Friday, November 22, 2013

एक हिंदुस्तानी, सहा भारतीय आणि एक अनिवासी

काही सिनेमे धूमधडाक्यात लागतात, महिन्या-पंधरा दिवसांत 100, 200, 300 कोटींचा गल्ला गोळा करतात...
सहा महिन्यांनंतर त्यांचं नावही लोकांना आठवावं लागतं आणि वर्ष-दोन वर्षांनी ते सामूहिक विस्मृतीत जमा होतात.
काही सिनेमे लागतात, तेव्हा पडतात; नंतर धो धो चालतात. काळाच्या पुढचे सिनेमे असा त्यांचा उदोउदो होतो.
काही सिनेमे गल्लापेटीवर पार आपटतात, पण समीक्षकांच्या आणि जाणकारांच्या स्मरणरंजनातून जिवंत राहतात. त्यातून त्यांना कल्ट फॉलोइंगही मिळतं. यांना लोक क्लासिक म्हणून ओळखतात. त्यांचं नाव सगळय़ांना माहिती असतं, पाहिलेल्यांची संख्या कायम हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहते...

गोवामुक्तीच्या लढय़ाचा संदर्भ असलेला `सात हिंदुस्तानी' हा या सगळय़ांपेक्षा वेगळा सिनेमा आहे... तो आला तेव्हा फ्लॉप झाला, त्याला कोणी क्लासिक मानत नाही, तो तेव्हा कोणी पाहिला नव्हता, आजही कोणी पाहात नाही आणि तरीही त्याचं नाव आणि संदर्भ हिंदी सिनेमाच्या दर्दी प्रेक्षकाला विसरता येणार नाही... हा सिनेमा भलत्याच कारणाने अजरामर होऊन बसलेला आहे... हिंदी सिनेमातल्या आजवरच्या सर्वात मोठय़ा महानायकाचं अपघाती पदार्पण या सिनेमातून झालं होतं... आजही या सिनेमाच्या पोस्टरांवर त्याचा नंतर मोठा करून मध्यभागी लावलेला फोटो दिसतो...  
हा सिनेमा अमिताभ बच्चनचा दुसरा सिनेमा असता, तरी त्याचा फारसा कुठे उल्लेख झाला नसता...
या सिनेमात अमिताभ बच्चन नसताच, तर तो काळाच्या उदरात केव्हाच गडप झाला असता... के. ए. अब्बास यांच्या इतर बहुतेक सगळय़ा सिनेमांच्या वाटय़ाला जे चौफेर अपयश आलं, तेच `सात हिंदुस्तानी'च्या वाटय़ाला आलं असतं...
ख्वाजा अहमद अब्बास हे नाव हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजही घेतलं जातं ते त्यांनी स्वतः काढलेल्या, दिग्दर्शित केलेल्या सिनेमांसाठी नाही... शहर और सपना हा त्यांचा एकमात्र व्यावसायिक यशस्वी सिनेमा... तोही आज कोणाच्या खिजगणतीत नाही, तर धरती के लाल, दो बूंद पानी, बंबई रात की बाहों में, नक्षलाइट वगैरे त्यांच्या आल्या-गेल्या सिनेमांची याद कोणाला राहील. अब्बास हे सर्वपरिचित आहेत ते राज कपूरच्या चित्रपटांचे लेखक म्हणून. आवारा, श्री 420 चे लेखक म्हणून. अब्बास हे फक्त नावाचेच मुसलमान. त्यांचा सगळा पिंड बंडखोर कम्युनिस्टाचा. त्यांच्या कॉलेजात म्हणे एकदा एक दिपोटी आला आणि त्याने इंग्रजांचं राज्य कसं परमदयाळू आहे, त्याने किती सुधारणा केल्या आहेत, अशी टेपच लावली. इंग्रजांनी काय काय सुखसुविधा निर्माण केल्या याची जंत्री सांगताना तो सांगू लागला, इंग्रजांनी बनवले शफाखाने (हॉस्पिटल्स), डाकखाने (टपाल कार्यालयं)... विदय़ार्थ्यांमधून अब्बास ताडकन उद्गारले, `कैदखाने!...' तो त्यांना स्फुरलेला पहिला खटकेबाज संवाद असावा. 
