Tuesday, February 7, 2012

मनी नाही भाव। म्हणे `प्रेमा' मला पाव।। (इतिहास)


प्रेम... वय, धर्म, जात, भाषा वगैरे सर्व बंध मोडून, सर्व पाश तोडून दोन जिवांचं अद्वैत साधणारा अडीच अक्षरी सिद्ध महामंत्र... प्रेमाची महती मोठी, सत्ता निरंकुश आणि संचार सर्वव्यापी... परब्रह्म् परमात्म्यासारखा... कळ जीवघेणी, क्षणक्षणाला जाळणाऱया आणि कणाकणानं मारणाऱया एखाद्या असाध्य रोगासारखी.
  एकदा हा रोग जडला की रोगाचं रोगावरही प्रेम जडतं, प्रेम आणि प्रेयसापलीकडे दुनिया झूट भासू लागते, प्रेयसाचा निदिध्यास जडतो, प्रेमाची आसक्ती देवाच्या भक्तीच्या पातळीवर जाऊन पोहोचते... `माणसाच्या माणूसपणाइतक्या पुरातन आणि सनातन अशा या भावनेचं मोहक-दाहक इंद्रधनुष्य सर्व युगातल्या सर्व मानवी कलांमध्ये प्राणतत्व बनून राहिलं. विसाव्या शतकाची कला म्हणून ओळखला जाणारा सिनेमाही याला अपवाद कसा असणार?
  हिंदी सिनेमाची तर सगळी धुगधुगीच दोन हृदयांमधल्या या नाजुक धडधडीवर आधारलेली. बिनप्रेमाचा हिंदी सिनेमा म्हणजे बिनजीवाचा देह. पण प्रेमाच्या प्रगल्भ भावनेचा अविष्कार हिंदी सिनेमात विरळाच. कारण प्रेक्षकाचं मानसिक वयच मुळी पौगंडावस्थेतलं गृहीत धरण्याचा इथला रिवाज. हा रिवाज पाळण्याच्या अट्टाहासामुळे `प्रेमाचा इतिहास' मांडण्याच्या गमजा करणारा राजकंवर दिग्दर्शित `इतिहास' हा लवकरात लवकर इतिहासजमा व्हायच्या लायकीचा पोरखेळ होऊन बसला आहे.
  दोन जिवांमधलं प्रेम त्यांची ताकद बनून कळीकाळावरही मात करतं, हे `इतिहास'चं कथासूत्र असंख्य वेळा हिंदी सिनेमात येऊन गेलेलं. राजकंवरसारखा हुशार दिग्दर्शक या सूत्रावर नवी, ताजी, रसरशीत मांडणी करू शकला असता. पण इथं त्यानं प्रेमाला द्वेषाची, हिंसेची, वैराची फोडणी देण्याचा धोपटमार्ग स्वीकारला आहे. कथाही निवडलीये `कोयला' शी बरंच साधर्म्य असणारी.
  `इतिहास'चे प्रेमिक आहेत नैना (ट्विंकल खन्ना) आणि करण (अजय देवगण). करणच्या गावावर सत्ता आहे जमीनदार ठाकूर दिग्विजय सिंगची (राज बब्बर) शहरात मोठय़ा महालात राहणाऱया ठाकूरच्या गावातला कारभार करणचा इमानी पिता बलवंत (अमरीश पुरी) सांभाळतो. ठाकूरला देवासमान मानणारा बलवंत त्याच्या अय्याशीसाठी गावातल्या तरण्याताठय़ा मुली पुरवण्याचं गैरकृत्यही भक्तीभावानं करतो.
  ठाकूरची अत्यल्पवस्त्रांकिता बहीण अंजली (सपना बेदी) गावात येते. ती करणच्या पौरुषावर फिदा होते. त्याचवेळी ठाकूरची नजर गावतल्या : उफाडय़ाच्या नैनावर पडते. तो बलवंतला हुकूम देतो, नैनाला शहरातल्या महालांवर हजर करण्याचा. बलवंत ही जबाबदारी करणवर सोपवतो. ठाकूरच्या खास पाहुणीला जिवापाड जपून सहीसलामत त्याच्या हवाली करण्याच्या भावनेनं करण नैनाला घेऊन निघतो.
