Sunday, February 13, 2011

पुकारता चला हूँ मै (अभिजीत देसाई)

पुकारता चला हूँ मै
 
गली गली बहार की
 
बस एक छाँव जुल्फ की
 
बस इक निगाह प्यार की..
  
ही अभिजीतची कॉलरट्यून.. ती पूर्ण कधीच ऐकायला मिळायची नाही.. तो घरात काही इतर व्यापात असला, थिएटरमध्ये असला किंवा कुठे ट्रेनमध्ये फोन न घेण्याच्या स्थितीत असला तरच फोन उचलला जात नसे.. एरवी ‘पुकारता चला हूँ मै’ एवढी एक ओळ पूर्ण ऐकायला मिळाली तरी पुष्कळ. सहसा कॉल करताच चटकन फोन उचलला जायचा आणि समोरून फोन करणा-यापेक्षाही उत्सुक ‘हं बोल’ ऐकू यायचा..
 ही कॉलरट्यून ऐकली की मोहम्मद रफीचा प्ले बॅक घेऊन पलीकडे स्वत: अभिजीतच हे गाणं गातोय, असा भास- त्याला जेव्हा जेव्हा फोन करायचो, तेव्हा तेव्हा हटकून व्हायचा. हे त्याचंच तर गाणं होतं.. हिंदी सिनेमाचा सुवर्णकाळ म्हणून ओळखल्या जाणा-या काळाने ज्यांच्यावर गारुड केलं, त्या अनेक पिढ्यांचं हे गाणं होतं. त्यांच्यासाठी थिएटरची वाट हीच ‘गली गली बहार की’ होती. तिथल्या कुंद अंधारात झळाळून उठलेल्या पडद्यावर ‘जुल्फ की शाम’ आणि ‘प्यार की निगाह’ त्यांना गवसायची. हा बहुश: मधुर संगीतमय बाळबोधपटांच्या उत्कर्षाचा कालखंड होता. बीएमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट येणा-या चाळिशीतल्या नायकाला गाजर का हलवा खिलवणारी पडद्यावरची सोशिक माँ याच काळातली आणि एकमेकांपासून फुटभर अंतरावर हवेत ठोसे मारत ‘ढिशुम ढिशुम’ असे तोंडाने आवाज काढत फास्ट मोशनमध्ये चालणारी विनोदी फायटिंगही याच काळातली. पण, या काळाने अभिनयाचा सरताज दिलीपकुमार, ग्रेट शोमन राज कपूर आणि सदाबहार देव आनंदसारखे अव्वल स्टार दिले, गुरुदत्त-बिमल रॉय यांच्यासारखे मास्टर दिग्दर्शक दिले आणि प्रचंड मोठय़ा सांगितिक टॅलंटने मिळून कानसेनांवर एकापेक्षा एक सरस गाण्यांचा खजिनाच उधळून रिता केला..
..अभिजीतने तनाने 2010 साल गाठलं खरं, पण मनाने मात्र तो कायम याच काळात राहिला.. त्याच्याच स्टायलीत सांगायचं, तर मोबाइल जन्माला येण्याच्या कैक वर्ष आधीपासून त्याची कॉलरटय़ून हीच होती..
..अभिजीतची पहिली ओळख त्याच्या लिखाणातूनच झाली. अभिजीतची पिढी ज्या कालखंडावर पोसली, त्याच्याच उत्तरार्धातली आमची पिढी. टीव्हीवर ब्लॅक अँड व्हाइट सिनेमे पाहणारी, छायागीत, चित्रहारसाठी जीव टाकणारी, रेडिओवर चित्रलोक, हवामहल, बेला के फूल कानात प्राण ओतून ऐकणारी, पडद्यावर अमिताभ बच्चन नावाच्या महामानवाच्या दर्शनाने धन्य होणारी, परवीन, झीनत, रेखा यांना पाहताच छातीत कळाबिळा येणारी.. थोडा फरक होता.. आमच्या सिनेमावेडाला पुण्याच्या ‘आशय फिल्म क्लब’मुळे एकदम जागतिक आणि कलात्मक वळण लागलं होतं.. अनसेन्सॉर्ड सिनेमे पाहण्याचा तारुण्यसुलभ आंबटशौक करायला गेले आणि एकदम सिनेमाकलेच्या अनेक शक्यतांच्या विश्वरूपदर्शनाने लीन झाले, अशी स्थिती..
..अशात अभिजीतची अट्टल कमर्शियल सिनेमाभक्त लेखणी तळपू लागली आणि एकाच वेळी संताप आणि कौतुक अशा परस्परविरोधी भावना मनात उमटवू लागली.. संताप यासाठी की त्याची कमर्शियल सिनेमावादी मतं अत्यंत आग्रही, टोकाची असायची आणि ती इतर कोणत्याही प्रकारातल्या चित्रपटरसिकांना चाबूक फटकावून ‘अबे हाट!’ असं उडवून लावणा-या विलक्षण आक्रमक शैलीत मांडलेली असत.. कौतुकाची गोष्ट अशी होती की वेगळय़ा सिनेमाच्या नादींना व्यक्तिश: झोंबणारं हे लिखाण कमालीच्या रसाळ शैलीत, खुमासदार भाषेत केलेलं असायचं.. म्हणजे अभिजीत हा त्याच्यापेक्षा वेगळी अभिरुची असणा-यांचा लेखणीरूपी तलवारीने थेट शिरच्छेद करीत असायचा आणि ज्याची मान छाटली जायची त्याच्या चेह-यावर याच्या हिरेजडित सोनेरी तलवारीचे कौतुक दाटलेलं.
 
