Sunday, March 27, 2011

गोडमिट्ट साखरगोळीत हरवली मात्रा (हमारा दिल आप के पास है)


गुन्हेगारापेक्षा गुन्ह्याच्या बळीलाच शिक्षा देणारा असा एक गुन्हा जगात आहे... बलात्कार.
बलात्कार करणारा पुरुष सजा (झालीच तर) भोगून समाजात उजळ माथ्यानं वावरायला मोकळा होतो. बलात्कारितेला मात्र त्या अत्याचारानंतर सर्वसामान्य आयुष्य जगण्याची मुभाच राहत नाही. स्त्राeची अब्रू हे काचचं भांडं वगैरे मानणाऱया भारतीय समाजात अत्याचार करणाऱयापेक्षा अत्याचारितेच्या चारित्र्याचेच वाभाडे निघतात. जणू तिच्यावर अत्याचार झाला हा तिचाच दोष!
अशा परिस्थितीत एका बलात्कारितेला आदार, प्रेम, आत्मसन्मान देणारा नायक `हमारा दिल आप के पास है' सारख्या बटबटीत कौटुंबिकपटात भेटला, तरी त्याचं स्वागतच करावसं वाटतं. कारण, निव्वळ निर्बुद्ध, उथळ `करमणूक' करणारे कौटुंबिकपट आणि अगदी तशाच हाताळणीचा पण गाभ्यात काही वेगळा- बंडखोर आशय मांडणारा `हमारा दिल...' सारखा सिनेमा यांना केवळ चित्रपटीय गुणवत्तेच्या तागडीत एकाच मापानं मोजणं अयोग्य ठरेल. ती चंगळ आपल्या अद्यापही दृक्निरक्षरच असलेल्या देशाला परवडणारी नाही. चित्रपटीय मनोरंजनाच्या अत्यंत प्राथमिक कल्पना बाळगणारा मोठा प्रेक्षकवर्ग असे सिनेमे बाह्यस्वरुपावरून `कौटुंबिक' मानून गाफीलपणे त्यांना गर्दी करतो. अशा धक्कादायक विषयाच्या मात्रेचे अगदी किंचितसे का होईना वळसे, गोडमिट्ट चिकटचिट्ट फॉर्म्युल्याच्या साखरगोळीतून त्याच्या गळी उतरतात, हे विसरून चालणार नाही.
गंमत म्हणजे सदैव पारंपारिक आणि कालबाह्य नीतीमुल्यांची तळी उचलून धरणाऱया दाक्षिणात्य कौटुंबिकपटांनीच असा आधुनिक बंडखोर आशय मांडण्याचाही एक फॉर्म्युला तयार केला आहे. नेहमीचा कौटुंबिक नाटय़मय मालमसाला, त्यात पेरलेली `नेत्रसुखद' वगैरे गाणी आणि क्वचित ओंगळपणाकडे झुकणारा ग्राम्य विनोद यात आधुनिक आशाय घुसवायचा आणि `पुरातन परंपरेचा हाच खरा अर्थ' अशा वरपांगी बिनतोड भासणाऱया ढोबळ युक्तिवादासह फिट्ट बसवायचा, अशी साधारण मांडणी.
वेंकटेश आणि सौंदर्या यांच्या एका सुपरहिट तेलुगू सिनेमावर बेतलेला `हमारा दिल...' हाच धडा गिरवतो. अत्यंत पातळ फुळकवणीच्या स्वरुपात का होईना, तो काही सत्त्व पुरवतो.
इथली प्रीती (ऐश्वर्या राय) ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातली आदर्शवादी मुलगी. भररस्त्यात एका गावगुंडानं (मुकेश ऋषी) एका माणसाला मारहाण करून भोसकल्याची घटना ती पाहते; पण गर्दीतल्या इतरांसारखी ती स्वस्थ बसत नाही, पोलिसांत तक्रार नोंदविते. परिणामी, या गुंडाचा धाकटा भाऊ (पुरू राजकुमार) तिच्यावर बलात्कार करतो.
या घटनेमुळं इभ्रत धुळीला मिळण्याच्या भयानं वडील तिला घरातून हुसकावतात आणि मैत्रिणीकडेही थारा मिळत नाही. तिला आसरा देतो तो अविनाश (अनिल कपूर). तिच्या धडाडीची आधीपासून माहिती असलेला, अविवाहित आणि एकटा राहणारा अविनाश लोकापवादाला न घाबरता तिला थेट आपल्या घरातच थारा देतो. समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपल्या कंपनीत मोठय़ा पदावर नेमतो.
कालांतरानं तो तिच्यावरचं प्रेम व्यक्त करून लग्नाची मागणी घालतो, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे नकार मिळतो. कारण, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी प्रीती त्याच्या प्रेमाला मात्र `उपकार' मानते आणि आपण त्याला `लायक' नसल्याचा गंड जोपासते. काही काळानं त्याचं प्रेम स्वच्छपणे प्रेम म्हणून स्वीकारण्याची तिची तयारी होते तेव्हा परिस्थितीनं आणखी एक वळण घेतलेलं असतं...
... टीव्हीवरून `हमारा दिल...'चे प्रोमोज- गाणी पाहिलेल्या मंडळींना हे (पक्षी : एवढंच) कथानक वाचून गोंधळून जायला होईल. `अविनाश आणि प्रीती हे नवराबायको नाहीत तरी एका घरात राहतात. त्यांच्याबरोबर दिसणारी मुलं त्यांची नाहीत, तरी ती त्यांना मम्मी- डॅडी म्हणतात. असं हे विलक्षण पण सुखी कुटुंब आहे', या आशयाचा प्रोमो आणि सिनेमातली गाणी पाहणाऱया प्रेक्षकांना त्या मुलांचा या कथानकात उल्लेख कसा नाही, असा प्रश्न पडेल. ही मुलं आणि त्यांच्याशी संबंधित ब्रह्मघोटाळा हा खरंतर मूळ कथेच्या प्रवाहातला अनावश्यक अडथळा आहे, शिवाय त्याच्याशी संबंधित माफक सस्पेन्सही आहे, म्हणून त्या ठिगळाचा उल्लेख टाळायची इच्छा होते.
अविनाशला अगदी सर्वगुणसंपन्न नायक करण्याच्या ओघात तसंच अतिनाटय़ाच्या हव्यासापायी का कथाभाग सिनेमात आला असावा, असं प्रथमदर्शनी वाटतं. पण, कथानकाच्या गाभ्यातील संवेदनशील विषयावर भर दिला तर सिनेमा `जड', म्हणजेच गंभीर, म्हणजेच कमी `करमणूक' करणारा, म्हणजेच व्यावसायिकदृष्टय़ा जोखमीचा होईल (की काय?), असा धंदेवाईकक विचारच या रचनेमागे असावा. कारण, प्रीतीवरचा बलात्कार काही क्षणांतच तीही संपूर्णपणे विसरून जाते. इतरांवरच्या अन्यायाबद्दल जागरूक असणारे प्रीती आणि अविनाश तिच्यावरच्या अत्याचाराचा तपास व्हावा. यासाठी कुठे प्रयत्न करताना दिसत नाहीत. शिवाय, प्रीतीवरचा बलात्कार ही संपूर्णपणे स्वतंत्र- आयसोलेटेड घटना असावी, अशीच सर्व पात्रांची समजूत दिसते. तिने आधी नोंदविलेल्या तक्रारीशी त्याचा संबंध जोडण्यइतकी बुद्धी कुणाकडेच नसावी?
बलात्कारातून आपण अपवित्र झालो आहोत, या भावनेनं पोखरलं जाणं, त्यातून मनात तयार होणारे गंड, प्रेमाला उपकार मानणं वगैरे प्रीतीच्या अंतरंगातल्या घडामोडींवर पटकथाकार- दिग्दर्शकांनी लक्ष केंद्रित केलेलं नाही. अविनाशचा पुरोगामी देवतास्वरुप आवेशही इतका एकांगी होतो, की तो उपकाराच्या भावनेविना, `खरोखरीच' प्रेमात पडण्यास पात्र असा `माणूस' आहे का, असा प्रश्न प्रीतीबरोबरच विचारी प्रेक्षकालाही पडतो. कारण, तिचं `पुनर्वसन' करण्याचा त्याचा आवेग इतका जबरदस्त की, तो तिला (शैक्षणिक अर्हता वगैरे न तपासता) थेट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरच बसवतो. त्याची ठिकठिकाणची भाषणबाजीही डोकं उठवते. त्यामुळे, अविनाशच्या प्रेमाचा तात्काळ स्वीकार करून टाक बिनधास्त, असा सल्ला देणारी प्रीतीची मैत्रीण (तनाझ करीम) आणि अविनाशवर एकतर्फी प्रेम करणारी बडबडी बालमैत्रीण खुशी (खास भूमिकेत सोनाली बेंद्रे) या व्यक्तिरेखाच सिनेमात सर्वात खऱया आणि आकर्षक ठरतात.
