चांगल्या
लेखकाने पहिल्या वाक्यातच वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण केली पाहिजे आणि वाचकाला आपल्या शब्दांच्या बळावर लेखनात गुंतवून, त्याचं बखोट पकडून शेवटापर्यंत खेचत नेलं पाहिजे, असं म्हणतात… अमोल
उद्गीरकर याचे हे पहिलेच पुस्तक एक पायरी पुढेच आहे… ते
वाचकाच्या मनात शीर्षकापासूनच उत्सुकता निर्माण करतं....
न-नायक?…
नायक आपल्याला माहिती आहे, अँटिहिरो
अर्थात प्रतिनायक माहिती आहे, प्रोटॅगॉनिस्ट
म्हणजे (नायकत्वाच्या
फिल्मी सद्गुणांचा भार नसलेली) मुख्य
व्यक्तिरेखा आता प्रचलित होऊ लागली आहे… पण, हा न-नायक
काय प्रकार आहे?…
पुस्तकाच्या
शीर्षकाने बुचकळ्यात पडून तुम्ही पुढे अनुक्रमणिका चाळाल तेव्हा आणखी गोंधळून जाल… यांतली ऋषी कपूर, तबू, अक्षय खन्ना, फरहान
अख्तर, अनु
अग्रवाल यांच्यासारखी नावं आपल्याला प्रस्थापित धाटणीचे, मुख्य प्रवाहातले
नायक आणि नायिका म्हणून माहिती आहेत… डॅनी
डेंगझोपा, मोहनीश
बहल, बमन
इराणी यांच्यासारखे काही अभिनेते थेट नायक नसले तरी मुख्य प्रवाहात दमदार भूमिकांमुळे स्टार आहेत… जिमी
शेरगिल, अर्शद
वारसी हे तर नायकपदाला स्पर्श करून आलेले आणि अनेक प्रस्थापित नायकांपेक्षा अधिक टॅलेंटेड असूनही दुर्दैवाने दुय्यम भूमिकांमध्येच जखडून राहिलेले अफलातून अभिनेते… राधिका
आपटे, स्वरा
भास्कर, मनोज
बाजपेयी, इरफान, नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज
त्रिपाठी, रिचा
चढ्ढा, राजकुमार
राव यांच्यासारखे अभिनेते-अभिनेत्री सिनेमासृष्टीत आले, तेव्हा फारसे परिचित नव्हते, लोकप्रिय
होण्यासाठी आवश्यक साचेबंद ‘आकर्षक’ व्यक्तिमत्त्वं त्यांच्यापाशी नव्हती, पण
आज ते बाकायदा स्टार आहेत… ज्याला
मुंबईत वीसेक वर्षांपूर्वी अर्धपोटी राहावं लागलं होतं, वाहनाचे
पैसे वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटरची तंगडतोड करावी लागली होती, तो
नवाजुद्दीन सिद्दिकीसारखा अभिनेता आज त्याच मुंबईत एक बंगला बांधण्याइतका मोठा स्टार बनलेला आहे… या
अनुक्रमणिकेत प्रकाश बेलावडी, शफीक
खान, राजेश
विवेक यांसारखी काही नावं अशीही आहेत, जी
आजही आपल्याला नीटशी माहिती नाहीत… त्यांचे
फोटो पाहिल्यावर लक्षात येईल, अच्छा, हा होय, याला
पाहिलं होतं अमुक सिनेमात, फार छान काम करतो, पण
नाव लक्षात नव्हतं… म्हणजे, मुख्य प्रवाहातले नायक-नायिका
म्हणून यशस्वी असलेले, संघर्ष
करून यशस्वी झालेले आणि संघर्ष अजूनही सुरूच असलेले अशा तिन्ही प्रकारच्या कलावंतांची भेट या पुस्तकात होते आहे… पण हे सगळे न-नायक
कसे?
ते समजून घेण्यासाठी आधी हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहातला ‘नायक’ समजून घ्यावा लागेल… त्याचं
बॅगेज समजून घ्यावं लागेल…
हिंदी सिनेमाच्या लोकप्रिय नायकाने खूप काळ (१९५०-६०चं
दशक) प्रभु
रामचंद्राचा आदर्श बाळगला होता… सद्गुणी, सदाचारी, सज्जन, सर्वगुणसंपन्न… आईच्या हातचा गाजर हलवा खाऊन खाऊन तेजतर्रार झालेली बुद्धी वापरून बीएमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट येणारा, मेहनत
करून गरीब आईबापांचे पांग फेडणारा, सदैव
सत्याच्या वाटेने चालणारा, नायिका
ओल्याचिंब स्थितीत शेकोटीजवळ एकटी भेटली, गळ्यात पडली
तरी (अनेकदा नतद्रष्टपणे) संयम पाळणारा आणि खलनायकाचं हृदयपरिवर्तन करण्यासाठी दोनपाच ठोसे लगावणे अत्यावश्यक झाले आहे, याची
खात्री पटल्यावरच कमीत कमी इजा होईल, अशा
बेताने हलकीफुलकी मारामारी करून खलनायकाला इमाने इतबारे- नेहमी
मारामारी संपल्यावरच पोहोचणाऱ्या- पोलिसांकडे सोपवणारा धीरोदात्त सज्जन वीरपुरुष… अधूनमधून
हिंदी सिनेमात या साच्याच्या विपरीत नायक सादर झालेच, नाही
असे नाही, पण
ते रुचिपालटापुरते… शिवाय, बाहेरून
कितीही ओबडधोबड, अनैतिक
धंद्यांमध्ये बरबटलेले असले तरी मनाने अतिशय चांगले. स्मगलिंगपासून
पाकीटमारी, दरोडेखोरीपर्यंतचे
सगळे गैरधंदे निव्वळ मजबुरीतून किंवा सर्व प्रकारची हिंसा निव्वळ व्यवस्थेविरोधात बंड म्हणून करावे लागणारे नायक… म्हणजे
अँटिहीरोच्या खलनायकी
बाजाच्या भूमिकेतही सद्गुणी नायकत्वाचं ओझं बाळगावं लागायचंच नायकाला… १९९०च्या
दशकात हिंदी सिनेमा हळुहळू कूस पालटायला लागला आणि त्या दशकाच्या अखेरीपर्यंत काही वेगळीच माणसं सिनेमाचे तोवरचे नियम मोडू तोडू लागली… नव्या
सहस्रक-कम-शतकाच्या सुरुवातीला ही पडझड तीव्र झाली आणि या शतकाची दोन दशकं पूर्ण होईपर्यंत अपवाद हाच नियम बनतो आहे की काय, अशी
परिस्थिती आली आहे… नायकाचं
आकर्षक रंगरूप आणि सुपरस्टारडम लाभलेले सलमान खान, शाहरूख
खान, हृतिक
रोशन, अक्षय
कुमार, रंगरूपाचा
भाग वगळून स्टारडम लाभलेला अजय देवगण असे मेगास्टार सिनेमात आजही आहेत, त्यांची
बॉक्स ऑफिसवरची क्रेझही बऱ्याच प्रमाणात बरकरार आहेच… पण, यांच्यातल्या अनेकांनी आता नायकाचा टिपिकल साचा मोडून काढणाऱ्या ‘प्रोटॅगॉनिस्ट’ म्हणजे ‘प्रमुख
व्यक्तिरेखा’ साकारल्या आहेत (अक्षय
कुमारचं वैविध्य फक्त वेगवेगळ्या गेटअपपुरतंच राहतं, तो
कोणत्याच व्यक्तिरेखेच्या त्वचेआत शिरलाय, असं
वाटतच नाही, ते
सोडा)… त्याचबरोबर (बऱ्याच अंशी ओटीटी माध्यमांच्या कृपेने) या
नायकांच्या साचेबंद सिनेमांपेक्षा अधिक संख्येने वेगळ्या कथा मांडणारे, प्रयोगशील
सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. ज्यांना
एरवी नायक सोडा, सहाय्यक
भूमिकांमध्येही कुणी संधी दिली नसती, एक्स्ट्रा
बनूनच राहावं लागलं असतं (काहींच्या
कारकीर्दीचा बराच काळ तसा गेलेलाही आहे), असे अनेक वयोगटांमधले कलाकार आज प्रमुख किंवा लक्षवेधी भूमिकांमध्ये झळकताना दिसतात. रणबीर
कपूर, रणवीर
सिंग आणि आयुष्मान खुराणा या आजच्या पिढीतल्या स्टार हीरोंच्या कारकीर्दींवर नजर टाकली तर नायकाचीच कल्पना आता किती न-नायकासारखी
व्हायला लागली आहे, हे
दिसून येईल… या
स्थित्यंतराच्या कालखंडाचे खरे नायक नेहमीचे ‘नायक’ नाहीत तर या पुस्तकात ज्यांना सलाम ठोकला आहे ते ‘न-नायक’ या
कालखंडावर ठसठशीत नाममुद्रा उमटवून आहेत.
हिंदी सिनेमाचा सगळा मोहराच बदलून टाकणाऱ्या या बदलांच्या सुरुवातीचा नेमका टप्पा म्हणून एकच एक निश्चित काळ, सिनेमा
किंवा दिग्दर्शक ठरवणं अवघड आहे- पण, तरीही ढोबळमानाने दोन दिग्दर्शकांकडे ही लाट निर्माण करण्याचं श्रेय जाईल… एक
होता शेखर कपूर, त्याच्या
बँडिट क्वीन या सिनेमातून तेव्हा अनोळखी असलेले जबरदस्त कॅलिबरचे दिल्लीतले कलाकार एकगठ्ठा हिंदी सिनेमाच्या मुंबईत येऊन पोहोचले… त्या सिनेमात फुटकळातली फुटकळ भूमिका करणारे अनेक कलाकार आज या पुस्तकात मानाचं स्थान मिळण्याइतके नामांकित झाले आहेत… एनएसडी
अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची बोट मुंबईच्या किनाऱ्यावर फुटण्याची तुलना पन्नासेक वर्षांपूर्वी फिल्म इन्स्टिट्यूटची एक फळी हिंदी सिनेमात धडकली त्याच्याशीच होऊ शकते… जया
भादुरी, शत्रुघ्न
सिन्हा, डॅनी
डेंग्झोपा, असरानी, सुभाष घई, विजय
अरोरा, अनिल
धवन आदी मंडळी तेव्हा एकगठ्ठा मुंबईत अवतरली होती… अभिनय
ही काय शिकण्याची गोष्ट आहे काय, सिनेमा
शिकून बनवता येतो काय, या
तुच्छतानिदर्शक प्रश्नांना आणि वृत्तीला तेव्हा ते पुरून उरले होते, यावेळी
हे पुरून उरले… तेव्हा
फिल्म इन्स्टिट्यूटवाल्यांना हिंदी सिनेमातल्या प्रस्थापित संकल्पनांशी जुळवून घ्यावं लागलं होतं, त्या
साच्यात फिट्ट बसावं लागलं होतं… काळाच्या
पाठबळामुळे एनएसडीवाल्यांनी मात्र साचाच मोडून टाकला…
तो मोडण्याचं आणि न-नायकांची
सद्दी सुरू करण्याचं दुसरं प्रमुख श्रेय निर्विवादपणे रामगोपाल वर्माचं. आज
सर्वार्थाने ‘भलत्या’च
कारणांनी चर्चेत राहणाऱ्या या दिग्दर्शकाच्या ‘सत्या’ने
न-नायकांना
पहिलं मोठं यश मिळवून दिलं आणि हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहाच्या कथनशैलीला नंतर जे भगदाड पडणार होतं त्याचा पहिला तडा दिला… हिंदी
