'हे राम' मध्ये नायक साकेतरामला त्याची
गांधीवादी पत्नी गांधीजींची आत्मकथा वाचायला सांगते, तेव्हा तो घृणेनं उद्गारतो, 'आय
डोंट लाइक सेमीफिक्शन'.
'हे राम' हा सिनेमाही सेमीफिक्शनल, म्हणजे वास्तवाला कल्पिताची जोड देणारा आहे. मात्र, तो पाहिल्यावर कल्पितातल्या साकेतरामप्रमाणंच
वास्तवातल्या कमलहासनलाही सेमीफिक्शनची आवड नसती, तर बरं झालं असतं, अशी भावना होते.
महात्मा गांधींचा खून, त्या काळातलं
हिंदू-मुस्लिम दंग्यांचं वातावरण हा या सिनेमातल्या वास्तवाचा पाया. महात्मा गांधींच्या
खुनाचा कट रचणाऱया एका गांधीद्वेष्टय़ाला कट अमलात येण्याच्या आतच गांधीविचारांची महती
पटते, ही मध्यवर्ती कल्पना... आकर्षक आणि नाटय़पूर्ण.
महात्मा गांधींच्या 'हे राम' या
अखेरच्या उद्गारांचाच सिनेमाच्या शिर्षकासाठी वापर करण्यात आलाय. साकेतराम हे नायकाचं
नाव आणि त्याचा सतत 'राम' असा होणारा उल्लेख या दृष्टीनं अन्वर्थक. ऐतिहासिक वास्तवाला
कल्पिताची जोड किती प्रभावीपणे देता येते, हे फ्रेडरिक फोरसिथच्या 'द डे ऑफ द जॅकॉल'मध्ये
दिसलं होतं. तसाच अनुभव कमलहासनलिखित-दिग्दर्शित-अभिनित 'हे राम'मध्ये अनुभवायला मिळण्याची
अपेक्षा होती. पण, वीस रिळांच्या या प्रदिर्घ सिनेमांत कमलनं नायकाच्या व्यक्तिरेखाटनात
घातलेला गोंधळ पाहून प्रेक्षकांच्या तोंडून 'हे राम!' असे उद्वेगपूर्ण उद्गार निघतात.
तर, साकेतराम आहे (कमलहासन) स्वातंत्र्यपूर्व
काळातला एक पुरातत्त्वशास्त्रज्ञ. मूळ मद्रासमधला हा अय्यंगार ब्राम्हण कलकत्त्यात
स्थायिक झाला आहे आणि त्यानं अपर्णा (रानी मुखर्जी) या बंगाली मुलीशी प्रेमविवाह केला
आहे. तो कराचीमध्ये एका उत्खननस्थळी कामात मग्न असताना हिंदू-मुस्लिम दंगे सुरू होतात.
त्याला कलकत्त्यात परतावं लागतं. कोणत्याही धर्माचा द्वेष्टा नसलेला मवाळ साकेतराम
कलकत्त्यात मात्र पूर्ण पालटतो. त्याच्या घरात, त्याच्याच परिचयाचे मुस्लिम अपर्णावर
सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करतात.
या घटनेनं उद्ध्वस्त झालेला साकेतराम दंग्यांमध्ये
उतरून काही मुस्लिमांना कंठस्नन घालतो. त्या धामधुमीत त्याला भेटतो श्रीराम अभ्यंकर
(अतुल कुलकर्णी) हा कडवा हिंदुत्ववादी. देशभर उसळलेल्या दंग्यांना केवळ महात्मा गांधींकडून
होत असलेलं मुसलमानांचं लांगूलचालनच जबाबदार आहे, त्यामुळे गांधींना संपवायलाच हवं,
हे तो साकेतरामच्या गळी उतरवतो.
विषण्ण अवस्थेत मद्रासला परतलेल्या
साकेतरामचा सहा महिन्यांत मैथिलीशी (वसुंधरा दास) दुसरा विवाह होतो.
अपर्णाच्या आठवणी
आणि मैथिलीकडे नैसर्गिकपणे ओढ घेणारं तनमन यांच्या संघर्षात सापडलेल्या साकेतरामला
अभ्यंकरकडून महाराष्ट्रात बोलावणं येतं. इथला एक सांस्थानिक राजा (विक्रम गोखले) गांधींच्या
खुनासाठी साकेतराम आणि श्रीराम यांची निवड करतो. एका अपघातात जायबंदी झालेला श्रीराम
मरणोन्मुख अवस्थेत आपल्या ध्येयपूर्तीची जबाबदारी साकेतरामकडे सोपवतो.
