श्रीराम राघवनच्या
जॉनी गद्दार या सिनेमामध्ये जॉनी नावाचं कुणीच नाही...
हे नाव बी ग्रेड सिनेमासारखं वाटतं असं या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या नील
नितीन मुकेशच्या वडिलांचं म्हणणं होतं...
श्रीराम म्हणाला, मला तसाच फील
अपेक्षित आहे... सिनेमातली मुख्य व्यक्तिरेखा म्हणजे नील नितीन मुकेश
एकदा जॉनी हे नाव धारण करताना दिसतो... सिनेमात एकदा एका हॉटेलात विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ सुरू असलेला दिसतो, दुसऱ्या एका प्रसंगात एक नायिका ‘गाइड’ हे आर. के. नारायण यांचं पुस्तक वाचताना दिसते... याच पुस्तकावर विजय आनंदचा ‘गाइड’ आधारलेला होता...
...हे निव्वळ योगायोग नव्हेत... ही एका नव्या पिढीच्या दिग्दर्शकाने आपल्या आधीच्या पिढीच्या परात्पर गुरूला
दिलेली सलामी आहे...
‘जॉनी गद्दार’मध्ये ‘जॉनी मेरा नाम’च्या छटा दिसतात आणि शैलीवर विजय आनंदचा प्रभाव दिसतो. विजय आनंदच्या ‘फिल्म न्वार’ शैलीतल्या सिनेमांचा आजच्या काळातला सर्वात मोठा वारसदार म्हणून श्रीरामचं नाव
घेतलं जातं... हे नातं समजून घ्यायचं तर मुळात ‘फिल्म न्वार’ म्हणजे काय, ते समजून घ्यायला हवं...
मुख्य प्रवाहातला
व्यावसायिक सिनेमा हा जगभरात स्वप्नं विकण्याचा धंदा आहे... मात्र, सिनेमाकलेच्या प्रारंभापासून या कलेतून मानवी
आयुष्याचा अधिक गंभीरपणे वेधही घेता येऊ शकतो, असा विचार करणारे कलावंतही तिला लाभले आहेत... १९२०च्या सुमारास अमेरिकेतल्या गुन्हेगारीपटांमध्ये एक शैली विकसित झाली... तिला फ्रेंच समीक्षकांनी फिल्म न्वार असं नाव दिलं... हा सिनेमा गोड, गुलाबी, रंगीत नव्हता, तो माणसाच्या
मनातल्या काळ्या कपारींच्या आड दडलेल्या अंधारावर प्रकाश टाकणारा आणि त्या काजळीचं
गहिरं दर्शन घडवणारा सिनेमा होता... हा सिनेमा दु:स्वप्नं विकणारा
सिनेमा होता... यात सद्गुणपुतळे नायक आणि सौंदर्यखनी नायिका नव्हत्या, ‘आणि ते सुखाने नांदू लागले...’छापाच्या स्वप्नील शेवटावर हे सिनेमे संपत नव्हते... अटळ नियतीचं कठोर दर्शन या सिनेमांच्या शेवटी घडायचं... या सिनेमांचे नायक हे परिस्थितीच्या रेट्यात सापडणारे, प्रसंगी अध:पतित होणारे नायक होते... रूढार्थाने ते नायकही नव्हते, नायक आणि खलनायक यांच्या सीमारेषेवर वावरणारी प्रमुख व्यक्तिरेखा असं त्यांचं
स्थान असायचं... या सिनेमांमधल्या प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखाही सज्जन, सालस नसायच्या, उलट पुरुषांना
खेळवणाऱ्या, प्रसंगी त्यांच्यावर कुरघोडी करणाऱ्या, नीतीमूल्यांची फारशी चाड न बाळगणाऱ्या स्त्रिया या सिनेमात दिसायच्या... खुनाखुनीने, छळकपटाने भरलेल्या जुगाराच्या, वेश्यांच्या, गुंडांच्या
अंधाऱ्या अड्ड्यांच्या आसपास घडणारे, गुन्हेगारी कृत्यांचा थरार ठेकेबाज संगीताच्या साथीने शैलीबाज पद्धतीने दाखवणारे हे सिनेमे जगभरात लोकप्रिय झाले...
विजय आनंद हा त्या
पद्धतीच्या सिनेमाचा हिंदीतला एक मोठा दिग्दर्शक...
