Tuesday, February 7, 2012

विशुद्ध बिनडोकबाजी (मिस्टर अँड मिसेस खिलाडी)


मनमोहन देसाईना `मूर्खशिरोमणी' म्हटलं जाई. ही पदवी देणाऱयांचा सूर कदाचित हेटाळणीचा असेलही; पण तिनं देसाचा गोरवच केला होता.
 कॅमेऱयाचा माध्यमातून पडद्यावर काय घडवायचं, याचा सर्वाधिकार एकदा दिग्दर्शकाकडे सोपवल्यानंतर त्याला मूर्खपणा घडवायचं स्वातंत्रही द्यायला हवं. प्रेक्षकानं इतकंच पाहायचं की, पडद्यावर साकारलेला मूर्खपणा किती अस्सल आहे? किती मनोरंजक आहे?
  आणि मनजींच्या `नशीब'पर्यंतच्या सर्वच सिनेमांनी घसघशीत मनोरंजन देऊन त्यांची `निजाम ऑफ नॉन्सेन्स' ही पदवी सार्थ ठरवली होती. मनमोहन देसाई `स्कूल'ची धुरा सध्या डेव्हिड धवनच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत त्यानं `शाळे'ला बुट्टी मारून दादा कोंडकेंचा खाजगी क्लास जॉईन केला असावा, अशी शंका त्याचे सिनेमे पाहिल्यावर यायची. हल्ली मात्र डेव्हिडचं मन शाळेत रमायला लागलेलं दिसतंय.
  अस्सल मनमोहन देसाई छापाचा तिरपागडेपणा थोडा आणखी पुढे() घेऊन जाणारा `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' काढून डेव्हिडनं शाळेच्या लौकिकात भर टाकली आहे.
  मनजींच्या सिनेमात नायकांमध्ये `नायक'पण वाईट मार्गाला लागलेले मुळचे सालस नायक होते. डेव्हिडचा नायक राजा (अक्षयकुमार) नालायक, कामचुकार, अंधश्रद्धाळू आई-बहिणीची पर्वा न करणारा (हेही मनजीपेक्षा हटके) उद्दाम, शेफारलेला तरुण आहे. चंदामामा नावाच्या ज्योतिषी मामानं (सतीश कौशिक) त्याला सांगितलंय की, तो एका वर्षात राजा होणार आहे. त्यामुळं त्यानं हलकी नोकरी करू नये. मामाच्या ज्योतिषावर त्याचा आणि त्याच्या आईचाही (हिमानी शिवपुरी) प्रचंड विश्वास. घरदार सांभाळावं. चार पैसे कमवावेत, तरुण बहिणीच्या लग्नाची काही तजवीज करावी, याची फिकीर त्याला नसते, बहीणही (एरवीच्या फिल्मी स्टँडर्डस्च्या तुलनेत) निर्लज्जपणे `लग्न करून दे नाहीतर दूधवाल्याबरोबर पळून जाईन', असं ठणकावणारी.
 श्रीमंत बापाची (कादरखान) एकुलती एक सरफिरी मुलगी शालू (जुही चावला) राजाच्या प्रेमात पडते. चंदामामानं मुलींपासून दूर राहायला सांगितल्यानं राजा शालूपासून फटकून राहतो. शालू मात्र लग्न करीन, तर राजाशीच, असा पण करून बापाच्या पोटात गोळा आणते.
  मुलीच्या प्रेमाखातर बाप चंदामामाला `चौदाव्या रत्ना'चा धाक घालून राजा-शालूचं लग्न घडवून आणतो. पण, राजाला वास्तवाची जाणीव व्हावी, स्वप्नांच्या जगातून त्यानं जमिनीवर यावं, यासाठी अट घालतो की, राजानं एक लाख रुपये दिल्यानंतरच त्याला शालूशी `सुहाग रात' साजरी करता येईल. (हा डेव्हिडवरचा `क्लास'चा प्रभाव असावा.)
  मग राजा स्वत:चं `भावी राजे' पण न सोडता पैसे कमावण्यासाठी काय काय युक्त्या लढवतो. त्यांच्या चोरटय़ा भेटींमध्ये शालूचा बाप कसा बिब्बा घालत राहतो, याची क्रॅकजॅक कहाणी म्हणजे `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' अर्थात राजाला शेवटी `इमोशनल' होऊन सरळ मार्गावर यावं लागतंच. (शेवटी हिंदी सिनेमा आहे ना हा!)
   कथानक म्हणून फारशा मोठय़ा नसलेल्या या `स्टोरीलाइन'ला डेव्हिड आणि लेखक रुमी जाफरी यांनी वेगवान फार्सिकल कॉमेडीचं स्वरुप दिलं आहे. पडद्यावर जे काही घडेल त्यातून प्रेक्षक हसलेच पाहिजेत. असा पण करून `वाट्टेल ते' घडवून प्रेक्षकांना हसवत ठेवलं आहे.
