Friday, April 20, 2012

माफियांच्या मुंबैचं रक्तलांच्छित 'सत्य'

बहुतेक वेळा सिनेमा पाहिल्यावर बरंवाईट काय ते भडाभडा बोलून मोकळं व्हावंसं वाटतं. चांगला असेल तर तोंड भरून कौतुक करावं किंवा बंडल असेल तर यथेच्छ तोंडसुख घेउन मोकळं व्हावं.
कधी कधी मात्र सिनेमा पाहिल्यावर काय बोलावं ते सुचत नाही. सिनेमा भंकस असेल तर तो पाहण्याचा तापदायक अनुभव पुन्हा आठवण्याच्या कल्पनेनं वाचा बसते. पण, सिनेमा अप्रतिम असेल तर त्याचा अनुभव वर्णन करण्यासाठी शब्दच सुचत नाहीत.
'सत्या' पाहण्याचा अनुभव या दुसऱया श्रेणीतला. शब्द सुचणं राहूद्या. आपण एक सिनेमा पाहून बाहेर पडलोय, हे समजायलाही थोडा वेळ लागतो... कारण सिनेमा असूनही फिल्मी नसलेला असा 'सत्या' हा एक दुर्मिळ अनुभव आहे... भेज्यात गोळी मारून भेज्याच्या ठिकऱयाठिकऱया उडवून देणारा अनुभव... सुन्न करून टाकणारा.
अंडरवर्ल्डमधले गुंड, माफिया डॉन काही हिंदी सिनेमाला नवे नाहीत. एकतर त्यांना खलनायक ठरवून मोकळं व्हायचं किंवा त्यांना अन्यायकारी समाजव्यवस्थेची शिकार ठरवून 'अँटी हीरो' बनवायचं, हे हिंदी सिनेमाचे धोपटमार्ग.
'सत्या'चं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे तो या सिनेमांना खूप मागे टाकून पुढे आलेला सिनेमा आहे. समकालीन सिनेमांपेक्षाही पुढचा सिनेमा. कारण, या सिनेमाच्या केंद्रस्थानी सत्या हे प्रमुख पात्र असलं तरी तो रुढार्थानं नायक नाही. तो एक संदर्भबिंदू आहे... सिनेमाचं नाव हे त्यांचं नाव आहे, त्याच्यापासून सिनेमा सुरू होतो. त्याच्यापाशी संपतो, म्हणून तो महत्त्वाचा... पण, नायक नाही.
देशाच्या कानाकोपऱयातून मुंबईत पोट भरायला जी हजारोंची गर्दी लोटत असते त्यातला हा एक. त्याला बियर बारमध्ये वेटरची नोकरी मिळते. ती करताना कुणाची मिसाज खपवून न घेण्याच्या वृत्तीतून सत्या (जे.डी. चक्रवर्ती उर्फ चक्री) एका स्थानिक गुंडाचा रोष ओढवून घेतो. हा जग्गा... गुरुनारायण (राजू मावानी) या बडय़ा भाईचा हस्तक. त्याच्याशी पंगा घेणं सत्याला फारच महागात पडतं. बायकांची दलाली केल्याचा खोटा आरोप लावून त्याची तुरुंगात रवानगी होते.
तुरुंगातही 'सीनियर' कैद्यांचं 'रॅगिंग' सहन न होउन सत्या भिकू म्हात्रे (मनोज बाजपेयी) या दुसऱया एका डॉनशी मारामारी करतो. सत्याची जिगर लक्षात आल्यावर भिकू त्याच्यापुढे दोस्तीचा हात करतो. दोघे मित्र बनतात. भिकू हा मुंबईतला त्या काळातला सर्वात 'टेरर' दादा. 'चुकून' आणि 'तात्पुरता' तुरुंगात आलेला. एकेकाळी भाउ ठाकूरदास झावळे (गोविंद नामदेव) या मुंबईच्या अनभिषिक्त गुन्हेगार सम्राटासाठी भिकू आणि गुरुनारायण यांनी एकत्र काम केलेलं. पण, भाउ राजकारणात गेल्यापासून भिकू आणि गुरुनारायणमध्ये धुसफुशी सुरू झालेल्या असतात.