त्याच्या आधी आणि आसपास गुरुदत्त (आरपार, सीआयडी, जाल) आणि त्याच्याच पठडीतले शक्ती सामंता, राज खोसला यांनी या प्रकारचा सिनेमा भारतीय संगीतमय सिनेमाच्या शैलीत घोळवून
सादर केला... मात्र, विजय आनंदला हे कॉकटेल जसं जमलं, तसं फारच कमीजणांना जमलं... ‘नौ दो ग्यारह’ या हलक्या फुलक्या
रोमँटिक रोड मूव्हीच्या शेवटी त्याने अफलातून क्लायमॅक्स जुळवून आणला होता... घड्याळातली तीन मिनिटांची वेळ ही प्रत्यक्ष पडद्यावरही तीन मिनिटांची वेळ
दाखवून त्याने क्लायमॅक्सचं कळसाध्याय हे नाव सार्थ केलं होतं... विजय आनंदने अनेक प्रकारचे सिनेमे दिग्दर्शित केले, त्यात अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळलेला ‘तेरे मेरे सपने’सारखा सिनेमा होता, जगभरात ख्याती मिळवलेला संगीतप्रधान ‘गाइड’ होता, पण विजय आनंदची शैलीदार ओळख निर्माण केली ती ‘ज्युएल थीफ’, ‘जॉनी मेरा नाम’ आणि ‘तीसरी मंझिल’ या सिनेमांनी. क्षणाक्षणाला नवनवीन धक्के देत उलगडत जाणारं रहस्य, त्याला रोमान्सची फोडणी, सोबतीला झिंगबाज गाणी, अफलातून नृत्य, गाण्यांचं बहारदार
टेकिंग आणि क्षणाचीही उसंत न देणारा वेग ही विजय आनंदच्या शैलीची बाह्य वैशिष्ट्यं. मात्र, या मसाल्यात विजय आनंदने ‘फिल्म न्वार’चे अनेक घटक घोळवले. ‘ज्वेल थीफ’मध्ये नायक विनय म्हणजे देव आनंद हा त्याच्या समकालीन
नायकांप्रमाणे सद्गुणी, चारित्र्यशील वगैरे नाही. (राज कपूर आणि दिलीप कुमार या समकालीन श्रेष्ठ नायकांच्या तुलनेत देव आनंदचं हे
वैशिष्ट्य आश्चर्यकारक मानायला हवं. सिनेमानायक सत्शील असण्याच्या काळात अगदी गुरुदत्तबरोबरच्या पहिल्या
टप्प्यापासूनच देव आनंदने अध:पतित नायक धाडसाने
रंगवला आहे. त्याचा नायक शहरी, छटेल, रंगेल आणि नीतीमूल्यांची फारशी फिकीर नसलेलाच राहिला
आहे... वास्तवातल्या देव आनंदसारखाच.) ‘ज्वेल थीफ’मध्ये हा नायक वैजयंतीमालावर प्रेम करतो, पण तनुजालाही खेळवतो, हेलनबरोबर एका बिछान्यात रात्र व्यतीत करतो आणि फरयाल, अंजू महेंद्रू यांनाही खेळवतो. त्यात तो कोणतेही आडपडदे बाळगत नाही. आपण आधी पाहिलं ते खरं होतं की आता पाहतो ते खरं आहे की नंतर दिसेल ते सत्य, अशा गोंधळात प्रेक्षकाला सतत ठेवणारी चतुर मांडणी हे या तिन्ही सिनेमांचं
वैशिष्ट्य आहे.
विजय आनंदला हिंदी सिनेमात ‘फिल्म न्वार’ची क्रांती करायची
नव्हती, त्याला खपाऊ हिंदी सिनेमाचं पॅकेज विकायचं होतं, त्यामुळे गाणी, रोमान्स आणि
सुखात्म शेवट हे फिल्म न्वारमध्ये अभावानेच दिसणारे घटक त्याने या सिनेमांमध्ये
गुंफले आणि म्हणूनच हे सिनेमे तत्कालीन प्रेक्षकांना भावले. आज जवळपास पन्नास वर्षांनंतरही हे सिनेमे तेवढेच ताजे आणि थरारक आनंद देणारे
आहेत.