बऱयाच विनोदी कलावंतांना एकत्र आणणारा एक विनोदी ट्रक सिनात आहे. हे सगळे अविनाशचे शेजारी आहेत. पण, हा संबंध जेवढयास तेवढाच. कारण, पुढे त्यांच्या उचापती अगदीच स्वतंत्रपणे चालतात. मनात येईल तेव्हा मनात येईल तो सण साजरा करणारा सटकू बंगाली (जॉनी लिव्हर), सतत नाइट डय़ुटीवर जाणारा पंजाबी पहेलवान (राणा जंगबहाद्दूर), तो जाताक्षणी मद्रासी शेजाऱयाला (अनुपम खेर) शयनगृहात घेणारी त्याची पत्नी (उपासना सिंग), या उपक्रमासाठी मद्राश्यानं झोपेत चालण्याचं नाटक करणं, सतत सरदाजीछाप प्रतिक्रिया देणारा सरदार (जसपाल भट्टी), आयुष्यभर एकच कोट घालून अस्खलित उर्दूत निरर्थक संवाद बोलणारा स्थानिक दिलीपकुमार (आबिद) अशा या मंडळींच्या व्यक्तिरेखा समजल्या तरी त्यांच्याकडून करवून घेतलेल्या कामगिरीचा अंदाज येईल. या सर्वांनी (अनुपम आणि जॉनी हे बेष्टच) झकास व्यक्तिगत कामगिरी करूनही सांघिक परिणाम उबगवाणा ठरतो.
अनिल कपूरच्या प्रगल्भत वावरामुळे अविनाशच्या व्यक्तिरेखेला योग्य वजन मिळतं खरं; पण क्लोजअपमध्ये स्पष्टपणे जाणवणाऱया वयामुळे `इतकी वर्षं कारा (अविवाहित) राहिल्यामुळेच हा अद्याप इतका एकांगी आदर्शवादी आणि अतिरेकी स्त्राeदक्षिण्ययुक्त राहिला आहे काय' अशी एक खोडसाळ शंकाही येते. ऐश्वर्याच्या व्यक्तिरेखेला सखोलता नसल्यानं तिच्या व्यावसायिक सफाईवरच समाधान मानावं लागतं. अन्य कलावंतांमध्ये प्रीतीच्या आईच्या भूमिकेतील मराठी नाटय़अभिनेत्री विदुला मुणगेकर तसंच वडिलांची भूमिका साकारणारा कलावंत हे लक्षवेधी कामगिरी करून जातात. सोनाली बेंद्रे आणि तनाझ करीमही उल्लेखनीय. अत्याचारापूर्वी हात जोडून नमस्ते करणाऱया खलनायकाच्या भूमिकेत पुरु राजकुमारला स्टाईलबाजीपलीकडे वाव नाही, पण, त्याला सेकंड इनिंग मिळण्यासाठी या भूमिकेचा फायदा होऊ शकतो.
दृश्यरचना, प्रकाशयोजनेतून काही आशय मांडणारे कबीर लालचे छायालेखन आणि अन्य निर्मितीमूल्ये ठाकठीक. संगीताच्या बाबतीत मात्र शीर्षकगीत वगळल्यास सुमार मामला आहे. संगीतकार संजीव- दर्शन हिंदी सिनेसृष्टीत फारच लवकर (आणि फारच चुकीच्या अर्थानं) रुळलेले दिसतात. `मन'मधल्या `काली नागन के जैसी जुल्फे तेरी' या हिट गाण्याची नक्कल त्यांनी इथे खपवली आहे, तीही आपल्या तिसऱयाच सिनेमात.
दिग्दर्शक सतीश कौशिकला चित्रपटाच्या तांत्रिक अंगांची उत्तम समज आहे आणि त्याची हाताळणी सफाईदार असते, हे `प्रेम'पासून `हम आपके दिल मे रहते है' पर्यंत प्रत्येक सिनेमात दिसून आलंय. पण, त्यापलीकडे काहीही यातल्या कोणत्याच सिनेमात दिसलं नाही आणि दुर्दैवानं याही सिनेमात दिसत नाही.
सबब, `हमारा दिल...'चा मूळ गाभा बंडखोर आशयामुळे स्वागतार्ह वाटला तरी दक्षिणी कौटुंबिकपट पाहताना सद्गतित वगैरे होणाऱया कुळीतल्या प्रेक्षकांपलीकडे इतरांना त्याची शिफारस करता येत नाही, हे दुर्दैव.

(महाराष्ट्र टाइम्स)

मिशन उणे काश्मीर

`मिशन कश्मीर' या सिनेमाच्या नावावरून अशी गैरसमजून होऊ शकते की, हा काश्मीर प्रश्नावरचा सिनेमा आहे.
हा विधु विनोद चोप्राचा सिनेमा असल्यानं ही समजूत बळावूही शकते.
कारण विधु विनोद हा स्वत: विस्थापित काश्मिरी आहे आणि त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीमुळे त्याच्याकडून काश्मीर प्रश्नाभोवती गुंफलेल्या, गंभीर सिनेमाची अपेक्षा करता येऊ शकते.
पण `मिशन कश्मीर' हा काश्मीर प्रश्नाचा वेध वगैरे घेणारा सिनेमा नाही. तो घडतो काश्मीरमध्ये. त्यात माणसं काश्मिरीयतबद्दल बोलतात. त्यातल्या गाण्यांना काश्मिरी लोकसंगीताची डूब आहे. सिनेमाच्या शीर्षकस्थानी असलेलं `मिशन कश्मीर' हे काश्मीरमधल्या अतिरेक्यांनी रचलेलं एख महाभयानक षड्यंत्र आहे. तरीही हा सिनेमा काश्मीर प्रश्नावरचा सिनेमा नाही.
काश्मीरची समस्या तोंडी लावण्यासारखी वापरणारा हा एक थरारक सूडपट आहे.
इथे अल्ताफ (हृतिक रोशन) हा काश्मिरी तरुण सूडभावतेनं पेटलाय. त्याचा रोष आहे इनायत खान (संजय दत्त) या पोलिस अधिकाऱयावर. कारण अल्ताफ आठ वर्षांचा असताना एक दहशतवाद्याविरुद्ध (पुरु राजकुमार) पोलिसांनी केलेल्या कारवाईत अल्ताफचे निरपराध आई-वडील-धाकटी बहीण मारले गेले आहेत. अनाथाश्रमातून त्याला इनायत खान आणि त्याची पत्नी नीलिमा (सोनाली कुलकर्णी) हे दत्तक घेतात. त्यांचा एकुलता एक मुलगा नुकताच एका अपघातात मरण पावलाय. अल्ताफच्या आगमनानं खान दाम्पत्याच्या आयुष्यातली मुलाची उणीव भरून निघू लागते; अल्ताफलाही `अम्मी-अब्बा' मिळाल्याचा आनंद होतो. पण तो फार काळ टिकत नाही.  
आपल्या आई-वडिलांवर गोळीबार करणारा बुरखेधारी पोलिस अधिकारी इनायत खानच होता, हे लक्षात आल्यावर अल्ताफ बिथरतो आणि इनायतच्या घरातून पळून जातो.
तो हिलाल (जॅकी श्रॉफ) या अफगाणी दहशतवाद्याच्या टोळीत वाढून मोठा होतो. कट्टर अतिरेकी झालेल्या अल्ताफावर हिलाल `मिशव कश्मीर' या काश्मिरात हाहा:कार उडवून देणाऱया कारवाईची जबाबदारी सोपवतो. ती पार पाडण्यासाठी आणि लगे हाथ आता काश्मीरचा पोलिस महासंचालक बनलेला इनायत खानचाही काटा काढण्यासाठी अल्ताफ श्रीनगरमध्ये येतो.