भिकू तुरुंगातूनच सत्याच्या जामिनाची व्यवस्था करून त्याला सोडवतो. आपल्या गँगमध्ये 'नोकरी' देतो. राहायला एका चाळीतली खोलीही. 
इथे सत्याला विद्या (उर्मिला मातोंडकर) भेटते... समोरच्या खोलीत राहणारी, अपंग वडील आणि आईला सांभाळणारी एकुलती एक कमावती मुलगी. पार्श्वगायनाची संधी मिळावी म्हणून रोज संगीतकारांचे उंबरठे झिजवणारी ही उदयोन्मुख गायिका. सत्याशी तिची मैत्री होते. तोवर कुणात न गुंतलेला अबोल सत्या तिच्यामध्ये गुंतू लागतो.
इकडे भिकूच्या गँगमध्येही सत्याचा वेगानं उत्कर्ष सुरू होतो. गरम डोक्यानं कृती करणाऱया भिकूला थंड बुद्धीनं विचार करणाऱया सत्याची पुरक जोड मिळते. 
सत्या भिकूच्या गँगचा 'मेंदू' बनू लागतो. गुरुनारायणच्या माणसांनी भिकूच्या गँगवर हल्ला केल्यावर पिसाळलेला भिकू गुरुनारायणचा 'गेम' करायचं ठरवतो. पण, ऐनवेळी भाउ झावळे मध्ये पडून गुरुनारायणला वाचवतो.
भाउ फक्त स्वत:पुरता विचार करतोय, हे सांगून-चिथावून सत्या भिकूला गुरुनारायणवर हल्ला करायला भाग पाडतो. गुरुनारायणची हत्या झाल्यावर संपूर्ण मुंबईवर एकटय़ा भिकूचंच दहशतीचं साम्राज्य प्रस्थापित होउ लागतं. गँगवॉरमुळे जनमानसात उडालेली खळबळ लक्षात घेउन नव्याने मुंबईत आलेला पोलिस आयुक्त आमोद शुक्ला (परेश रावळ) वरिष्ठांच्या संमतीनं गुंडांविरुद्ध जोरदार मोहीम उघडतो. तरतऱहेच्या एन्काउंटर्समध्ये गुंड मारले जाउ लागतात.
पोलिसांना रोखायचं तर त्यांच्या 'बडय़ा भाई'ला म्हणजे कमिशनर आमोद शुक्लालाच उडवलं पाहिजे, अशी धाडसी योजना सत्या मांडतो. ती यशस्वीही करून दाखवतो. मुंबईतल्या भयग्रस्त, असुरक्षित वातावरणाचा पुरेपुर फायदा उठवून भाउ महापालिका निवडणुकीत भिकूच्या मदतीनं आपल्या पक्षाला यश मिळवून देतो. विजयोत्सव सुरू असतानाच भाउ भिकूला गोळी घालून ठार मारतो आणि पोलिसांना सत्याची 'टीप' दिली जाते.
पुढे उसळणाऱया हिंसक प्रलयातून कोणीच वाचत नाही. ना भाउ ना सत्या. सत्याचं तर आयुष्य जगण्याचं कारण (विद्या) आधी दुरावतं आणि मग आयुष्यही.
हे 'सत्या'चं कथानक... पण पूर्ण कथा नव्हे. ही कथा वाचून सिनेमा 'समजणार' नाही. कारण, या कथेत तुम्हाला कल्लूमामा (सौरभ शुक्ला), चंदर वगैरे भिकूच्या गँगचे मेंबर कुठे भेटले? भिकूची सुंदर आणि त्याहीपेक्षा टेरर बायको (शेफाली छाया) कुठे दिसली? सत्याची टीप पोलिसांना देणारा जग्गाचा खुनशी साथीदार, बेरकी भोळे वकील उर्फ अंकल (मकरंद देशपांडे), करडय़ा शिस्तीचा इन्स्पेक्टर खांडिलकर, लंपट संगीतकार रोणु (नीरज व्होरा) यांचा तर उल्लेखही झाला नाही. ज्याच्या दृश्यापासून सिनेमा सुरू होतो आणि त्याच दृश्यावर संपतो तो भिकूच्या गँगमधला झिंज्या वाढवलेला-अबोल काळा गुंड, बिल्डर मल्होत्रा, भाउचा आडदांड शरीररक्षक आणि मुंबईचा पाउस... या सगळय़ांशिवाय 'सत्या' पूर्णच होउ शकत नाही.
