Tuesday, February 7, 2012

बेताल आणि बेतोल (तराजू)


विमलकुमारांचं सगळंच गणित चुकलंय यावेळी!
 एकतर त्यांनी `फ्रेश' मालाच्या बाजारपेठेत चोरबाजारातल्या जुन्या, पुराण्या, भंगार मालाचं दुकान लावलंय. त्यात `तराजू'च्या एका पारडय़ात प्रेक्षकांच्या सिनेमाकडून असणाऱया भरभक्कम अपेक्षा टाकल्या; दुसऱया पारडय़ात अक्षयकुमार, सोनाली बेंद्रे आणि स्वत: विमलकुमार असला हलका माल भरला. आता हे पारडं झुकणार कसं आणि समतोल साधणार कसा?
  `तराजू'मध्ये विमलकुमार तीच ती धिसीपिटी कहाणी सांगतात, पाप-पुण्याची. एका पारडय़ात पुण्य म्हणजे हीरो आणि मंडळी; दुसऱयात पाप म्हणजे व्हिलन आणि त्याचा गोतावळा. मध्यंतराआधी पापाचं पारडं जड झाल्यासारखं भासणार, मध्यंतरानंतर पुण्य पापाला झुकणार आणि पुण्याचा, सत्याचा, सत्प्रवृत्तीचा जय होणार, हे सांगायला `तराजू' कशाला तोलायला हवा?
 इथे पुण्यात्मा आहे राम यादव (अक्षयकुमार) हा पोलिस अधिकारी. त्याच्या पारडय़ात आहे त्याचा भाऊ राज (अनिल धवन), वहिनी शकुन्तला (शशी शर्मा) आणि प्रेमिका पूजा (सोनाली बेंद्रे).
  पापाच्या पारडय़ात अप्पा राव (अमरिश पुरी) हा दुरात्मा, त्याचा मुलगा जनार्दन (मोहनीश बहल) आणि खलनायकांची टोळी आहे. इन्स्पेक्टर राम अप्पा रावचे काळे धंदे रोखण्याचा प्रयत्न करतो. अप्पाला सामील असलेल्या आपल्याच सहकारी इन्स्पेक्टरचा (तेज सप्रू) अक्कल हुशारीनं खात्मा करतो.
  वाया गेलेल्या जनार्दनला रामनं गजाआड डांबल्यानंतर त्याच्या आईसमान गर्भवती वहिनीची त्याच्या डोळ्यादेखत हत्या केली जाते. पुराव्याअभावी अप्पा राव निर्देष सुटल्यावर राम त्याच्यावर गोळीबार करतो. बरोबरचे पोलिस अधिकारी पिसाटलेल्या रामवर गोळ्यांची बरसात करतात.
  रामला उपचारांसाठी डॉक्टरखान हिंदुस्थानीच्या (कादर खान) दवाखान्यात दाखल करतात. रामवरचा अन्याय लक्षात घेऊन डॉक्टर राम कोमात असल्याची बतावणी करतो. दरम्यान, रामच्या भावाचीही हत्या झालेली असते. राम मग रुद्रावतार धारण करून एकेका खलनायकाचा नि:पात करतो. क्लायमॅक्सला तो अप्पा रावला विजयादशमी मेळाव्यात रावणासोबत जाळून टाकतो.
असली ही कोणतंही नावीन्य नसलेली कथा खुलवण्यासाठी विमलकुमारांनी `इनोदा'चा आधार घेतला आहे. मध्यंतरापर्यंत राम आणि पूजा यांचं प्रेमप्रकरणच रंगवलं आहे. पूजानं रामच्या प्रेमात पडल्यावर त्याला गटवण्यासाठी केलेल्या युक्त्याप्रयुक्त्यांचा भाग माफक रंजन करून जातो. पण, त्याला बीभत्सतेचा, द्व्यर्थी, अश्लील विनोदाचं हिणकस गालबोट लावून विमलकुमारांनी `तराजू'मधल्या त्यातल्या त्यात बघणीय प्रसंगांची वाट लावून टाकली आहे.
  रामच्या प्रेमात पडल्यावर पूजा आपल्या सख्यांच्या मदतीने त्याला एका उद्ध्वस्त इमारतीत बोलावते. तिच्या ढालगज सख्या रामचा `विनयभंग' करण्याचा प्रयत्न करतात. तेवढय़ात ती `हीरो'च्या थाटात प्रवेशून गुंड मुलींना चोप देऊन पळवून लावते आणि `राम'ची `इज्जत' वाचवते, हा प्रसंग नेहमीच्या हीरोनं हिरोइनला वाचवण्याच्या प्रसंगांचं झकास विडंबन करतो. पण त्यातही बटबटीत हाताळणी करून विमलकुमारांनी मजा घालवलीये.
  रामला गटवण्यासाठी त्याच्या घरात मोलकरीण बनून घुसलेल्या पूजानं त्याच्या वहिनीला गरोदरपणाचं रहस्य विचारणं, रातांधळेपणाचं नाटक करून राम आंघोळ करत असताना बाथरूममध्ये घुसणं आणि नंतर स्वत: गरोदर असल्याचं नाटक करणं, हा सगळाच भाग ओंगळवाणा, शिसारी आणणारा.