इथे त्याला बालपणी दुरावलेली मैत्रीण सूपी (प्रिटी झिंटा) भेटते. त्याच्यातली कोवळी प्रेमभावना जागी होते. एकीकडे तिच्यात मन गुंतलेलं असताना अल्ताफ तिचा दहशतवादी कारवाईसाठी प्याद्यासारखा वापर करून घेतो. `मिशन कश्मीर'साठी आणि इनायत खानचा खात्मा करण्यासाठी सज्ज झालेला अल्ताफ आणि त्याचं `मिशन कश्मीर' उद्ध्वस्त करून त्याला मार्गावर आणू पाहणारा इनायत खान यांच्यात संघर्ष सुरू होतो. मुलगा आणि नवरा यांच्याबद्दलच्या ओढीमध्ये हेलकावणारी नीलिमा, ज्याच्यावर निस्सीम प्रेम केलं त्याचं भरकटणं पाहणं नशिबी आलेली सूफी आणि अल्ताफला अंधारात ठेवून त्याच्याकडून भलतीच कामगिरी करून घ्यायला निघालेला हिलाल... या पात्रांच्या ताणतणावातून `मिशन कश्मीर' अपेक्षित शेवट गाठतो.
एक थ्रिलर किंवा सुडपट म्हणून पाहिला तर `मिशन कश्मीर' चोख मनोरंजन पुरवतो. सुमारे पाऊण सिनेमा तर काही वेगळे, अनोखे क्षणही पदरात टाकतो; पुढे काही वेगळं पाहायला मिळण्याची अपेक्षा निर्माण करतो. पण सिनेमानंतर दिग्दर्शक `क्लायमॅक्स'ची मोळी बांधायला घेतो आणि सालाबादप्रमाणे क्लायमॅक्सला या अपेक्षांवर बोळा फिरतो.
`मिशन कश्मीर'मध्ये पहिल्या फ्रेमपासून नजर बांधून घेते आणि शेवटापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते ती लेखक- दिग्दर्शक- तंत्रज्ञ- कलावंत यांची अप्रतिम सांघिक कामगिरी. तिची सुरुवात कथा पटकथा- संवादांपासूनच होते. अभिजात जोशी, सुकेतु मेहता आणि विक्रम चंद्रा या पटकथाकारांनी अतिशय बंदिस्त पटकथा रचलेली आहे. प्रत्येक प्रसंग अगदी नेमका आणि आटोपशीर केला आहे. अल्ताफची चित्रकला, त्या भीषण हत्याकांडानं पोळून निघालेल्या बालमनाला भेडसावणारी, तरुण वयातही पिच्छा न सोडणारी भयाण दु:स्वप्नं, नुकताच मरण पावलेला मुलगा आणि अल्ताफ यांच्या `अस्तित्वा'चे खान दाम्प्त्याच्या मनातले पडसाद, अशा कंगोऱयांना `मिशन कश्मीर' अनोख्या पद्धतीनं स्पर्श करतो. या भागाची पटकथा आणि दृश्यमांडणी (टेकिंग) अनेकदा प्रायोगिकतेकडे झुकते; पण ती दुर्बोध बनत नाही. मुख्य प्रवाहात प्रायोगिकता मिसळण्याचा बऱयापैकी यशस्वी प्रयत्न करते.
हा प्रयत्न `बऱयापैकी यशस्वी'च राहतो. कारण अल्ताफचं `नायक'पण सांभाळण्यासाठी त्याला भेडसावणाऱया दु:स्वप्नांचा अतिरेक होतो. जणू त्याच्या निरपराध कुटुंबाची अशी नृशंस हत्या झाली म्हणजे त्याचे पुढचे सगळे गुन्हे क्षम्यच मानायला हवेत. शिवाय `मिशन कश्मीर' सुरू झाल्यावर अल्ताफसारखा कडवा अतिरेकी पोलिसांचं, सुरक्षा दलांचं लक्ष वेधून घेणाऱया अवसानघातकी कारवाया कशा करू धजतो, त्याच्या कारवायांमधल्या व्यक्तिगत सूडाच्या संदर्भातल्या कोणत्या आणि `मिशन'च्या संदर्भातल्या कोणत्या, असे प्रश्न पडत राहतात. अल्ताफ- इनायत- नीलिमा आणि सूफी या प्रमुख व्यक्तिरेखा पटकथाकार- दिग्दर्शक यांनी पूर्वार्धात इतक्या स्पष्ट रेखाटल्या आहेत की, हा थ्रिलर त्यांच्यातल्या मानसिक आंदोलनांचा वेध घेत पुढे जाईल, असे वाटते. ती वाट तो अर्ध्यात सोडतो. व्यापक काश्मीर प्रश्नाकडेही वळत नाही आणि मग व्यक्तिगत सूडपट म्हणूनची वाटचाल तर फारच सरधोपट होऊन जाते. विशेषत: इनायत आणि अल्ताफ यांना समोरासमोर आणण्यात पटकथाकारांची झालेली दमछाक स्पष्टपणे जाणवते. तिथे सिनेमा सगळ्यांच्या हातातून सुटतो.
अर्थात, सांघिक कामगिरीमुळे इथवरचा आणि यापुढचा सिनेमा निश्चितपणे पाहवतो. यात विनोद प्रधान यांचं छायालेखन, नितीन देसाई यांचं कलादिग्दर्शन, स्वर्गीय रेणु सलुजा यांचं संकलन, ध्वनिमुद्रण आणि चित्रणोत्तर, विशेष दृक-श्राव्य परिणामांचा मोठा वाटा आहे. यातल्या बहुतेक तंत्रज्ञांना विधु विनोद चोप्रानं श्रेयनामावलीत सह- दिग्दर्शनाचं श्रेय दिलं आहे. दिग्दर्शकाची `व्हिजन' पडद्यावर यथातथ्य साकारण्यात ही मंडळी केवळ मोलाची कामगिरी करत नाहीत, तर बऱयाचदा सिनेमा तीच `घडवतात.' त्यांना श्रेय देऊन त्यांच्यावर अधिकृत जबाबदारी सोपविण्याचा हा अतिशय चांगला पायंडा आहे.
या कामगिरीनं `मिशन कश्मीर'ला दिलेलं रुप ही खास( जमल्यास डिजिटल ध्वनियुक्त) थिएटरात जाऊन अनुभवण्याची चीज आहे. एहसान- शंकर- लॉय यांच्या पार्श्वसंगीतानंही `मिशन कश्मीर'चा परिणाम दुणावलाय. `बुम्बरो, बुम्बरो' हे चालीसकट उचललेलं काश्मिरी लोकगीत सुनिधी चौहान, जसपिंदर नरुला आणि शंकर महादेवन यांनी खुलून गायलंय. नायिकेची बैठी अदा आणि नायकाच्या काश्मिरी लोकन्त्यासदृश `स्टेप्स' यामुळे चित्रीकरणही बहारीचं झालंय. `जिंदपोशे माल'मध्ये लोकसंगीत आणि पॉपचं फ्यूजन उत्तम जमलंय. `चुपकेसं सुन'मध्ये मुख्य गायिकेचा आवाज प्रेमाची कोवळीक नजाकतीनं व्यक्त करतो आणि आघाती कोरस नायकाच्या आयुष्याचा छिन्नपणा मांडतो. ही रचना (आणि टेकिंग) ढोबळ असलं तरी मजा आणतं. सोनाली कुलकर्णीवर आयुष्यातून त्यांच्या सख्ख्या मुलाचं पुसट होत जाणं आणि अल्ताफनं त्याची जागा घेणंही हे कल्पकतेनं दाखवलं आहे. `धुआँ धुआँ' या गाण्यावर श्रेयनामावली चित्रित झाली आहे.
संजय दत्तनं एरवी अशा जिगरबाज, कर्तव्यनिष्ठ नायकांच्या भूमिका ढिगानं केल्या आहेत; पण तरुण वय ते मध्यम वयापर्यंतचा प्रवास दाखवण्याची संधी त्याला क्वचित मिळाली असेल. त्यातही इनायतचं वय नुसतं कॅलेंडर वर्षांत वाढत नाही; तो अनुभवांनी पिकत जातो. हे संजयनं उत्तम दाखवलं आहे. त्याच्या करारीपणाला एका बापाच्या हळवेपणाची, `मुला'च्या काळजीची अव्यक्त छटा आहे. ती संजयनं फारच प्रगल्भतेनं खुलवली आहे. हृतिकचा अल्ताफ पदोपदी `फिजा'च्या अमानची आठवण करून देतो. अर्थात, इथे तो अधिक सुस्पष्ट भूमिकेत आहे. `नायका'च्या जबाबदाऱया तो लीलया पार पाडतो आणि त्याला पडद्यावर पाहणं हा आनंददायक अनुभव असतो, ही `नेहमीची यशस्वी' बलस्थानं झाली. आता त्याची यापुढची भूमिका या साच्यातली असणे त्याच्या कारकिर्दीसाठी हानिकारक ठरेल. सोनाली कुलकर्णीची नीलिमा संजय आणि हृतिक या दोन टोकांचा मेळ उत्तम सांभळते. नीलिमामधला जीवनविषयक भाबडा उत्साह चांगुलपणावरचा विश्वास, उत्साही वृत्ती ती झक्कपणे साकारते. तरुण वय ते मध्यम वय हा प्रवास तीही सहजगत्या पेलते. दिग्दर्शकानं उत्तरार्धात तिच्याकरवी काही भाषणबाजी करून घेतली आहे. सोनालीच्या सिन्सियर भावदर्शनामुळे ती फारशी खटकत नाही. जॅकी श्रॉफनं हिलालच्या भूमिकेत (संवादफेक, गेटअप यातून) काही रंग भरण्याचा प्रयत्न केलाय; पण मुळ भूमिकाच तोकडी आहे. त्याहून तोकडय़ा भूमिकेत, जेमतेम दोन- तीन प्रसंगांमध्ये पुरु राजकुमार छाप पाडून जातो. तो या सिनेमातलं सरप्राइज पॅकेज ठरेल. प्रिटी झिंटा नेहमीप्रमाणे अगदी सहज वावरते आणि भावदर्शनाला संधी देणाऱया एखाददुसऱया प्रसंगात चोख कामगिरी बजावते.
एकूणात, गेल्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत फक्त निर्मितीमूल्यांची नव्हे, तर सिनेमाकलेची (दृक- श्राव्य अनुभवासंदर्भात) श्रीमंती दर्शविणारा `मिशन कश्मीर' एकदा पाहायला काहीच हरकत नाही.



(महाराष्ट्र टाइम्स)

तीन दिलवाले + तीन दुल्हनियाँ = साडेतीन तास (मोहब्बतें)

 आदित्य चोप्राचा `दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' प्रदर्शित झाला तेव्हा त्या सिनेमानं हिंदीत एक नवा ट्रेन्ड आणला.
तोवरच्या बहुतांश प्रेमपटांमध्ये प्रेमिक आणि प्रेमाचे दुश्मन यांच्यातला संघर्ष तीव्र करून `दिलवाले' आपल्या `दुल्हनिया'ला जबरदस्तीने- समाजाशी, प्रसंगी तिच्याच कुटुंबयांशी दोन हात करून, पळवून नेताना दाखविले जात. `दिलवाले...'नं परिपक्व प्रेमाची फ्रेश कहाणी सांगितली. तिथला नायक प्रेमिकेला पळवून नेत नाही. तो तिच्या कुटुंबियांची मनं (भले फिल्मी सहजतेनं का होईना) जिंकून, त्यांच्या संमतीनं तिला आपली `दुल्हनिया' बनवतो.
फिल्मी प्रेमाकडे पाहण्याचा हा दृष्कोन निराळा होता, तसंच या सिनेमातलं अनिवासी भारतीयांचा दर्शनही अनोखं होतं. शिवाय, उत्तम पटकथा, सुरेख संवाद, सुरेल गाणी आणि दिग्दर्शकाची माध्यमाची जाणकार हाताळणी यांनी या सिनेमाला विक्रमी यश दिलं. अभ्यास करून, भरपूर मेहनतीनं पटकथा रचणाऱया या लेखक- दिग्दर्शकाच्या दुसऱया सिनेमाबद्दल अभूतपूर्व उत्सुकता निर्माण झाली.
आदित्यचा हा दुसरा सिनेमा- `मोहब्बतें' महत्त्वाकांक्षी आहे.
त्यात अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान हे सुपरस्टार आणि तरुण प्रेमिक साकारणारे सहा कलावंत (तीन जोडय़ा) आहेत. सिनेमावर मोठा खर्च करण्यात आला आहे. सिनेमांची लांबी वीस रिळांची- म्हणजे जवळपास साडेतीनहून अधिक तासांची आहे.
पण, ही महत्त्वाकांक्षा इथेच थांबते. `मोहब्बतें' हा `दिलवाले...'च्या तुलनेत भव्यपट ठरतो, पण गाभ्यात `दिलवाले...'च्या पुढे जाणारं काही मांडत नाही.
`मोहब्बतें'मध्ये वाढतं काय तर `दिलवाले' आणि `दुल्हनियाँ'ची संख्या आणि साहजिकच त्यांच्या स्वतंत्र प्रेमप्रकरणांची एकत्रित लांबी. बाकी याही सिनेमात प्रेमानं नफरतीवर `अहिंसक' मार्गानं मिळवलेला विजयच दिसतो.
या प्रेमकहाण्या आकार घेतात नारायणपूर या गावातील `गुरुकुल' या एका (भारतातल्या महाप्रख्यात वगैरे) कॉलेजात. इथे प्रवेश मिळणंच प्रतिष्ठेचे असतं. या कॉलेजचा प्राचार्य आणि सर्वेसर्वा असतो नारायण शंकर (अमिताभ बच्चन) हा खत्रुड म्हातारा. या कॉलेजमध्ये शिस्त कडक आणि कुणालाही प्रेमात पडायला बंदी. माणूस प्रेमात पडला की अकारण गुंते वाढवून ठेवतो; प्रेमातून वेदना आणि कमकुवतपणाखेरीज काहीच निर्माण होत नाही, हे नारायण शंकरचं ठाम मत.
त्याच्या या कॉलेजात विकी (उदय चोप्रा), समीर (जुगल हंसराज) आणि करण (जिम्मी शेरगिल) हे तीन नवयुवक प्रवेश घेतात. या कॉलेजात `लव्हॉलॉजी' किंवा तित्सम विषयाचीच पदवी मिळते, अशा गैरसमजुतीनंच हे तिघे या कॉलेजात येतात की काय, देव जाणे! कारण ते कोणत्याही क्षणी अभ्यास करताना दिसत नाहीत, `आज फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला काय बोंब झाली' छापाची विद्यार्थीवर्गाला साजेशी चर्चा करताना दिसत नाहीत. त्यांना एकमेकांव्यतिरिक्त कोणी मित्र नसतात आणि प्रेमाव्यतिरिक्त काही उद्योग नसतो.
कॉलेजात आल्याबरोब्बर हे तिघे साधारम एकाच सुमाराला (पण सुदैवानं तीन वेगवेगळ्या मुलींच्या) प्रेमात पडतात. विकीला भेटते बडय़ा घरची बिगडी बेटी इशिका (शमिता शेट्टी). समीर लहानपणापासून जिच्यावर एकतर्फी प्रेम करत असतो ती संजना (किम शर्मा) त्याला याच गावात भेटते. आणि रेल्वे स्टेशनवर दिसलेल्या किरणमध्ये (प्रिती झांगियानी) प्रथमदर्शनातच करणचा जीव गुंततो.
नारायण शंकरच्या कठोर शिस्तीचा भंग करून आपापली प्रेमकहाणी सुफळ- संपुर्ण कशी करायची या विवंचनेत असलेल्या या त्रिकुटाला राज आर्यनच्या (शाहरूख खान) रुपानं देवदूतच भेटतो
हा व्हायोलिनधारी मूर्तिमंत- अंतर्बाह्य प्रेमस्वरूप संगीतशिक्षक गुरुकुलात येतो. गुरुकुलाची पंचवीस वर्षांची परंपरा मोडून नारायण शंकर त्याला नोकरी देतो. संगीताच्या जादूनं तो विद्यार्थ्यांना आपलंसं करतो आणि त्यांच्यातले प्रेमवीर अचूक हेरतो. या प्रेमवीरांना वेळोवेळी गुरुकुलाचे सगळे नियम, सगळी शिस्त धाब्यावर मारून प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची `प्रेरणा' तो देत राहतो, जमेल ती सगळी मदत करतो, अडीअडचणीला त्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहतो.
संगीताच्या मिषानं प्रेमाचं, बंडखोरीचं शिक्षण हा राज आर्यन का बरे देत असतो?
कारण हा राज आर्यन म्हणजेच राज मल्होत्रा असतो. गुरुकुलाचा माजी विद्यार्थी. खुद्द नारायण शंकरच्याच मुलीवर (ऐश्वर्या राय) प्रेम करण्याचं, तिला प्रेमात पाडण्याचं धाडस त्यानं केलेलं असतं. त्याबद्दल नारायण शंकरनं त्याचा चेहराही न पाहता, कोणताही खुलासा करण्याची संधी न देता त्याला गुरुकुलातून हुसकावून लावलेलं असतं. आपला पाषाणहृदयी बाप कधीही द्रवणार नाही, आपलं प्रेम कधीही सफल होणार नाही, याची खात्री पटलेल्या त्याच्या मुलीनं आत्महत्या केलेली असते.
आता तोच राज आर्यन, नारायण शंकरला आपली `ओळख' न देता त्याच्या गुरुकुलातल्या नफरतीच्या, प्रेमद्वेषाच्या साम्राज्याला सुरुंग लावायला आलेला असतो.
हा संघर्ष कसा घडतो, वाढतो, त्याची परिणती प्रेमाच्या विजयात कशी होते याची लंबीचवडी कहाणी म्हणजे `मोहब्बतें' हा सिनेमा.
कथा- पटकथा- संवाद- दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी पेलणाऱया आदित्य चोप्राला या चारही अंगांचं ज्ञान आणि समज आहे, याची खूण `मोहब्बतें'मध्ये दिसते. लेखक म्हणून आठ प्रमुख पात्रांना न्याय देणारी, त्यांचे ताणेबाणे एकमेकांमध्ये चलाखीनं गुंफणारी मांडणी त्यानं केलेली आहे. यात त्याची अभ्यासू आणि मेहनती वृत्ती दिसते. त्यानं तीन प्रेमकहाण्या मांडताना त्यातल्या सहा तरुण- तरुणींच्या व्यक्तिरेखाही अतिशय स्पष्टपणे रेखाटल्या आहेत. या तीनही जोडय़ा वेगवेगळ्या जातकुळीच्या, वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या. त्यांची प्रेमप्रकरणंही एकमेकांपेक्षा अगदी वेगळी.
आधी नफरत किंवा प्रेमाला स्कोपच नसलेली सिच्युएशन आणि त्यातून हळुहळू आपल्या प्रेमवीरांनी फुलवलेलं प्रेम असा साधारण तीनही प्रेमकथांचा प्रवास आहे. पण, त्याव्यतिरिक्तची मांडणी अगदी वेगवेगळी आहे. शिवाय या तीनही प्रेमकथांच्या सुरुवातीला भला मोठा अडसर येतो.  
गर्विष्ठ इशिकाला विकीचा चेहरासुद्धा नजरेसमोर नको असतो ती त्याचा द्वेष करते. संजनाच्या लेखी समीर हा केवळ छान मित्र असतो, कारण तिचा बॉयफ्रेंड कुणी वेगळाच असतो. सगळ्यात पंचाईत असते ती करणची. कारण, किरण ही चक्क विवाहिता असते. तिचा सैनिक नवरा लग्न होताक्षणी (म्हणजे `सुहागरात' होण्यापूर्वी, फिल्मी प्रेमात ही `अक्षता' महत्त्वाची) युद्धावर रवाना होऊन तिकडेच मरण पावलेला असतो. पण मुलाच्या मृत्यूचा स्वीकार करू न धजणाऱया तिच्या सासऱयानं तिला अखंड सौभाग्यवती बनवून ठेवलेलं असतं.
यातली प्रत्येक सिच्युएशन अगदी `इम्पॉसिबल'आहे, अशी प्रेक्षकांची समजूत करून द्यायची आणि त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत त्यालाही गुंतवून घ्यायचं, ही मुख्य जबाबदारी पटकथाकार म्हणून आदित्य उत्तम पार पाडतो. प्रेमाच्या या उलघालींमध्ये उलझल्यामुळेच प्रेक्षक पावणेचार तासांचा हा प्रवास फारसा न कंटाळता पार पाडू शकतो. राजच्या मनात राहणारी आणि त्याच्या वाटचालीत सदैव त्याच्या साथीला येणारी अदृश्य प्रेयसी दाखवण्याची नेहमीची यशस्वी हळवी कल्पनाही त्यानं चपखल वापरून घेतली आहे. त्यामुळे, राजच्या सगळ्या कृत्यांना वजन येतं.
पण, हाच पटकथाकार नारायण शंकर आणि राज आर्यन यांच्यातला संघर्ष रेखाटताना फार कमी पडतो. म्हणजे बाह्यत: त्यांचे स्वभाव रेखाटणं, त्यानुसार त्यांच्यातली खडाजंगी किंवा शीतयुद्ध रचणं, चटकदार, मर्मग्राही संवादांच्या फैरी झडवणं वगैरे नैमित्तिक जबाबदाऱया तो चोख पार पडतो. पण, हा संघर्ष तकलादू आणि बिनबुडाचा आहे, हे काही काही केल्या लपत नाही. याला कारण नारायण शंकरची धूसर व्यक्तिरेखा. त्याचं मितभाषी असणं त्याच्या व्यक्तिरेखेला साजून `दिसणारं', ती प्रभावी करणारं आहे, पण फार वरवरच्या पातळीवर. प्रेमाबद्दल इतकी तीव्र द्वेषभावना त्याच्या मनात का आहे, याचं काही स्पष्टीकरण त्याच्या वर्तनातून मिळत नाही. त्याचं त्याच्या मुलीशी असलेलं नातं ममत्त्वाचं आहे. अशा वेळी तिचं प्रेम- तिला आत्महत्या करण्यावाचून दुसरा मार्गच उरू नये एवढं- असफल होणं हे पटत नाही. आणि इतका एकांगी- हट्टी नारायण शंकर पुढे राज आर्यनला गुरुकुलात नोकरी देतो
`मला कोणत्याही पद्धतीचं परिवर्तन पसंत नाही', असं एकीकडे बोलतो आणि दुसरीकडे राज आर्यननं घडवून आणलेला प्रत्येक बदल कुरकूर करत- पण, कोणतीही मोठी कारवाई न करता स्वीकारतो. हे तर अनाकलनीयच आहे. राज आर्यनची `ओळख' लपवण्यासाठी केलेली कारागिरीही सतत जाणवते, खटकते.
शिवाय या भल्यामोठय़ा कॉलेजात जेमतेम शेपाचशे विद्यार्थी दिसतात, तेही बिनचेहऱयाचे. त्यांच्यातल्या घडामोडी, अन्य शिक्षकवर्ग वगैरे काहीच कुठेच दिसत नाही. गुरुकुल हे परदेशातलं लोकेशन आहे हे चटकन लक्षात येतं. गुरुकुलाबाहेरच्या गावातला अनुपम खेर आणि अर्चना पूरणसिंग यांच्या अधेड प्रेमाचा ट्रक सर्वस्वी अनावश्यक वाटतो. आणि तो अगदी पाचकळ विनोदीही आहे.
दिग्दर्शक म्हणून आदित्य चोप्रा `ओल्ड स्कूल'चा विद्यार्थी आहे. मोठे, तपशीलसमृद्ध प्रसंग, त्यांच्या चित्रणासाठी रचलेले दीर्घ, भव्यतादर्शक शॉट, त्यांतील कॅमेऱयाच्या संथ हालचाली, कलाकारांकडून नेमकी आणि अव्वल कामगिरी करून घेण्याचा आग्रह हे या `शाळे'चे गुण त्याच्यात दिसतात. त्याच्या गाण्यांच्या चित्रणातही वैविध्य आणि गाण्यातून कथा पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो. एरवी `दिल तो पागल है' आणि `दिलवाले दुल्हनिया' या यशस्वी चोप्रापटांची छाप असलेलं, स्वतंत्रपणे ऐकताना अतिशय रिपिटिटिव्ह वाटणारं जतीन- ललितचं संगीत या टेकिंगमुळे थिएटरात श्रवणीयही होऊन जातं. `हम को हमीसे चुरा लो', `चलते चलते युँही', `आँखे खुली हो या हो बंद' आणि `हम तेरे दीवाने है' ही गाणी सिनेमात मुरून गेली आहेत. थीम म्युझिक म्हणून रचलेल्या संगीताच्या तुकडय़ावर सर्व प्रेमप्रकरणांचं सुफळ, संपूर्ण होणंही झकास चित्रित झालंय.
अमिताभ बच्चनचा नारायण शंकर पटकथाकारानं त्याच्यावर लादलेल्या सर्व मर्यादांतही प्रभावी होतो. या भूमिकेला काही तर्काधार असता तर ही कामगिरी अधिक प्रभावी झाली असती. सर्व नवोदित जोडय़ाही या सिनेमात सहज सफाईने वावरल्या आहेत. त्यांत, (भावमारू रोल मिळाल्यामुळे आणि त्या रोलला न्याय देण्याची कुवत असल्यामुळे) उदय चोप्राचा विकी लक्षात राहतो. त्याची स्वाभाविक विनोदनिर्मिती धमाल मजा आणते.
