Sunday, May 8, 2011

ज्वेल थीफ नकली होऊन परतला


ज्वेल थीफ... व्यावसायिक हिंदी चित्रपटांच्या गारगोटय़ांच्या खाणीतला एक चकाकता हिदा. मेंदू चक्रावून टाकणारा रहस्याला अप्रतिम संगीत, सदासतेज सितारे, बांधीव पटकथा आणि विजय आनंदसारख्या अफलातून दिग्दर्शकाचा परिस्पर्श असे पैलू लाभल्यानं तीसएक वर्षांनंतरही झळाळी टिकवून असलेला.
 ज्वेल थीफचा दुसरा भाग, `सिक्वेल' काढण्याची कल्पनाच मुळात फँटास्टिक. आपल्याकडे एखादा सिनेमा हिट झाल्यावर त्याच्या नकला काढण्यातच निर्माते-दिग्दर्शक इतके गुंगून जातात, की मूळ सिनेमा संपला तिथून दुसरा सिनेमाही सुरू होऊ शकतो, हे काही त्यांच्या डोक्यात येत नाही. तशी डोकं चालवावं लागेल, अशी कोणतीच कल्पना त्यांच्या डोक्यात येत नाही म्हणा!
त्यामुळे `ज्वेल थीफ'च्या निर्मितीनंतर 27 वर्षानी निर्माते टी.पी.अगरवाल आणि दिग्दर्शक अशोक त्यागी यांना संजय निरुपम यांच्या कथा-कल्पनेवर `ज्वेल थीफ'चा पुढचा भाग काढावासा वाटला, याबद्दलच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
  परत आला
`रिटर्न ऑफ ज्वेल थीफ' सुरू होतो मूळ `ज्वेल थीफ' नंतर 27 वर्षांनी. `ज्वेल थीफ'मधला हिरेचोर प्रिन्स अर्जुन (अशोककुमार) सजा भोगून तुरुंगाबाहेर पडतो तिथपासून. प्रिन्सनं ज्या विनयकुमारला (देव आनंद) `ज्वेल थीफ' ठरवण्याचा प्रयत्न केलेला असतो तो विनयकुमार `रिटर्न...'मध्ये भारतातला बडा हिरे व्यापारी झाला आहे. हिऱयांचं एक मोठं, कायमस्वरुपी प्रदर्शन त्यांनं मांडलं आहे, त्यातल्या हिऱयांची किंमत जवळपास 60 हजार कोटी रुपये आहे.
  विनयकुमारची महत्त्वाकांक्षा असते भारतीय अस्मितेचं ब्रिटनकडे गहाण पडलेलं प्रतीक, हिऱयांचा बादशहा कोहिनूर हिरा काही काळापुरता का होईना, आपल्या प्रदर्शनात मांडण्याची. त्यासाठी ब्रिटनच्या उच्चायुक्ताची मनधरणी करून, राज्याच्या मुख्यमंत्र्याला, नीलकंठला (प्रेम चोप्रा) मध्यस्थी करायला लावून, आपली 60 हजार कोटींची मालमत्ता तारण ठेवून तो हिरा भारतात आणतो. कडेकोट सुरक्षेत आपल्या प्रदर्शनात मांडतो. हिरेचोरांचा नि:पात करण्याचा वसा घेतलेल्या पोलिस कमिशनर सूर्यदेव सिंगवर(धर्मेन्द्र) हिऱयाच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली जाते.
कोहिनूर भारतात येणार म्हटल्यावर तमाम हिरेचोरांचे डोळेही प्रदर्शनाकडेच लागलेले असतात. त्यात म्हातारा झाल्यावरही रग टिकवून असलेल्या प्रिन्सचा समावेश असतोच. त्याला विनयकुमारच्या प्रदर्शनातून कोहिनूर पळवून, चोरीचा आळ विनयकुमारवर आणून बदला घ्यायचा असतो. शिवाय कोहिनुर पदरी बाळगून शाहजहान, महाराजा रणजितसिंग आणि राणी एलिझाबेथच्या पंक्तीत जाऊन बसायचे असते. इतके उदात्त हेतू नसलेला, कोहिनूर चोरून चढत्या दामानं विकून गब्बर होण्याची माफक इच्छा असलेला आंतरराष्ट्रीय हिरेचोर जुकासो (सदाशिव अमरापूरकर) हाही कोहिनूरच्या मागावर असतो. त्यात जॉनी (जॅकी श्रॉफ) हा आणखी एक उपटसुंभ हिरेचोरही उपटतो.