मद्रासला परतल्यावर मैथिली गरोदर असतानाच
साकेतरामला महाराष्ट्रातून तार येते. श्रीरामचं निधन झाल्याची बातमी या तारेत असते. मैथिली आणि अन्य कुटुंबियांना सोडून साकेतराम दिल्लीला रवाना होतो. गांधीजींच्या खुनासाठी
योग्य संधी शोधत असतानाच त्याला विलक्षण नाटय़मय घटनाक्रमातून चांदनी चौकातल्या मुस्लिम
वस्तीत जावं लागतं. तिथे त्याला कराचीमधला जिगरी दोस्त अमजद (शाहरूख खान) भेटतो.
साकेतरामच्या
आगमनामुळं त्या वस्तीत दंगल उसळते. त्या धबडग्यातच गांधीवादी अमजद स्वत: शहीद होउन साकेतरामचं मनपरिवर्तन घडवतो. आता साकेतराम गांधीजींच्या प्रार्थनासभेत पोहोचतो, ते
त्यांच्या हत्येसाठी आणलेलं पिस्तुल त्यांच्या चरणी वाहण्यासाठी. पण, तोवर उशीर झालेला
असतो... त्याला नंतर भेटायला सांगून प्रार्थनासभेत झपझप चालत निघालेल्या गांधींना वंदन
करून नथुराम गोडसे (शरद पोंक्षे) त्यांच्यावर गोळय़ा झाड?ो...
हा सगळा कथाभाग उलगडतो फ्लॅशबॅकमध्ये.
1999 सालातला 89 वर्षांचा साकेतराम मृत्यूशय्येवर असताना त्याचा नातू आपल्या डॉक्टर
मित्राला आपल्या आजोबांची कहाणी ऐकवत असतो. हा दिवस असतो सहा डिसेंबरचा. त्यांची ऍम्ब्युलन्स
दंगलीत अडकते. एक मुस्लिम पोलिस अधिकारी तिचं रक्षण करतो. प्रत्यक्षात रुग्णालयाकडे
नेण्यापूर्वीच साकेतरामचं निधन होतं. त्यानं गांधीहत्येच्या वेळी घेतलेल्या गांधीजींच्या
चपला आणि चष्मा (या दोन वस्तू त्यावेळी 'हरवल्याची' इतिहासात नोंद आहे) छोटा साकेतराम
गांधीजींचे पणतू तुषार गांधी (खरेखुरे) यांच्याकडे सोपवतो, हा सिनेमाचा शेवट.
'हे राम'च्या प्रदिर्घ प्रवासाला सुसह्य़
करते, ती निर्मितीमुल्यांची अभिरुचीपूर्ण श्रीमंती, छोटय़ाछोटय़ा भूमिकांमध्ये झळकणाऱया
बडय़ा कलावंतांचा अभिनय आणि तो काळ दृश्यात्मक स्वरूपात उभा करण्यासाठी कलादिग्दर्शक
साबू सिरिल, वेशभूषाकार सारिका कमलहासन, रंगभूषाकार आणि छायालेखक तिरुनवुक्करसू यांनी
केलेली यशस्वी मेहनत. चालू काळ कृष्णधवल रंगात दाखवून भूतकाळ रंगीत करण्याची गिमिकी
क्लृप्ती या सिनेमात आहे. छायालेखकानं जुना काळ दाखवताना निवडलेले रंग आणि प्रकाशयोजनेतून,
फिल्मच्या, रसायनांच्या निवडीतून दिलेला जुन्या, हातानं रंगवलेल्या फोटोंसारखा पोत
या क्लृप्तीचंही सोनं करून जातो. पण, प्रेक्षकावर काहीही परिणाम घडत नसल्यानं ही सगळी
मेहनत कौतुकास्पद असूनही अनाठायी ठरली आहे.
या अपयशाचं अपश्रेय सर्वस्वी लेखक-दिग्दर्शक
कमलचं. कथानकाच्या मांडणीमध्ये प्रत्येक प्रसंगाचा आणि सिनेमाचा काही अंतिम परिणाम
गृहीत धरून रचना करण्याचा पटकथालेखनाचा प्राथमिक धडाच तो विसरलाय. प्रसंग खुलवायचा
म्हणजे लांबवायचा, या गैरसमजुतीपायी अनावश्यक तपशिलांची भरताडभरती करून त्यानं सगळे
प्रसंग विसविशीत आणि बोथट केले आहेत. तांत्रिक बाजू, निर्मितीमूल्यं आणि दृक् चमत्कृतींच्या
हव्यासातून सिनेमाच्या दृश्यरुपातच तो गुंतून पडलाय. मनोहर श्याम जोशी यांचे शुद्ध
हिंदीमधले, मोजक्या शब्दांत मोठा आशय मांडणारे संवादही त्यामुळे वाया गेले आहेत.
या
सिनेमातून कमलला काय सांगायचंय, हे शेवटपर्यंत समजत नाही. गांधीद्वेष ते गांधीभक्ती
अशा कथानायकाच्या कॉन्ट्रास्टयुक्त, नाटय़मय प्रवासातून आणि तो 1999शी जोडण्यातून गांधींचा
सहिष्णुतेचा मार्गच श्रेष्ठ, असा 'संदेश' त्याला द्यायचा असावा. पण प्रत्यक्ष सिनेमात
हा प्रवास कुठेही ठळक होत नाही. याचं कारण म्हणजे साकेतरामची विलक्षण गोंधळलेली व्यक्तिरेखा.
नायकाच्या भूमिकेत स्वत:च असल्यामुळे
की काय, कमलनं सगळा सिनेमा नायकाच्या नजरेतून घडवलाय. साकेतराम उपस्थित नाही, असे प्रसंग
सिनेमात जवळपास नाहीतच. हा घाट निवडताना साकेतरामचं व्यक्तिमत्त्व ठसठशीत करण्याची
जबाबदारी मात्र त्यानं पाळलेली नाही. संपूर्ण सिनेमा पाहूनही साकेतरामची काही टोटल
लागत नाही. दिसते ती साकेतरामच्या कौटुंबिक आणि लैंगिक जीवनाच्या तपशीलांची आणि त्याच्या
संज्ञाप्रवाही, फँटसीसदृश स्वप्नांची अकारण भरती. या गोंधळाची सुरुवात अगदी सुरुवातीपासून
होते. साकेतरामच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ असण्याला सिनेमात काही प्रयोजन नाही. 'एक्झॉर्सिस्ट'
किंवा 'जुरासिक पार्क'च्या सुरुवातीसारखी एक्झॉटिक लोकेशनवरची भव्य चित्रणाची संधी
देणारी सुरुवात करण्यापलिकडे त्यातून काही साधत नाही.
अपर्णावर त्याचं निरातिशय प्रेम
असल्याचे संकेत सिनेमात आहेत. मृत्यूनंतरही ती त्याला वारंवार आठवत राहते. पण, तरीही
मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यांन तो मैथिलीशी (कुटुंबियांच्या आग्रहामुळे का असेना)
लग्न करायला तयार होतो. तिच्या सहवासात हळुहळू खुलतो. तिच्यात गुंतलेला राहतो.
अपर्णा
आणि मैथिली यांच्याबरोबरच्या शरीरसंगांच्या प्रसंगांचं चित्रण कमलनं इतक्या चवीचवीनं
केलंय, की विकृतीच्या पातळीवर जाणारी तीव्र कामेच्छा असलेला पुरुष, ही आणि एवढीच ओळख
पक्की होते साकेतरामची.
शिवाय, मुस्लिमांची हत्या केल्यानंतर त्याला सतत अपराधी वाटत
राहतं. गांधीहत्येसारख्या कृतीला लागणारं वैचारिक कडवेपण त्याच्यामध्ये कधीही दिसत
नाही आणि जीव पणाला लावण्याचं धैर्यही. तरीही, अभ्यंकरसारखे कडवे गांधीद्वेष्टे या
कामगिरीसाठी त्याची निवड कोणत्या 'गुणां'च्या आधारे करतात, हे कळत नाही.
त्याचा गांधीद्वेष
इतका दुबळा असल्यानं अमजदच्या भेटीनंतर होणारं हृदयपरिवर्तन निष्प्रभ होउन जातं. सामान्य
हिंदी सिनेमांमध्ये डोक्यावर फटका लागून स्मृती गमावलेली पात्र पुन्हा तसाच फटका बसला
की ताळय़ावर येतात. या सिनेमाचा उत्कर्षबिंदूही इतक्या फिल्मी पद्धतीनंच येतो. चांदनी
चौकात साकेतरामची अमजदशी भेट होण्याची पूर्वपीठिकाही अविश्वसनीय योगायोगांनी भरलेली
आणि दंग्यांच्या धुमश्चक्रीत इकडून तिकडे लपत पळत या दोघांनी केलेली चटावरची तत्त्वचर्चा
तर विनोदीच वाटणारी.
असाच विनोद कमलनं अनाहूतपणे घडवलाय, तो गांधीहत्येच्या प्रसंगात.
नथुरामनं गांधीजींची हत्या केल्यानंतर साकेतराम एका पेटीतून पिस्तुल काढून तिथेच आक्रंदन
करतो. खरतंर त्यावेळी साकेतरामला ताबडतोब अटक झाली असती (आणि त्याची इतिहासात नोंदही
झाली असती.)
साकेतरामच्या चेहऱयात सतत होणाऱया
बदलांचं, कमलची गेटअप्स बदलण्याची हौस यापलिकडे काही स्पष्टीकरण दिसत नाही. दुर्दैव्रानं
या गेटअप्सच्या आतल्या त्याच्या चेहऱयानं आणि शरीरानं घडवलेलं अभिनयदर्शन अन्यसमकालिनांच्या
तुलनेत अव्वल दर्जाचं भासलं, तरीकमलच्याच मोजपट्टीवर फार श्रेष्ठ म्हणता येणार नाही.
'नायकन' जाउद्या, 'चाची 420' मधल्या बोजड मेकअपआडून त्यानं केलेल्या अभिनयाचीही सर
या भूमिकेला नाही.
रागाचे, असहाय्यतेचे, उद्रेकाचे, पश्चातापाचे-अगदी म्हातारपणातल्या
मरणासन्नतेचेही-तारसप्तकातले लाउड क्षणच त्यानं अभिनयपटुत्वदर्शनासाठी निवडावेत, हे
क्लेशकारक आहे. त्याच्या तुलनेत अगदी सहज वावरणारी सेन्शुअस 'मिष्टीमधुर' रानी मुखर्जी,
केवळ शरीरभाषेतून गांधीजी विश्वसनीय करणारा नसीरुद्दीन शाह, निरागस गोडवा दर्शवणारी
वसुंधरा दास आणि अभ्यंकरचा समावेश असलेली प्रत्येक फ्रेम-समोर कमल असतानाही-खिशात टाकून
जाणारा अतुल कुलकर्णी हेच सरस वाटतात.
किडकिडीत शरीरयष्टीच्या अतुलनं नजरेच्या जरबेतून
आणि करडय़ा स्वरातून अभ्यंकरचा कडवेपणा विलक्षण प्रभावी केला आहे. शाहरुख खानकडे पठाणाची
देहयष्टी नसताना त्याला ती वेशभूषा देण्यात आली आहे. तो दाढीमिशा लावलेला नेहमीचा शाहरुखच
वाटतो, तरीही अंगभूत एनर्जीच्या बळावर अमजदच्या व्यक्तिरेखेत काहीशी जान आणतो. हेमामालिनी,
गिरीश कर्नाड, ओम पुरी, अब्बास या जुन्या-नव्या नामांकित कलाकारांना दिलेल्या भूमिका
इतक्या छोटय़ा आणि बिनमहत्त्वाच्या आहेत, की त्या त्यांनी का स्वीकारल्या असाव्यात,
असा प्रश्न पडतो.
अन्य तांत्रिक बाजूंमध्ये ध्वनीमुद्रण
आणि पार्श्वसंगीताचा उल्लेख जमेच्या बाजूंमध्ये करता येईल. पण, सिनेमात अजिबात लक्षात
न राहणारं इलयाराजाचं संगीत आणि रेणु सलजाचं निष्प्रभ संकलन या बाजू सिनेमाच्या परिणामहीनतेत
भर घालतात. हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहात 'सत्याचा प्रयोग' (संदर्भ -'ऍन एक्सपरिमेंट
विथ ट्रुथ' ही या सिनेमाची जाहिरात) करण्याचं धारिष्टय़ कमलनं दाखवलं असूनही त्याचं निखळ
अभिनंदन करता येत नाही.
कारण, हा प्रयोग पाहून अगदी त्याचे कट्टर चाहतेही 'वुई डोन्ट
लाइक (धिस टाइप ऑफ) सेमीफिक्शन' असं खेदानं म्हणतील.
No new post for about four months? What's up, Sir?
ReplyDelete