शाहरूखचा राज आर्यन हा `मोहब्बतें'चा कणा आहे. प्रेमपागल हिरोच्या बऱयाचशा छटा दाखवल्यानंतरही तो राज आर्यनला ताज्या उत्साहानं सामोरा जातो. नारायण शंकरच्या तुलनेत अधिक सहानुभूतीखेचक भूमिकेचा फायदा त्याला मिळाला आहे. पण, प्रेमाचं (ऐकायला, सिनेमात पाहायला) फार आकर्षक भासणारं तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडण्याची त्याची हातोटी विलक्षण आहे. अमिताभबरोबरच्या संघर्षाच्या प्रसंगात त्याच्या नॉर्मल बोलण्याआड नारायण शंकरबद्दलची अतिशय संयमित शिसारी जाणवत राहते. अशा काही खास जागा त्याच्या परफॉर्मन्समध्ये जाणवत राहतात.
मनमोहन सिग यांचं छायालेखन, फरहा खानचं नृत्यदिग्दर्शन आदी तांत्रिक बाजू भव्य नेटक्या निर्मितीच्या जबाबदाऱया पार पाडतात.
एकूणात, साडेतीन तासांची ही प्रदीर्घ प्रेमगाथा `दिलवाले...'च्या तुलनेत फिकी आहे. ती अर्ध्या-पाऊण तासाने कमी असती तर...? असा प्रश्न सिनेमा पाहताना कायम मनात येत राहतो. पण, संपूर्ण सिनेमा पाहवतो. चोप्रा मंडळीकृत प्रेमपटांचं अगदी अजीर्णच झालं नसेल तर `मोहब्बतें' पाहायला हरकत नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

मारून मुटकून देशभक्त (द पेट्रियट)

सिनेमाच्या नावातून सिनेमाचा ढोबळ आशय थोडक्यात व्यक्त व्हावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.
म्हणूनच कोलंबिया- ट्रायस्टारच्या `द पेट्रियट'चं नाव गोंधळात पाडतं. वरपांगी हा एक ऐतिहासिक युद्धपट आहे. नायक लढवय्या योद्धा आहे, तो देशाच्या सार्वभौमत्त्वासाठी शिरतळहाती वगैरे घेऊन लढतो. (शिवाय या भूमिकेत मेल गिब्सन आहे, त्याची रंगभूषा- वेशभूषा आणि सिनेमातला काळ- माहौल गिब्सनच्याच `ब्रेव्हहार्ट'ची आठवण करून देतात, या `पेट्रियट'बाह्य घटकांचाही विचार करायला हवा.) या सगळ्या गोष्टी जमेस धरूनही नायकाला `देशभक्त' असं ढोबळ लेबल लावता येत नाही. लावायचंच झालं तर `मारूनमुटकून देशभक्त' असं लेबल लावायला हवं किंवा `पेट्रियट'च्या हिंदी आवृत्तीचं `योद्धा' हे सपाट शीर्षकच समर्पक.
कारण `ब्रेव्हहार्ट' सारखाच हाही `शूर मर्दाचा पवाडा' वगैरे भासत असला तरी त्याहूनही अधिक एक कुटुंबवत्सल गृहस्थाची, एका बापाची ही कहाणी आहे. अपरिहार्य परिस्थितीच्या रेटय़ानं देशभक्तीच्या लाटेवर फेकल्या गेलेल्या एका सामान्य `माणसा'ची कहाणी... देशभक्तीची सनातन संकल्पनाच पुन्हा तपासून पाहायला लावणारी.
`पेट्रियट'चा नायक आहे बेंजामिन मार्टिन (मेल गिब्सन) हा अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना प्रांताचा रहिवासी. काळ आहे 1763 चा. कॅनडावर तसेच अपाल्शियन पर्वत आणि मिसिसिपी नदी यांच्या दरम्यानच्या प्रेदशावर ब्रिटनची अधिसत्ता प्रस्थापित झाली आहे. अमेरिका नामक `नव्या जगा'त ब्रिटिशांच्या 13 वसाहती वसविण्यासाठी घाम गाळलेल्या आणि लढायांमध्ये रक्त सांडलेल्या `ब्रिटिश' नागरिकांचं ब्रिटनशी असलेलं नातं तुटू लागलेलं आहे आणि इथल्या भूमीशी नाळ जुळू लागलेली आहे. सातासमुद्रापारच्या ब्रिटिश बादशहानं बसविलेले भरमसाठ कर त्यांना जाचक वाटू लागले आहेत. या `प्रतिनिधित्वविना कर आकारणी विरुद्धचा असंतोष वाढीस लागला आहे आणि स्वराज्याची सार्वभौमत्वाची मागणी जोर धरू लागली आहे... ब्रिटिश सेनेशी युद्ध आता अटळ आहे.
बेंजामिन मार्टिनचे बाहू खरं तर युद्धवार्तेनंच फुरफुरायला हवेत. कारम तो एकेकाळचा असामान्य जिगरबाज योद्धा... ऐन तारुण्यात रणांगणं गाजवून तो आता दक्षिण कॅरोलिनात बडा मळेवाला बनून स्थिरावलाय. विधुर बेंजामिनच्या पदरात आईवेगळी सात मुलं आहेत.
म्हणूनच या युद्धाबद्दल तो अजिबात उत्साही नाही; उलट भयाकुल आहे. कारण हे युद्ध आता फक्त रणांगणांवर नाही, तर घराघरांत लढलं जाणार आणि असंख्य निरपराधांचे बळी घेणार, अशी त्याची खात्री आहे. जुलमी करांना त्याचा विरोध आहेच. स्वातंत्र्य त्यालाही हवंय; पण वाटाघाटींच्या शांततामय मार्गानं कारण तो एक बाप आहे... या युद्धाची झळ आपल्या मुलाबाळांना पोहोचली तर... ही काळजी त्याचं काळीज पोखरते.
...कधीकाळी अनेकांच्या मुलाबाळांची कत्तल करण्याचं `शौर्य' गाजवणाऱया या योद्धयाला आता भयानं ग्रासलंय. या पातकांची किंमत आपल्या मुलाबाळांना चुकती करावी लागली तर...?
दुर्दैवानं त्याच्या 18 वर्षांच्या थोरल्या मुलाला- गॅब्रिएलला (हीथ लेजर) बापाचा हा मवाळ सूर पटत नाही. ओजस्वी युद्धकथांनी भारलेल्या वातावरणात वाढलेल्या गॅब्रिएलला युद्धाची अमानुषता ठाऊक नाही. शौर्य, देशभक्ती, स्वातंत्र्य या उच्च कल्पनांनी तो भारून गेलेला आहे. `भेकड' बापाच्या इच्छेविरुद्ध तो स्थानिकांच्या फौजेत भरती होतो.
ब्रिटिशांची शिस्तबद्ध `रेडकोट आर्मी' आणि स्थानिक शेतकरी- कामकऱयांच्या छोटय़ा `मिलिशिया' टोळ्या यांच्यातला संघर्ष हळूहळू बेंजामिनच्या मळ्यापर्यंत, घरापर्यंत येऊन ठेपतो.
एके रात्री जखमी अवस्थेतील गॅब्रिएल घरी पोहोचतो आणि दुसऱयाच दिवशी रेडकोट सेना बेंजामिनचं घर घेरते. युद्धाचे नियम धाब्यावर बसवून सामान्य नागरिकांवर बिनदिक्कत अत्याचार करण्याबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या `ग्रीन ड्रगून्स' या पलटणीचा कर्दनकाळ कर्नल टॅव्हिंग्टन (जेसन आयझॅक्स) बेंजामिनसमोर उभा ठाकतो. गॅब्रिएल हा शत्रूसैनिक बेंजामिनचा मुलगाच आहे, हे कळल्यावर विकृत टॅव्हिंग्टन गॅब्रिएलला फासावर लटकावण्याचा हुकूम देतो. बेंजामिनचा धाकटा मुलगा न राहवून गॅब्रिएलकडे झेपावतो आणि टॅव्हिंग्टनच्या गोळीला बळी पडतो... बेंजामिनचं घर- कोठी त्याच्या डोळ्यांदेखत पेटविल्या जातात... मांडीवर एका मुलाचं कलेवर... दुसऱयाची वधस्थानाकडे वरात निघालेली आणि संपूर्ण कुटुंबाचा दाणागोटा, आसरा आगीच्या भक्ष्यस्थानी... बेंजामिनला त्या क्षणी युद्धाची अटळता पडून जाते. तीरासारखा धावत तो पेटत्या घरात शिरतो, जुन्या संदुका उघडतात, तरतऱहेची शस्त्रं बाहेर पडतात, मुलाचे प्राण वाचवण्यासाठी बेंजामिन पुन्हा योद्धा बनून बाहेर पडतो...
