, जिथे प्रशिक्षण देण्याचा पगार घेणाऱया मेजरला प्रशिक्षणाची फिकीर नाही तिथे हीरो कशाला करील? हीरोचं प्रेमप्रकरण कळाल्यावर हे गृहस्थ शिंगं मोडून वासरांत शिरतात. लष्कराची युद्धसामुग्री वापरून लग्नाच्या मंडपातून हिरॉईनला पळवून `एनडीए'मध्ये आणतात. एका सज्ञान मुलीला तिच्या पंसतीच्या सज्ञान मुलाशी लग्न करता येऊ नये म्हणून पोलिस कमिशनर संपूर्ण पोलिसदल घेऊन `एनडीए'वर पहारा बसवतो. सरतेशेवटी तर खलनायक क्र. 2 च्या अभेद्य किल्ल्यासारखा महालावर मेजर, हीरो आणि इतर कॅडट `कमांडो ऑपरेशन' केल्यासारखा हल्ला चढवून खलनायकांचा नि:पात करतात. कशासाठी तर एका फुटकळ लग्नासाठी! अरे, एनडीए आहे का शनवारातलं मगंल कार्यालय?
  बरं, घटकाभर बाजूला ठेवू `एनडीए' वगैरे! `मेजरसाब' हा `मिलिटरी राज' वगैरेसारखा लष्कराशी काहीएक संबंध नसलेला लष्करपट आहे, असं मानून चालूयात. मग, निदान या सगळ्या बाष्कळपणातून मनमोहन देसाई छाप बिनडोक मनोरंजन तरी व्हावं? तेही घडत नाही. कारण इथे `मेजरसाब' सगळं काही गांभीर्यानं करतो. `डोंट मेस विथ आर्मी' वगैरे टाळीबाज पल्लेदार डायलॉग मारतो. त्यातून प्रेक्षकाला स्फुरण चढण्याऐवजी फुस्सकन् हसूच फुटतं.
लष्कराच्या कॅडेटनं प्रेमातच पडू नये की काय, असा सवाल कुणी करील. पडावं की, अगदी त्याच्या मेजरनं, इतर कॅडेटस्नी त्याला मदतही करावी. पण, इतक्या लोकांनी आपली विहितकर्तव्यं सोडून यांच्या लग्नासाठी युद्ध पुकारावं, अशा लायकीचं प्रेम तरी दाखवा! यांची प्रेमाची पद्धत काय, तर स्वप्नांमध्ये झटापटी आणि झटाझटींची गाणी म्हणणं आणि इतरांच्या साह्यानं एकत्र आल्यावर मिठय़ा मारणं. त्यातही नायिकेचं वर्तन तर अक्षम्यच. प्रेमासाठी ती काहीही करत नाही. दोन वेळा लग्नाच्या मांडवात सजूनधजून नायकाची वाट पाहात बसते. पहिल्या वेळी तर `आलाच नायक तर बरंच आहे, नाहीतर होऊन जाऊदे खलनायकाबरोबरच लग्न', असा स्थितप्रज्ञ आविर्भाव असतो तिचा. आपल्या भावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाल्यानंतरही ती त्याचं मन दुखावू नये, म्हणून नायकाशी लग्न करायला कचरते. म्हणजे अगदी राष्ट्रीय संपत्ती वाचवल्याच्या थाटात त्यांनी तिला पळवून एनडीएत आणलं ते काय वेळ जात नाही म्हणून? तिच्या निर्बुद्धपणाला त्याग म्हणणं हे सोनाली बेंद्रेला `अभिनेत्री' म्हणण्याइतकंच वेडगळपणाचं ठरेल. ती आणि तिचा हा बोटचेपेपणा समजूनही तिच्यासाठी वेडा झालेला नायक अंगापिंडानं थोराड दिसतात म्हणून तरुण म्हणायचे. एरवी `एनडीए' सोडा, `इयत्ता सितरी क'मध्येही प्रवेश मिळवण्याची पात्रता दिसत नाही दोघांमध्ये.