सौरभ शुक्ला आणि अनुराग कश्यप यांनी 'सत्या' लिहिलाय. काय सांगायचंय हे  नेमकं ठाउक असलं की किती बंदिस्त पटकथा लिहिता येते आणि साधेसोपे संवादही कसे पुरेसे ठरतात, याचा आदर्श म्हणून 'सत्या'चं उदाहरण देता येईल. 
त्यांच्या कथा-पटकथेत नायक-नायिका-खलनायक अशी लेबलं लावलेली पात्रं नाहीत. आहेत ती सगळी हाडामांसाची, तुमच्याआमच्यासारखी माणसं... आपल्यापेक्षा विलक्षण वेगळय़ा जगातल्या वेगवान घटनांच्या आवर्तानं एकत्र आणलेली... पण माणसंच.
अतिरंजित नाटय़ावर प्रचंड विश्वास असलेल्या हिंदी सिनेमावाल्यांची (यात आपला प्रेक्षकांचाही समावेश आहे.) अशी एक लाडकी समजूत आहे की, कुणी सिनेमात वास्तवाचं चित्रण केलं तर ती रटाळ डॉक्युमेंट्री होते. भडक नाटय़ नसेल तर सिनेमा मिळमिळीत होतो. या समजुतीला 'सत्या' सुरुंग लावतो. 
इथे हिंसाचाराचे, मारामाऱयांचे, गोळीबारांचे, रक्तपातांचे विलक्षण बोल्ड, प्रत्ययकारी प्रसंग आहेत. पात्रांची 'भ'आणि 'म'च्या बाराखडीतल्या अपशब्दांनी भरलेली भाषा आहे. पण, पडद्यावर कुणाचाही खून पाहून आपण टाळय़ा पिटू शकत नाही, कुणाच्या शिवीला 'दाद' देता येत नाही. शाब्दिक-शारीरिक हिंसेचा प्रत्येक प्रसंग आपलं काळीज गोठवून टाकतो.
हिंसा हे उदरनिर्वाहाचं साधन असू नये, असा 'सत्या'चा स्पष्ट संदेश आहे; पण त्यासाठी पडद्यावर भाषणबाजी घडत नाही, उरबडवेपणा घडत नाही. प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याचा भंपकपणा घडत नाही. कारण, 'सत्या' प्रेक्षकांना बुद्धिमान मानणारा सिनेमा आहे. 'तुम्ही थंड एसीत, गुबगुबीत खुर्चीत बसा मस्त रेलून, तुमचं फुल मनोरंजन करून टाकतो आम्ही', असा घाउक मक्ता घेतलेला सिनेमा नाही. इथे दाराबाहेरअर्ध्या तिकिटाबरोबर बुद्धीही दरवानाकडे सोपवून आत येता येत नाही. तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मेंदूला चालना मिळतेच आणि प्रचंड अस्वस्थता दाटून येते 'सत्या' पाहताना.
कारण सौरभ-अनुराग यांनी सिनेमात जे काही घडवलंय ते त्यातली कारागिरी कुठेही दिसणार नाही, अशा चलाखीनं. त्यामुळे, मुंबईतल्या इतिहासातलं एक पानचं आपण वाचतो आहोत, अशी भावना होते. पण हा इतिहास रूक्ष नाही. यातलं प्रेम-हिंसा-वेदना-कौर्य-माणुसकी-हळवेपणा-कर्तव्यकठोर निष्ठुरता यांचं नाटय़ माणसाच्या माणूसपणातून खुलत जातं. सिनेमात दृश्यं बोलली पाहिजेत, पात्रांची टकळी नव्हे, याचं अचूक भान लेखकांना आहे.
