Friday, December 16, 2011

लालजर्द भयाचा कंद (कौन)


बाहेर पाऊस किच्च रिपरिपतोय.. सुनसान बंगल्यात ती तरुणी एकटी... फोनवरून आईला लवकर परत येण्याविषयी सांगतेय... एकटी घाबरलीये... दारखिडक्या गच्च बंद करून बसलीये...
 टीव्हीवर बातम्या लागतात... घरात एकटय़ा असलेल्या बायकांचे खून करणारा माथेफिरू मुडदेफरास त्याच परिसरात. मोकाट फिरतोय... कुणाही अनोळखी इसमाला घरात येऊ नये...
  ...या बातमीनं विलक्षण घाबरलेल्या त्या तरुणीच्या मनातल्या वेडय़ाविद्रय़ा शंका चित्रविचित्र आभासांच्या रुपानं तिला भेडसावताहेत... सतत आभास होतोय... घरात कुणीतरी आहे... पण कोण...?
  अशात दारावरची बेल वाजते... टिंगटाँग... कोण आहे दारात? कौन।़।़।़?
  दारात आयहोलमधून दिसतो एक सुटाबुटातला रुबाबदार तरुण... कुणा मल्होत्राला या घरात शोधायला आलेला... `पण इथं तर गुप्ता राहतात... जी.एस. गुप्ता...' ती तरुणी त्याला सांगते.
 ``मॅम... बाहेर मुसळधार पाऊस पडतोय, मला थंडी वाजलीये... मला घरात तात्पुरता आसरा द्या... मला घरात घ्या ना मॅम'', त्या तरुणाची आर्त- आग्रही- काहीशी जरबेची विनंती... ती अर्थातच धुडकावून लावते. तो वारंवार बेल वाजवून आर्जव करतो, ती किचनमध्ये गेली की, तिथल्या खिडकीत, हॉलमध्ये आली की, तिथल्या खिडकीत... शेवटी शक्कल लढवून तिलाच दरवाजा उघडायला लावून तो आत शिरतोच...
 बाह्यत: तरी तो सरळ-साधा, खरोखरीच पावसात अडकलेला माणूस वाटतो. त्याच्या अतिबडबडय़ा स्वभावात मध्येच विक्षिप्ततेची झाक चमकते. कोण आहे हा? तोच माथेफिरू खुनी तर नाही. ही भयशंका खरीशी वाटून त्याच्यापासून पळ काढण्यासाठी ती दरवाजा उघडते, तर दारात दुसराच माणूस... बंदुकधारी... तो पोलिस असल्याचं सांगून आत घुसतो... पण खरोखरीच तो पोलिस आहे का...? की हाच आहे तो खतरनाक माथेफिरू... की तो पोलिसच आहे आणि आधी आलेलाच खुनी...?
 एक घर... एक वेळ... तीन माणसं... कोण कोण आहे...? कौन... कौन...?
 प्रेक्षकाच्या मेंदूला गिरमिट लावून त्याचा भुगा करणारा रामगोपाल वर्मा दिग्दर्शित `कौन' हा हिंदी रुपेरी पडद्यावरचा एक चमत्कार आहे. एका बंगल्यात, एका रात्रीत तीन पात्रांमध्ये सिनेमाच्या (10 रिळांच्या) अवधीएवढय़ाच वास्तव काळात घडणारा विलक्षण परिणामकारक
  रहस्यपट... त्याहूनही अधिक भयपट `स्टार्ट टू फिनिश' प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवणारा... त्याहूनही अधिक शेकडो प्रेक्षकांच्या साथीतही व्यापून टाकणाऱया भयप्रद एकांतापासून पळून जावे जीव खाऊन, अशी भावना निर्माण करणारा.