रॉबिन भट्ट आणि संतोष सरोज हे सिनेमाचे लेखक `दुसरी ड' मधले. आणि दिग्दर्शक वेरिंदर राज आनंद (म्हणजे आपला टिनू आनंद) यांनी नुकताच `प्लेग्रुप'मध्ये प्रवेश घेतल्यासारखं सरधोपट दिग्दर्शन केलंय. जबर जखमी झालेला मेजरसाब हॉस्पिटलात मरणोन्मुख पडलाय. एका घटकेला त्याच्या हृदयाचे ठोके थांबतात. अशाच स्थितीत हीरो पडलेला असताना त्याला खास फिल्मी ढंगात ऑर्डर देऊन मेजरंन उठून चालायला लावलेलं असतं. ते आठवून हीरोही मेजरला तशीच भाषणबाजी करून `जिवंत' करतो. सिनेमॅटिक नाटय़ाला वाव असलेल्या या प्रसंगात हीरो मेजरचा `अरे, तुरे'मध्ये उल्लेख करतो. त्याला `मेजरसाब' म्हणून हाक न मारता `तुम मर नही सकते मेजर' असा आरडोओरडा करतो. तिथे प्रसंगाची वाट लागते. तसाच प्रकार नायिकेच्या लग्नघरात घडतो. नायिकेला पळवून न्यायला आलेल्या नायकाबरोबर झटपट पळून जाण्याऐवजी ती तिथे खलनायकांना उद्देशून प्रेमाची महती सांगणारं गाणंच गायला लागते. अरे प्रसंग कसला आणि गाणी कसली म्हणताय? नाव बदललं म्हणून गुणवत्ता निर्माण होत नाही आणि नशीबही पालटत नाही, हे टिनू ऊर्फ  वेरिंदर राज आनंदला सांगा कुणीतरी!
 `मेजरसाब'मध्ये अमिताभ जुनेच गुण नव्या दाढीत उधळतो आणि लष्करी पोशाख घालण्याची हौस भागवून घेतो. अजय देवगण पूर्वीपेक्षा खूपच सुसह्य झालाय. पण, जिथे अमिताभलाही लेखक- दिग्दर्शकांनी मिळून निष्प्रभ केलाय तिथे त्याचा काय पाड लागणार. सोनाली अजयबरोबर शोभून दिसते. पण, जिच्यासाठी एवढा रक्तपात घडावा, अशी प्रेमिका काही वाटत नाही. नफिसा अलीचं मोठय़ा कालखंडानंतरचं दर्शन तिच्या आंग्लप्रदूषित हिंदी उच्चारांमुळे अपेक्षित परिणाम साधत नाही. आशिष विद्यार्थी चेहरे वेडेवाकडे करण्याच्या कलेत वाकबगार झालाय. मोहन जोशीला खलनायक साकारण्यासाठी तसं काही करावं लागत नाही, इतकंच.
आनंद राज आनंदनं `अकेली न बाजार जाया करो', `प्यार किया तो निभाना' ही सुरेल गाणी दिली आहेत. तेवढय़ानं भागणार नाही म्हणून आदेश श्रीवास्तवचं `सोना, सोना' हे भांगडा ठेक्याचं दणकेबाज गाणंही घुसवलं. `विरासत' फेम रवी के. चंद्रनचं अप्रतिम छायांकन ही `मेजरसाब' मधली एकमेव उजवी बाजू.
  सिनेमाच्या शेवटी मेजरसाब आणि अन्य सहकाऱयांवर लष्करानं `कोर्टमार्शल'ची कारवाई केली, असा मजकूर (बहुधा लष्कराच्या आग्रहावरून) जोडलाय. अमिताभचे अंधभक्त (खरंतर ही द्विरुक्ती झाली) वगळता बाकीचे बहुसंख्य प्रेक्षकही या सिनेमावर बहिष्काराचं कोर्टमार्शल बजावतील.
  अमिताभ बच्चन या विलक्षण स्पार्क असलेल्या नवोदित अभिनेत्याचं मध्यम दर्जाच्या सामान्य पण अफाट यशस्वी नटामध्ये परिवर्तन झाल्याला आता 25 वर्षे उलटून गेली आहेत. आता काळ बदललाय. पडदा व्यापणारा लंबूटांग नायक आणि खुजे दिग्दर्शक हे अमिताभनंच घडवलेलं समीकरण इतिहासजमा झालंय.  
खुज्या दिग्दर्शकांच्या `शिस्ती'त राहून पाटय़ा टाकण्याऐवजी अमिताभनं बुद्धीमान दिग्दर्शकांबरोब कथा- पटकथेवर मेहनत घेऊन आपली ताकद सार्थकी लावायला हवी. अन्यथा, यशाचं श्रेय एकटय़ानं ओरबाडण्याच्या हव्यासापोटी अपयशांची खापरं फोडून घ्यावी लागतील. आणि `मी एक सामान्य नट आहे.' असं त्यानं सांगण्याची गरज राहणार नाही. प्रेक्षकच ते म्हणू लागतील.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment