Tuesday, July 12, 2011

डेडली बोली (डेल्ही बेली)

‘वेगळा’ हा चित्रपटसृष्टीतला परवलीचा शब्द.  सिनेमा बनवणा-या आणि त्यात काम करणा-या प्रत्येकाला आपला ताजा सिनेमा म्हणजे चित्रपटसृष्टीतली किंबहुना चित्रपटांच्या इतिहासातली ‘न भूतो न भविष्यति’ अशीच एक कलाकृती आहे, अशी खात्री असते. सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्या जाणा-या प्रत्येक अडीच मिनिटाच्या मुलाखतीत ते तोंड दुखेपर्यंत वेगळेपणाची टेप लावत फिरत असतात. त्याचा बालमनांवर इतका विपरीत परिणाम होतो की टीव्ही पत्रकारही ‘हा सिनेमा म्हणजे वेगळय़ा सिनेमाची आवड असलेल्या रसिकांसाठी एक आगळीवेगळी मेजवानीच ठरेल.. खूपच वेगळा प्रयत्न आहे हा, अगदी वेगळय़ा कथेला एक वेगळीच ट्रीटमेंट दिलीये डिरेक्टरने आणि नायकानं कामही खूप छान खूप वेगळं केलं आहे.. एक वेगळाच अनुभव आहे हा’ असं ‘एक वेगळंच’ दळणं दळताना दिसतात.. 
असा एक ताजा वेगळा, कल्ट मूव्ही वगैरे बनण्याच्या वाटेवर असलेला सिनेमा म्हणजे आमिर खान प्रॉडक्शन्सचा ‘डेल्ही बेली’.. निर्मितीसंस्थेचा उल्लेख अशासाठी केला की आमिर खान म्हणजे क्वालिटी आणि ‘हट के’ मनोरंजन असं समीकरण झालंय.. गेल्या दहा वर्षात या निर्मितीसंस्थेनं ‘लगान’पासून ‘डेल्ही बेली’पर्यंत काढलेला प्रत्येक सिनेमा हिट किंवा सुपरहिट झालेला आहे. ‘तारे जमीं पर’, ‘पीपली लाइव्ह’ आणि ‘धोबीघाट’ यांसारख्या सिनेमांचे विषय पाहिले, तर मेनस्ट्रीम सिनेमावाले त्यांच्या वाटेला जाऊ धजले नसते. आमिरने हे विषय हाताळलेच नाहीत, तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि त्याच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा वापर करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवले. ‘डेल्ही बेली’ हेही याच परंपरेतले मर्यादित अर्थाने धाडसच होते.. मात्र, त्यातला धाडसाचा भाग जुगारासारखा होता.. आमिरचं लक चांगलं होतं.. त्याला तो मटका लागला..
 काय होतं हे धाडस?
शिवराळ-अशिष्ट भाषेचा मन:पूत वापर आणि चित्रदर्शी टॉयलेट ह्यूमर हेच ‘डेल्ही बेली’मधलं धाडस आणि तेवढाच वेगळेपणा.
 