पत्रकारितेतून सिनेमालेखनात आलेल्या आणि कट्टर साम्यवादी विचारांच्या अब्बासांवर नेहरूंच्या स्वप्नाळू हिंदुस्थानाच्या स्वप्नाचा मोठा पगडा होता. त्या सगळय़ाचं अजब कॉकटेल त्यांच्या व्यक्तिमत्वातही झालेलं दिसतं आणि त्यांच्या लेखनातही. एकीकडे राज कपूरसारख्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन कमर्शियल मांडणीच्या सिनेमाकाराला त्याच्या सिनेमांचं आर्ग्युमेंट आणि त्यानेच साकारलेल्या नायकाला व्यक्तिमत्त्व देताना नाच-गाणी, मेलोड्रामा, योगायोग वगैरे सगळय़ा फिल्मी मसाल्याची रेलचेल करण्यात कोणतीही कसर न सोडणार्या अब्बास यांनी त्या सगळय़ा सिनेमांमधून त्यांचं साम्यवादी तत्वज्ञान मांडण्याची संधी कधी सोडली नाही. राज कपूर यांचा नायक `सोविएत' रशियामध्ये अमाप लोकप्रिय झाला, हा काही योगायोग नव्हता, ती लोकप्रियता खरंतर अब्बासांची लोकप्रियता होती, त्यांच्या कम्युनिस्ट कंटेंटची लोकप्रियता होती. अब्बास या लोकप्रियतेवर स्वार होऊन राज कपूरच्या सिनेमांचीच नक्कल असलेले सिनेमे त्याला किंवा इतरांना घेऊन काढू शकले असते आणि स्वतःही मोठे सिनेमाकार बनू शकले असते. पण, या माणसाच्या व्यक्तिगत सिनेमाच्या संवेदना अगदीच वेगळय़ा होत्या. त्यांना संपूर्णतया यथार्थवादी आणि आदर्शवादी सिनेमे काढायचे होते. असे सिनेमे काढण्याचं धारिष्टय़ कोणताही कमर्शियल निर्माता करणार नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे सिनेमाशीच लग्न लागलेल्या या सद्गृहस्थाने अख्खं आयुष्य एकाहून एक कमर्शियल सिनेमे लिहून पैसे कमावले आणि ते सगळे आपल्या आदर्शवादी सिनेमांमध्ये खर्च करून टाकायचे, यात घालवून टाकलं. `बॉबी'सारखा तद्दन बाजारू सिनेमा तुम्ही लिहिलातच कशाला, असं जेव्हा तेव्हाच्या एका प्रख्यात समीक्षकाने त्यांना दरडावून विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की `दो बूंद पानी' आणि `शहर और सपना' काढण्यासाठी पैसे मिळावेत, म्हणून... 
सगळय़ात हृदयद्रावक गोष्ट ही आहे की इतके लोकप्रिय सिनेमे लिहून, राज कपूरला व्यक्तिमत्त्व देऊनही व्यावसायिक यशाची कस्तुरी आपल्या निर्मितीला आणि दिग्दर्शनाला अप्राप्य असणार आहे, याची कल्पना अब्बास यांना असणारच; पण, अपयशी का होईना, एखादा `क्लासिक' सिनेमा आपल्या नावावर असावा, असं त्यांना कधी ना कधी वाटलं असेल. तेही त्यांना अप्राप्यच राहिलं.
`सात हिंदुस्तानी' किंवा अब्बासांचा इतर कोणताही सिनेमा क्लासिक बनण्याच्या जवळपास फिरकू शकला नाही, याचं कारण `सात हिंदुस्तानी'मध्येही समजतं. जो सामाजिक जाणिवांच्या दृष्टीने अतिशय सजग दिग्दर्शक असतो, तो जर लेखकही असेल, तर सिनेमातून तो भाषण ठोकायला लागतो. लोक सिनेमा पाहायला आलेले असतात, त्यांना भाषणबाजी आवडत नाही. जेव्हा लेखक अब्बासांना वसंत साठेंसारख्या सहलेखकाची जोड असायची आणि राज कपूरसारखा दिग्दर्शक त्यातून वेचक तेच निवडून घ्यायचा, तेव्हा त्यांचे सिनेमे आटोपशीर, प्रमाणबद्ध आणि मुख्य म्हणजे प्रचारकी थाट टाळलेले असायचे. अब्बास स्वतःच लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक असायचे, तेव्हा ते अनेक सामाजिक प्रश्नांवर एकाच कथानकात भाष्य करायला जायचे आणि मग सगळी मांडणी भाबडी होऊन जायची. शिवाय, चांगला लेखक हा चांगला दिग्दर्शक होऊ शकेलच असं सांगता येत नाही, हे अब्बास यांच्या बाबतीत खरं होतं. सिनेमाच्या तांत्रिक अंगांच्या बाबतीत ते बरेचसे ढिले होते. त्यामुळे त्यांच्या जवळपास सगळय़ाच सिनेमांवर हौशीपणाची छाप दिसून येते...
... ती `सात हिंदुस्तानी'मध्येही आहे, अगदी अमिताभच्या अभिनयातही. कारण साधं आहे. कितीही गुणवान असला तरी अमिताभ त्या सिनेमात न्यूकमर होता, तो त्याचा पहिला सिनेमा होता आणि त्याच्या गुणांना पैलू पाडण्याची क्षमता अब्बास यांच्यात नव्हती, सात नायक असलेल्या सिनेमात ती त्यांची प्रायॉरिटीही असण्याची शक्यता नाही. त्यामुळे या सिनेमात अमिताभची डायलॉग डिलिव्हरीही त्याआधी शेरवुड कॉलेजात त्याने केलेल्या इंग्रजी नाटकांमधल्या संवादफेकीसारखीच कृत्रिम आहे...
हा सिनेमा अमिताभला कसा मिळाला, याच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. बच्चन कुटुंब हे कायम नेहरू घराण्याच्या सावलीत वाढलं. नेहरूंच्या कृपाछायेमुळे हरिवंशरायांसारख्या सालस प्रोफेसराला परदेशात नेमणुका मिळाल्या. मात्र, अमिताभच्या उदयापर्यंत हे घराणं परप्रकाशितच होतं. सामाजिकदृष्टय़ा ते ज्या वर्तुळात होते, त्या वर्तुळात राहण्याइतकी त्यांची आर्थिक स्थिती संपन्न नव्हती. त्यात मुलांना बोर्डिंग स्कूल वगैरे श्रीमंती थाटाच्या जीवनशैलीशी त्यांची खेचाखेच सुरू असायची. त्यामुळे कोलकात्यात सुखासुखी मिळत असलेली नोकरी सोडून अमिताभने सिनेमात करीअर करायचा निर्णय केल्यानंतर प्रसंगी मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवण्याचीही तयारी ठेवली होती. इथे ओळखीचं कोणी नव्हतं. असं म्हणतात की ज्या टॅलंट हंट स्पर्धेतून राजेश खन्ना हिंदी सिनेमात आला, त्या स्पर्धेत अमिताभही होता, पण प्रभाव पाडू शकल्याने बाद झाला होता. त्याची उंची आणि त्याचा आवाज (हो हो आवाज) यामुळे त्याला कोणी भूमिका देत नव्हते. अमिताभ असं सांगतो की त्याने दिल्लीतून अब्बास साहेबांना पत्र लिहिलं आणि त्यांनी पाचारण केलं, म्हणून तो सात हिंदुस्तानीमधला एक हिंदुस्तानी बनला. काही मंडळींचं म्हणणं असं आहे की अब्बास हे नेहरूवादी असल्यामुळे नेहरूंच्या आणि गांधी घराण्याच्या जवळचे होते. हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांच्याशीही त्यांचा परिचय होता. या दोघांच्या सुपुत्राला आपल्या सिनेमात संधी दय़ा, अशी चिठ्ठी तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी दिली म्हणून त्यांनी अमिताभला संधी दिली. 
गंमतीची गोष्ट म्हणजे अमिताभने या सिनेमात जी मुस्लिम शायराची व्यक्तिरेखा साकारली आहे, ती त्याला मिळाली टिनू आनंदमुळे. टिनूची या भूमिकेसाठी निवड झाली होती. नेमक्या त्याच वेळेला सत्यजित राय यांचा सहायक दिग्दर्शक बनण्याची संधी त्याला मिळाली आणि तो तिकडे गेला. ही भूमिका अमिताभला मिळाली. अमिताभ यानंतर 18 फ्लॉप सिनेमे देऊन का होईना, सुपरस्टार झाला. टिनू ना अभिनेता म्हणून यशस्वी झाला, ना `शहेनशहा'चा अपवाद वगळता दिग्दर्शक म्हणून. सत्यजित राय यांच्याकडे उमेदवारी करून त्याने `शहेनशहा' काढावा, हाही एक विनोदच. पण, टिनूची नियतीही या सिनेमाशी जोडलेली राहिलीच. या सिनेमातली एकमेव नायिका शहनाज (अभिनेते आगा यांची मुलगी आणि जलाल आगाची बहीण) हिच्याशी त्याचे भावबंध जुळले आणि तो तिच्याशी विवाहबद्ध झाला.
या सिनेमात जलाल आणि शहनाझ ही दोन्ही भावंडं होती, उत्पल दत्त होते, `चेम्मीन' या गाजलेल्या मल्याळी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अभिनेता मधु होता, मेहमूदचा भाऊ अन्वर होता... प्रयोगशीलतेबाबत व्ही. शांतारामांचा आदर्श अब्बास यांनी ठेवला असावा. शांतारामांनी `शेजारी' आणि `पडोसी' हे सिनेमे काढताना हिंदूच्या भूमिकेत मुसलमान आणि मुसलमानाच्या भूमिकेत हिंदू असं गिमिक केलं होतं. अब्बास यांनी या सिनेमात ते गिमिक आणखी पुढे नेऊन बंगाली उत्पल दत्त यांना पंजाबी माणसाची व्यक्तिरेखा, हिंदू अमिताभला मुस्लिम शायराची व्यक्तिरेखा, मुस्लिम शहनाझला ख्रिस्ती मारियाची व्यक्तिरेखा असला अचाट प्रयोग केला होता. हा सिनेमाच मुळात जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांच्या बंधनांपासून मुक्तीचा संदेश देणारा होता. त्याची (म्हणजे अब्बास यांच्या भाषणबाजीची) सुरुवात कास्टिंगपासूनच झाली होती...
`सात हिंदुस्तानी'ची कथा काय, असं हा सिनेमा न पाहिलेल्या कोणालाही विचारलं तरी तो त्याचं उत्तर देऊ शकतो. पोर्तुगीजांच्या अमलातून गोवा मुक्त करण्याच्या लढय़ात सात हिंदुस्तानी तरुण सहभागी होतात, त्यांची गोष्ट, हे ते उत्तर. पण, हे अर्धवट आणि सोयीस्कर उत्तर आहे. एवढीशी गोष्ट सांगण्याकरता अब्बासांनी या सिनेमाचा घाट घातला नव्हता. अतिशय भाबडय़ा आणि क्रूड अशा कास्टिंगच्या त्यांच्या प्रयोगामागेही काही वेगळा विचार होता. तो या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे आणि गोव्याचा स्वातंत्र्यसमर हा पार्श्वभूमीला असलेला विषय आहे. हा काही त्या मुक्तीलढय़ावरचा सिनेमा नाही, हा त्यापलीकडच्या मुक्तीलढय़ावरचा सिनेमा आहे.
सिनेमातली एकमेव नायिका मारिया ही सहाजणांना पत्रं लिहित असल्याच्या प्रसंगातून सिनेमा सुरू होतो. ती आजारी आहे, मृत्यूच्या दारात आहे आणि तिला मरणाआधी आपल्या या सहा कॉम्रेडांना भेटायचं आहे. त्यांच्या साथीने तिने एकेकाळी गोव्याच्या मुक्तीलढय़ात एक गुप्त मोहीम पार पाडलेली असते. देशाच्या वेगवेगळय़ा प्रांतांमध्ये असलेल्या या मित्रांना बोलावून एका अरण्यात निमलष्करी प्रशिक्षण घेऊन गोव्यात घुसखोरी करून पोलिस स्टेशनांवर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवायचा आणि गोव्यातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याकांक्षेला बळ दय़ायचं, चिथावणी दय़ायची, अशी ती मोहीम असते. ही मोहीम पार पाडल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना पकडून, छळून गोव्याच्या हद्दीबाहेर फेकून दिलेलं असतं... हा झाला फ्लॅशबॅक. तिने आणि तिच्या मित्रांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांताचे भेद बाजूला ठेवून एक हिंदुस्तानी म्हणून हिंदुस्तानासाठी केलेल्या त्यागाची कहाणी. पण, मारिया जेव्हा त्यांना पत्र लिहिते तेव्हा मात्र हे सगळे मित्र आपापल्या प्रांतातल्या विभाजनवादी चळवळींमध्ये अग्रेसर असतात. कोणी भाषेच्या आधारावर आपल्याच सरकारशी लढत असतो, कोणी प्रांताच्या. तामिळनाडूमधला हिंदीविरोधी लढा, पंजाबचं हरयाणा, हिमाचल, पंजाब असं त्रिभाजन, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या हिंदीवादी चळवळी यांच्यात तिचे मित्र सहभागी झालेले असतात. महाराष्ट्रीयांसाठी गैरसोयीचा विषय म्हणजे या सिनेमात संयुक्त महाराष्ट्राचा लढाही `विभाजनवादी' म्हणून आकळला गेला आहे. नेहरूंच्या प्रांतविहीन एकात्म देशाच्या स्वप्नात ही भाषक अस्मितांना फुंकर घालणारी भाषावार प्रांतरचना बसणारी नव्हती. हे सगळे मित्र जेव्हा गोव्यात पोहोचतात, तेव्हा मारिया मरण पावलेली असते. पण, तिच्यामुळे त्या सर्वांना आपण सर्वांनी सात हिंदुस्तानी बनून केलेल्या संघर्षाची आठवण होते आणि हे सगळे पुन्हा फुटीरवादी चळवळींमध्ये सहभागी न होण्याची शपथ घेतात...
...हे कथानक वाचल्याबरोब्बरच हे समजतं की हे आधी आर्ग्युमेंट ठरवून त्यानुसार बेतलेलं कथानक आहे. ती कृत्रिमता त्याच्यामध्ये आहेच. सिनेमामध्ये तर हाताळणीतही तांत्रिक त्रुटी, भाबडेपणा, सोपेपणा, भाषणबाजी, हौशी पद्धतीचा अभिनय ही अब्बास यांच्या सिनेमाला साजेशी वैशिष्टय़ं आहेत. पण, मुळात हे कथानक प्रसरणशील आणि प्रवाही कालाच्या एका टप्प्याचं अतिशय बंदिस्त आकलन मांडणारं कथानक आहे. आज भाषावार प्रांतरचनाही लोकांच्या आशाआकांक्षा आणि अस्मितांच्या अपेक्षांना पुरेशा पडत नाहीयेत. एकाच भाषेच्या राज्यांचीही शकलं पडल्याने भाषावार प्रांतरचनेच्या कल्पनेचे तीन तेरा झालेले आहेत. अब्बास यांना आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या नेहरूंना असं वाटलं होतं की भारतीय समाज त्यांच्याइतकाच भाबडा आणि स्वप्नाळू आहे, प्रगतीशील आहे. तो आपल्या जुन्या ओळखी भारतीयत्वाच्या ओळखीत विसर्जित करून टाकेल. प्रत्यक्षात या बनेल समाजाने एकेकाळच्या सगळय़ा सुधारक पावलांवरून मागे फिरून अस्मितावाद कवटाळला आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा यांच्या ओळखी आधीपेक्षाही जास्त प्रबळ होऊन बसलेल्या आहेत. हा देश `भारतीयां'नी भरलेला आहे, पण त्यांचं भारतीयत्वही या ओळखींच्या नंतर येतं, त्याआधी येत नाही; मग अब्बास यांना अभिप्रेत असलेला `हिंदुस्तानी'पणा तर फार म्हणजे फारच दूर राहिला... त्यांच्या या सिनेमातले सात नायक वास्तविक आयुष्यात आपापल्या भाषेच्या, प्रांताच्या चाकोरीतच बद्ध राहिले... उत्पल दत्त यांचा काहीसा अपवाद. आणि त्यांच्या ज्याच्यामुळे हा सिनेमा आजही स्मरणात आहे, तो अमिताभ बच्चन तर कागदोपत्री का होईना, कायदय़ाने भारतीयही राहिला नाही, फार कर भरावे लागतात म्हणून तो अनिवासी भारतीयसुद्धा बनायला तयार झाला...
अब्बास यांचं स्वप्न अपयशी तर ठरलंच... पण, अश्वत्थाम्याच्या जखमेसारखं `अमिताभचा पहिला सिनेमा' म्हणून चिरंतन भळभळणंही त्या स्वप्नाच्या नशिबी आलं...




(पूर्वप्रसिद्धी : गोवादूत दिवाळी अंक २०१३)

Saturday, April 27, 2013

बहुत देर कर दी, बरखुरदार!



 त्र्याण्णव हे सामान्यतः माणूस जिवंत असण्याचंच वय नसतं…
…जिथे या वयातही जिवंत असलेल्या माणसाला तो कोण आहे हेही रोज सकाळी इतर कुणीतरी सांगावं लागतं; तिथे अशा वयातला एखादा कलावंत जिवंत आहेच तर त्याला देऊन टाकू म्हणून, देशातला एक सर्वोच्च पुरस्कार द्यायचा, हा फारच क्रूर विनोद झाला… 
तो भारत सरकारने करून दाखवला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेते प्राण यांना दिल्याने ना त्यांना सन्मानित होत असल्याचा आनंद, ना त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या सन्मानाचं सुख. या पुरस्काराने फार फार तर इतकंच घडलं असेल की प्राणसाहेब अजूनही जिवंत आहेत, हे लोकांना समजलं असेल. आजवर त्यांच्या निधनाच्या एवढया अफवा पसरल्या आहेत की खुद्द प्राणसाहेबांनाही समजलं असेल, अरेच्चा, आपण जिवंतच आहोत की काय! सिनेमा पाहणाऱ्या नव्या पिढीला तर हे काका कोण? याचीच कल्पना नाही. हातपाय थकून 90च्या दशकातच त्यांची चित्रपटांतली कारकिर्द संपली, तेव्हा ते सत्तरीच्या घरात होते. त्यानंतर 20 वर्षं उलटल्यानंतर पुरस्कार दिल्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना ते कदाचित राष्ट्रपतींना म्हणतीलही, ”बरखुरदार, बहुत देर कर दी आपने!” 
प्राणसाहेबांनी त्यांच्या खास खर्जदार आवाजात, भेदक नजर रोखून, ‘बरखुरदार’ हा केवळ त्यांनीच म्हणण्यासाठी निर्माण केलेला शब्द उच्चारला, तर आपल्या देशाचे राष्ट्रपती तर सोडा, अमेरिकेचेही राष्ट­्राध्यक्ष एकदम गर्भगळित होतील आणि खजील होऊन आपली फार मोठी चूक झाली याची कबुली देतील.
‘प्राण’ या नावाचा दरारा आणि रुपेरी पडद्यावरची दहशत अशी जबरदस्त होती. त्यांच्या एंट्रीलाच पब्लिक चिडीचूप व्हायचं आणि नंतर प्रत्येक वेळी ते पडद्यावर आले की त्यांच्या नावाने बोटं मोडत त्यांच्या कृष्णकृत्यांकडे डोळे विस्फारून पाहत हतबलपणे हात चोळत बसायचं. प्राणही नीचपणाच्या एकेक भयंकर हरकती करून पब्लिकचा हिरमोड होऊ द्यायचे नाही. जुन्या काळातल्या अशा सिनेमांमध्ये हमखास शेवटच्या रिळात ओढूनताणून घुसडलेला एक मनःपरिवर्तनाचा प्रसंग असायचा. या टप्प्यापर्यंत नायकाला देशोधडीला लावणं आणि नायिकारूपी झेंडूचं गेंदेदार फूल कुस्करून तिच्या अब्रूचं खोबरं हादडणं, हेच जीवनध्येय असल्यासारखा वागणारा खलनायक या रिळात नायकाकडून मजबूत मार खायचा आणि आपल्या गुन्ह्याची कबुली द्यायचा. यापुढे चांगलं वागण्याची कसम खायचा. नायकही त्याला मोठेपणाने माफ करायचा. हा सगळा आनंदीआनंद पाहून भाबडया पब्लिकला बरं वाटायचं. पण जगातले चार टक्केटोणपे खाल्लेल्या लोकांना ही खात्री असायची की हा बाबा आत्ता नाटक करतोय, नंतर संधी मिळाली की या नायकाच्या घरादारावर नांगर फिरवतो का नाही बघा! सिनेमाभर त्याचा जिच्यावर डोळा असायचा, त्या रूपसुंदर नायिकेलाही हा नायकाच्या हाताखालनं यूँ गुल करेल, अशीही भीती वाटायची. अर्थात, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार, विश्वजीत, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या मेंगळट नायकांपेक्षा प्राणसारख्या राजबिंडया, हिकमती खलनायकाबरोबरच नायिका अधिक सुखी राहील, असंही प्रेक्षकाला मनोमन वाटायचं. पण तशी कबुली कोणी द्यायचा नाही. खलनायकाच्या बाजूने विचार करणं म्हणजे महापाप!
हिंदी सिनेमातला सर्वोच्च खलनायक म्हणजे प्राण. त्या दृष्टीने प्राण हे त्यांचं नावही फार समर्पक आहे. खलनायक हा खरंतर हिंदी सिनेमाचा अर्धा प्राण असतो. फार धाडसी विधान वाटतं का हे? चित्रपट हा सुष्टदुष्टांतला खेळ म्हणून पाहिला तर हे विधान पटू लागेल. ‘बॅटमॅन’च्या ‘द डार्क नाइट’ या सिनेमातला जोकर हा खतरनाक खलनायक नायकाला म्हणजे बॅटमॅनला सांगतो की, ‘गडया, तू आणि मी हेच जगात एकमेकांचे खरे यार आहोत. तू नसशील तर मला काय काम उरणार आणि मी नसेन तर तुझ्या मोठेपणाला कोण विचारतो? मी आहे म्हणून तू आहेस आणि तू आहेस म्हणून मला जगायला मजा येते आहे. त्यामुळे हा खेळ खेळत राहा. मला मारू नकोस, संपवू नकोस. मला संपवलंस तर तूही संपलास.’
हे फार उच्च कोटीचं तत्त्वज्ञान आहे.
अंधार नसेल तर प्रकाशाला कोण विचारणार?
दुष्ट माणसं नसतील, तर सुष्टांची महत्ता कोणाच्या संदर्भात जोखता येणार?
रामायणात रावण नसता तर आयुष्यभर आदर्श रामराज्य चालवण्याखेरीज रामाला काही काम उरलं नसतं आणि तो इतिहासातला ‘आणखी एक’ राजा बनून राहिला असता. रावणामुळे रामाच्या अस्तित्वाला धार आली, अर्थ आला, प्रयोजन आलं. (प्राण यांचा रामायणाशी एक गंमतीशीर संबंध आला होता. ‘सीता बन गयी रावण’ असंही त्यांच्या आत्मचरित्राचं नाव ठेवता आलं असतं. दिल्लीच्या सधन घरात जन्मलेल्या प्राण यांनी शिमल्यात फोटोग्राफीची नोकरी करत असताना तिथे आपल्या आयुष्यातली पहिली भूमिका केली. ती होती रामलीलेतल्या सीतेची. राम बनले होते मदन पुरी. 
या भूमिकेमुळेच त्यांना ‘यमला जट’ या पंजाबी सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. एकदा तोंडावर रंग लागला की काय होतं, ते प्राण यांना तेव्हा कळलं असेल. त्यांनी महिना 200 रुपये पगाराची, सुखाची नोकरी सोडून 50 रुपये पगाराच्या सिनेमाधंद्यात उडी घेतली. असो.) बहुतेक सगळया व्यावसायिक चित्रपटांमध्ये हाच काळयापांढऱ्याचा संघर्ष असतो. सिनेमा रंगीत झाला म्हणून काय झालं, व्यावसायिक सिनेमा आशयाच्या अंगाने ‘ब्लॅक ऍंड व्हाइट’च असतो. यातला खलत्वाचा काळा रंग जर डोळयात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका कभिन्न काळा झाला नाही, तर चांगुलपणाचा श्वेतवर्णही पिरपिरा मलूल होऊन जातो.
‘शोले’चं उदाहरण घ्या. त्या सिनेमात गब्बरसिंग नसता, तर जय-वीरू आणि ठाकूर मिळून काय पाच-तीन-दोन खेळत बसले असते? अमजद खानने गब्बर अशा उंचीला नेला की त्याच्यासमोर सगळयाच व्यक्तिरेखांना उठावदार व्हावं लागलं. तोच दिग्दर्शक, तेच लेखक आणि प्रचंड मोठं बजेट असतानाही ‘शान’ने बॉक्स ऑफिसवर मान टाकली. कारण, ‘शाकाल’मध्ये गब्बरची दहशत नव्हती. त्याला पाहून भीती वाटत नव्हती, हसू येत होतं. कुलभूषण खरबंदा हे काही वाईट अभिनेते नव्हते, पण त्यांच्यात व्हिलनचा तिखटजाळ ठसका नव्हता. हा खलनायक सॉफिस्टिकेटेड होता म्हणून पडला म्हणावं तर अमरीश पुरींनी मोगँबोच्या रूपाने सेम टु सेम तसाच खलनायक अजरामर केला. त्याच वेळी ‘शोले’चीच आवृत्ती असलेल्या, राजकुमार संतोषीच्या ‘चायना गेट’मध्ये मुकेश तिवारी गब्बरसारखाच घोडयावरचा डाकू असून, खतरनाक गेटअप असूनही ती जरब आणि दहशत आपल्या अस्तित्वातून निर्माण करू शकला नाही.
ही ‘प्राणहीन’ उदाहरणं तपशीलवार देण्याचं कारण असं की त्यातून ‘प्राणमय’ आणि ‘प्राणहीन’ सिनेमांमधला फरक लक्षात येतो. प्राणसाहेबांचा फक्त चेहरा डोळयांसमोर आणा आणि मनात उमटणाऱ्या सगळया भावना तटस्थपणे न्याहाळा. प्राणसाहेबांनीही अनेक गेटअप वापरले, त्यासाठी मेकअपमनसमोर दोन दोन तास बसण्याची तपश्चर्या केली. पण कोणताही गेटअप नसतानासुध्दा जेव्हा ते पडद्यावर यायचे, तेव्हा आपल्या नजरेतून, आवाजातून प्रेक्षकाच्या मनात कापरं भरवायचे किंवा मनात आत्यंतिक चीड निर्माण करायचे. हा खलनायक इतका जबरदस्त होता, म्हणूनच तर नायकाने त्याच्यावर मात करण्यात काही मतलब होता. जिथे खलनायक फसतो, तिथे नायकावरही माश्या मारण्याची पाळी येते. प्राण यांच्या खलनायकाची दहशत अशी होती की लोकांनी ‘प्राण’ हे आपल्या नवजात बाळाचं नाव ठेवण्याची हिंमत केली नाही बरीच वर्षे. हीच त्याच्या उफराटया लोकप्रियतेची पावती म्हणायला हवी.