  विमलकुमारांनी अभिरुचीहीनतेचा कळस गाठलाय `सू सू सू आ गया मै क्या करूं' या गाण्यात. लघुशंका उरकण्याची घाई व्यक्त करणाऱया (गाणी आता काय काय व्यक्त करू लागलीयेत पाहा!) या गाण्यात त्यांनी शाळकरी मुलांकडून जे काही हावभाव करून घेतलेत ते पाहिल्यावर या मुलांच्या आईबापांचीही मान शरमेनं झुकावी. आतापर्यंत हिंदी सिनेमातल्या गाण्यांमधली विकृती समूहनर्तकांना सूचक उत्तेजक हावभाव करायला लावण्यापर्यंत मर्यादित होती. आता निरागस मुलांना अंतर्वस्रांमध्ये नाचवून विमलकुमारांनी या विकृतीला वेगळं परिमाण मिळवून दिलंय.
  `बँडिट क्वीन' किंवा `कामसूत्र'सारख्या सिनेमांमध्ये कथानकाशी सुसंगत, प्रगल्भ `ऍडल्ट' भावनांचा आविष्कार दिसल्याबरोबर कापायला धावणारी सेन्सॉरची कात्री हे गाणं आणि `तराजू'मधले इतर ओंगळ प्रसंग संमत करताना कोणत्या कोपऱयात गंजून पडली होती देव जाणे! वडिलांच्या (रोशन) परंपरेतलं कर्णमधुर संगीत देण्याबद्दल प्रसिद्ध असणाऱया राजेश रोशन यांच्या कारकीर्दीवरचा `सू सू सू'हा मोठा `डाग' ठरणार आहे. गीतकार समीरनं त्याच्या `खटिया' परंपरेचंच पालन केलं आहे, त्याच्याकडून वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही.
 उत्तरार्धात नायकानं खलनायकाचा सूड घेण्याचा भागही नीरस, नाविन्यहीन आणि निर्बुद्ध पद्धतीनं चित्रित करून विमलकुमारांनी `तराजू'मध्ये पाहण्यासारखं काहीच राहणार नाही, याची खातरजमा करून घेतली आहे.
  अक्षयकुमार हा मूलत: दगडी ऍक्शन हीरो. `तराजू'ची थरारदृश्य, विशेषत: धावत्या मोटारींच्या टपावरून धावण्याचा प्रसंग त्यानं उत्तम वठवला आहे. विनोदी प्रसंगांमध्येही त्यानं सहज वावरण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय, पण त्यानं कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या चेहऱयावर भाव उमटत नाहीत, उमटले तर चेहरा विलक्षण वेडावाकडा होतो आणि तेही समजून घेतलं तरी (जितेंद्रला नव्हतं आपण समजून घेतलं?' त्याच्या संवादातले भाव त्याच्या डोळ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. डोळे निर्जीव राहतात. शिवाय अक्षयला चांगल्या आवाजाचीही साथ नाही.
  असल्या सिनेमात नायिकेला फारसं काम नसतं. सुदैवानं सोनालीला पूर्वार्धात बऱयापैकी वाव मिळालाय, पण बागेत फिरायला आल्यासारखं कॅमेऱयासमोर वावरलं की झाला सहज वावर, अशी समजूत तिनं करून घेतलीये. खलनायकाला गंडवण्यासाठी मराठी घाटणीचं सोंग वठवण्याच्या प्रसंगात तिला धमाल उडवता आली असती, पण या प्रसंगात एक मराठी वाक्य तिनं इतक्या अमराठी ढंगात उचारलंय की, ही `बेंद्रे'च ना, अशी शंका येते.
  अमरिश पुरींनी अप्पा राव साकारताना `इन्स्पेक्टर गारु' वगैरे दक्षिणी शब्दप्रयोग करून वैविध्य आणण्याचा प्रयत्न केलाय, पण तो तोकडा पडतो. .. . कादर खान महाराजांची थबथबलेल्या स्वरातली देशभक्तीपर भाषणबाजी उबग आणते.
  राजेश रोशनने शॅगीच्या `समरटाईम'ची उचलेगिरी करून (एकाच सिनेमातला हा दुसरा अपराध) बनवलेलं `हसीना गोरी गोरी' हे गाणं ऐकण्यासारखं जमलंय अहमद खाननं त्याचं एम टीव्ही स्टाईल चित्रण केलंय. पण हे गाणं पाहण्यासाठी `तराजू' पाहावा अशा दर्जाचं काही हे गाणं नाही बहुतेकांनी टीव्हीवर हजार वेळा ते पाहिलेलं आहेच.
 काढून काढून विमलकुमारांना `तराजू'च काढायचा होता तर त्यांनी निदान आपल्या पारडय़ात अक्षयऐवजी त्यांच्या फेवरिट `वजनदार' गोविंदाला तरी घ्यायचा होता. तो असता तर काटा मारून का होईना, किमान बोहनी तरी झाली असती.
...........................................................................
          तराजू
निर्माता - विनोद मल्होत्रा
दिग्दर्शक - विमलकुमार
संगीतकार - राजेश रोशन
कलाकार - अक्षयकुमार, सोनाली बेंद्रे, अमरिश पुरी, मोहनीश बहल, कादर खान, रणजीत, राकेश बेदी, टिकू तलसानिया, दिनेश हिंगू.
....................................

No comments:

Post a Comment