सौरभ-अनुराग यांचा कागदावरचा 'सत्या' पडद्यावर साकारताना दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं स्वत:ला सर्वस्वानं पणाला लावलंय. धंदेवाईक सिनेमाचे जवळपास सर्वच्या सर्व नियम अडगळीत फेकून देण्याचं धैर्य दाखवून रामूनं बंडाचा झेंडा रोवलाय. चाकोरीबाहेरची कथा, नवे लेखक यांच्याबरोबरच त्यानं अनेक नवे बिन-ओळखीचे कलाकार घेतले आहेत. उर्मिला मातोंडकर, परेश रावळ आणि काही अंशी मनोज बाजपेयी-सौरभ शुक्ला (टीव्ही सिरियल्समुळे ओळखीचे), मकरंद देशपांडे वगळता फारसा पाहिलेला एकही चेहरा नाही. उर्मिला-परेश यांच्याशिवाय कुणाला मार्केट व्हॅल्यू नाही. रामूचा सिनेमा असूनही इथे उर्मिला ग्लॅमरस नाही. सिनेमात विनोदी पात्राचा रिलिफ नाही, सगळी मांडणी कल्पितापेक्षा सत्याच्या जवळ जाणारी. धंदेवाईक हिंदी सिनेमात असा सिनेमा काढण्याला आत्मघातकी भिकेचे डोहाळे मानतात.
पण, रामू असली धाडसं करण्यात माहिर आहे. 'सत्या' त्यानं कमालीच्या निष्ठेनं काढलेला आहे. ही निष्ठा आहे अर्थपूर्ण बुद्धिमान सिनेमावरची. या माध्यमातल्या नवनव्या वाटा धुंडाळण्याची. जुने नियम मोडून नवे प्रस्थापित करण्याची. इथे सत्या या एका माणसाचं सूत्र धरून सिनेमा पुढे सरकतो पण, तो फक्त 'कॅटलिस्ट' आहे. त्यात उर्मिला ही 'नायिका'ही दिलीये. पण, 'आणि ते सुखाने नांदू लागले' पद्धतीचा सुखांत घडवलेला नाही. नायिका पावसात (एकाच कडव्याचं) गाणं म्हणते (तेही न भिजता), दोघांमध्ये प्रेमही निर्माण होतं. पण, या प्रेमाला कथानकात विशिष्ट प्रयोजन आहे.
सत्याला हिंसेतून इतरांना होणाऱया वेदनेचा शोध लागतो विद्यामुळे. एका थिएटरमध्ये त्याच्यामुळेच झालेल्या पळापळीत चेंगरून काही निरपराध माणसं ठार होतात तेव्हा त्याला कळतं, की यात कदाचित विद्याही असू शकली असती. तिला गमावण्याच्या कल्पनेनं जर आपल्याला इतक्या वेदना होतात, तर ज्यांना खरोखरीच जवळची माणसं गमावावी लागतात, त्यांचं काय होत असेल?
नायक-नायिकेच्या प्रेमाचं अति उदात्तीकरणही लेखक-दिग्दर्शकानं टाळलंय. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढंच महत्त्वाचं, बाकी सर्व फजूल' असं सुरुवातीला म्हणणारी विद्या पोलिसांकडून तिला सत्याचं खरं रूप समजल्यावर कोलमडते. जिवाच्या करारानं फक्त तिला भेटण्यासाठी आलेल्या सत्यासाठी ती दरवाजाही उघडत नाही, उघडू धजत नाही, हे सिनेमाच्या मांडणीशी सुसंगतच आहे.
'सत्या'मध्ये नायक-नायिकेइतकंच महत्त्व भिकू आणि त्याच्या बायकोमधल्या खट्टय़ामिठय़ा नात्याला आहे. हिंदी रजतपटावर आजवर इतकी आक्रमक (प्रेमात आणि भांडणातही) आणि लोभस जोडी कुणी चितारली नसेल. या दोघांमधल्या लुटुपुटीच्या झटापटी आणि आक्रमक प्रेम हा 'सत्या'मधला अविस्मरणीय भाग आहे.
'सत्या'मधली हिंसा कुठेही सुचक, सौम्य नाही. वास्तवात जशी घडते तशी मारामारी, खुनाखुनी 'सत्या'मध्ये घडते. रामू हिंसा दाखवताना काही लपवत नाही, तसंच पदरचं 'इंटरप्रिटेशन'ही जोडत नाही. ती 'ग्लॅमरस' करत नाही. ही हिंसा पाहताना पोटात ढवळून मळमळल्यासारखं वाटतं, घृणा वाटते.
