‘आयेगा, आयेगा, आयेगा...’
दुरून
उमटणारे अस्फुट सूर... अंधारात धुराची वलयं सोडत वळणारा, चेहऱ्यावर उत्कंठा आणि भयाचं मिश्रण दाखवणारा नायक, त्याच्या चालीबरोबर वाढत जाणारा आवाज, स्वर्गीय अप्सराच भासावी, अशी शुभ्रवस्त्रांकित नवयौवना झोपाळ्यावर झुलते आहे... नायक तिच्या दिशेने ओढला जातो आणि एकदम झुल्यावरून ती गायब होऊन नुसता रिकामा झुलाच हिंदोळत राहतो...
‘आयेगा आनेवाला’चे मनाला झपाटून टाकणारे स्वर भयाचे शहारे अंगावर आणतात...
हिंदी
सिनेमामध्ये ज्याच्यापासून सस्पेन्स थ्रिलरची विधिवत सुरुवात झाली असं मानता येईल, त्या ‘महल’ने पुढे अनेक वर्षं हिंदी सिनेमामध्ये क्राइम थ्रिलरची मांडणी कशी असेल, याचा एक वस्तुपाठ घालून दिला. स्मशानात अचानक प्रकटणारी स्त्री (वो कौन थी), रात्रीच्या वेळी दिवा घेऊन ‘कहीं दीप जले कहीं दिल’ असं हाँटिंग गाणं गात फिरणारी नायिका (बीस साल बाद), तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, असं पुन्हा झपाटणाऱ्या सुरातच गाणारी नायिका (मेरा साया) अशा प्रकारच्या मांडणीचं उगमस्थान म्हणजे ‘महल’चं ‘आयेगा आनेवाला’ आणि ती झपाटलेली हवेली.
गंमत
म्हणजे या सगळ्या सिनेमांच्या कथानकांमध्ये वेगळेपण आहे. काही निव्वळ रहस्यपट आहेत, काहींमध्ये गुन्हेगारीचा स्पर्श आहे किंवा काही सोशल थ्रिलरही आहेत. बहुतेकांची ‘प्रेरणास्थानं’ परदेशी आहेत. शेरलॉक होम्सच्या ‘हाऊंड्स ऑफ बास्करविले’वर बेतलेला ‘बीस साल बाद’ घ्या, ‘रिबेका’चं रूपांतर असलेला ‘कोहरा’ घ्या किंवा अॅगाथा ख्रिस्तीच्या ‘टेन लिट्ल निगर्स’वर बेतलेला ‘गुमनाम’ घ्या किंवा मराठीतल्या ‘पाठलाग’वर बेतलेला ‘मेरा साया’ पाहा... या सगळ्या सिनेमांमध्ये संगीतमय गूढरम्यता हा एक समान विशेष सापडू शकतो. कथानक कोणत्याही वळणाचं असो, हिंदी सिनेमाचा प्रेक्षक हा त्यात रोमान्स पाहायला येतो आणि त्याला उत्तम गाणीच थिएटरकडे खेचून आणतात, हे समीकरण लक्षात घेऊन या सिनेमांची रचना केली गेलेली आहे. मात्र, काहीशा संथ चालीचे हे सिनेमे आहेत. त्यात रहस्याचा भाग प्रेक्षकाला थिएटरमधून घाबरवून पळून जायला भाग पाडणारा ठरू नये, यासाठी रोमान्स, विनोद, गाणी यांच्या मसाल्यात रहस्य पातळ करून वाढलेलं आहे.
एकीकडे
या संथगतीच्या, ब्रिटिश सिनेमांच्या धर्तीच्या रचनेचे सिनेमे तयार होत असताना दुसरीकडे गुरुदत्तच्या ‘आरपार,’ ‘सीआयडी’ यांसारख्या सिनेमांमधून क्राइम थ्रिलर एक वेगळा आकार धारण करत होते. इथे धुक्यात हरवलेली हवेली, हातात कंदील घेतलेला रामूकाका, शुभ्र कपड्यांमध्ये दिवे घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया वगैरे गूढ रहस्याचा भागच नव्हता. इथली गुन्हेगारी ही मुंबईच्या अधोविश्वातली खरीखुरी गुन्हेगारी होती. इथे खलनायकांचे अड्डे होते, त्यात नृत्य करणाऱ्या बदनाम पण चांगल्या हृदयाच्या नर्तिका होत्या, सहृदय असूनही वाममार्गाला लागलेला आणि सुधारण्याचा यत्न करणारा नायक होता. हा सगळा तरुण पिढीला भावणारा सरंजाम आणि जोडीला ठेकेबाज संगीत, त्याचं अफलातून टेकिंग असा हा मामला होता. पण या सिनेमांमध्येही गुन्हेगारीचा, थरारक भाग हा तोंडीलावण्यासारखा होता. मेंदू गुंगवून टाकणारं रहस्य असा काही प्रकार या संगीतमय गुन्हेगारीपटांमध्ये नव्हता. अशाच प्रकारच्या शक्ति सामंत, प्रमोद चक्रवर्ती, राज खोसला यांच्या सस्पेन्स थ्रिलरपटांनी गुरुदत्त शैलीच पुढे नेली.
‘नौ दो ग्यारह’ हा सिनेमाही याच पठडीतला. पण, त्याचा दिग्दर्शक गोल्डी आनंद अर्थात विजय आनंद याचं पाणी काही वेगळंच आहे, याची जाणीव या सिनेमाच्या अखेरच्या प्रसंगाने करून दिली होती. क्लायमॅक्सला घड्याळातल्या पाच मिनिटांच्या जागी बरोब्बर तेवढाच रिअल टाइम क्लायमॅक्स रेखाटून त्याने प्रेक्षकांचा श्वास रोखायला लावला आणि क्राइम थ्रिलर्सचा एक वेगळाच जॉनर किंवा एक वेगळीच पठडी निर्माण होते आहे, याची साक्ष त्याने दिली. विजय आनंदवर त्याच काळात युरोपात लोकप्रिय असलेल्या फिल्म न्वारचा म्हणजे नव्या शैलीतल्या, सिनेमाचं पढीक व्याकरण मोडून काढणाऱ्या सिनेमांचा प्रभाव असावा. त्याची संगीताची जाण उत्तम होती. त्याचं गाण्यांचं टेकिंग गुरुदत्तची आठवण करून देणारं होतं. एकीकडे ‘गाइड’सारखा मास्टरपीस दिग्दर्शित करणारा विजय आनंद दुसरीकडे ‘तीसरी
मंझिल’ आणि ‘ज्वेल थीफ’ यांच्यासारख्या मेंदूला मुंग्या आणणाऱ्या सिनेमांचाही दिग्दर्शक होता, हे आश्चर्यच होतं. त्याने हिंदी सिनेमातल्या क्राइम थ्रिलरचा सगळा ढाँचा बदलून टाकला. त्याच्या सिनेमात गूढरम्यता नव्हती, मात्र मेंदू चक्रावून टाकणारा सस्पेन्स असायचा. प्रेक्षकांना कोडी घालायची आणि ती सोडवत पुढे जायचं, असं बुद्धिबळ खेळत त्याचे हे सिनेमे चालतात. त्यांच्यात व्यावसायिक सिनेमाचे सगळेच मसाला घटक आहेत. देखणा नायक, नायिका, त्यांचं प्रेमप्रकरण, गाणीबजावणी, हे सगळं आहे. मात्र सिनेमाचा मूळ धागा हा सस्पेन्सचा आहे, हे प्रेक्षक विसरू शकत नाही. जबरदस्त उंचावर जाणारे क्लायमॅक्स आणि प्रेक्षकांना हमखास धक्का देणारं रहस्योद्घाटन ही त्याची वैशिष्ट्यं.