या सिनेमाचे तीन नायक, नायिका, खलनायक, साइड कॅरेक्टर्स.. सगळे सगळे हिंदीत ‘भ’ची, ‘म’ची आणि इंग्लिशमध्ये ‘फ’ची भाषा बोलतात.. हिंदी सिनेमाच्या- किंवा खरंतर एकंदर भारतीय सिनेमाच्या प्रेक्षकांना सवयीचा असलेला सांस्कृतिक दुटप्पीपणा म्हणजे सामान्य माणसांची खरीखुरी भाषा कधीच सिनेमात ऐकू येत नसायची. विशिष्ट वर्गातली शाळकरी मुलंसुद्धा एकमेकांना भगिनीगमनी आणि मातृगमनी या आशयाच्या शिव्या दोस्तीत देतात. त्यावरच्या वर्गातली मुलं आणि मुलीही इंग्रजीत शौच आणि लैंगिक क्रियानिदर्शक शब्द स्टायलीत उच्चारतात. ते न वापरणारा माणूस भलताच मागासलेला मानला जातो. मात्र, हे सगळं पडद्यावर ऐकू येता कामा नये, असा अलिखित दंडक होता. हल्लीच्या काळातल्या शिव्याप्रचुर संवादयुक्त सिनेमांनी हा दांभिकपणा मोडीत काढायला घेतला होताच- ‘डेल्ही बेली’ने ते राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या थाटात पाच-सात सिनेमांचा शिव्यांचा कोटा एकहाती पूर्ण करून टाकलाय.. त्याचबरोबर अतिशय बोल्ड असं लैंगिक कृतींचं दर्शन आणि लैंगिक वर्णनपर संवादपठण (एकदम अपेक्षा वाढवून घेऊ नका- इथे पूर्ण कपडय़ांमधले प्रसंग आणि संवाद आहेत- पण ते नग्नदृश्यांपेक्षा प्रभावी आहेत) मुख्य प्रवाहातल्या भारतीय सिनेमात (दक्षिणेतला ‘मिडनाइट मसाला’ लैंगिकतेच्या उघडय़ा वाघडय़ा दर्शनात कितीतरी पुढे आहे) कधीच घडलं नव्हतं, ते या सिनेमात आहे.. पारंपरिक सिनेमावर पोसलेल्या प्रेक्षकाला 440 व्होल्टचा करंट बसेल, इतका शॉकिंग असा हा सरंजाम आहे.

धाडस क्र. दोन म्हणजे टॉयलेट ह्यूमर. बीभत्सरस हाही नवरसांमधला एक रस आहे आणि सिनेमासारख्या कलाकृतीमध्ये त्याचा ‘परिपोष’ करता येतो, याचं दर्शन आणि श्रवण घडवणारा हा सिनेमा आहे. ‘डेल्ही बेली’ हा शब्दप्रयोगच मुळी मसालेदार भारतीय पदार्थ खाऊन परदेशी माणसाचे पोट बिघडणे अशा अर्थाने केला जातो. या सिनेमातला एक नायक पोट बिघडलेल्या स्थितीतच सिनेमाभर वावरता होतो. त्यामुळे, अत्यंत गलिच्छ अशा प्रसाधनगृहातील शौचक्रियेचे- अगदी थेट नव्हे, पण- तपशीलवार दर्शन वारंवार घडत राहते आणि पोट बिघडलेले असते तेव्हा त्या क्रियेला ज्या अलेखनीय आवाजांची जोड मिळते, त्यांचंही ‘श्रवणसुख’ हा सिनेमा देतो. त्याबद्दल वेगवेगळय़ा प्रेक्षकांची वेगवेगळी मतं असू शकतात, पण, या हुबेहूब आवाजांसाठी या सिनेमाला यंदाचं ऑडिओ डिझाइनचं म्हणजे ध्वनिनिर्मिती, ध्वनिमुद्रण आणि ध्वनिसंकलनाचं विशेष पारितोषिक- जमलं तर ऑस्करच दिलं पाहिजे, अशी सर्वाची एकमताची शिफारस असेल.
 अशा प्रकारच्या बीभत्स वास्तवदर्शित्वाचे भारतीय प्रेक्षक किती ‘भुकेले’ होते, हे या सिनेमावर प्रेक्षकांच्या- विशेषत: तरुणांच्या ज्या प्रकारे उडय़ा पडतायत, त्यावरून दिसून येतंय. यात एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की हा सिनेमा गलिच्छ किंवा ओंगळपणासाठी ओंगळपणा करणारा नाही. कथानकाचा, त्याच्या ओघाचा अत्यावश्यक भाग म्हणूनच यातली प्रत्येक गोष्ट घडते आणि त्यात अकारण सेन्सेशनल काही करून दाखवण्याचा आव नाही. धक्का देण्यातला हा संयम वाखाणण्यासारखा आहे.
‘डेल्ही बेली’ची जी काही उलटसुलट चर्चा सुरू आहे ती याच दोन घटकांभोवती फिरते. ते धाडसी आहेत, नवे आहेत हे खरंच- पण, जागतिक सिनेमाला सरावलेल्या आजच्या प्रेक्षकांना त्यात ‘आयला, हे हिंदीतसुद्धा?!!!!’ एवढीच त्याची शॉक व्हॅल्यू आहे. ‘डेल्ही बेली’ पाहून आल्यानंतर एकमेकांना टाळय़ा देत पोरं-पोरी एकमेकांना काय सांगतात किंवा कोणत्या प्रसंगांची आवर्तनं होतात, तर ते हे सगळे प्रक्षोभक प्रसंग. उद्या ‘डेल्ही बेली’ हा बालपट वाटावा, असे आणखी पुढचे दोन सिनेमे आले की हे प्रसंग आणि हा ‘काळाच्या पुढे असणे’पणा कालबाह्य होऊन जाईल. त्याव्यतिरिक्त आशयाच्या अंगानं सिनेमात वेगळं काय?
 