सिनेमात स्फोटक टॅलेंट आणण्याच्या बाबतीतही ‘सत्या’ने ‘बँडिट
क्वीन’च्या
बरोबरीची कामगिरी केली. सौरभ
शुक्ला आणि अनुराग कश्यप हे अभिनय-दिग्दर्शनगुणी
लेखकद्वय असो की मनोज बाजपेयीसारखा न-नायकांचा
महानायक असो (आज
हिंदी सिनेमात उत्तम काम करून सुस्थापित झालेली ‘अनलाइकली हीरों’ची
एक अख्खी फळी एकट्या मनोज बाजपेयीकडे पाहून हिंदी सिनेमात आली आहे आणि मनोजबरोबर स्ट्रगल करणाऱ्या कित्येकांना त्याने त्या काळात स्वहस्ते रोट्या लाटून खिलवल्या आहेत… अक्षरश: पोसलं आहे…)- या
सगळ्यांना एक फार मोठा ब्रेक आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे हिंदी सिनेमात आपल्यासारख्यांनाही जागा असू शकते हा विश्वास ‘सत्या’ने दिला… कौन, सरकार, कंपनी
आदी सिनेमांनंतर रामू भरकटत गेला आणि त्याचं बॅटन पुढे अनुराग कश्यपने समर्थपणे पेललं… पुढे
नेलं… त्याच्या
गँग्ज ऑफ वासेपूरने पुन्हा बँडिट क्वीन आणि सत्याप्रमाणेच
हिंदी सिनेमाच्या पडद्यावर एक निर्णायक स्फोट केला… इथून
पुढे ‘लोकप्रिय’ सिनेमाची व्याख्याच त्याने सैल करून टाकली आणि त्या व्याख्येत कितीतरी अचाट प्रयोग बसू शकतील याची व्यवस्था केली… त्याच्या
पुढच्या सिनेमांमधून नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज
त्रिपाठी, पीयूष
मिश्रा, केके
मेनन, रिचा
चढ्ढा, माही
गिल, राधिका
आपटे यांच्यासारखे अनेक न-नायक-नायिका हिंदी सिनेमाला गवसले आहेत…
न-नायक म्हणजे कोण या प्रश्नाचं उत्तर हळुहळू इथे आपल्याला गवसायला लागतं… टिपिकल
नायकाचं रंगरूप नसताना हिंदी सिनेमात ज्यांच्याभोवती कथा गुंफल्या जात आहेत, ज्यांना
मुख्य व्यक्तिरेखेचा मान मिळतो आहे, ते
तर बाय डिफॉल्ट न-नायक
आहेतच, पण
जे सिनेमात मुख्य भूमिकेत नाहीत, तरीही, सिनेमाची जातकुळी कोणतीही असली तरी स्वत:कडे
सहजाभिनयाने लक्ष वेधून घेतात, सिनेमा
संपल्यावर आपल्या (अनेकदा
नायकनायिका, प्रमुख व्यक्तिरेखांपेक्षा अधिक) लक्षात
राहतात, तेही
न-नायक
आहेत… बधाई
हो, या
सिनेमात रूढार्थाने आयुष्मान खुराणा हा नायक आहे, पण
खरे न-नायक-नायिका आहेत गजराज राव आणि नीना गुप्ता. ‘कहानी,’ ‘तलाश’, या
सिनेमांमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी सहाय्यक व्यक्तिरेखांमध्ये आहे, त्या
सिनेमांमध्ये मुख्य कलावंतांच्या जबरदस्त भूमिका आहेत. तरीही
तो आपल्या डोक्यात फिट बसतो… हे
त्याचं न-नायकत्व…
आता यात ऋषी कपूर, तबू, फरहान अख्तर, अक्षय
खन्ना, अर्शद
वारसी ही मंडळी काय करत आहेत?… अर्शद
वारसी हा नायक म्हणून किती दमदार आहे, ते ‘जॉली एलएलबी’सारख्या
सिनेमातून कळून जातं, पण
आपल्या कर्मदरिद्री सिनेमासृष्टीत त्याला नायकपद मिळत नाही, कायम ‘सर्किट’ बनून
फिरावं लागतं… पण
तो प्रत्येक संधीचं अफाट सोनं करतो… तबू
मुख्य प्रवाहातली नायिका, पण
तिने त्या प्रवाहात असतानाच अनेक वेगळ्या वाटेच्या भूमिका साकारून त्या प्रकारच्या भूमिकांना एक आकर्षण मिळवून दिलं… फरहानही
अशीच मिक्स्ड कारकीर्द पुढे नेताना दिसतो… अक्षय
खन्ना आणि ऋषी कपूर या दोघांनी कारकीर्दीचा एक मोठा टप्पा (ऋषीने
तर पहिली संपूर्ण इनिंग्ज) टिपिकल
नाचगाणीवाले गुलछबू हिरो बनून पार पाडला… मात्र, दुसऱ्या टप्प्यात बदललेल्या आशयाच्या सिनेमात त्यांनी धाडसी प्रयोग केलेले आहेत… सर्वाधिक
नव्या नायिकांना ब्रेक देणारा आणि याचं अर्धं घर विविधरंगी स्वेटरांनी भरलेलं असेल, असं
वाटावं इतक्या प्रमाणात ‘हसीन
वादियों में’ प्रेमगीतं
गाणाऱ्या ‘चॉकलेट
हीरो’ ऋषी
कपूरने खूँख्वार, खतरनाक
आणि महा नीच ‘रौफ
लाला’ साकारावा, हा अद्भुत चमत्कार होता… दो
दूनी चार, अग्निपथ, कपूर अँड सन्स, १०२
नॉट आऊट अशा ऋषीच्या सेकंड इनिंग्जमधल्या सिनेमांचा महोत्सव भरवला तर अभिनयरसिकांना निखळ मेजवानी मिळेल, अशी
तगडी कामं आहेत पठ्ठ्याची. हा
नायकत्वाची झूल स्वेच्छेने उतरवून न-नायकत्वात
घुसलेला अभिनेता.