इथपर्यंतचा कथाभाग पाहताना प्रेक्षकाची भावना होते ती हिंदीतल्या रूढ सूडपटांचा ऐतिहासिक रुपडे ल्यालेला चकचकीत हॉलिवुडी आवृत्ती पाहात असल्याची. या सिनेमाचा पुढचा सगळा प्रवासही तसाच घडतो. गॅब्रिएलचं प्रेमप्रकरण, पुढे लग्न. टॅव्हिंग्टननं बेंजामिनला धडा शिकवण्यासाठी गॅब्रिएलच्या सासुरवाडीची केलेली होळी, बेंजामिनच्या उर्वरित कुटुंबाचा तलास लावण्याचा प्रयत्न, गॅब्रिएलची कपटानं हत्या, खचून गेलेल्या बेंजामिननं अखेरीस उसळी मारून युद्धात पुन्हा सहभागी होणं आणि अखेरचा निर्णायक विजय हा सगळाच कथाभाग लोकप्रिय ऍक्शनपटांच्या वैश्विक रुपबंधाशी थेट नातं सांगणारा आहे. त्यानं ब्रिटिश सेनेला जेरीस आणण्यासाठी रचलेल्या चाली शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आणि रॉबिनहुडपटांची आठवण करून देतात.
शिवाय, हा काही अस्सल ऐतिहासिकपट नाही. कारण, बेंजामिन मार्टिन या नावाचा कोणीही स्वातंत्र्ययोद्धा अमेरिकी इतिहासात नाही. फ्रान्सिस मॅरिअन, डॅनियल मॉर्गन आणि थॉमस सम्टर यासारख्या वास्तवातल्या योद्ध्यांच्या गुणावगुणांचा मेळ घालून पटकथाकार रॉबर्ट रोडॅट यांनी बेंजामिनला जन्म दिला आहे. कर्नल टॅव्हिंग्टनही लेफ्टनंट कर्नल बेनॅस्ट्रे टॅर्लेटन या क्रूरकर्म्यावर बेतलेला आहे.
 तरीही `पेट्रियट' ही इतिहासाचा सोयीस्कर संदर्भ घेऊन मनोरंजक काल्पनिका होत नाही, याचं श्रेय पटकथाकार रोडॅट, दिग्दर्शक रोलँड एमेरिच आणि मेल गिब्सन यांना द्यायला हवं. प्रचंड मोठय़ा कॅनव्हासवर थरारक, रोमांचक, भव्यदिव्य अशा युद्धांचं श्वासरोधक चित्रण करण्याच्या नादात तसेच चित्रणस्थळांच्या निवडीपासून, रंग- वेशभूषा, कलादिग्दर्शन, विशेष दृकपरिणाम आदींमधून एक काळ उभा करण्याच्या ओघात सिनेमाचं मूळ सूत्र त्यांनी हरवू दिलेलं नाही. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी युद्धात न उतरणारा बेंजामिन देशभक्तीचं स्फुरणदायी इंजेक्शन टोचून घेऊन रणमर्दानगी गाजवतो ते केवळ कुटुंबरक्षणासाठीच. हा गाभा कधीच विसरता येत नाही प्रेक्षकाला
कारण, बेंजामिन रणांगणात शौर्य आणि रणाबाहेर लष्करी डावपेचांची अक्कलहुशारी दाखवत असताना सतत त्याच्या बोलण्यावागण्यात थकलेपणा जाणवत असतो. युद्धाचा फोलपणा समजल्यानतंरही लढावं लागत असलेल्या योद्धयाचा हा थकवा आहे. त्याच्या डोळ्यांत सतत पूर्वायुष्यांतल्या पातकांच्या प्रायश्चित्ताचं भय दिसत राहतं. या एकाच पैलूमुळं हा नायकही वेगळा होतो आणि सिनेमाही रुटीन युद्धपटांच्या पलिकडे जातो. इथले सर्वच मृत्यू प्रेक्षकाला हलवून सोडतात. त्यात हा सिनेमा भारत- पाकिस्तान युद्धाचा नसल्यानं आपोआप `तटस्थ' ठरणाऱया भारतीय प्रेक्षकाला तर एका क्षणी असंही लक्षात येतं की, समजा रोडॅट- एमेरिच द्वयीचं हाच सिनेमा बरोब्बर उलटा करून- म्हणजे बेंजामिनला खलनायक आणि टेव्हिंग्टनला नायक कल्पून बनवला असता तरी तो आपल्याला इतकाच प्रभावी वाटला असता. `देशभक्ती म्हणजे आपली मातृभूमी हा- केवळ आपला जन्म तिथे झाला म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ प्रांत मानण्याची प्रवृत्ती' ही सुप्रसिद्ध व्याख्या इथे आठवते आणि माणसामाणसांना आपसात झुंजवणाऱया देशभक्तीच्या संकल्पनेतला अंतर्विरोध मन अस्वस्थ करतो.
अत्यंत अभ्यासपूर्वक रचलेला युद्धाचा काळ, त्याचं अप्रतिम चित्रण, बापाची उलाघाल, जाणत्यची तगमग आणि योद्ध्याची जिगर यांचा अद्भुत मेळ दाखवणाऱया मेल गिब्सनसह सर्व कलावंताची जबरदस्त कामगिरी आणि एमेरिचनं कुशलतेनं टिपलेला भावभावनांचा कल्लोळ यामुळे तब्बल पावणेतीन तासांची `पेट्रियट'ची महागाथा एरवीही प्रेक्षणीय झाली आहेच. संदर्भाविना आणि/ किंवा विचारांविना पाहणाऱयालाही तो उत्तम ऍक्शनपट पाहिल्याचा आनंद देऊन जाईल.


(महाराष्ट्र टाइम्स)

रंगबिरंगा प्रेमतिरंगा (हर दिल जो प्यार करेगा)

कुठल्याही नव्या सिनेमाच्या पोस्टरवर- प्रोमोजमध्ये एक नायक- दोन नायिका किंवा एक नायिका- दोन नायक असं त्रांगडं दिसलं की, `हरे राम! पुन्हा प्रेमत्रिकोण?' असा हताश उद्गार मनात उमटतो.
तरीही आपण प्रेमत्रिकोणपट (बरा असेल तर) पाहायचं काही सोडत नाही. दर वर्षीच्या हिट सिनेमांमध्ये हमखास एखादा `लव्ह ट्रँगल' असतोच.
तीन माणसांनी एकमेकांत जीव गुंतवायचा, तो गुंता सोडवायच्या प्रयत्नात अधिकाधिक घट्ट करत न्यायचा आणि कुणा तीर एकाच्या `कुर्बानी'नं त्याचा तुकडा पाडून टाकायचा, असा हा हमखास यशस्वी खेळ. तो `हमखास यशा'ची मिनिमम गॅरंन्टी देतो, कारण प्रेक्षकही कळत- नकळत या गुंत्यात गुंततो. जिंकणारा जिथे हरतो आणि हरणारा जिथे जिंकतो, अशा या अजब खेळाची गोडीच तशी न्यारी.
`जिंकणाऱया' बरोबर प्राप्य `वस्तू' मिळवल्याचं सुख आणि हरणाऱयाबरोबर त्यागमय प्रेमाची उदात्तता अनुभवल्याचं ऑल्मोस्ट आध्यात्मिक समाधान, असा हा `होलसम' स्वप्नरंजनाचा मामला!
राजकंवर दिग्दर्शित `हर दिल जो प्यार करेगा' हा अगदी बेतीव प्रेमत्रिकोण आहे. चोख फॉर्म्युल्यानुसार बनवलेला. दोन्ही नायिकांची नायकाशी आणि प्रेक्षकही ओळख झाली की, सिनेमाचा शेवट काय होणार हे क्षणार्धात डोळे झाकून सांगता येईल, इतका चाकोरीबद्ध. तरीही डोळे उघडे ठेवून शेवटपर्यंत पाहण्याजोगा. अत्यंत साचेबंद कथाबाजीतून कथा- पटकथा- संवादकार रुमी जाफरी यांनी नावीन्याचा आभास देणारं, `इंटरेस्टिंग' असं काही घडवलंय आणि राजकंवर यांनी ते प्रेक्षणीय बनवलंय. `हम दिल दे चुके सनम'सारखा प्रेमडोहात बुचकळवून आतून ढवळून काढणारा अनुभव `हर दिल...' काही देत नाही. पण किनारेकिनारे फिरून, चार- दोन प्रेमशिंतोडे उडवून घेऊन `भिजलो- भिजलो' म्हणून आनंदणाऱया बहुसंख्य पब्लिकला तीन तास उलझवून ठेवण्याचं काम तो चोख बजावतो; `बच्चा भी खुश, बच्चे का बाप भी खुश्' टाइप घाऊक सुखान्त शेवटापर्यंत किमान पाहवतो.