१९७०च्या
दशकापर्यंत साधारणपणे हाच क्राइम थ्रिलरचा ढाँचा होता. अपवाद होते चोपडा बंधूंचे दोन जबरदस्त सिनेमे. एक होता बी. आर. चोपडा यांचा ‘कानून’ आणि दुसरा होता यश चोपडा
यांचा ‘इत्तेफाक.’ आजच्या पिढीत म्हणजे जवळपास साठ वर्षांनंतर हिंदी सिनेमाने क्राइम थ्रिलरचा जो ढंग अवलंबलेला दिसतो, त्याचं नातं या दोन सिनेमांशी जोडलं जातं. एका अर्थी आधुनिक क्राइम थ्रिलर्सची पायाभरणी या दोन सिनेमांनी केली. नायक, नायिका, प्रेमप्रकरण आणि गाणी या मसाल्याला या दोघांनी थेट फाटा दिला. थरारक सिनेमा म्हणजे थरारपटच. त्यात इतर भानगडी ठेवायच्याच नाहीत, हा त्यांचा खाक्या त्यांच्या काळात क्रांतिकारकच म्हणायला हवा. कारण, गाण्यांविना सिनेमा ही कल्पनाच तेव्हा असहनीय होती. शिवाय थरारपटांमधला ताण कमी करणारे रिलीफ वगैरे पुरवायलाही नकार देणं हे धक्कादायक होतं. एवढ्या ताणाची प्रेक्षकांना सवय नव्हती. या सिनेमांनी प्रशंसा मिळवली, नंतर ते क्लासिक मानले गेले; पण ते गल्लापेटीवर त्यांनी फारसा छनछनाट केला नाही. ते स्वाभाविकच होतं. म्हणूनच त्यानंतरही बराच काळ शक्ति सामंत, प्रमोद चक्रवर्ती, रामानंद सागर, नासिर हुसैन यांच्या सिनेमांमधून सामाजिक आशयाचे किंवा शुद्ध गुन्हेगारीपट स्वरूपाचेही सिनेमे ‘संगीतमय थ्रिलर’ याच स्वरूपात बनत राहिले आणि त्याच प्रकारचा मसालेदार सिनेमा प्रेक्षकांना भावत राहिला. विधू विनोद चोपडाने ‘खामोश’सारखा सिनेमा बनवून पदार्पण केलं, पण त्याला यश मिळवून दिलं ते ‘परिंदा’सारख्या, मसालापटांची सगळी वैशिष्ट्यं बाळगून थ्रिलरपटाचा अनुभव देणाऱ्या सिनेमानेच. त्यानंतरच्या टप्प्यावर एकीकडे पार्थो घोष वगैरे दिग्दर्शक ‘हंड्रेड डेज’सारखे संगीतमय रहस्यपट बनवत होते,
त्या काळात रामगोपाल वर्माने सिनेमाचं व्याकरण मोडणाऱ्या ‘शिवा’मधून दमदार एन्ट्री घेतली. ‘सत्या’मध्ये त्याने गुन्हेगारी विश्वाचा मानवी पातळीवर घेतलेला शोध गाजला. नंतर त्याने ‘कंपनी’मधून दाऊदच्या गुन्हेगारीचं चित्रण केलं आणि दुसरीकडे ‘सरकार’पटांमधून राजकारण आणि गुन्हेगारी यांच्या सांगडीवर प्रकाश टाकला. त्याने ‘रात’
आणि ‘भूत’सारख्या सिनेमांमधून थेट भयपटांचीही निर्मिती करून पाहिली. आजच्या पिढीतल्या क्राइम थ्रिलर्सवर सगळ्यात मोठा प्रभाव रामगोपाल वर्माचाच आहे. अनुराग कश्यपपासून श्रीराम राघवनपर्यंतचे आजचे सगळे थरारपट दिग्दर्शक हे उमेदीच्या काळात रामूशी जोडलेले होते. या दोघांनीही सिनेमाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न त्यांच्या थरारपटांमध्ये केलेला दिसतो. अनुरागचे ‘नो स्मोकिंग’पासून ‘अग्ली’पर्यंतचे सगळे सिनेमे या मोडतोडीची
साक्ष देतात. श्रीराम राघवनने तर विजय आनंदचा थरारपटांचा जॉनर ‘जॉनी गद्दार’पासून ‘अंधाधुन’पर्यंत सगळ्या सिनेमांमध्ये आणखी पुढे नेलेला दिसतो. विशाल भारद्वाजचा ‘कमीने’, रीमा कागतीचा ‘तलाश’, नीरज पांडेचा ‘अ वेन्सडे’,
सुजॉय घोषचा ‘कहानी’, निशिकांत कामतचा ‘४०४ नॉट फाऊंड’ आणि राजकुमार गुप्ताचा ‘आमिर’ हे सिनेमे या शैलीतले लक्षणीय सिनेमे आहेत.
आज
सिनेमांमध्ये गाण्यांची गरज फारशी उरलेली नाही. सिनेमांचा वेळ कमी झाला आहे. वेगवेगळ्या शैलींच्या थरारपटांना स्वीकारणारा वर्ग तयार झाला आहे. पण, तरीही प्रेक्षकांना सतत इंतजार आहे तो सर्व वर्गाच्या प्रेक्षकांना भावणाऱ्या उत्तम संगीतमय थ्रिलरची... कारण संगीत, नृत्य, प्रेम आणि थरार यांची चमचमीत भेळ बनवणारी विजय आनंदी शैली हीच खरी ‘भारतीय थ्रिलरशैली’ आहे.
No comments:
Post a Comment