खरंतर 'सत्या' पाहता पाहता आपण सुरुवातीला (हिंदी सिनेमांनी लावलेल्या सवयीनुसार) सत्याला हीरो कल्पून त्याच्या बाजूने विचार करू लागतो. कल्लूमामा, भोळे, चंदर आणि विशेषत: भिकू यांच्याबद्दल आपुलकीची भावनाही मनात येते आपल्या. सत्या-भिकू आणि गँग प्रतिपक्षावर 'विजय' मिळवतात तेव्हा आनंदही होतो आपल्याला. पण, रामूची तटस्थ हाताळणी आपल्याला अपरिहार्य शेवटाची सतत जाणीव करून देत राहते. त्यामुळे, आपल्या ओळखीची ही पात्रं एकापाठोपाठ एक मरत जातात तेव्हा आपल्या 'माहितीचा माणूस गेल्याची हळहळ वाटते' 'आप्तेष्ट' गमावल्याचं दु:ख होत नाही.
हा परिणाम साधण्यात जॉर्ज हूपर आणि मझहर हमरान हे छायालेखकही जबरदस्त कामगिरी करून जातात. एकतर रामूनं आजवर हिंदी सिनेमांनी सतत झाकून ठेवलेली मुंबई या सिनेमासाठी धुंडाळून काढलीये. तुम्हाआम्हाला या (किंवा अशा) जीर्णशीर्ण चाळी, चिंचोळय़ा गल्ल्या, 'डान्सिंग बार' अर्धवट बांधकाम झालेल्या इमारती, झोपडपट्टय़ा, गोठे, गटारं रोज पाहावी-भोगावी लागतात. पण, मुंबईत घडणाऱया हिंदी सिनेमांची मजल चकचकीत लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या पुढे जात नाही. गेलीच तर स्टुडिओत लावलेल्या 'बस्ती'च्या टिपीकल सेटपर्यंत. रामूनं मात्र खरी मुंबई अस्सल रूपात पडद्यावर आणलीये आणि जॉर्ज-मजहर जोडीनं अफलातून टिपलीये.
मुंबईच्या बाह्य चित्रणात नैसर्गिक प्रकाश आणि पाउस वापरून जॉर्ज-मजहर यांनी संपूर्ण सिनेमाला एक गहिरी उदास छटा दिलीये. बंदिस्त चित्रणातही खिडक्या-दरवाजांतून झिरपणारा जेमतेम प्रकाश आणि भयाण पिवळे बल्ब, निस्तेज प्रकाशणाऱया टय़ूबलायटी हे प्रकाशाचे स्रोत गृहीत धरून अंधाराला उठाव देणारी प्रकाशयोजना केली आहे. त्यामुळे 'सत्या'चं दृश्यरूप अन्य सिनेमांपेक्षा खूप्च वेगळं झालंय.
सुरेख, सुबक, सुंदर दृश्यचौकटी रचून 'क्या शॉट लिया बाप' किंवा 'क्या सॉलिड अँगल लगायेला है' असल्या भाकड कॉम्लेमेंट्स मिळवण्याचा मोहही दिग्दर्शक, छायालेखकांनी टाळलाय. जॉर्ज-मजहर यांचा कॅमेरा जणू एक मूक साक्षीदार बनून त्या-त्या प्रसंगात थेट उतरतो. तिथे दृश्य'रचना' न करता 'घटनां'चं चित्रीकरण करतो. अर्थात, जिथे आवश्यक असेल तिथे तो 'टाईट क्लोजअप'मध्ये पात्रांच्या चेहऱयावरची रेष अन् रेष टिपण्यातही कसूर करीत नाही. ऍक्शन सीन आहेत म्हणून प्रत्येक प्रसंगाचे छोटे छोटे तुकडे पाडून संकलनातून वेग देण्याचा बालिशपणा टाळला आहे.