अमोल उद्गीरकर या पुस्तकात या सगळ्यांच न-नायकांची अतिशय
जिव्हाळ्याने ओळख करून देतो…
यातला जिव्हाळा हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे… तो
आपल्याकडे जरा जपूनच वापरावा लागतो… त्याचं
कधी पाल्हाळात रूपांतर होईल हे सांगता येत नाही… (किंबहुना
तसं ते होईलच असं सांगता येतंच…)
चित्रपटांवर
लिहिणाऱ्यांचे दोन ठळक प्रवाह आपल्याला दिसतात… एक
वर्ग वीस वर्षांपूर्वीच्या फिल्म सोसायटीच्या चळवळींवर पोसलेला, आंतरराष्ट्रीय
पातळीवर नावाजलेले, गाजलेले
सिनेमे पाहून त्या मापदंडांवर हिंदी-मराठी
किंवा एकंदर एतद्देशीय सिनेमांचे मोजमाप करणारा… या
मंडळींच्या अभिरुचीचं भरणपोषण या मातीतल्या सिनेमात झालेलं नाही… त्यामुळे, मुख्य प्रवाहातल्या हिंदी किंवा कोणत्याच भाषेतल्या सिनेमाशी त्यांचं आतड्याचं नातं नाही… आपल्याकडे
सत्यजित राय, ऋत्विक
घटक, अदूर
गोपालकृष्णन, मृणाल सेन, श्याम
बेनेगल, गोविंद
निहलानी यांच्याशी त्यांचं अधिक गहिरं नातं आहे… त्यामुळे
फार फार तर गुरुदत्त, बिमल
रॉय आदी मोजक्याच दिग्दर्शकांकडे ते त्यातल्या त्यात कमी तुच्छतेने पाहतात… त्या
अफाट उंचीवरून पाहिल्यामुळे आणि हिंदी सिनेमाच्या साँग अँड डान्स फॉरमॅटविषयी फारशी आस्था नसल्याने या सिनेमाविषयी ते लिहीत नाहीत, लिहायची वेळ आलीच तर अतिशय कोरडेपणाने लिहितात… मृतदेहाचं
पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरला त्या मृतदेहाविषयी जेवढी आस्था असेल, त्याहून
थोडी कमीच या लेखकांना मुख्य प्रवाहातल्या सिनेमाविषयी असते… त्यांच्या
आवडीच्या सिनेमाविषयीही ते फारसं वेगळं लिहीत नाहीत… रसास्वादापेक्षा
काटेकोर विश्लेषणावर त्यांचा भर अधिक…
या स्पेक्ट्रमच्या बरोब्बर दुसऱ्या टोकाला आहेत ते सिनेमागृहांच्या अंधारात आपली इवलाली आयुष्यं विरघळवून वगैरे टाकणारे, नायकांमध्ये
देव शोधणारे पाल्हाळिक, प्रासादिक, शब्दबंबाळ, भावविव्हळ
लेखक… या
मंडळींनी सिनेमाचं गारूड स्वत:वर
स्वसंमोहनासारखं करून घेतलेलं आहे… तुम्ही
आस्वादक लेखक असा की विश्लेषक असा- सिनेमाचा
पहिला अनुभव (सिंगल
स्क्रीन थिएटर जिवंत असेपर्यंत तरी) सर्वसामान्य
आयुष्यातून उचलून जादूनगरीत नेणाराच होता… भव्य
पोकळीचं प्रेक्षागृह, त्यात कभिन्न अंधार, भव्य
पडद्यावर उमटणाऱ्या ग्लॅमरस प्रतिमा, नाच, गाणी, संगीत, मारामारी, नाट्य, विनोद सगळ्यांची रेलचेल… नेहमीच्या
आयुष्यातून वेगळ्याच जगात घेऊन जाणारी मायावी दुनिया… तिची
मोहिनी नानाविध प्रकारच्या कंटेंटचे नळ धो धो वाहात असलेल्या आजच्या दृक्माध्यमसमृद्ध (तरीही ‘जादू’च्या बाबतीत दरिद्री) अशा
आजच्या पिढीला समजणार नाही… मात्र, सिनेमाच्या या जादूने भारावलेल्या स्थितीतच आयुष्यभर राहायचं, माहिती, आकलन, आस्वाद, विश्लेषण यांच्या बाबतीत तसूभरही पुढे सरकायचं नाही, ही
तथाकथित रसास्वादक लेखकांनी केलेली जादू पडद्यावरच्या जादूपेक्षा भारी होती… जिव्हाळ्याने
लिहायचं म्हणजे सतत भरजरी उपमा-उत्प्रेक्षांचा
खच घालायचा, गॉसिप
चघळायचं, क्षुद्र
हेव्यादाव्यांना नक्षत्रांच्या शर्यतींचं ग्लॅमर द्यायचं, सिनेमाच्या
बाबतीत फक्त प्रभावच पाडून घ्यायचा, तो
कसा पडला असेल, याचं
कुतूहल वाटून घ्यायचं नाही, वाचकाला
वाटू द्यायचं नाही, निव्वळ
शैलीवर पचपचीत किश्शांना ‘अमर
चित्रकथा’ बनवून
टाकायचं, ही
या लेखकांची कामगिरी… त्या
त्या वेळी वाचायला मजा येते, सोबत
काही राहात नाही आणि एका टप्प्यानंतर त्या उमाळे, उसाशे, दर्दभऱ्या दास्तानी वगैरेंचा निखळ कंटाळा यायला लागतो…