  प्रवासातल्या भांडणतंटय़ांमधून करण आणि नैना एकमेकांच्या प्रेमात पडतात. शहरात पोहचल्यावर अंजलीकडून करणला ठाकूरचा वाईट इरादा समजतो. तो नैनाला ठाकूरच्या कचाटय़ातून सोडवून पळ काढतो. ठाकूरनं उभारलेला हरएक अडथळा पार करून जाणाऱया करणला रोखण्यासाठी ठाकूर त्याच्या बापालाच बलवंतलाच पाचारण करतो. धन्याप्रतीचं इमान आणि पुत्रप्रेम यांच्या कैचीत सापडलेला बलवंत करणच्या जिवावर उठतो. पण नेहमीप्रमाणं शेवटी त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन अनेकांचे मुडदे पडल्यावर नैना-करणचं प्रेम सफल होतं.
  मुळात नैना-करणच्या प्रेमापायी घडणाऱया उत्पातांची व्याप्ती आणि भयावहता पाहता एवढे उत्पात न्याय्य वाटावेत, अशा लायकीचं, त्या दर्जाचं प्रेम चितारणं, ही लेखक-दिग्दर्शक राजकंवरची मुख्य जबाबदारी होती. पण `इतिहास'चा प्राण असलेलं हे प्रेम इतकं पातळ पचपचीत, भडक, बटबटीत झालं आहे की, असल्या फडतूस प्रेमासाठी इतका गदारोळ कशाला. अशीच प्रेक्षकांची भावना व्हावी.
  नैना-करणमधला प्रणय साचेबद्ध यांत्रिक पद्धतीनं खुलतो. त्यांच्या गावापासून रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास तर गिरीभ्रमणापलीकडे काहीच साधत नाही. या दोघांना एकमेकांबद्दल `दोन देह एक जीव' अशी भावना वाटायला लावणारं आधी काहीच घडत नाही. दर दीड मिनिटांनी आर्त साद घालून, पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांना मिठय़ा मारल्या की, झालं प्रेम, अशी राजकंवरची बालिश कल्पना आहे. त्यानं स्वत: प्रेम करून पाहण्याचं वय बहुधा हिंदीतले उथळ प्रेमपट पाहण्यात वाया घालवलेलं असावं.
  नैना-करणचं प्रेम तेवढं उदात्त, पवित्र आणि अंजलीचं करणवरचं प्रेम किंवा ठाकूरची नैनाबद्दलची आसक्ती मात्र शारीर, अशी प्रेमाची ढोबळ विभागणीही राजकंवरनं केली आहे. ती दांभिकही आहे. कारण शरीरानं शरीराला भिडण्याचं आव्हान देणाऱया अंजलीला करण भारतीय संस्कृतीतल्या उदात्त प्रेमपरंपरेचं चऱहाट ऐकवतो, उघडय़ावाघडय़ा पाश्चात्य संस्कृतीची निर्भर्त्सना करतो, तेव्हा त्याच्या शेजारीच खजुराहोच्या कामशिल्पांच्या प्रतिकृती चित्रचौकटीत दिसत असतात.
  बरं हिंदी सिनेमात सगळेच नायकनायिका एकमेकांवर देहभावापलीकडचं प्रेम करीत असतात तरीही नायकाला शीलभ्रष्ट नायिका चालत नाही. त्याला चालली तरी ते प्रेक्षकांना खपत नाही. त्यामुळं `इतिहास'मध्ये दिग्दर्शक नायिकेच्या शीलरक्षणाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे चक्क खलनायकावर सोपवतो, तेव्हा या ढोंगीपणाबद्दल हसूसुद्धा येत नाही. कीवच येते.