विजय आनंदच्या
आसपास आणि नंतरही अनेक दिग्दर्शकांनी या शैलीतले सिनेमे तयार केले. मात्र, ‘व्हिक्टोरिया नं. २०३’सारखे सिनेमे देणाऱ्या ब्रिज सढाणांचा अपवाद वगळता ही
भेळ सगळ्यांना जमली नाही. नासिर हुसेनसारख्या दिग्दर्शकांचे अॅक्शनपॅक्ड मल्टिस्टारर सिनेमेही योगायोगपट
आणि संगीतप्रधान रोमँटिक सिनेमे म्हणूनच जास्त लक्षात राहिले. खऱ्या अर्थाने डार्क आणि इन्टेन्स सिनेमा विधू विनोद चोपडा (परिंदा), रामगोपाल वर्मा (शिवा) यांच्यामुळे हिंदीमध्ये प्रथमच आला. पण, विजय आनंदचा वारसदार ठरला तो श्रीराम राघवन. लहानपणी आई ‘तीसरी कसम’ दाखवण्याच्या प्रयत्नात असायची तेव्हा याला ‘तीसरी मंझिल’ बघण्यात रस होता. लहानपणापासूनच त्याला विजय आनंदच्या सिनेमाने झपाटलेलं होतं.
मुंबईत जन्म, पुण्यात फर्ग्युसन
कॉलेजमध्ये शिक्षण, स्टारडस्टमध्ये
नोकरी, मुकुल आनंदकडे उमेदवारी, एफटीआयआयमध्ये शिक्षण, इस्रोच्या डॉक्युमेंटरी विभागात नोकरी या टप्प्यांनंतर त्याला ‘रामन राघव’ या सीरियल किलरवर डॉक्युमेंटरी आणि कथापट यांचा संगम
साधणारी फिल्म करायला मिळाली. ती रिलीझ झाली नाही, पण, ती रामगोपाल वर्माच्या पाहण्यात आली आणि त्याने
त्याला सोबत काम करायची ऑफर दिली. ‘दया’ या नावाचा सिनेमा लिहिण्यात श्रीरामचा सहभाग होता. तो नंतर शिमित अमीनने ‘अब तक छप्पन्न’ या नावाने
दिग्दर्शित केला. दिग्दर्शक म्हणून
पहिली संधी मिळाली ती ‘एक हसीना थी’ या सिनेमामुळे. हा सिनेमा आजही
टोरंट आणि व्हिडिओंच्या सर्किटमध्ये क्लासिक म्हणून आवडीने पाहिला जातो. नकळत एका डॉनच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्याकडून फसवली गेलेली मध्यमवर्गीय, साधीभोळी नायिका नंतर त्याचा सूड घेण्याची योजना आखते आणि ती तडीला नेते, हे दाखवणाऱ्या या सिनेमात श्रीराम राघवनच्या शैलीचं पहिल्यांदा दर्शन घडलं.
हा टिपिकल सूडपटाच्या आवरणात दडवलेला ‘फिल्म न्वार’ सिनेमाच होता. इथे नायिकेला नायकाचं हृदयपरिवर्तन घडवून सुखाने नांदण्याची काहीही सवलत
नव्हती. तिचं उद्ध्वस्त आयुष्य नंतर कोणी नवा समजूतदार
प्रियकर येऊन सावरणार नव्हता. आपलं आयुष्य बरबाद करणाऱ्याला बरबाद करायचं, एवढाच आयुष्याचा उद्देश उरलेली नायिका उर्मिला मातोंडकरने अप्रतिम साकारली
होती. पण, ‘फिल्म न्वार’च्या शैलीतला नायक
कम खलनायक साकारणाऱ्या सैफ अली खानने खरी कमाल केली होती. (देव आनंदशी सैफची तुलना होऊ शकत नाही. पण, या सिनेमाबरोबरच त्याने ‘बिइंग सायरस’, ‘ओमकारा’ यांसारख्या सिनेमांमध्ये नीतीमूल्यांची चाड नसलेल्या, खलनायकी छटेच्या व्यक्तिरेखा ताकदीने साकारल्या होत्या.)
सिनेमाचं जग ब्लॅक अँड व्हाइट म्हणजे चांगलं आणि वाईट या दोन्हीतच विभागलेलं
असण्याची गरज नाही, ते संमिश्र
गुणावगुणांनी भरलेल्या करड्या रंगछटेच्या माणसांनी भरलेलं असू शकतं, हे श्रीराम राघवनच्या सिनेमांमध्ये दिसू लागलं. ‘जॉनी गद्दार’ हा या प्रकारचा
अफलातून सिनेमा. इथे श्रीराम राघवनने विजय आनंदच्या शैलीतलं ढंगबाज, वेगवान, आघाती संगीत, तसाच अंधार, पाऊस, ओव्हरकोट वगैरे सगळं वापरलं. विजय आनंदच्या सिनेमामधलं अधोविश्व ही एक फिल्मी कल्पना होती. त्या काळात जे अंडरवर्ल्ड अस्तित्वात असेल, त्याचं यथायोग्य प्रतिबिंब त्या काळच्या सिनेमात कधीच घडलं नाही. शिवाय संपूर्णपणे काळ्या छटेतला नायक तेव्हाच्या प्रेक्षकांच्या पचनी पडला
नसता.
श्रीराम राघवनचा सिनेमा आला तेव्हा प्रेक्षक प्रगल्भ
होऊ लागले होते. व्हिडिओ, इंटरनेटमुळे जगभरातला सिनेमा पचवू लागले होते. या पिढीला संपूर्णपणे अनैतिक असा नील नितीन मुकेशचा ‘गद्दार जॉनी’ पचवणं अवघड गेलं
नाही. सैल कासोट्याच्या, शरीरभुकेला प्रेमाबिमापेक्षा जास्त महत्व देणाऱ्या बायका, दरोडेखोरांच्या टोळीतले गुंड, ब्लॅकमेलर अशा काळ्याकरड्या व्यक्तिरेखांनी भरलेला हा थरारक सिनेमा अस्सल ‘फिल्म न्वार’ पद्धतीने अतिशय
क्रूर आणि धक्कादायक शेवटाला जातो, तेव्हा लक्षात येतं की इथे दिग्दर्शक, लेखक हा ‘नायका’चा पक्षपाती नाही, त्याची नियती त्याचा जो ‘न्याय’ करते, त्यात सिनेमाकार हस्तक्षेप करत नाही.
ही शैली आणखी पुढे
नेणारा डार्क सिनेमा होता ‘बदलापूर.’ चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला वरुण धवन या सिनेमात सुडाने पेटलेल्या प्रमुख
व्यक्तिरेखेच्या रूपात पुढे आला होता. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या यामी गौतम, हुमा खान आणि राधिका आपटे या स्त्री व्यक्तिरेखाही रूढार्थाने नायिका नाहीत. एका अश्राप मुलीचा खून करणारा नवाझुद्दिन सिद्दिकी सिनेमात एका टप्प्यानंतर ‘बळी’ वाटायला लागतो आणि बायको-मुलीच्या क्रूर हत्येचा बदला घ्यायला निघालेला वरुण ‘खलनायक’ वाटायला लागतो. अपघाताने झालेली हत्या आणि ठरवून केलेली हत्या यात नैतिक-अनैतिकाचा पेच कसा सोडवणार, ते दिग्दर्शकाने हुशारीने प्रेक्षकांवर सोडून दिलेलं आहे. सिनेमाच्या शेवटी दोन अधिक दोन बरोबर चार असं सोपं उत्तर घेऊन जाणाऱ्या
प्रेक्षकांना कोड्यात पाडुन आपलं उत्तर शोधायला भाग पाडणारा आणि सगळ्या गोष्टींची
ठरीव, बेतशुद्ध उत्तरं नसतात, याचं भान देणारा हा सिनेमा आहे.
श्रीराम राघवनला
खरं मोठं व्यावसायिक यश देणारा ‘अंधाधुन’ हा अगदी अलीकडचा सिनेमा नायकच संगीतकार असल्यामुळे संगीतमय आहे. त्यात रोमँटिक भासणारा नायकाचा ट्रॅक आहे. इथेही परक्याशी शरीरसंग करणारी अँटीहिरोइन आहे आणि आधी पाहिलं ते खरं की आता
पाहतोय ते खरं, असा प्रश्न पाडणारी चक्रावणारी पटकथा आहे. शेवटपर्यंत प्रेक्षक ज्याच्या नजरेने सिनेमा पाहतात असा सिनेमाचा ‘अंध’ नायक नंतर त्यांना असा झटका देतो की शेवटी नेमकं घडलं
तरी काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. जगात अंतिम सत्य असं काही नसतं, प्रत्येकजण सत्याचे आपल्याला गवसलेले किंवा आपल्या सोयीचे अन्वयार्थ मांडत
असतो, हे सांगणारा हा ‘ओपन एंडेड’ शेवट आहे. तुम्हाला हवा तो शेवट घ्या, शेवटी तेही एक मानणंच आहे, असं दिग्दर्शक इथे सांगतो.