हिंदीच नव्हे तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात एका वेगळ्या अध्यायाचा प्रारंभ नोंदविणारा हा सिनेमा स्थळकाळ आणि पात्ररचनेच्या बाबतीत आठवण करून देतो यश चोप्रांच्या `इत्तेफाक'ची. तिथे तर प्रमुख दोनच पात्र होती. पण, त्या पात्रांचा भूतकाळ ठसठशीत करण्यात आलेला होता. इतर दुय्यम पात्रांचा, मुख्य चित्रणस्थळाव्यतिरिक्तच्या चित्रणस्थळांचा वापर होता. इन्स्पेक्टरच्या तिऱहाईत आगमनातून रहस्याचा उलगडा होता.
 `कौन' या सर्वच बाबतीत `इत्तेफाक'पेक्षा वेगळा आणि फारच पुढचा सिनेमा आहे. इथे जे काही घडतं ते एकाच ठिकाणी आणि रहस्योद्घाटनही होतं ते केवळ तीन पात्रांमध्ये. शिवाय दिग्दर्शक रामगोपाल आणि पटकथाकार अनुराग कश्यप कळसाध्यायाला तोवर कथाबाह्य असलेला कळीचा मुद्दा आणून प्रेक्षकांवर आदळवत नाहीत... ते अत्यंत चतुराईने काही `हिंटस्' देतात आणि घटनाक्रमात त्या पुसून टाकतात... सर्व काही पाहूनही त्यांची रहस्योद्घाटनापर्यंत संगती न लागलेला प्रेक्षक रहस्य उघड होताना थरारून जातो... शेवटी काय घडणार याच्या `अडम तडम तडतड बाजा' पद्धतीनं अटकळी बांधून आपला `भिडू' ठरवणारा प्रेक्षक तर पार उताणाच पडतो शेवटी. आणि भयकंपित न होण्याची सिद्धी साधलेल्या तर्काच्या आधारावर शेवटाचा अचूक अंदाज घेणारा प्रेक्षकही तो अंदाज खरा ठरल्याचा आनंद घेताना `क्या बात है यार!' म्हणून `कौन'कारांना खुली दाद देऊन जातो.
 कारण, त्या शेवटपर्यंत येण्यासाठी अनुराग- रामगोपाल जोडी जो उंदरा- मांजराचा खेळ खेळविते तो निव्वळ भीषण आहे. तुम्ही एकेका क्षणाला जे जे गृहीत धराल ते ते पुढच्या क्षणाला आपल्याच मनातल्या शंकांच्या भोवऱयात गुडुप्प होऊन जातं. दुसरा क्षण... दुसर गृहीतक... तेही गुडुप्प... तिसरा क्षण... तिसरं गृहीतक... हा क्रूर खेळ मेंदू चक्रावून टाकणारा... कुणीतरी मरा रे।़।़।़ मेलात तरच सुटका आहे तुमची... असा आतल्या आत टाहो फोडायला लावणारा...
 पडद्यावर मृत्यूचा थयथयाट पाहताना प्रेक्षक सुप्तपणे आनंदतो तो सुटकेच्या भावनेनं... कारण रामगोपाल- अनुराग यांनी `कौन' बुद्धीच्या सजग प्रतलावरच्या रोमांचक थरारभावनेवर आधारलेला नाही. तसा रहस्यपट प्रेक्षकाला स्वत:च्या तटस्थतेच्या सुरक्षित कोशात राहून प्रेक्षकाची मती गुंगवत असतो. इथे पटकथाकार- दिग्दर्शक तो कोश टरटरा फाडून भिरकावून देतात... बखोटीला धरून त्या बंगल्यात त्या एकांतात प्रेक्षकाला आत घेऊन जातात... शेजारच्या खुर्च्यांवरल्या प्रेक्षकांच्याही अस्तित्वाचा विसर पाडतात (शेजारी कुणी नसेल तर कम्बख्तीच)... त्याला पार एकटं बनवून थिएटरच्या काजळकाळ्या अंधारभारल्या डोहात सोडून देतात... अशा वेळी सजग मनावरचे सगळे पापुद्रे सोलवटून डोकं बाहेर काढतो, तो लालजर्द भयाचा कंद... लहानपणी कधी अंधारल्या वाटेवरून चालताना जवळ काहीतरी खसफसल्यावर... चुकून घरात एकटं असताना धारपांची एखादी कथा वाचल्यावर... किंवा गर्दीतही एकटेपणा दाटून आल्यानंतर अचानक ज्याचं भीषण दर्शन घडलं होत तो कंद... अख्खाच्या अख्खा... असा समोर...