`व्हाइल यू वेअर स्लीपिंग' या हॉलिवुडच्या प्रेमपटावर बेतलेल्या `चंद्रलेखा'या प्रियदर्शन दिग्दर्शित दक्षिणी चित्रपटावरून `प्रेरणा' घेतलेल्या `हर दिल...'चा प्रेमत्रिकोण काहीसा `हटके'ही आहे; कारण इथे एक नायिका इंटरव्हलपर्यंत कोमामध्येच- बेशुद्धावस्थेत असते.
हे घडतं असं की, गोव्याहून मुंबईत नायक बनण्यासाठी आलेल्या राजूसमोर (सलमान खान) एक अपघात होतो. अपघातग्रस्त गाडीतून तो पूजाला (रानी मुखर्जी) बाहेर काढून वाचवतो. तेव्हापासून ती कोमातच असते. घरच्यांना पसंत नसलेल्या कुणा रोमी नामक इसमाबरोबर गांधर्वविवाह करायला निघालेली असताना पूजाला हा अपघात झालेला असतो. हा रोमी सिनेमाभर उगवतच नाही. पूजाचे घरवाले राजूलाच रोमी समजतात. हे ओबेरॉय खानदान बरंच बडं असल्यानं राजूला संगीतक्षेत्रात ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यातून पूजाच्या घरातल्यांनाही मानसिक दिलासा मिळणार असल्यानं तो रोमी बनायला तयार होतो.
त्याची पंचाईत होते जान्हवीच्या (प्रिटी झिंटा) आगमनानंतर. ही ओबेरॉयच्या अकाऊंटंटची (परेश रावळ) मुलगी. पूजाची सख्ख्या बहिणीइतकी सख्खी मैत्रीण. पहिल्या भेटीतच राजू तिच्या प्रेमात पडतो. पण ती राजूला रोमी- म्हणजे जीजाजी समजत असल्यानं त्याचं प्रेमगाडं पुढे सरकत नाही. एका नाटय़मय प्रसंगातून जान्हवीला असलियत का पता लागून ते पुढे चालू लागतं, तर पूजा कोमातून जागी होते आणि गैरजागी (पक्षी : मूळ रोमीवर) केलेल्या प्रेमातूनही जागी होते. लगे हाथ योग्य जागी (पक्षी : राजूच्या) प्रेमातही पडते.
झाला तिढा?
आणि या तिढय़ातून नेहमीच्या पद्धतीनं मार्ग निघतोच...
... हा मार्ग काय निघणार याच्या `हिंटस्' पटकथाकार- दिग्दर्शकांनी जागोजाग पेरल्या आहेत. राजूला पूजाचा नवरा मानून तिच्या घरातले जे काही विवाहसंबंधित धार्मिक- रुढीगत विधीकृती करायला लावतात, त्याला जान्हवीचा `सहभाग'च परंपरापरिचित प्रेक्षकाला `हा नवरा कोणाचा?' याचा अंदेशा देऊन जातो. या प्रसंगांच्या स्लोमोशनी- नाटय़मय हाताळणीमध्ये `जुदाई'च्या राजकंवरचा `टच' जाणवतो. मुळात पटकथाकार रुमी जापरी यांनी पूजाचं कोमानिद्रिस्त असणं (त्यातही तिला सगळं ऐकू येतं, समजतं, फक्त ती स्वत: कसलीच प्रतिक्रिया देऊ शकते, अशी खास योजना), राजूला रोमी समजलं जाणं, या सिच्युएश्न्सचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. अशा कथानकांत नायिकेच्या आगमनापर्यंतचा कथाभाग इंटरेस्टिंग करणं अवघड असतं
राजूला `लव्हेबल रास्कल' टाइप बालिश चक्रमपणा, `सिंगर' बनण्यासाठी त्यानं अबा (नीरज व्होरा) या मित्राबरोबर केलेल्या उचापती, अबाच्या मामाला (शक्ती कपूर) लावलेली दोन लाखाची शेंडी वगैरे डेव्हिड धवन स्टाइल (जाफ्री हे डेव्हिडभाऊंचे `पेट' लेखक आहेत हा योगायोग नाही.) टपोरी कथाभाग बऱयापैकी टाइमपास आहे. मात्र, तो `एन्जॉय' करण्यासाठी' किंचाळा, किंचाळा कोण अधिक किंचाळे तो' अशी स्पर्धा लावल्यागत केकाटणाऱया भडक- हिडीस हावभावयुक्त नीरज व्होरा आणि शक्ती कपूर यांना सहन (आणि क्षमा) करण्याची तयारी हवी, ही कल्पना देऊन ठेवलेली बरी.
दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मूळ कथानकाशी फारसा किंवा सुतराम संबंध नसलेला एक लाऊड विनोदाचा ट्रक जोडण्याची पॉप्युलर पद्धत आहे. तीच जाफ्री आणि राजकंवर यांनी इथे वापरली आहे. असल्या ट्रककडून दर्जेदारपणाची अपेक्षा करणं हे शक्ती कपूरला `देवेन वर्मा बन' म्हणण्याइतकं फजूल आहे, हे ध्यानात ठेवून पाहिला, तर काही ठिकाणी हा ट्रक हसवूनही जातो.
एरवी नेहमीच्या चाकोरीतून जाणाऱया या कथानकात बरोब्बर इंटरव्हलला आणलेला एक धक्का आणि इंटव्हलनंतर दिलेला धक्केपे धक्काही धमाल आहे. रुपेरी प्रेमकथा `संगीतमय' असण्याचा रिवाज आहे आणि राजकंवर हा संगीताचा चांगला कान असलेला दिग्दर्शिक. त्याच्याकडूनच्या अपेक्षा `हर दिल...'चं संगीत पूर्ण करते. समीरनं सिनेमाचा आशय सांगणाऱया अर्थपूर्ण शीर्षकगीतापासून `एक गरम चाय की प्याली हो' सारख्या बडबडगीतापर्यंत वैविध्यपूर्ण गाणी लिहिली आहेत
हल्ली जबर फॉर्मात असलेल्या अनू मलिकनं ती यच्चयावत श्रवणीय (याचा अर्थ `थिएटरात श्रवणीय (याचा अर्थ `थिएटरात श्रवणीय' असा घ्यायचा) केला आहेत आणि नृत्यदिग्दर्शिका फरहा खाननं ती प्रेक्षणीय केली आहेत. अर्थात, शीर्षकगीताचा गोडवा आणि `ऐसा पहली बार हुआ है'ची गिटारझणत्कारी झिंग यांनी ही गाणी थिएटराबाहेरही श्रवणीय केली आहेत. सोनू निगमनं (रफी स्टायलीत) खुलून गायलेलं `आते आते जो मिलता है' हे(`तीसरी मंझील'च्या `दीवाना मुझसा नहीं'वर बेतल्यामुळे मस्त जमलेलं) गाणं कॅसेटमध्ये आहे, त्याची सिच्युएशनही सिनेमात आहे, गाण्याचा संदर्भही आहे, पण गाणं सिनेमात नाही. काही आठवडय़ानंतर ऍडेड अट्रक्शन म्हणून ते जोडून पुन्हा गर्दी खेचायची ही आयडिया की काय?
सर्व कलाकारांची उत्तम कामगिरी हा `हर दिल...'चा आणखी एक प्लस पॉइंट. सलमानच्या व्यक्तिरेखेत `हम दिल...'च्या समीरच्या छटा आहेत. तिथल्या `आकाशातल्या' बापासारखी इथे कुणी अदृश्य मिसेस कुटिन्हो त्याला मार्गदर्शन करते. राजचा कलंदरपणा दर्शवण्यासाठी तो सदासर्वकाळ अनेपेक्षित अंगविक्षेप, तोंड वेडावणे आणि तऱहेवाईक चित्कार वगैरे प्रकार करतो, पण जिथे आवश्यक तिथे अभिनयाची गरजही समर्थपणे भागवतो. प्रिटी झिंटा आणि रानी मुखर्जी या दोन्ही नायिका आधुनिक युवती सहजतेनं साकारतात आणि `क्लायमॅक्स'ला त्या (एकमेकींशी स्पर्धा न करता) आपापली जबाबदारी नेटकेपणानं पार पाडतात. परेश रावळ आदी सहाय्यक मंडळींची कामंही चोख.
श्रीमंत निर्मितीमूल्यं आणि उत्तम तांत्रिक कामगिरीची जोड लाभलेला हा `रंगबिरंगा प्रेमतिरंगा' पब्लिकला भावून बॉक्स ऑफिसवर काही काळ डौलानं फडकल्यास नवल नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)