श्रीराम राघवन आणि
विजय आनंद यांच्यात काळाचं जवळपास चाळीस ते पन्नास वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे विजय आनंदवर व्यावसायिक यशस्वी आणि संगीतप्रधान सिनेमा बनवण्याची जी
जबाबदारी होती, ती आता श्रीराम राघवनवर नाही. तो मूळ ‘फिल्म न्वार’मधली नियतीशरणता, विनाशाची अटळता आणि
क्रौर्य जराही पातळ न करता निर्भीडपणे मांडू शकतो. त्या बाबतीत तो दोन पावलं पुढे म्हणजे ‘निओ न्वार’च्या टप्प्यात आला आहे. मात्र, बाह्यात्कारी लोकप्रिय व्यावसायिक सिनेमाची चौकट
निवडून, त्यात नृत्यसंगीताची बहार उडवून देऊन ‘फिल्म न्वार’चं सुपरडुपर हिट
कॉकटेल बनवण्याची संधी त्याला ‘एजंट विनोद’मध्ये मिळाली होती. मात्र, हा गुप्तहेरपट काही तुकड्यांतच जमून आला, एकत्रित परिणामात फसला. मात्र, या सिनेमातली सगळ्यात कमाल मोमेंट म्हणजे ‘कुछ तो है तुझसे राबता’ या अतिशय कर्णमधुर प्रणयरम्य गीताच्या पार्श्वभूमीवर सिंगल शॉटमध्ये चित्रित
केलेला काही मिनिटांचा प्रचंड गोळीबाराने भरलेला हिंसाचार. याला एकीकडे जॉन वूच्या ‘हार्ड बॉइल्ड’ या सिनेमातल्या सुप्रसिद्ध हॉस्पिटलदृश्याचा संदर्भ आहे. तिथे हॉस्पिटलमध्ये अगदी अशाच प्रकारे सिंगल शॉटमध्ये काही मिनिटांचा हिंसाचार
चित्रित केलेला आहे. मात्र, ‘एजंट विनोद’च्या गाण्याचं नातं पुन्हा विजय आनंदच्या सिनेमांशी
जास्त घनिष्ट आहे. विजय आनंदच्या ‘ज्वेल थीफ’मध्ये अतिशय थरारक प्रसंग हे हेलनच्या ‘बैठे है क्या उसके पास’ या कॅबरे
नृत्याच्या पार्श्वभूमीवर घडतात, फरियालच्या नृत्याच्या पार्श्वभूमीवर घडतात आणि क्लायमॅक्सला ‘होठों पे ऐसी बात मै दबा के चली आयी’ हे अप्रतिम गाणं
आहे. त्याच्या ‘ब्लॅकमेल’ या सिनेमात ‘मिले, मिले दो बदन’ या शृंगारिक प्रेमगीतात एकीकडे नायक-नायिका मीलनाची ओढ दाखवतात आणि दुसरीकडे खलनायकांची टोळी त्यांना शोधत असते.
‘अंधाधुन’च्या यशाने श्रीराम राघवनला पुन्हा एकदा मोठ्या कॅनव्हासवर संगीतमय ‘फिल्म न्वार’ साकारण्याची संधी
मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गीत-संगीत-नृत्य-प्रेम-वासना-भावना-वंचना-यातना-हिंसा-थरार यांचं झपाटणारं वेगवान आणि धक्कादायक कॉकटेल घडवणारा एखादा ‘ज्वेल थीफ’ किंवा ‘तीसरी मंझिल’ किंवा ‘जॉनी मेरा नाम’ पुन्हा पडद्यावर आलाच तर त्याच्यावर दिग्दर्शक म्हणून श्रीराम राघवनचंच नाव
असेल, हे नक्की.
नमस्कार सर जी. 'फिल्म न्वार' हा शब्द नाही समजला... 🤔... 🙏🙏🙏
ReplyDelete