  आपण एकटे... ठार एकटे असताना एरवीपेक्षा किती वेगळे असतो... काय काय चित्रविचित्र गोष्टी करतो... कशाकशात स्वत:ला गुंतवू पाहतो... सर्वांनाच असलेला हा अनुभव एरवी गमतीदार... पण एकटे असताना आपण अतिशय `व्हल्नरेबल' ही असतो... सगळ्या संवेदना अशा काही तरल झालेल्या असतात... दुखऱया जागा, मनाच्या सांदीकोपऱयात दडलेली भुतं अतिशय सजग असतात... योग्य जागी योग्य वेळेला झालेला एक हलकासा आघात शरीरमनाच्या एरवी जुळलेल्या सतारीतून विचित्रवीणेचा भयाण भासणारा झणत्कार उमटवू शकतो.
  असाच अनुभव एखाद्यानं `हौसे' नं भांग घेतली तरी येऊ शकतो. भांग घेऊन प्रयत्नपूर्वक सजग राहण्याचा अट्टहास केला, की आसपासच्या जगाची सगळी परिमाण बदलतात. सगळ्या संवेदना झिंगून आसमंताचं विरुप दर्शन घडवू लागतात, सशुद्ध माणसांच्या जगात आपल्याला पार एकटं पाडतात... ही स्थितीही कमालीची `व्हल्नरेबल'... मनाच्या पाताळात भलतेसलते उद्रेक घडवू शकणारी...
 `कौन' प्रेक्षकाला त्या अवस्थेत घेऊन जातो. सुरुवातीची जवळपास दोन रिळं उर्मिला मातोंडकर (ती तरुणी) घरात एकटीच असते. टॉप अँगलनं घेतलेल्या पहिल्याच दृश्यात जाजमावर आडवी पडून फोनवर आईशी बोलणारी ती दिसते तेव्हापासून कॅमेरा कधी माजंर, कधी घरातच दडलेलं आभासी अस्तित्व बनून तिला घेऊन टाकतो. तिच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तपणे पाळत ठेवल्यासारखा तिचा पाठलाग करतो... विलक्षण अंगावर येणाऱया प्रवाही अंधारघोळत्या पार्श्वसंगीतातून, मधेच कडाडणाऱया विजांच्या आवाजातून तिच्या बारीकसारीक हालचालीतून भीतीची थंड शिरशिरी मणक्यात सळसळवतो... ती संपूर्ण घरभर काही दडलंय का ते थरथरत पाहते तेव्हा काहीही नसणार याची खात्री असलेल्या प्रेक्षकाच्याही हृदयाचे ठोके त्याला स्वत:ला ऐकू येऊ लागतात... ती खोलीचं
 आपणहून किलकिललेलं दार लाथ मारून उघडते तेव्हा, बाथरुममधला पडदा झर्रकन सरकावते तेव्हा आपल्या नकळत डोळे गच्च मिटले जातात. तिच्या मनातल्या भयकारी आभासांना पडद्यावर मूर्तरुप लाभतं तेव्हा तिच्याबरोबर आपली किंकाळी कशी फुंटली नाही याचं आश्चर्य वाटतं. उर्मिला एकटी असताना काहीसं `लाऊड' वाटणारं पार्श्वसंगीत आणि क्षणाक्षणाला, घाबरवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न सराईत प्रेक्षकाला किंचित खटकतो खरा; पण, ही सगळी पूर्वतयारी क्लायमॅक्सच्या धक्क्य़ांसाठी आहे, हे (अर्थातच) क्लायमॅक्सलाच उमगतं. दारातला मनोज बाजपेयी (पहिला तरुण) जेव्हा `हॅलो।़।़ मॅम' म्हणून साद घालतो तेव्हा (हाच कदाचित तो माथेफिरू असेल, अशी शंका येऊनही) आपल्याला हायसं वाटतं. तोवर नायिकेसोबत कंठलेला एकांत जीवघेणा झालेला असतो. मनोजनं घरात प्रवेश मिळवल्यानंतर आपल्या हृदयाची गती नॉर्मलला येते न येते तोच शंकाकुशंकांचा भास श्वास घुसमटवू लागतो आणि सुशांतकुमारचं (दुसरा तरुण) आगमन चक्क सुखद वाटून जातं.
 ही कमाल आहे. सिनेमाचं माध्यम प्रतिभावान दिग्दर्शकाच्या हाती किती प्रभावी होऊ शकतं, याचं थक्क करणारं दर्शन `कौन' घडवतो. कॅमेऱयाचं आणि ध्वनीचं शस्त्र वापरण्याची समज असलेला हा दिग्दर्शक सर्कशीतल्या रिंगमास्टरसारखा आपल्या शरीरमनाचा संपूर्ण ताबा घेतो. कॅमेऱयाचा साधासा `पॅन' अभिनेत्याच्या चेहऱयातला सूक्ष्म बदल, संदीप चौटाचं अफलातून पार्श्वसंगीत किंवा पार्श्वध्वनीमधली एखादी जागा रामगोपालच्या हाती एखाद्या चाबकासारखी झपझपते `कौन'मध्ये माणसाव्यतिरिक्त अंधारल्या परिसराचं पावसाच्या अखंड पडद्याआडून दर्शन घडविणाऱया रिकाम्या खिडक्या आणि घराचा काळवडलेला अंतर्भाग कधी कधी दिसतो... भिंतींवर टांगलेल्या प्राण्यांची मुंडकी... शोभेच्या पुतळ्यांचे निष्प्राण चेहरे... भिंतीवरचं म्युरल... यांची कथाभागातली अचूक जागा, प्रकाशयोजना आणि संकलक भानोदयानं घडवलेलं काही सेकंदांचं दर्शन या घराला `जिवंत' करते... तेही भेसूरपणे... कबरीतल्या ताठर मृतदेहात प्राण भरावा तसे...
 पावसाच्या माऱयातही संध्याकाळचा उजेड क्षीणपणे तगून असताना `कौन' सुरू होतो आणि काळ्याकुट्ट रात्रीत संपतो. या काळात बाह्य परिसरात आणि घरातल्या प्रकाशयोजनेत घडणारे बदल छायालेखक मजहर कामरान यांनी इतक्या सूक्ष्मपणे टिपले आहेत की, सिनेमाची दृश्यात्मक `कंटिन्युईटी' कुठे तुटतच नाही. बंगल्यातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱयांमध्ये काही दिवस, दररोज स्वतंत्रपणे प्रकाशयोजना करून, कथानकातील प्रसंगाची (कदाचित) उलटापालटही करून तुकडय़ा तुकडय़ांमध्ये हे चित्रण झालं असणार, याची शंकाही येणार नाही, असा एकसंध परिणाम आहे या सिनेमाचा. तीच खुबी रामगोपालच्या दृश्यविभागणीत आणि भानोदयाच्या संकलनांतही दिसते. दोन दृश्यांमधले `कट' नजरेनं टिपले तरी आशयाची संगती मात्र प्रेक्षकाच्या मनातच जोडली जाते. आणि दृश्यांपेक्षा जास्त आवाजातूनच जाणवणारा तो संततधार पाऊस त्या तीन पात्रांना भूत-भविष्यापासून तोडून काळाच्या एकाच टकमक टोकावर आणून उभा करतो.