  आणि कोहिनूर चोरीला जातो. याच्यावर आळ, त्याच्यावर आळ करता करता ज्याच्या त्याच्यापाशी जो जो हिरा सापडतो तो कोहिनूरची हुबेहूब नक्कल असलेला अमेरिकन डायमंड. असली हिरा असतो तरी कुणाकडे?
   अगदी मेंदूबिंदू चक्रावून टाकणारा प्लॉट नसला तरी `हिरा आहे तरी कुणाकडे', अशी उत्सुकता निर्माण करणारं कथानक `रिटर्न...'ला निश्चितच लाभलंय. रहस्यभेदही मूळ `ज्वेल थीफ'सारखा झटका देणारा नसला तरी आपले अंदाज हुकवणारा निश्चितच आहे. अशा चित्रपटांत रहस्योद्घाटनाचा प्रसंग हा कळसाध्याय, उत्कर्षबिंदू असायला हवा. `रिटर्न...'मध्ये मात्र हिऱयाची कडेकोट सुरक्षा आणि ती भेदून होणारी चोरी, हाच सगळ्यात डोकेबाज भाग आहे. त्यागींनी थोडी घाईघाई केली असली तरी हाच प्रसंग उत्तम वठलाय.
 ढीगभर पात्रे
 `रिटर्न...' चाकोरीबद्ध हिंदी चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा अनुभव देतो पण तो घेण्यासाठी मध्यंतरानंतर थांबावं लागतं. आणि त्यागींनी बहुसंख्य प्रेक्षकांना मध्यंतरानंतर घरी (किंवा थिएटरबाहेर) कुठेही जावंसं वाटावं, अशीच व्यवस्था केली आहे. ढीगभर पात्रं आणि सगळेच छोटेमोठे स्टार. त्यामुळे प्रत्येक पात्राचं त्याच्या स्टायलीला साजेसं `आगमन' घडवण्यातच त्यांनी निम्मा वेळ दडवलाय.
  कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या कोहिनूर हिऱयाच्या भोवतीच समूरनृत्यं घडवणं, त्यात पोलिस कमिशनर आणि भारतातल्या सर्वात श्रीमंत हिरे व्यापाऱयानं सहभागी होणं, ब्रिटीश उच्चायुक्तानं इंग्लिश वळवाचं हिंदी बोलणं, हिऱयांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या गार्डच्या केबिनमधले उगाचंच लुकलुकणारे लाल, पिवळे, निळे, हिरवे दिवे, असा टिपिकल हिंदी फिल्मी बालिशपणाही भरपूर आहे. अनु अग्रवाल, शिल्पा शिरोडकर आणि मधू अशा तीनतीन नायिका आहेत पण काम एकीलाही नाही. तिघीही नाचण्यापलीकडे फारसं काही करीत नाहीत आणि तिघींनाही नाचगाणंही फारसं जमतं, अशातलाही भाग नाही,
  चित्रपट बराच काळ निर्मिती अवस्थेत होता याच्याही खुणा जागोजाग आहेत. मूळ चित्रपटाची लांबी बरीच वाढली असावी आणि नंतर निर्दयपणे कात्री लावून तो आटोपशीर करण्याचा प्रयत्न झालाय, हेही लक्षात येतं. एवढं करूनही जिथे आवश्यक तिथे कात्री लागलेली नाही आणि आहे तो सिनेमाही बराच लांबट झालाय. सहसा रहस्योद्घाटन झाल्यावर खलनायकांचा, नि:पात नायकांची सरशी, नायक-नायिकांचं मीलन वगैरे औपचारिक सोपस्कार झटपट उरकण्याचा प्रघात आहे. `रिटर्न...'मध्ये `चोर कोण' हे उघड झाल्यावरही `क्लायमॅक्स' इतका लांबलाय की ( मध्यंतरानंतर थांबण्याचं धाडस केलेले) प्रेक्षक अजून खरं रहस्योद्घाटन पुढेच असावं, अशा शंकेनंच थांबून राहतील (आणि पस्तावतील)
     पट्टी अडकली
``रिटर्न...''सारख्या चित्रपटात स्टार्सच्या भाउगर्दीत कोणालाही अभिनयनैपुण्य दाखवण्याची संधी नसते, कोणाकडून अपेक्षा नसते. त्यामुळे अशोककुमार, धमेंद्र, जॅकी, शिल्पा, मधू, अनु, प्रेम चोप्रा वगैरेंनी आपापल्या इमेजबरहुकूम कामगिरी बजावली आहे. सदाशिव अमरापूरकरांना तर `अरेच्या, याही सिनेमात आपण काम केलं होतं का', असा आश्चर्याचा धक्काच `रिटर्न...' पाहिल्यावर बसेल, इतकी साचेबंद भूमिका त्यांनी केलीये, देव आनंदबद्दल काय लिहिणार? हार्मोनियमची एखादी पट्टी अडकून बसते ना तशी गत झालीये त्याची. पूर्वी (म्हणजे थेट मूळ `ज्वेल थीफ'च्या काळात) ही पट्टी अडकली नव्हती. दिग्दर्शकाच्या बोटांचं नियंत्रण होतं तोवर ती सुरेल वाजली. आता अशी अडकून पडलीये की उर्वरित हार्मोनियमवर काय वाजतंय, हेही कळू नये.