अमोलच्या
लेखनात विश्लेषण आहेच, पण
ते कोरडेठाक नाही आणि आतड्याच्या नात्याचा जिव्हाळा आहेच, पण
तो गळेपडू भावविव्हळतेने बुजबुजलेला नाही… बालाजी
सुतार यांच्या एका कवितासंग्रहाचं नाव आहे, दोन
शतकांच्या सांध्यावरच्या कविता… तिथून
उसनवारी करून सांगायचं तर अमोल हा विलक्षण योगायोगाने (आणि अर्थातच स्वत: घडवलेल्या
पिंडधर्माने) दोन शतकांच्या सांध्यावरचा चित्रपट आस्वादक लेखक तर आहेच, पण
तो दोन शैलींच्या सांध्यावरचाही लेखक आहे, सिनेमातल्या
दोन युगांच्या सांध्यावरचा लेखक आहे… त्याचं
वय, त्याने (आधी नोंदस्वरूपात) ही व्यक्तिचित्रे लिहायला सुरुवात केली तो काळ आणि त्याची आस्वादक दृष्टी हे सगळं ‘फक्त
एकदाच’ जुळून
आलेल्या सुखद योगायोगासारखं आहे आणि त्या मर्यादित अर्थाने हे पुस्तक ‘एकमेवाद्वितीय’ आहे असं म्हणता येईल… याआधीच्या
काळाच्या टप्प्यावर न-नायकच
नव्हते, सिनेमाच्या
यापुढच्या टप्प्यावर नायकपणच धूसर होऊन गेल्यामुळे ‘न-नायक’ स्वतंत्रपणे अधोरेखित करता येणार नाहीत… म्हणून
हे एकमेवाद्वितीयत्व.
अमोल हा टिपिकल नाइन्टीज किड आहे, ९०च्या
दशकातला चित्रपटरसिक. नाइन्टीज किड्सचा शब्दश: अर्थ
१९९०च्या दशकात जन्मलेली मुलं असा असला तरी सिनेमांच्या संदर्भात तो तसा नाही. जेव्हा
सिनेमाची जाण निर्माण व्हायला लागलेली असते, आस्वादाची
सगळी इंद्रियं तरूण, ताजी, टवटवीत असतात, तारुण्याच्या
उंबरठ्यावरची स्वप्नील दुनिया असते आणि सिनेमा हा त्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असतो, असा
काळ ज्यांनी १९९०च्या दशकात अनुभवला ती पिढी म्हणजे नाइन्टीज किड्स. या
दशकावर आधीचं कसलंच बॅगेज नाही. १९७०च्या
दशकात जन्मलेल्या पिढीने वाढत्या वयात पाहिलेला सिनेमा अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन अवतारापासून पुढचा होता, पण (टीव्हीवरच्या दर रविवारच्या सिनेमामुळे) या पिढीने व्ही. शांतारामांपासूनचा
ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाही पाहिला, गुरुदत्त, बिमल रॉय, विजय
आनंद यांच्यापासून हृषिकेश मुखर्जी, बासू
चटर्जी, शक्ति
सामंता वगैरे दिग्दर्शकांचा प्रभाव वाहिला… लता
मंगेशकर, आशा
भोसले, किशोर
कुमार, मोहम्मद
रफी, मुकेश
हे गायक या पिढीच्या पौगंड-तारुण्याच्या
काळात खरंतर मध्यमवयाला पोहोचले होते, रफी, किशोर, मुकेश
हे तर पाठोपाठ अस्तंगतही झाले, तरी
या पिढीच्या सिनेसांगितिक घडणीवर यांचा मोठा प्रभाव राहिला आणि अमित कुमार, येसूदास, सुरेश वाडकर, कुमार
शानू, उदित
नारायण, अलका
याज्ञिक, कविता
कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल हे खरे ‘यांच्या
पिढी’चे
गायक-गायिका
यांच्यासाठी दीर्घकाळ परकेच राहिले… नाइन्टीज
किड्स या बाबतीत सुदैवी… त्यांच्यावर
गतकाळाचं ओझं नव्हतं, ते
हलकीफुलकी ८०-९०च्या
दशकाची सॅक पाठीला लावूनच शीळ वाजवत सिनेसफरीवर निघाले, ८०च्या
दशकाचा काही खास वजनदार माल नव्हताच पाठीवर, जी
काही पुंजी जमा झाली ती ९०च्या दशकानंतर… तीही
त्यांच्या तारुण्यातली ‘समकालीन’ पुंजी… हा सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या जादूचा अखेरचा काळ… या
दशकाच्या अखेरीपर्यंत मल्टिप्लेक्सेस आणि त्यानंतर मोबाइलच्या पडद्याने त्या जादूचा कायमचा घास घेऊन टाकला… इतक्या
गोष्टींच्या सांध्यावरच्या टप्प्यावर अमोलचा सिनेरसास्वाद सुरू झालेला असल्याने त्यात अनेक अनोख्या गोष्टींचं मिश्रण आहे… तो
सिनेमाने झपाटून जाणारा, कुमार
शानूचा आवाज, अनु
मलिक-नदीम
श्रवणचं संगीत, राजकुमार
संतोषीचं टेकिंग, मुकुल
आनंदचा टेक्निकल फिनेस, आमीर
खान, शाहरूख
खान यांची अदाकारी, सलमान, संजय दत्त, अजय
देवगण यांचा स्क्रीन प्रेझेन्स, गोविंदाचं
ऑल इन वन एंटरटेनमेंट पॅकेज यांच्या आकंठ प्रेमात असलेला, यांच्यामुळे
उचंबळून येणारा आस्वादक आहे, पण
त्यात तो वाहून जात नाही… त्यांचा
आपल्यावर होणारा परिणाम तो मुक्तपणे होऊ देतो, त्याचा
आनंद घेतो, पण
हे सगळं का होतं, त्यात
आपल्या वयाचा, काळाच्या
त्या टप्प्याचा वाटा किती, याचाही
शोध घेतो… आस्वादक
वृत्ती आणि विश्लेषक बुद्धी यांचं एक उत्तम काँबिनेशन नाइन्टीज किड्सना लाभलेलं आहे… अमोल
हा त्या पिढीचा प्रतिनिधी आहे…
या पिढीतल्या सिनेमावेड्यांना आणखी एक भाग्य लाभलेलं आहे… यांच्या
आधीच्या पिढीत सिनेमा पाहण्याच्या कक्षा नेहमीच्या व्यावसायिक हिंदी, प्रादेशिक
सिनेमांपलीकडे विस्तारू इच्छिणाऱ्याला काही मोजक्या शहरांमध्ये उत्तम प्रकारे काम करणाऱ्या फिल्म सोसायटी चळवळीचाच आधार होता… राष्ट्रीय
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कलात्मकदृष्ट्या उत्तम सिनेमे या पिढीने फिल्म सोसायटीच्या शोमध्ये किंवा आपल्याकडे होणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्येच पाहिले… नाइन्टीज
किड्सना मात्र इंटरनेट युगाने आंतरराष्ट्रीय सिनेमाचे पंख घरबसल्या लावून दिले… आधी
व्हिडिओ कॅसेट, मग
सीडीज, मग
शेअरेबल फाइल्सच्या रूपात अनेक देशांचा मुख्य प्रवाहाबाहेरचा सिनेमाही या पिढीला सहज उपलब्ध झाला… त्या
सिनेमांचा एक व्यापक संस्कार या पिढीवर झाला आहे… अमोल
उद्गीरकर हा हे संस्कार पचवलेला लेखक आहे… एकीकडे
त्याच्यावर ९०च्या दशकातल्या संगीतमय रोमँटिकपटांचा तारुण्यसुलभ पगडा आहे, दुसरीकडे
आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून आलेलं जगभान आहे… त्यामुळे
त्याने आपल्याच मातीतला बदलत गेलेला सिनेमा फार बारकाईने पाहिला आहे… ते
बदल समजून घेतलेले आहेत…
सिनेमाविषयक
लेखन करणारे बहुतेक जुन्या पिढीतले लेखक, आधी
सांगितल्याप्रमाणे सिनेमाने घडवलेल्या जादूतून बाहेर पडतच नाहीत, ती
कशामुळे घडून येते, याची
त्यांना मुळात उत्सुकता नसते, तर
ते तिचं विश्लेषण करतील कुठून. मी
सिनेमाचं परीक्षण करत होतो त्या काळात एकदा एका सिनेमाच्या सेटवर मला शूटिंगची सगळी प्रक्रिया निरखून पाहिल्यावर नंतर सिनेमा दिग्दर्शक झालेला एक मित्र म्हणाला होता, तू
सिनेपत्रकार नाहीस. मी
विचारलं, का? तो म्हणाला, कोणताही
सिनेपत्रकार उठून शूटिंगची उस्तवार पाहायला येत नाही. तो
एका जागी बसतो. कोल्ड्रिंक
पितो, स्नॅक्स
खातो, नटनट्यांना
ब्रेकमध्ये प्रश्न विचारतो. फोटो
घेतो आणि निघून जातो. सिनेमा
कसा तयार होतो, यात
त्याला शून्य रस असतो. त्याच्यासाठी
ती कंटाळवाणी प्रक्रिया असते.
सिनेमा आणि सिनेकलाकारांच्या पार्ट्या या जेवढ्या ग्लॅमरस गोष्टी आहेत, तेवढीच
शूटिंग ही कंटाळवाणी, तांत्रिक
प्रक्रिया आहे. पण
तिथे जे घडवलं जातं, तेच
पडद्यावरचा अंतिम परिणाम घडवून आणतं, याची
जराही उत्सुकता असू नये? अमोलमध्ये
ही उत्सुकता आहे. त्याच्या
पिढीमध्ये ही उत्सुकता आहे. अमोल
दोन पावलं पुढे जाऊन स्वत: सिनेमालेखन
करतो आहे. सिनेमा
पाहणं ही त्याच्यासाठी दुहेरी आनंददायी गोष्ट आहे… एकतर
निखळ सिनेमा पाहण्याचा, त्याने
थरारून जाण्याचा आनंद आणि रियाझ केल्याचा, अभ्यास
केल्याचाही आनंद (अभ्यासाचे
असे आनंददायी प्रकार दुर्मीळ).
या अंगभूत कुतूहलानेच अमोलला न-नायकांकडे
खेचून नेलं असणार… सिनेमा
संपल्यावर प्रमुख व्यक्तिरेखांइतक्याच किंवा त्यांच्याहून अधिक प्रमाणात वेगळाच कुणी अनोळखी अभिनेता आपल्या मनावर ठसून गेला, हा
अनुभव अनेकांना आला असेल… २०००च्या
दशकात तर तो वारंवार येत गेला असणार… पण
हा अनुभव देणारी ही हस्ती आहे तरी कोण, याचा
शोध घेण्याचा इतका सहृदय प्रयत्न दुसऱ्या कुणाला करावासा वाटला नाही… अमोललाच
तो करावासा वाटला, हे
खास कौतुकास्पद आहे… सिनेमाच्या
दुनियेत शिरकाव करण्याच्या प्रयत्नांत त्याचं मुंबईला येतजात राहणं, अनुराग
कश्यपच्या आसपास असणं आणि साहजिकच अनुरागमुळे हिंदी सिनेमात ठाशीवपणे आलेल्या कलाकारांविषयी काही खास गोष्टी समजत जाणं, हे
ओघाने होत गेलं असणार… सिनेमासारख्या
चित्रदर्शी, ओघवत्या शैलीत, अनौपचारिक
जिव्हाळ्याने अमोल एकेका अनमोल पण दुर्लक्षित हिऱ्याला उजेडात आणू लागला आणि रसिकांमध्ये ‘अरे, हा
तर मलाही आवडतो’ ही
भावना आधी जागू लागली… यांच्यातल्या
बहुतेक न-नायकांनी
अफाट संघर्ष केला आहे… नवाजुद्दिन
सिद्दिकीच्या फुटकळ भूमिकांच्या क्लिप्स आता लोक काढून काढून पाहतात, त्यांना
लाखोंचे व्ह्यूज मिळतात, असंच
इतर अनेक कलाकारांच्या बाबतीत होतं… मला
खात्री आहे, या
क्लिप्स शोधणारं निम्मं तरी पब्लिक अमोलने कामाला लावलं आहे… त्याने
लिहिलेलं वाचून लोकांनी हा शोध घेतला असणार…
…मुळात
अमोलला जो कलाकार भावतो, त्यावरच
तो लिहितो, त्यामुळे
त्या अभिनेत्याविषयीचा आदर त्या लेखनात आढळतो… क्वचित
भ्रमनिरास झाला असेल तर तोही जिव्हाळ्याने, आपल्या माणसाबद्दल बोलावं तसाच व्यक्त होतो… तो
त्या अभिनेता/अभिनेत्रीची
अभिनयप्रक्रिया क्लिष्ट, तांत्रिक
भाषेत उलगडत बसत नाही, त्यापेक्षा
त्याच्या आयुष्यातला एखादा वेगळा किस्सा शोधून तो लिहायला त्याला अधिक आवडतं… अमोल
हे सदरस्वरूपात ‘बिगुल’ या
वेबसाइटसाठी लिहीत होता, तेव्हा
लोकांच्या त्यावर उड्या पडायच्या… लोक
वाट पाहायचे… त्याचा
मजकूर अपलोड होताच गर्दी जमायची…
…ही त्या अभिनेत्यांच्या गुणांची किमया होतीच, पण
त्यात अमोलच्या लेखणीचाही मोठा वाटा होता… सिनेमाविषयक
असो की अन्य कोणत्या विषयावरचं असो- लेखन
वाचकाच्या मनात ठसतं केव्हा, जेव्हा ‘माझ्याच मनातलं हा माणूस लिहितो आहे,’ असं
वाटतं तेव्हा… अनेकदा
तर वाचकांना प्रेक्षक म्हणून ते सुचलेलंही नसतं, सापडलेलंही
नसतं, अमूर्त
स्वरूपात काहीतरी स्पर्शून गेलेलं असतं… पण
लेखक जेव्हा ते चिमटीत धरून मूर्त स्वरूपात समोर आणतो, तेव्हा
त्या वाचकाला वाटतं, अरे
हेच हेच, हेच
तर मला सांगायचं होतं… तुम्ही
माझ्या भावनेला शब्द दिलेत…
अमोलच्या
न-नायक-नायिकांना भेटल्यावर वाचकांची ही साहजिक प्रतिक्रिया होतेच, पण
त्यांचा अपरिचित संघर्षही समजतो… अमोल
दरवेळी एकाच पद्धतीने सगळ्यांची सगळी जीवनकहाणी सांगत बसत नाही… त्यांचं
न-नायकत्व
उजागर करणारे काही ठसठशीत स्ट्रोक्स देऊन तो संपूर्ण व्यक्तिचित्र दमदारपणे उभं करतो… त्याच्या
आधीच्या पिढीतल्या अनेक लेखकांमध्ये दिसणारी नायकपूजा आणि शब्दबंबाळ विशेषणबाजीचा सोस त्याच्या लेखनात नाही, नेत्रांच्या
निरांजनांनी ओवाळलेल्या भंपक आरत्या नाहीत… लगट
वाटावी अशी सलगीही नाही आणि सूक्ष्मदर्शकाकडे ठेवलेल्या अमीबाचं विश्लेषण करतो आहोत, असा
ढुढ्ढाचार्यी आवही नाही… अरे
यार, मला
हा नट फार आवडला, काय
कडक काम करतो यार आणि त्याची स्टोरी माहितीये का तुम्हाला, असं
एखाद्याने पाठीवर थाप मारून सांगावं आणि गप्पिष्ट आख्यान लावावं, तसं
त्याचं लेखन आहे… सर्व
प्रकारचं पाल्हाळ वगळून.
तो न-नायकाची लिनियर गोष्ट सांगत नाही, तो अलीकडच्या सिनेमातंत्राप्रमाणे जंपकट, फ्लॅशबॅक, फ्लॅश फॉरवर्ड, मोंताज अशी अनेक तंत्रं लेखनात वापरतो आणि एका कहाणीत इतरही अनेक कथांची गुंफण करत जातो… हासिल, सत्या, कौन, ब्लॅक फ्रायडे, कंपनी, मकबूल हे त्याच्याच नव्हे तर त्याच्या संपूर्ण पिढीच्या अभिरुचीवर, घडणीवर प्रभाव टाकणारे सिनेमे आहेत… त्यांचे, त्यांतल्या प्रसंगांचे, संवादांचे, अभिनयाचे संदर्भ त्याच्या लेखनात वारंवार डोकावत राहतात… ज्यांनी हे सिनेमे पाहिले नसतील, त्यांच्या मनात ते पाहण्याची इच्छा निर्माण होते…
असेही सर्वसामान्यांच्या जगात नायक कमी, न-नायक अधिक… सिनेमातल्या
न-नायकांमध्ये
कदाचित या वाचकांनाही आपलंही न-नायकत्व
सापडत असणार… हाही
एक मोठ्या स्थित्यंतराचा भाग आहे… पडद्यावरच्या
नायकासारखं दिसणं, त्याच्या
प्रतिमेत स्वत:ला
शोधणं, स्वत:ला नायकाच्या मूल्यांनुसार घडवण्याचा प्रयत्न करणं, असे
उद्योग कळत नकळत करून मागच्या पिढीतल्या अनेकांनी ‘नायक’ बनायचा प्रयत्न केला… निदान
स्वत:च्या
मनात तरी… २०००
सालानंतरचे हिंदी सिनेमाचे युग पडदयावरच्या आणि पडद्यासमोरच्याही न-नायकांचे
असावे, हा
योगायोग नाही.
सिनेमाच्या संदर्भाने अमोलच्याच पिढीचा असलेला आणि सिनेमावर, सिनेसंगीतावर विलक्षण प्रेम असलेला सागर कोपर्डेकरसारखा प्रकाशक या पुस्तकाला लाभलेला आहे, हाही योगायोग नाही, हा उत्तम जुळून आलेला योग आहे. मराठीत सिनेमावरची पुस्तकं मोठ्या संख्येने निघतात. ती बहुतेक वेळा शिळ्या कढीला ऊत आणणाऱ्या स्तंभलेखनातून जन्माला आलेली असतात… तीच तीच विव्हळगाणी सतत आळवणारी आणि तथाकथित सुवर्णकाळात रेंगाळणारी… या पार्श्वभूमीवर सागर आणि मुग्धा कोपर्डेकर हे प्रकाशक दाम्पत्य अगदी डोळसपणे सिनेमाकलेचा आस्वादक वेध घेणारं, वाचकाला समृद्ध करण्याची, त्याच्या कक्षा रुंदावण्याची क्षमता असणारं लेखन हेरून ते मराठीत आणत आहेत. न-नायकही त्यांच्याकडून ‘नायका’ला शोभणाऱ्या झोकात येईल, याची खात्री आहे.
न-नायकचा पहिला लेख वाचण्याआधी तुम्ही ही प्रस्तावना
वाचत असाल, तर हे पुस्तक वाचल्यानंतर काय होणार आहे, याची आगाऊ कल्पना देऊन ठेवतो. हे पुस्तक तुम्ही हातात
घेतलं की झपाटून वाचत जाणार आहात. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, मग नंतर पुन्हा कधीतरी पहिला,
असे लेख वाचत जेव्हा हे पुस्तक संपेल, तेव्हा तुमच्या
मनात समाधान आणि असमाधान यांचं एक चमत्कारिक मिश्रण दाटून येईल. आपल्याला आवडलेल्या इतक्या कलावंतांची इतकी अनवट ओळख झाली, याचं समाधान तुम्हाला लाभेलच. त्याचबरोबर आणखी एक असमाधानाचं
चक्र सुरू होईल… अरे, आपल्याला तो अमुक
कलाकारही आवडत होता, हा गायकही चांगला विषय असू शकतो,
तो तमुक गीतकारही हिंदी सिनेमाच्या गाण्यांची चौकट भेदणारा ठरला आहे,
तमक्या संगीतकाराच्या संगीताचा, पार्श्वसंगीताचा
केवढा वाटा आहे आजच्या सिनेमाच्या बदललेल्या स्वरूपात, कुणी सिनेमॅटोग्राफर,
कुणी संकलक, कुणी पटकथा-संवादलेखक
असं काहीबाही आठवत राहील. गोविंद
नामदेव, आशिष
विद्यार्थी, राजीव खंडेलवाल, अभय
देओल, विकी कौशल,
अभिषेक कपूर, वरूण ग्रोवर, इर्शाद कामिल, अमिताभ भट्टाचार्य, अमित त्रिवेदी, स्नेहा खानवलकर अशी अनेक नावं तुमच्या
मनात घोळू लागतील आणि अमोलच्या लेखणीतून या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या इतर न-नायकांची भेट कधी होईल, अशी एक ओढ दाटून येईल.
अमोलने सिनेमाच्या जगतात प्रवेश
करण्याची जी महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, ती सुफळ संपूर्ण होवोच, पण वाचकांना ‘न-नायक भाग २’ची जी ओढ लागणार आहे,
ती पूर्ण करण्याचीही उसंत त्याला लाभो, ही शुभेच्छा!
नाहीतरी काळ सिक्वेल्सचा आहे… अमोलचे वाचक या पुस्तकाचे
अनेक सिक्वेल आणि काही प्रिक्वेल आले तरी शाहरूख खानच्या स्टायलीत अगदी प्रेमाने त्यांचं
दोन्ही बाहू पसरून स्वागतच करतील, अशी खात्री आहे…
…तर चला, आता न-नायकांच्या अनोख्या दुनियेत प्रवेश करायला सज्ज
व्हा… तुमचं बखोट पकडून या उत्कंठावर्धक, रंगतदार आणि आनंददायी सफरीत तुम्हाला शब्दश: खेचून न्यायला
अमोल समर्थ आहेच…
No comments:
Post a Comment