काहीही नाही.
 
हल्ली वेगळेपणाचा एक फॉर्म्युला झालाय- त्या फॉम्र्युल्यात फिट्ट बसणारा हा सिनेमा आहे.
 
जुना फॉर्म्युला सिनेमा एका नायकाची एक गोष्ट सांगायचा. नवे फॉर्म्युलापट अनेक नायकांच्या अनेक गोष्टी गुंफून तयार होणारी एक गोष्ट सांगतात. त्यात नायकांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक शेड्स, त्यात काही काळ्या छटा देऊन त्याला मानवी पातळीवर आणण्याचा- नायक नव्हे, प्रमुख पात्र बनवण्याचा उपक्रम केला जातो. हा धंदा नवा नाही. ‘किस्मत’पासून अमिताभपटांपर्यंतचा अँटिहिरो असाच तर रचला जायचा.
 
सामान्य आयुष्य जगणा-या नायकांवर अचानक अशक्यप्राय, अविश्वसनीय अशी विपरीत परिस्थिती आदळते आणि त्यातून अनेक वळणवाटांनी जाऊन बौद्धिक हुशारीच्या बळावर नायक परिस्थितीवर मात करतात; या घटनाक्रमातून त्यांचे आयुष्यही उलटंपालटं होऊन जातं, ही हल्लीच्या काळात रिलीज होणा-या पाचपैकी चार सिनेमांची वनलाइन स्टोरी असते.. त्यात नवीन काय? इथे तर सगळय़ा नायकांना समान वेटेजही नाही. इम्रान खान हाच मुख्य न-नायक आहे, हे पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.
  
अशा प्रकारच्या कोणत्याही सिनेमामध्ये असायला हवा तेवढा वेगवान, चुरचुरीत रंजकपणा ‘डेल्ही बेली’मध्ये आहे. पण, शिव्यामृतबोध आणि शौचक्रियाकल्प वगळता वेगळं काहीही नाही. आमिर खान आणि मंडळींचा हेतू निश्चितपणे वेगळा आहे- पण हिंदी सिनेमावाल्यांचा मठ्ठपणाचा इतिहास पाहता या सिनेमामुळे उघडलंच तर गटाराचं दार उघडलं जाईल- तेही आवश्यकच आहे म्हणा- त्यानिमित्ताने परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली दबलेली वाफ तरी मोकळी होऊन जाईल.(प्रहार, ९ जुलै, २०११)

1 comment:

  1. gajendra ahire trid this in marathi movie tya ratree paus hota.but nobody cared or accepte his talent this is the differance between marathi critics and other critics,thanks machu. : sanjay d.

    ReplyDelete