दिलीप, देव, राज, शंकर-जयकिशन, रफी ही याची दैवतं. त्यांच्याबद्दल लिहिताना लेखणी इतकी भावभीनी व्हायची की ही मधुराभक्ती पाहून साक्षात मीरेचीही कृष्णावरची एकटक नजर क्षणभरासाठी ढळली असती. आवडत्या माणसांबद्दल, गाण्यांबद्दल लिहितानाही उत्साहाचा झरा झुळझुळायचा. कौतुक करताना ‘ग्रेट, सॉलिड, तुफान, अफलातून, जबरदस्त’ अशा सुपरलेटिव विशेषणांची हिरेमाणके जडायची भाषेला. ‘जुनं ते सोनं’ म्हणून डोक्यावर घेऊन नाचताना अकारण ‘नवं ते टाकाऊ’ ठरून पायदळी तुडवलं जातंय, याचं अभिजीतला कधी भान नसायचं. तो ‘संत ज्ञानेश्वर’मधल्या त्या सुप्रसिद्ध नागव्या नाचणा-या पोरासारख्या निरागसपणे त्याच्या धुंदीत आणि मस्तीत लिहायचा. हा इतकं एकांगी का लिहितो, म्हणून याच्यावर रागावायचं की हा इतकं ‘रीडर फ्रेंडली’ (हीसुद्धा त्याचीच देणगी- मराठीत असं सहज खुबीनं इंग्रजी पेरण्यात तो मास्टर- इंग्रजी शब्दांनी त्याच्या वाक्यांचा तोल कधी ढळला नाही, ‘वजन’ कधी घटलं नाही आणि सिनेमाच्या क्लायमॅक्ससारखीच नाटय़मय सम कधी चुकली नाही) कसं काय लिहू शकतो, याचा दुस्वास करायचा, या दुग्ध्यातून कधी बाहेर पडता आलं नाही..
 ..त्याची प्रत्यक्ष भेट झाली मुंबईत चित्रपट परीक्षण करताना. दिसायला एखाद्या फाकडू हीरोसारखा देखणा (त्याचा तो उलट्या फिरवलेल्या केसांचा फुगीर भांग परवा शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत आडव्या स्थितीतही विस्कटला नव्हता.. आत्ता हा उठून बसेल आणि ‘तुला सांगतो, हार्ट अ‍ॅटॅक म्हणजे कायच्च्या काहीच एक्स्पीरियन्स असतो रे’ असं सांगेल, असं वाटत होतं). स्वत:च्या धुंदीत झपझप चालणारा. साध्या साध्या वाक्यांची फेकही एकदम ड्रामॅटिक. त्याला हायपर स्वभावाची जोड. त्यामुळे, पडद्यावरच्या शाहरुख खानप्रमाणे अस्वस्थ अभिजीतमध्येही आत ठासून भरलेली ऊर्जा चहूअंगांनी उसळून बाहेर पडू पाहतेय, असं जाणवायचं. लिखाणातला आग्रही, आक्रमक बाणा बोलण्यातही कायम. मात्र, अभिजीतने ज्यांचा कित्ता गिरवला असं म्हणतात, त्या अनेक तथाकथित ‘सौंदर्यवादी’ आस्वादक समीक्षकांचा शिवराळ, विखारी बाज ना अभिजीतच्या लेखणीला शिवला ना वाणीला. त्याची मतं अतिशय ठाम होती. पण, ती इतरांवर लादली नाहीत. वर्ल्ड सिनेमा वगैरे भानगडी आपल्याला कळत नाहीत, डोक्यावरून जातं ते डोक्यावरून जातं, उगाच खोटं का बोला, असा त्याचा नितळ आविर्भाव असायचा. दातात काडी चावत गाणं गात हिरोइनीमागे पळणा-या नटाचा सिनेमा तोच खरा श्रेष्ठ सिनेमा, सत्यजित राय, कुरोसावा वगैरे झूट, बोगस, असला पोरकटपणा त्याने कधी केला नाही. तू तुझ्या पंढरीचा वारकरी, मी माझ्या पंढरीचा, असा सहिष्णुभाव होता त्याच्यात.
हा ‘सश्रद्ध’ भाव होता म्हणूनच अभिजीत सिनेपत्रकारितेच्या गदळ धंद्यात वावरूनही निर्मळ राहिला. हिंदी नटनटय़ांचे किस्से तो रंगवून लिहायचा, पण लफडेबाजीचे लाळगाळू किस्से नव्हेत, तर कलावंतांच्या मेहनतीचे, (त्याच्या मते) सच्च्या प्रेमाचे, स्टारडमचे, ‘लार्जर दॅन लाइफ’ जगण्याचे ‘प्रेरणादायक’ किस्से.. कधी गप्पा मारतानाही त्याच्या तोंडून ‘तसलं’ काही निघायचं नाही, कुणी तशी पांचट चर्चा करत असेल, तर तो ‘शांतम पापम’च्या चालीवर ‘काय रे काय काय करतात हे लोक’ असलं काहीतरी बोलून विझूनच जायचा. सिनेमा, क्रिकेट, खवय्येगिरी आणि पर्यटन या विषयांची मुशाफिरी करताना प्रत्येक सुंदर गोष्ट आसुसून भोगायची आणि मग तो आनंद देवगडचा हापूस सोलून चाखावा, तशा एकतानतेनं नंतर वाचकांनाही मनमुराद चाखवायचा, हे लेखनव्रतच होतं त्याचं.