  गावातल्या मुलींचा एक रात्र उपभोग घेऊन त्यांना कुंटणखान्याची वाट दाखवणारा खलनायक दिग्विजय नैनाशी मात्र अधिकृत लग्नच करण्याचा हट्ट का धरतो. याचं लॉजिकलं उत्तर `इतिहास'मध्ये नाही. नैना आणि करणचं अपरिहार्य मीलन होणार तेव्हा नैना `कुमारिका'च असली पाहिजे, हा भंपक दंडक पाळण्यासाठी दिग्दर्शकानं योजलेली ही क्लृप्ती आहे.
  ठाकूरनं खास पाहुणी म्हणून शहरात बोलावल्यावर त्याचा `अर्थ' नैनाला कळत नाही का, करणला समजत नाही का, नैनाचे कुटुंबीय (ते पडद्यावर कधीच दिसत नाहीत) करणसारख्या दांडजवान पोराबरोबर तिची रवानगी कशी करतात, गावात राहून रेल्वेबद्दलची आश्चर्य वाटणारा करण प्रथमच शहरात आल्यावर अत्याधुनिक शस्त्रZ सफाईने कशी चालवतो. त्याला मुंबईची गल्लीबोळं कशी समजतात, हे आणि असले असंख्य प्रश्न `इतिहास' मध्ये अनुत्तरित राहतात. हे प्रश्न पडूच नयेत, असा वेगही `इतिहास'ला नाही.
  अभिनयाच्या आघाडीवरही `इतिहास'ची कामगिरी सुमार आहे. ट्विंकल खन्नाला पाहिलं की हिची आईच (डिंपल) हिच्यापेक्षा किती तरुण आणि आकर्षक दिसते. हाच विचार मनात येतो. तिनं आणि अजय देवगणनं मन लावून अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय. पण `इतिहास'सारखा ढिसाळ चित्रपट `बघणीय' करायला फारच श्रेष्ठ दर्जाच्या अभिनयाची गरज होती. मन लावून केला म्हणून अभिनयाचा दर्जा श्रेष्ठ होत नाही. राज बब्बर, अरुणा इराणी (करणची आई). अमरिश पुरी आणि दुहेरी भूमिकेतला शक्ती कपूर यांचीही कामगिरी यथातथाच.
   `बॉर्डर'मध्ये मिनिटभराच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या सपना बेदीला अंगप्रदर्शनाखेरीज `इतिहास'मध्ये फार काही करायला लागलेलं नाही. दुर्दैवानं अंगप्रदर्शनासाठी आवश्यक. आकर्षक शरीरयष्टीही तिला लाभलेली नाही. त्यामुळं तिच्यासाठी सगळी वजाबाकीच.
  प्रेमकहाण्यांच्या यशात संगीताचा मोठा वाटा दिसतो. `दिलकी कलमसे' हे टायटल साँग वगळता दिलीपसेन- समीरसेन यांनी खास मनात घोळवावं. असं एकही गाणं न देऊन `इतिहास'चं भवितव्य स्पष्ट केलं आहे. नरेश शर्मा यांनी पार्श्वसंगीतात `कोयला', `गुप्त' आणि `दुनिया दिलवालों की' मधल्या संगीताचे तुकडे निर्लज्जपणे उचललेले आहेत. उसनवारी करताना नक्कल मारण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलेले नाही. सरळ मूळ `साऊंडट्रक'च वापरला आहे.
   लोकांना मटणाचा तेजतर्रार रस्साही आवडतो आणि बासुंदीची गोडीही भावते. पण म्हणून कोणी मटण आणि बासुंदी एकत्र कालवून खात नाही `इतिहास'मध्ये प्रेमाला हिंसाचाराची फोडणी देऊन राजकंवरनं मटणावर बासुंदीची धार वाढण्याचा आचरटपणा केला आहे. ही खानवळ चालणार नाही, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
..................................................................................
         इतिहास
 निर्माता-लेखक- दिग्दर्शक- राज कंवर
 पटकथा - रॉबिन भट, आकाश खुराणा
 संवाद - कमलेश पांडे
 गीते - समीर
 संगीत - दिलीप सेन-समीर सेन
 कलाकार - अजय देवगण, ट्विंकल खन्ना, सपना बेदी, शक्ती कपूर, अरुणा इराणी, राज बब्बर, अमरिश पुरी.

No comments:

Post a Comment