लोकप्रियतेची मोठी गंमत असते. पडद्यावर जे सुरू आहे ते खोटं आहे. इथला बहादूर आणि सत्शील नायक प्रत्यक्ष जीवनात पळपुटा, नेभळट, व्यसनी, अत्याचारी, व्यभिचारी खलनायक असू शकतो. पडद्यावर सतत बलात्कार करणारा, दारू पिणारा, कारस्थानं रचणारा, मुडदे पाडणारा खलनायक प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सज्जन, सालस, कुटुंबवत्सल माणूस असू शकतो. हे लोकांना माहीत नसतं, अशातलाही भाग नसतो. 
प्राणसाहेबांनी या इंडस्ट्रीत पन्नास वर्षं घालवूनही त्यांचं नाव कधी कुणाशी जोडलं गेलं नाही किंवा त्यांच्या हातून काही वावगं घडल्याचं कधी ऐकिवात आलं नाही. तरीही प्रेक्षकांनी नायकाची भूमिका साकारणाऱ्या नटात नायकाचे गुण पाहिले आणि खलनायकात खरोखरचा दुष्टावा पाहिला. खलनायकाची भूमिका आणि ती साकारणारा अभिनेता यांच्यातलं अंतरच पुसून टाकण्याच्या या सवयीमुळेच एखादा अभिनेता खलनायक म्हणून किती अव्वल होता, म्हणजेच अभिनेता म्हणून किती श्रेष्ठ होता, याची आपल्याला अनेकदा कल्पनाही येत नाही.
उदाहरणार्थ, एका काळात लोकांनी दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर या त्रयीच्या सिनेमांची भक्ती केली. त्यांच्यात आपले आदर्श पाहिले. आपण त्यांचे चाहते आहोत असं सांगितलं. पण या तिघांच्याही अतिशय गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांना कुदवायला प्राण नावाचा एकच महाखवीस बसलेला असायचा, त्याचं काय! त्यांच्या सगळया सुष्टाव्याला उठावदार करणारा दुष्टावा हा एकच माणूस करत होता. म्हणजेच, या तीन सुपरस्टार्सच्या एकत्रित लोकप्रियतेइतकीच लोकप्रियता या एका माणसाकडे होती. यांची पिढी अस्तंगत झाली, त्यानंतर आलेले शम्मी कपूर, राजेंद्र कुमार वगैरेही इतिहासजमा झाले, तरी प्राण मात्र एव्हरग्रीन राहिले. कारण, त्यांच्या खलनायकाला घाबरणं ही त्या खलनायकाच्या लोकप्रियतेचीच पावती होती. नाना तऱ्हेचे गेटअप आणि हावभाव, हालचाली वापरून, आवाजाचा, डोळयांचा परफेक्ट वापर करून प्राणसाहेबांनी पडद्यावर केलेली घृणास्पद कृष्णकृत्यं, त्यांना घाबरून का होईना, आपण आसुसून पाहत होतो, म्हणूनच नायकांच्या सत्कृत्यांना मजा यायची, हे या सगळया नटांच्या ‘पंख्यां’च्या कधी लक्षातही आलं नसणार.
खलनायकांचं दुर्दैव हेच असतं. आपण त्यांचे चाहते आहोत, हेही लोकांना कळत नाही. साहजिकच आहे. आपल्यासारखाच एक माणूस पडद्यावर आल्यावर आपण अस्वस्थ होतो, कारण आपल्याला त्याच्या बोलण्यातून आपल्यातलंच गरळ ठिबकताना दिसत असतं. आपण वास्तवात जी पापं करायला घाबरतो, तीच मनोमन मात्र मिटक्या मारत करत असतो, त्या आकर्षक पापांचं प्रतिबिंब त्याच्या नजरेत पाहून आपल्याला दचकायला होतं. हा पडद्यावरचा माणूस आपल्यातल्याच असत्याचं, अशिवाचं म्हणजे वाईटपणाचं दर्शन घडवतो, म्हणून आपल्याला शिवाची म्हणजे चांगुलपणाची आणि सत्याची महती कळते. पण आपल्याला हा खलपुरुष आवडतो, त्याचं पडद्यावरचं अस्तित्व आपली नजर खिळवून ठेवतं, त्याच्याकडून घडणाऱ्या काही पापांमध्ये आपलाही मनोमन सहभाग असतो, याची कबुली कोण देईल? खलनायक आवडतो हे मान्य करणं म्हणजे आपल्यातल्या या कमीअधिक प्रमाणातल्या खलत्वाची कबुली देणं. ती कोण देणार?