      देवाचा `आनंद'
 इमेरजमध्ये अडकलेल्या नटाचं कसं मातेरं होतं, हे दाखवण्यासाठी देव आनंदचे या चित्रपटातले प्रसंग फिल्म इन्सिटय़ूटला अभ्यासक्रमात समाविष्ट करता येतील. प्रसंग काय, इतर माणसं काय बोलतायत, (किंवा काही बोलतायत) आपली भूमिका काय, तिचं वय काय, तिचा सामाजिक दर्जा काय, यापैकी कशाचाही विचार न करता हा आधुनिक नार्सिसस उटपटांग कपडे घालून पडद्यावर तरुणपणातल्या देव आनंदची केविलवाणी नक्कल करत असतो. आपल्याच बेसूर पट्टीत चिरकत राहतो. त्याच्या चाहत्यांना हीच त्याच्या चिरतरूणपणाची साक्ष वाटत असेल तर देव (आकाशातला) या भूतलावरच्या `देवा'ला लवकर `प्रौढ' करो (आणि त्याच्या चाहत्यांनाही.) देव आनंदला सिनेमात घेतल्यामुळे निर्मात्याचा विनोदी नटावरचा खर्च वाचायला, एवढं सांगितलं तरी पुरे!
  `ज्वेल थीफ'चा हा पुढचा भाग असल्यामुळे संगीताबद्दल न लिहून चालणार नाही. यात ना `होठोंमे ऐसी बात' आहे, ना `ये दिल न होता बेचार', ना `आरमां के नीचे' ना `चुराके गया सपना मेरा', ना आशाच्या मधाळ-मादक स्वरातलं `रात अकेली है.' सचिनदेव बर्मनच्या तोडीच्या संगीताची अपेक्षा जतीन-ललितकडून करणं हे विजय आनंदसारखं दिग्दर्शन अशोक त्यागींकडून अपेक्षिण्याइतकंच व्यर्थ आहे. जो वकूब त्यांगींचा तोच जतीन-ललितचा. त्यांची गाणी पडद्यावर सुरू झाल्यावर प्रेक्षकांना अपरिहार्य देहधर्मांची आठवण होत नाही, हेच पुष्कळ आहे. आपल्या अनिल मोहिलेंच्या मुलानं, अमर मोहिलेनं दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटाच्या वेगाशी सुसंगत आणि त्याला साहाय्यकारक आहे.
माफक करमणूक करणाऱया `रिटर्न ऑफ ज्वेल थीप'मध्ये मूळच्या `ज्वेल थीफ'ची झळाळी शोधायला जाल तर पस्तावाल. एरवी जमाना अमेरिकन डायमंड्सचाच आहे, याचं भान ठेवलं तर उत्तम.
........................
   `रिटर्न ऑफ ज्वेल थीफ'
  निर्माता : टी.पी.अगरवाल
  दिग्दर्शक : अशोक त्यागी.
  पटकथा-संवाद : रणबीर पुष्प
  संगीत : जतीन-ललित
  कलाकार : अशोककुमार, देव आनंद, धमेंद्र, जॅकी श्रॉफ, शिल्पा शिरोडकर, अनु अग्रवाल, मधू, प्रेम चोप्रा, सदाशिव अमरापूरकर.

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment