Tuesday, April 21, 2015

‘‘फोन अशासाठी केला होता’’

मुजावरांचा फोन कधीही यायचा...
ते ‘‘हॅलो, मुजावर बोलतोय’’नंतर फोन योग्य नंबरला लागलाय का, याचीही खातरजमा न करता थेट ‘‘फोन अशासाठी केला होता’’ किंवा ‘‘फोन यासाठी केला होता’’ असं म्हणून बोलायला सुरुवात करायचे आणि थेट मुद्यावर यायचे. त्यांचा फोन म्हणजे, ते बोलायचे आणि आपण ऐकायचं; लाइन कट झालेली नाही, हे त्यांना कळत राहावं, इतपत अधूनमधून हुंकार, हो का, बरंबरं, अच्छा, अरेच्चा, वगैरे उद्गार काढत राहिलं म्हणजे बास! अर्थात, साक्षात मुजावर समोर बोलत असताना त्यांच्यापुढे तोंड उघडण्याचा गाढवपण कोण, कशाला करणार?
नव्वद टक्के वेळा त्यांचा फोन एकाच कारणासाठी असायचा. त्यांनी लिहिलेल्या, वाचलेल्या किंवा आपण लिहिलेल्या, आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एखाद्या सिनेमाविषयक बातमीच्या, पत्राच्या, लेखाच्या अनुषंगाने त्यांना काहीतरी आठवलेलं असायचं किंवा त्या मजकुरात काहीतरी गफलत झालेली असायची. आठवलेला किस्सा सांगण्यासाठी किंवा ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांचा फोन असायचा. अत्यंत रसाळ शैलीत, कोल्हापुरी लहेजात, मधून मधून ठसकेबाज हसत ते किस्सा सांगायचे. चूक दुरुस्त करतानाही त्यांचा आव पंतोजी टाइप ढुढ्ढाचार्याचा नसायचा. ‘तुम्ही (किंवा त्यांनी) चांगलं लिहिलंय ते, पण ही एक जराशी गफलत झालीये,’ असाच त्यांचा सौम्य, समजावणीचा सूर असायचा. आपला शहाणपणा, व्यासंग, ज्ञान वगैरे दाखवून समोरच्याला गारद करण्याचा त्यांचा हेतू नसायचा, तर आपल्या कॉमन जिव्हाळ्याच्या विषयाच्या मांडणीत काही त्रुटी राहू नयेत, एवढाच त्यांचा प्रयत्न असायचा. मुजावरांना हिंदी-मराठी सिनेमाचा माहितीकोश म्हटलं का जातं, ते त्यांच्या पाच मिनिटांच्या फोनवरूनही कळायचं. भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासूनचे अनेक संदर्भ त्यांना सनावळीसह मुखोद्गत होते आणि ते घोकंपट्टी करून पाठ केलेले नव्हते. कारण, सिनेमा हा त्यांच्या औपचारिक ‘अभ्यासा’चा विषय नव्हता, अनौपचारिक जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय होता, मुख्य म्हणजे अतीव प्रेमाचा विषय होता. ते शरीराने आजच्या काळात वावरत होते खरे; पण, वयोमानानुसार अधू झालेल्या त्यांच्या डोळ्यांना जे जग दिसायचं, ते रंगीत कमी आणि कृष्णधवल अधिक होतं... त्यांच्या काळातल्या सिनेमाचं जग. ते जणू त्याच जगात वावरत असायचे. त्या काळातल्या कलावंत-तंत्रज्ञांच्या गराड्यातून अधून-मधून बाहेर येऊन आपल्याशी बोलायचे. 
मुजावर चित्रपट समीक्षक नव्हते. तेवढ्या अंतरावरून त्यांना सिनेमाकडे पाहता आलं असतं की नाही, कोण जाणे! एकेकाळी शुक्रवारी प्रदर्शित होत असलेल्या आगामी सिनेमाची धडधडत्या हृदयाने वाट पाहात असलेल्या सिनेमावेड्या तरुण मुलाचं मन त्यांच्या शरीरात सतत जिवंत होतं. थिएटरच्या अंधारामध्ये विरघळून जायचं, पडद्यावरच्या प्रतिमांनी मनाचे अंधारे कोपरे उजळवून टाकायचे आणि मग तीच झिंग घेऊन वास्तव आयुष्यात वावरायचं, असा त्या काळातल्या सिनेमावेड्यांचा परिपाठ होता. मुजावरांचा पिंड तोच होता, पण ते निव्वळ चाहता बनण्याच्या पुढे गेले. चित्रपटविषयक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी या तारेतारकांच्या जगात प्रवेश मिळवला. तो काळ छापील माध्यमांच्या चलतीचा होता. चित्रपटांच्या ग्लॅमरस प्रसिद्धीसाठी साप्ताहिकं, मासिकांशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे, सिनेपत्रकारांना सिनेसृष्टीत मानाचं स्थान होतं. उपयुक्ततेला महत्त्व देणाऱ्या या कागदी फुलांच्या दुनियेत मुजावरांनी अनेक मान्यवर कलावंतांचा स्नेह कमावला. त्यांच्याशी असलेल्या जवळीकीचा शोबाज बाजार न मांडता त्यांनी ‘आतली बातमी’ वाचकांपर्यंत अधिकाराने पोहोचवली. या व्यवसायातल्या मैत्रीमध्ये एक अंतर राखणं अनुस्यूत असतं. ते भान भल्याभल्यांना राहात नाही आणि मग गोट तरी निर्माण होतात किंवा शत्रुत्वाला तरी चालना मिळते. मुजावर सदैव या सगळ्यापासून दूर राहिले. अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या प्रदीर्घ मुलाखतींमधून त्यांनी प्रचंड संदर्भसाधनं निर्माण केली. रसरंग आणि चित्रानंदचे- खासकरून दिवाळीचे विशेषांक ही तर मेजवानीच असायची. हे सगळे संदर्भ त्यांना कुठे मांडून ठेवावे लागले नाहीत, त्यांच्या गरजेप्रमाणे ते त्यांना सापडत जायचे... त्यांच्याच डोक्यात. हे संदर्भ इतरांनाही मुक्तहस्ते उपलब्ध असायचे. म्हणूनच तर शिरीष कणेकरांसारख्या पत्रकाराने असं सांगून टाकलं होतं की, मुजावर नावाच्या महासागरात लोटा बुडवून तेवढ्या  पाण्यावर माहितगार म्हणून मिरवता येतं. 
आपल्याकडच्या इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे सिनेमाच्या क्षेत्रातही दस्तावेज ठेवण्याच्या बाबतीत भोंगळपणा आहे. विश्वासार्ह ग्रथित इतिहासाची तर वानवाच आहे. अशावेळी वेगवेगळ्या कलावंत-तंत्रज्ञांच्या मुलाखतींमधून मिळालेल्या माहितीचा ताळेबंद मांडून त्यातून त्यातल्या त्यात निकं सत्त्व पाखडून घेण्याचा किचकट उपक्रम मुजावरांनी आयुष्यभर केला. त्यांच्याकडे सर्वच फिल्मी पत्रकारांप्रमाणे अनेक गावगप्पांचीही नोंद होती. त्यांची खासगीत चर्चाही व्हायची. पण, लेखनात त्यांनी सहसा अशा गॉसिपचा, अधिकृत माहिती म्हणून उल्लेख केला नाही. जिथे शक्य होतं तिथे माहिती कोणी दिली हे सांगितलं; जिथे ते शक्य नव्हतं, तिथे त्यांनी नावं घेणं टाळलं. त्यांना या सगळ्या गोष्टींच्या मसालेदारपणापेक्षा त्यातल्या माहितीत अधिक रस असायचा. ती नोंद बहुतेक वेळा कोरडी ठाक असायची.
त्यामुळेच की काय, मुजावर कधीही शैलीदार लेखक म्हणून प्रसिद्ध झाले नाहीत. क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर  शैली असली तरच लिहिता येतं (म्हणजे शैलीच्या झालरीखाली अज्ञान झाकता येतं) असा एक समज आजही रूढ आहे. तो मुजावरांनी मोडीत काढला. त्यांना लोकप्रिय होण्यासाठी शैलीची गरज पडली नाही. त्यांच्याकडे असलेले संदर्भ आणि माहितीच इतकी जबरदस्त होती की त्यांची अनलंकारिक पण आंतरिक जिव्हाळ्याचा स्पर्श असलेली शब्दकळाही वाचकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेशी होती. मुजावरांचं लिखाण ओबडधोबड असतं, संस्कारित नसतं, अशी नाकं मुरडणाऱ्यांनाही त्यांची संदर्भसमृद्धता झक्कत मान्य करायला लागायची आणि त्यांच्या त्या ‘जंत्री’तून संदर्भ उचलून, नकलून आपलं लेखन सजवून नवा माल म्हणून खपवावं लागायचं. त्याबद्दल कधी त्यांनी तक्रारही केली नाही. तो त्यांचा स्वभावच नव्हता. दुसरं म्हणजे त्यांच्यापाशी तेवढा वेळ नव्हता. त्यांना सतत काहीतरी सुचायचं, आठवायचं, जुन्या माहितीची नवी संगती लागायची आणि त्यातून लेख आकार घ्यायचा. कधी पुस्तकांच्या कल्पना जन्म घ्यायच्या. वयाला आणि प्रकृतीला न साजणाऱ्या झपाट्याने ते हे उपक्रम हातावेगळे करायचे.
‘आय ईट सिनेमा, आय ड्रिंक सिनेमा, आय ड्रीम ऑफ सिनेमा’ असं राज कपूर म्हणाला होता. त्याच्याइतकंच ते लागू असलेली इतर माणसं शोधली असती, तर त्यात इसाक मुजावरांचं नाव फारच वरच्या क्रमांकावर आलं असतं. 
सिनेमाच्या जगापलीकडे त्यांचं काही जग आहे का, हे फार कमीजणांना ठाऊक असेल. इतरांच्या बाबतीतही ते फारशा बिनकामाच्या चौकशा करत नसत. त्यांच्या फोनवर म्हणूनच कधीही कौटुंबिक संदर्भ यायचे नाहीत... शेवटची काही वर्षं वगळता. तेव्हा हळुहळू प्रकृतीच्या तक्रारींपासून पत्नीच्या आजारापर्यंत काही उल्लेख मोघमात यायला लागले होते. पत्नीच्या निधनानंतर ते बऱ्यापैकी एकटे पडले होते. शरीरही थकलं होतं. ‘फोन अशासाठी केला होता’नंतर उत्साही आवाजात येणाऱ्या किश्शाच्या जागी काही व्यावहारिक विचारणा येऊ लागल्या होत्या. संयुक्तपणे काही उपक्रम करूयात, तुम्हाला हवं तर लेखनिक देतो, वगैरे उभारी देण्याच्या प्रयत्नांच्या पलीकडे ते गेले होते. 
आता ते त्याच्याही पलीकडे गेले आहेत...
पण, अलीकडे बरंच काही आहे. 
त्यांचं कोणतंही पुस्तक काढून कोणतंही पान उलगडलं, तर मुजावरांच्या उत्साही शब्दांमध्ये किस्सा ऐकू येऊ लागतो... 
‘फोन अशासाठी केला होता’ ही ओळ ऐकू आली नाही, म्हणून काय झालं?

No comments:

Post a Comment