  इंग्रजीत `निर्दय' कॉमेडीची परंपरा आहे. उठसूट इंग्रजी सिनेमाच्या नकला मारण्यांनी `अ फिश कॉल्ड वॉन्डा' सारखा `हलकट' हास्यपट कधीही काढलेला नाही. `मिस्टर अँड...'मध्ये राजा कमालीचा हलकटपणा करत राहतो. पण हा हलकटपणा `शुद्ध' असल्यानं लोभस आणि हास्योत्पादकच होतो, हे लेखक दिग्दर्शकांचं यश आहे.
  सिनेमाचा नायक सासऱयाला `अरे, तुरे' करतो, उर्मटपणे वागतो; आपण हसतो. नायकाला अपघात होऊन तो जायबंदी होतो; आपण हसतो. एरवी नायकानं कुणाकडून मार खाल्लेला आपल्याला खपत नाही. पण, इथे अगडबंब सुमो पैलवान नायकाची यथेच्छ पिटाई करतो, तेव्हाही आपण हसतो. मानवी आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या भावनांमधून, वेगवेगळ्या रसांचा परिपोष करणाऱया प्रसंगांमधून हास्यरस निर्माण करणं, हे काही सोपं काम नाही.
  बापानं मुलीच्या शरीरात इलेक्ट्रिक उपकरण बसवून नायकानं तिला स्पर्श केल्यावर `सायरन'चा आवाज येईल, अशी व्यवस्था करणं किंवा नायकानं एकाला (दुसऱयाचीच) बकरी `बोलकी' बकरी म्हणून विकणं, हे प्रसंग तर फर्मासच जमलेले. सुसूत्र कथानक म्हणून काहीही न घडवता तीन तास चुटक्यांची मालिका सादर करूनही डेव्हिड प्रेक्षकाला खुर्चीत बसवून ठेवतो.
  अर्थात, शेवटचा बोधप्रद इमोशनल भाग डेव्डिड टाळू शकणार नव्हताच. तोही जमेल तेवढय़ा `सर्किट' पद्धतीनं चित्रित करण्याचा प्रयत्न डेव्हिडनं केला आहे. गाणी हे या सिनेमातले अडथळेच आहेत. `तू क्या बंगला बनायेगा' आणि `टायटल साँग' वगळता बाकीची गाणी कथानक पुढेही नेत नाहीत. बरं, पूर्ण `टेन्शन फ्री' असलेल्या या सिनेमात `रिलीफ' म्हणूनही गाण्यांची गरज नव्हती.
  डेव्हिड-रुमीच्या प्रयत्नांना सर्वच कलावंतांनी मस्त-मजेशीर साथ दिलीये. अक्षयकुमारला अभिनय जमतो, हे (बहुधा) पहिल्यांदाच सिद्ध झालंय. एरवी ऑकवर्ड पद्धतीनं, दगडी चेहऱयानं पडद्यावर वावरणाऱया अक्षयनं या सिनेमात शरीर मोकळं सोडलंय आणि चेहराही झरझर हालता ठेवलाय. एरवी वात आणणारा त्याचा चिरका आवाज इथे उच्चारणाची ढबच बदलल्यानं सुसह्य होतो. `अबे क्या बच्चेकी जान लेगा तून' हे त्याचं पालुपदही धमाल. जुहीही या सिनेमात फुल फॉर्मात सुटली आहे. डेव्हिडचा सिनेमा असूनही `जब तक रहेगा समोसे मे आलू' हे खटियागीत किंवा जुहीचं बिकिनीमधलं दर्शन `व्हल्गर' होत नाही, हे जुहीचं यश. बाकीची मंडळीही या बिनडोक कॉमेडीत धमाल उडवतात.
 सिनेमाच्या आस्वादाची तऱहा, आवडीनिवडी माणसामाणसांनुसार बदलत असल्या तरी जातकुळी पाहून सिनेमा पाहायचा असतो. सत्यजित राय यांचा सिनेमा पाहण्याची फुटपट्टी मनमोहन देसाइभच्या सिनेमाला लावायची नसते आणि तशी मोजमापं ठरवायची नसतात. प्रत्येक सिनेमानं जीवनाचा तळ खरवडून काढायचं ठरवलं तर सिनेमे पाहणं, ही शिक्षाच ठरेल. काही सिनेमे डोकं बाजूला ठेवून बघायचे असतात. (त्यात डोकं `असणं' ही गृहीत धरलेले आहे.)
   पूर्णपणे निर्बुद्ध, निर्लज्ज आणि हलकट होऊन, डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहण्याचा वकूब असेल तर `मिस्टर अँड मिसेस खिलाडी' पाहा. आपल्याला एरवीही डोकं बाजूलाच ठेवून जगता आलं असतं तर किती बरं झालं असतं, हे लक्षात येईल.

No comments:

Post a Comment