 हीच संगती उर्मिला-मनोज यांच्या अभिनयातून राखली गेली आहे. पहिल्या दोन रिळांमधल्या उर्मिलाच्या शरीरभाषेतून, चेहऱयातून आणि विशेषत: नजरेतून व्यक्त होणाऱया भीतीच्या छटा कॅमेऱयासमोरच्या श्रेष्ठ अभिनयाचा नमुनाच ठराव्या. इथे हे लक्षात घ्यायला हवे की प्रेक्षकापर्यंत पोहोचणारा परिणाम दृश्यविभागणी, संकलन, ध्वनीपरिणाम आणि पार्श्वसंगीतातून गडद झालेला असतो. कॅमेऱयासमोर कलावंत उभा असतो तेव्हा यातलं काहीही नसतं त्याच्या साथीला दिग्दर्शक- कॅमेरामन- क्लॅपरबॉय- लाईट्मन, अशी `गर्दी' असते दृश्यचौकटीबाहेर ती विसरून किंवा तिचं अस्तित्व आपल्या अवकाशातून जाणीवपूर्वक वजा करून सूक्ष्मातिसूक्ष्म छटा दर्शविण ही कलावंताचं पाणी जोखणारी कसोटी आहे. त्या कसोटीला उर्मिला `कौन'च्या अथपासून `इति'पर्यंत उतरते तिच्या आजवरच्या कारकिर्दीतला सर्वेच्च दर्जाचा अभिनयाविष्कार म्हणून `कौन'ची सहजगत्या नोंद होऊ शकेल.
  मनोजनं साकारलेला समीर आपटे हे गुंतागुंतीचं `पात्र' आहे. तो अखंड `इरिटेरिंग' बडबडीतून डोकं उठवतो, मधाळ- बालिश स्वरातल्या आर्जवानी दया उत्पन्न करतो, चटपटीत बोलण्यातून हशेही वसूल करतो, बालिशपणाला चक्रमपणाची जोड देऊन माथेफिरूपणाची भयशंका उत्पन्न करतो, कधी कधी क्रूरकरर्मा भासण्याइतका निर्दय बनतो, आगंतुक सुशांतकुमारवंर कुरघोडी केल्यावर खुनशी होतो आणि बाजी पलटल्यावर अगदी लोळागोळा होऊन जातो. मनोजचा `भिकू म्हात्रे' पाह्यल्यावर `आता यापुढे हा काय करू शकणार यापेक्षा सरस?' अशी शंका आलेल्यांनी `कौन'मधला मनोज आवर्जून पाहायला हवा, हा `तो'च आहे यावर विश्वास बसू नये, अशा सफाईनं त्यानं संपूर्ण देहबोली बदलली आहे. त्याचे कपाळावर आलेले भिजलेले आखूड केस, सफाचट चेहरा, बावळट चष्मा आणि सुटाबुटाचा पेहराच यातूनही त्याचा `कायापालय' हुशारीनं करण्यात आला आहे. हा रुपबदल केवळ वरवरचा राहात नाही तर तो अंगात भिनवून मनोज सर्वर्स्व वेगळा आणि अनुकंप निर्माण करणारा माणूस सामर्थ्यानं साकारतो.
सुशांतकुमारला मनोज- उर्मिला यांच्या तुलनेत कमी फुटेज आहे. त्याची खुरटी दाढी, राकट चेहरा आणि निगरगट्ट भाव ते नेमका कोण आहे, याचा थांगपत्ता त्यानं सांगेपर्यंत लागू देत नाहीत. उर्मिलानं पिस्तूल रोखल्यावर मनोजशेजारी बळजबरीनं बसून त्याचा बालिश खुनशीपणा सहन करताना त्यानं त्रासल्याचा अवघडलेलं भावदर्शन अप्रतिम घडवलंय.
  नवरसांपैकी त्याच त्याच रसाचा चघळचोथा चिवडून हिंदी सिनेमावाल्यांनी बोथट केलेल्या बुद्धीला धार लावण्यासाठी `कौन' पाहणं `मस्ट' आहे. यापुढे स्वत:ला `चित्रपटरसिक', `फिल्म बफ्' वगैरे म्हणवून उजळ माथ्यानं फिरायचं असेल तर `कौन' पाहण्यावाचून गत्यंतर नाही. पैसे देऊन घाबरण्याचा आनंद सिनेमाकडून मिळवायच्या आनंदाच्या एका अनवट पैलूच दर्शन घडवील.

No comments:

Post a Comment