त्याचं आणखी एक रूप पाहायला मिळालं ते त्याच्यासोबत काम करताना. हार्ड टास्कमास्टर बॉस अभिजीत. टीममधल्या प्रत्येकाला कुदवणारा, पळवणारा अभिजीत. पण त्याच्या टीमला कामाला लावण्याचा त्याला एकशे दहा टक्के अधिकार होता. कारण, तो स्वत: धावायचा. तुफान कष्ट उपसायचा. गरज असेल तर घरी पहाटेपर्यंत बसून लेख हाणायचा. त्याचा टेलिफोन पत्रकारितेवर विश्वास नव्हता. एखाद्याशी बोलून लेख करायचा असेल, तर आपल्या पदाचा बाऊ न करता काखोटीला झोळी मारून त्या माणसाला तो म्हणेल तिथे गाठायचा आणि त्याचं म्हणणं नीट उतरवून घ्यायचा. पुरवणीचं संपादन करताना त्याच्याकडे लेखनाच्या नावाखाली कसला कसला कडबा यायचा. तो न कुरकुरता ‘तेच तर माझं काम आहे’ म्हणून त्या कडब्यातून आर्टिकल काढायचा, असंख्य मजकूर स्वत: रि-राइट करायचा. ऑफिसातल्या खुर्चीत दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ स्वस्थ बसलेला अभिजीत दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, अशी पैज लावली असती, तर ती कधीही कुणीही जिंकली नसती....ती साक्षात मृत्यूनेच जिंकली 23 मार्च 2010 ला. हातात आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ झालेला अभिजीत त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचाच त्या खुर्चीत दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ नुसताच बसून राहिला असेल..
..‘बरं नाही म्हणून घरी जातो’, असं त्याला विलक्षण मानहानीकारक वाटणारं वाक्यही त्याने त्याच दिवशी पहिल्यांदा उच्चारलं असेल..
..आणि बरं नाही म्हणून कुणीतरी ऑफिसातलं काम सोडून डॉक्टरकडे घेऊनबिऊन जातंय, असला विलक्षण संकोचून टाकणारा प्रसंगही त्याच्यावर त्याच दिवशी ओढवला असेल..
 ..तो दिवस वेगळाच होता..
..त्याच्यासाठीही आणि त्याच्यावर प्रेम करणा-या, त्याचा आदर करणा-या, त्याच्या मित्रांसाठी, चाहत्यांसाठीही..
..तो दिवस- त्याच्याच भाषेत सांगायचं तर ‘कायच्च्या काहीच’ वेगळा होता..
..आता इथून पुढे सगळ्याच कॉलरटय़ून नुसत्याच ‘ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग’ अशा बेजान वाजत राहणार आहेत..

(प्रहार, २७ मार्च २०१०)

4 comments:

  1. Realy Abhijit Desai was a nice writer.His nostalgic article and books are unforgetable.
    Dhananjay Kulkarni
    dskul21@gmail.com

    ReplyDelete
  2. Arey Baapre!kaychya kayach lihita tumhi sarrrrkan kata aananare! mala tharavikach lokanche lekhan aawadate-abhijeet desai,parag patil aani mukesh machkar,pravin tokekar aani book-up madhle girish kuber yanche !ek parag patil sodlyas urvarit sarvanshi majhe bolane kewal phonevar jhaley. majhyamate ha mrutyulekh nahi-vyaktitv-vishesh lekh hoy.

    ReplyDelete
  3. नाटक - सिनेमांचं योग्य परीक्षण (समीक्षा) करणारे फार थोडे लोक आहेत! त्यातीलही कमी होताहेत हे दुर्दैव...

    ReplyDelete
  4. नाही विसरू शकत या माणसाला

    ReplyDelete