प्राणसाहेबांना त्यांच्या ‘लोकप्रियते’ची थेट पावती मिळायला सुरुवात झाली ती त्यांनी ‘उपकार’मधला मलंगचाचा रंगवला तेव्हा. त्याआधी जाहीर कार्यक्रमांत नटांवर तुटून पडलेल्या प्रचंड गर्दीला आवरण्यासाठी प्राणसाहेबांना माइकवरून दम भरायला लावलं जायचं. त्यांचा जरबदार आवाज ऐकल्यावर सगळे एका फटक्यात चिडीच्चूप होऊन जायचे. ‘उपकार’नंतर हे चित्र बदललं. ‘मलंगचाचा आले, त्यांना जागा द्या,’ असं आवाहन केलं की गर्दी आपोआप दुभंगून प्राणला वाट करून द्यायची. रुपेरी पडद्यावरची एखाद्याची इमेज त्याच्या वास्तव आयुष्यावर कसा परिणाम करते, त्याचं हे दर्शन होतं. खलनायकी सोडून पत्करलेल्या चरित्र भूमिकांना ‘ऍंड प्राण’ किंवा ‘अबव्ह ऑल प्राण’ या पातळीला नेऊन प्राण यांनी ही इनिंग्जही सार्थकी लावली. त्याचा कसून मेहनतानाही घेतला. अमिताभ बच्चनला ‘जंजीर’ मिळवून देण्यात प्राणसाहेबांचा मोठा वाटा होता. आपण शिफारस केलेल्या या नवख्या नटाला पाहायला प्रेक्षक यावेत म्हणून प्राण यांनीही त्याच्या बरोबरीची भावखाऊ भूमिका साकारली होती. 
त्यांच्या या शेरखान पठाणला पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात यायचे आणि अमिताभला मनात साठवून घरी जायचे. म्हणूनच या सिनेमानंतर ‘डॉन’पर्यंत तरी अमिताभचं मानधन प्राणसाहेबांपेक्षा कमी होतं. किती कमी? डॉनसाठी अमिताभला अडीच लाख रुपये मिळाले होते, तेव्हा प्राणसाहेबांनी साडेसात लाख रुपये घेतले होते. विनोद खन्ना, विनोद मेहरा, नवीन निश्चल वगैरे मंडळींना प्राणपेक्षा खूप कमी मानधन मिळत होतं. संजीवकुमार, धर्मेंद्र आणि शशी कपूर एवढयाच नायकांना प्राणसाहेबांच्या बरोबरीने मानधन होतं. एकटया राजेश खन्नाला प्राणपेक्षा जास्त पैसे मिळायचे. त्यामुळेच या दोघांचे एकत्र सिनेमे कमी आहेत, कारण या दोघांना एकत्र घेणं निर्मात्यांना परवडायचंच नाही. कामाचा चोख मेहनताना घेणाऱ्या प्राणसाहेबांनी त्याचा चोख मोबदलाही दिला. आपली बहीण मरण पावलेली असताना, निर्मात्याचे दोन दिवस वाया जाऊ नयेत म्हणून दुःख दडवून शूटिंग करणारा हा अभिनेता होता. 
राज कपूरच्या भव्य स्वप्नाचे, ‘मेरा नाम जोकर’चे तीन तेरा वाजल्यानंतर त्याच्याकडे प्राणसाहेबांचा मोठा मेहनताना देण्याइतके पैसे नव्हते. राजच्या दोस्तीसाठी त्यांनी ‘बॉबी’मध्ये एक रुपयाच्या सायनिंग अमाउंटवर काम केलं.
वास्तव आयुष्यात तब्येतीने जगलेल्या, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न केलेल्या प्राणसाहेबांचे चविष्ट अघळपघळ किस्से फारसे कधी कुणी ऐकले नाहीत. कारण ते वास्तवात अतिशय सज्जन आहेत. आपण बरं आणि आपलं काम बरं, असा त्यांचा स्वभाव आहे. जन्मजात खानदानीपणातून येणारा सुसंस्कृत आब त्यांना कधी सोडून गेला नाही. जुन्या जमान्यातल्या माणसांमध्ये असलेला एक अद्भुत पीळ मात्र या माणसाला सोडून गेला नाही, त्याचा हा किस्सा.
गोष्ट आहे फिल्मफेअर पुरस्कारांची. हे पुरस्कार ‘विकत’ घेतले जातात, अशी गुप्तपणे चालणारी चर्चा उघडपणे सुरू झाली, ती एका वर्षी मनोजकुमारच्या ‘बेइमान’ नामक भयपट नसलेल्या भयपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला तेव्हा. 
या सिनेमासाठी प्राण यांना साहाय्यक अभिनेत्याचं फिल्मफेअर जाहीर झालं होतं. ते त्यांनी स्वीकारलं नाही. कारण त्या वर्षी ‘पाकीजा’ स्पर्धेत असताना ‘बेइमान’च्या संगीताला सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला होता. गुलाम मोहम्मदला पुरस्कार मिळायला हवा होता, यासाठी त्यांनी स्वतःचा पुरस्कार नाकारला.
हे असं का केलंत? म्हणून प्राणसाहेबांना त्या काळात कुणी विचारलं की नाही, ठाऊक नाही… 
पण त्यांना कुणी विचारलं असतं तर हवेत सिगारेटच्या धुराचा एक झकास छल्ला सोडून ते म्हणाले असते, ”बरखुरदार, अपने अपने उसूल होते है!”

(पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक विवेक, April 2013)