मुंबईतला पाउस 'सत्या'मध्ये वापरून घेण्याची कल्पना 'सत्या'कारांपैकी ज्या कुणाला सुचली असेल, त्याला आपला सलाम! हा पाउस नसता तर 'सत्या'ची परिणामकारकता निम्म्यानं घटली असती. या पावसामुळे 'सत्या'मधल्या घटनांना काळाची कंटिन्यूटी लाभली आहे. पावसाच्या आगमनाआधीच्या फक्त ढग भरून येण्याच्या, घामट उकाडय़ाच्या काळात सिनेमा सुरू होतो आणि गणेशविर्सजनाच्या धामधुमीत संपतो. हे सर्व सिनेमात सलग दोन-तीन महिन्यांत घडत नाही. मध्ये काही वर्षे लोटली असतील. तरी सिनेमातले बहुतेक प्रसंग पावसाच्या पार्श्वभूमीवर घडतात. 'सत्या'ला विद्या भेटते तेव्हा तीही एकदा 'बरसते बादलों के पार' दिसते. पण, तिच्या आगमनानंतर हवा स्वच्छ होते. पाउस ओसरतो, सिनेमातला आसमंत किंचीत स्वच्छ, प्रकाशमान दिसू लागतो.
कारण 'सत्या'मधला पाउस रोमँटिक नाही. अस्सल मुंबईकराला ठाउक असलेला गाडय़ा बंद पाडणारा, रस्त्यांच्या नद्या बनवणारा, कचरा कुजवून मयतासारखी दुर्गंधी पसरवणारा चिप्प-किचकिचीत पाउस आहे. हा पाउस आणि त्याचं ढगाळ वातावरण 'सत्या'च्या बाह्यचित्रणात आपोआपच कुंदपणा आणतं. हाच कुबट-कुंदपणा छायालेखकांनी बंदिस्त चित्रणातही कायम ठेवलाय.
अशा सिनेमात खरंतर ड्रेस डिझायनरला वावच नाही. पण, मनीष मल्होत्रानं प्रत्येक पात्राचं चित्र मनात पक्कं उभं राहील, असे साधे पण वैशिष्टय़पूर्ण कपडे देउन वेशभूषेचं महत्त्व ठसवलं आहे. जीन्स आणि जाड कॉटनचे एकाच डिझाइनचे प्लेन रंगाचे शर्ट घालणारा सत्या, फिकट, स्वस्त पण उत्तम अभिरुचीदर्शक रंगसंगतीच्या साडय़ा नेसणारी विद्या, कोणतीही पँट आणि कोणताही भडक-चंगी भंगी डिझाइनचा, बटणं उघडी टाकलेला शर्ट-आत गडद रंगाचं बनियन-गळय़ात जाड बटबटीत चेन अशा वेशातला भिकू, बनियनवर चुकून कधी घातला तर शर्ट आणि जोडीला लुंगी नेसणारा गोलमटोल दाढीदीक्षित कल्लूमामा, जीन्सवर खादीचे मळखाउ कुडते घालणारा लांब केसवाला अबोल गुंड, बाहेर नटण्यामुरडण्याची हौस असलेली आणि घरातही थोडय़ा गडद डिझाइनच्या साडय़ा वापरणारी भिकूची बायको या पात्रांचे कपडे त्यांच्या स्वभावांना-कृतींना साजून दिसतात.
या सिनेमात कपडय़ांइतकेच भूमिकांना साजून दिसतात ते अपरिचित पण गुणवान अभिनेते. 'सत्या'मधल्या अभिनेत्यांचे सरळ दोन वर्ग पाडता येतात. एक वर्ग चक्रवर्ती उर्फ चक्री या सत्याची शिषर्क भूमिका करणाऱया दक्षिणेतल्या नामवंत (पण हिंदीत अनोळखी) नटाचा. तो काही फार ताकदीचा नट नाही. पण, सत्या साकारताना महत्त्वाचा होतो तो बुजलेपणा, तोडकीमोडकी हिंदी भाषा आणि घुम्या एकलकोंडय़ा माणसाचा 'लुक'. तो चक्रीकडे आहे. तो सत्या 'दिसतो' आणि तेवढंच त्याचं काम आहे. या वर्गात बियरबारचा मालक, जग्गा, बिल्डर मल्होत्रा, गुरुनारायण ही 'दिसण्यावर' भागणारी पात्रं.
दुसरा वर्ग आहे भिकूची भूमिका करणाऱया मनोज बाजपेयीचा, शंभर नंबरी अभिनय करणाऱया अस्सल कलावंतांचा. यात अग्रभागी आहे तो मनोज बाजपेयी. 'तमन्ना', 'दौड' वगैरे सिनेमांमध्ये फुटकळ भूमिका केलेल्या मनोजने 'सत्या'मध्ये अविस्मरणीय अभिनयाविष्कार केला आहे. सिनेमाचं नाव 'सत्या' असलं तरी बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक मात्र भिकू म्हात्रेचंच नाव घोळवत बाहेर पडेल, असला जबरदस्त परफॉर्मन्स आहे त्याचा. ढोबळमानानं अरुण गवळीवर बेतलेला भिकू म्हात्रे पडद्यावर पहिल्यांदा येतो तेव्हापासून तो मरेपर्यंत प्रेक्षक त्याच्या कह्यातच जाताता. 
घटकेत खेळकर तर घटकेत हिंस्त्र होणारं त्याचं हसू, एकूण वावरातली बिनधास्त बेफिकिरी, बायकोबरोबरचा रांगडा रोमान्स, मारामाऱयांमध्ये नजरेत साकळून येणारी आरपार खुनशी वृत्ती, सतत उसळणारा-विझणारा संताप, दिलेर वृत्ती, आयुष्यातला प्रत्येक क्षण पुरेपूर भोगण्याचा स्वभाव, सर्व हालचालींमध्ये जाणवणारी अस्वस्थ उर्जा... मनोजनं हे सगळं सहजगत्या स्वत:मध्ये मुरवून घेतलंय. दोन गाण्यांमध्ये त्याचा सडकछाप नाच पाहा, त्याच्या नाचात, चेहरे वेडेविद्रे करण्यात हिंस्त्रपणाची झाक आहे आणि आयुष्याबद्दलची असोशीसुद्धा. हॅट्स ऑफ टू मनोज!
या वर्गात उर्मिलाचाही समावेश करायला हवा. मुळात खूप कमी फुटेजची, ग्लॅमरस दिसण्याची सुतराम संधी नसलेली ही भूमिका तिनं स्वीकारणचं कौतुकास्पद. त्यातही तिनं विद्याचा फक्त बाह्य वेषच स्वीकारलेला नाही तर एका साध्या पण सत्त्वशील मुलीचं अंतरंगही आत्मसात केलंय. मुंबईतल्या एका मातब्बर पुढाऱयाची आठवण करून देणारा भाउ साकारताना गोविंद नामदेव यांनी नक्कल मारण्याचा शॉर्टकट टाळून ती माफिया मनोवृत्ती भिनवून घेतली आहे. दुय्यम फळीत कमाल केलीये शेफाली छायानं. भिकूच्या बायकोचा मराठमोळा ठसका तिनं अत्यंत स्वाभाविक शैली साकारून मनोजला तोडीस तोड साथ दिलीये.
परेश रावळ, सौरभ शुक्ला, मकरंद देशपांडे, कै. राजेश जोशी यांच्या बरोबरीनं लक्षात राहतात ते बडबडय़ा हसतमुख चंदर आणि करारी इन्स्पेक्टर खांडिलकर झालेले दोन अनाम कलाकार. ते आता फार काळ अनोळखी राहू शकणार नाहीत.
'सत्या'मध्ये गाण्यांना जागा नाहीत. तरीही तीन पूर्ण गाणी आणि दोन एकेका कडव्यात उरकलेली गाणी सिनेमात आहेत. 
'गोली मार भेजे में' या गुंडांच्या विजयोत्सवी गाण्यात गुलजार यांनी खास सडकछाप भाषा वापरलीये. दारुची नशा, सिग्र्रेटचा धूर विशालनं संगीतात घोळवलाय आणि त्याचं चित्रण करताना रामूनं खास पुरुषी रासवटपणाचं दर्शन घडवलंय. 'बादलोंसे काट काटे कर' या सत्याच्या प्रेमभावनेला 'एक्स्प्रेशन' देणाऱया गाण्यात भूपेंद्र यांचा घनगंभीर आवाज कानामनाला सुखावून जातो. 'सपनेमें मिलती है'मध्ये सुरेश वाडकर बऱयाच काळानं खेळकर मूडमध्ये फिट बसलेला ऐकू येतो. 'गीला गीला पानी' आणि 'तू मेरे पास भी है' ही दोन्ही गाणी एकेका कडव्यात उडवून रामूनं हुशारी दाखवलीये. पहिल्यात उर्मिला रस्त्यावर चिंब स्थितीत पाहावी लागली असती (तश् एरवी पाहायला आवडेलही, पण 'सत्या'मध्ये विसंगत झालं असतं) आणि दुसऱया गाण्यात चक्री बसल्याबसल्या खांदे उडवत 'नाचताना' पाहावा लागला असता. (म्हणजे 'सत्या'च्या व्यक्तिरेखेचे बारा वाजले असते.)
'सत्या'ला संदीप चौटा यानं दिलेलं पार्श्वसंगीत हा अभ्यासाचा आणि स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल. व्हायोलिन्सचा समूह, ड्रमचे ठेके, ड्रमच्या झांजेची चुट्चुट्, बासरी, पाश्चात्य आलापीचा समूहस्वर, संस्कृत मंत्र आणि 'हो हो हो' असा हिंस्त्र सामूहिक उच्चार यातून त्यानं 'सत्या'चं परिणामकारक पार्श्वसंगीत निर्माण केलंय. एका प्रसंगात एकाच वाद्याच्या लयबद्ध वादनातून पुढच्या प्रसंगातून नांदी घडवायची आणि सलगपणे त्या प्रसंगाला भिडायचं, अशा खुबीनं रचलेल्या पार्श्वसंगीतामुळे 'सत्या'च्या गोळीबंद एकात्म परिणामात मोठी भर पडते.
जिथे बऱया सिनेमांचाही वर्षानुवर्षं दुष्काळ असतो, अशा हिंदी सिनेमाचं बीज टाकलंय. ते फुलवायची जबाबदारी आपली आहे. कारण, सत्या हा कोणी आपल्या बाहेरचा माणूस नाही ती एक प्रवृत्ती आहे... आपल्या आतलीच. ती जेव्हा प्रबळ होउ पाहील तेव्हा 'सत्या'ची आपण पाहिलेली परवड तिला रोखेल... आपल्यातल्या माणसावर आपल्यातलं जनावर मात करू धजणार नाही.

11 comments:

  1. सिनेमा तर अर्थात आवडलेलाच होता.. पण इतक्या बारकाईने त्याचं विश्लेषण .. रसग्रहण वाचून हरखून गेलो.. अप्रतिम डिटेलिंग केली आहे...

    ReplyDelete
  2. Have always been a big fan of your writing and reviews since 1997.. came across this blog just today. Awesome!!

    ReplyDelete
  3. मी आदल्या दिवशी चित्रपट पाहून दुसऱ्या दिवशी मटात परीक्षण वाचले होते. ते वाचून मी हरखून गेलो होते. त्यानंतर तुमची परीक्षण सतत वाचत राहिलो.

    ReplyDelete
  4. Nostalgic ! मस्त. पुन्हा आठवत राहिलो !

    ReplyDelete
  5. पुन्हा एकदा आख्खा 'सत्या' पाहिला..!

    ReplyDelete
  6. इतक्या वर्षांनंतर आज पुन्हा वाचलं तरीही तितकंच ताज आणि टवटवीत ! ग्रेट !!👍

    ReplyDelete
  7. पुन्हा एकदा परीक्षण वाचून दिल खुश झाला , सत्याने मुंबईच्या काळ्या दुनियेला बोले तो जैसे का तैसा दावेयला है
    ही दुनिया त्यातले खाचखळगे ,त्यातील उत्साह ,अगतिकता हे मास्तुरे म्हणून मी फार जवळून पाहिलेय
    माझी खूप चांगली मुलं यात वाया गेली , त्यांची ऊर्जा ध्येयवादी कामात लावण्यासाठी मी केलेला आटापिटा फुकट गेला
    माझी काही मुलं सत्या बनून उध्वस्त झाली काही भिकू म्हात्रे बनून दारुगोळा सारखे आयुष्याची दिवाळी करून गेले हे जेवढे परिणामकारक रित्या सत्या ने बंदिस्त कथे द्वारे मांडले तेव्हढेच त्याचे परीक्षण करताना आपण केलेले विश्लेषण ,संश्लेषण बोले तो जबरि मांडले
    शेयर करतो

    ReplyDelete
  8. मस्त झालाय लेख

    ReplyDelete