Thursday, December 29, 2011

नाव ज्ञानूबाई... (अशी ज्ञानेश्वरी)


सिनेमातली लहान मुलं नेहमी अशीच का असतात?
 अशीच म्हणजे आगाऊ... आपल्या वयानुरूप न वागता मोठय़ा माणसांसारखं वागणारी, बोलणारी.
  कदाचित मुलांच्या चुणचुणीतपणाबद्दलची आपली (गैर) समजूत याला कारणीभूत असेल. कारण अशी `घडवलेली' ओव्हरस्मार्ट मुलं सिनेबाहेरच्या जगातही भेटतात. अर्थही न कळलेल्या जड शब्दांची पढीक पोपटपंची करून वात आणतात, मोठय़ा माणसांच्या छोटय़ा आकारातलय प्रतिकृती वाटतात... तकलादू आणि खोटय़ाखोटय़ा.
  त्यात `अशी ज्ञानेश्वरी असेल तर विचारायलाच नको. पटकथा-संवाद लेखक प्रताप गंगावणे तिला `ज्ञानियांची राणी'च बनवून टाकतात. दिग्दर्शक एस.एम.रंजन तिच्याकडून बाळबोध अभिनय करवून घेतात आणि या ज्ञानेश्वरीची बेगडी गाथा तयार होते.
  `अशी ज्ञानेश्वरी' हा `नन्हा फरिश्ता'या एकेकाळी खूप गाजलेल्या हिंदी सिनेमाचा मराठी अवतार. त्या सिनेमाशी प्रामाणिक राहून जरी हा सिनेमा बनवला असता, तरी बऱयापैकी सुसह्य ठरू शकला असता. पण मूळ कथाबीजावर उपकथानकांची उतरंड रचून पटकथाकार- दिग्दर्शक यांनी बिचाऱया लहानग्या ज्ञानेश्वरीच्या जीव घुसमटवला आहे.
  ज्ञानेश्वरी (अक्षता नाईक) हिचे वडील अविनाश कुलकर्णी (रमेश भाटकर) हे निवृत्त लष्करी अधिकारी. गावातल्या बबनराव घुगरे पाटील (कुलदीप पवार) या बडय़ा राजकारणी नेत्याचा पर्दाफाश करून त्याच्या भ्रष्टाचाराचे पुरावे न्यायालयात सादर करण्याचा निर्धार अविनाशने केला आहे. संभाव्य संकटातून वाचवण्यासाठी बबनराव तीन गुंडांना पॅरोलवर सोडवून त्यांच्यामार्फत ज्ञानेश्वरीचं अपहरण घडवून आणतो.
  अजय (सुहास पळशीकर), सावळ्या (सयाजी शिंदे) आणि हिंदुराव (नंतू माधव) हे तीन गुंड ज्ञानेश्वरीला एका ओसाड बंगल्यात डांबून ठेवतात. तिचा सुरुवातीला छळ करतात. पण चुणचुणीत ज्ञानेश्वरी या तिघांची मनं जिंकते. त्यांच्यातली माणुसकी जागी करते आणि तिच्या जिवावर उठलेले हे तीन नराधम नंतर जिवावर उदार होऊन तिचे रक्षण करू लागतात.
  सिनेमाच्या नावावरून ही ज्ञानेश्वरीच्या शौर्याची- धैर्याची गाथा आहे, असा भास होतो. पण निम्म्याहून अधिक सिनेमा तिच्या अपहणाव्यतिरिक्तच्या घटनांनी व्यापला आहे. अत्यंत पुस्तकी भाषेतली अविनाशची भ्रष्टाचारविरोधी भाषणबाजी, त्याचे सतत देवघरातच मुक्कामाला असलेले आईवडील, बाहेरून मवाळ, बावळट दिसणारा पण आतून पक्का कावेबाज बबनराव, त्याच्या भानगडी या फाफटपसाऱयाला सिनेमात अवास्तव महत्त्व मिळालं आहे. त्यामुळे सिनेमांचा तोल ढळला आहे.
 त्यातही, एका लहान मुलीची शीर्षक भूमिका असलेला सिनेमा प्रेक्षक सहकुटुंब (विशेषत: लहान मुलांना घेऊन) पाहायला येतो, याचं भान पटकथाकार-दिग्दर्शक यांनी सोडलेलं दिसतं. अन्यथा, बबनरावांची आपल्या सेक्रेटरीच्या बायकोबरोबरची (स्मिता ओक) शारीरिक लगट आणि लैंगिक संबंधसूचक हावभाव त्यांनी इतक्या तपशीलवार दाखवले नसते. सिनेमात ऐन कळसाध्यायाला घुसवलेली लावणीही अशीच वाह्यात. या लावणीच्या शब्द-संगीतापेक्षा नर्तिकेचे अवयव चवीनं टिपत केलेलं चित्रण अधिक आक्षेपार्ह आहे. बालप्रेक्षकांच्या मनावर ते कोणते संस्कार करणार आहे? (सिनेमा या माध्यमानं काही संस्कार करण्याचा मक्ता घेतलेला नाही. हे इथं स्पष्ट करायला हवं. पण, या सिनेमात चिमुकल्या ज्ञानूसकट सगळेजण सतत `संस्कार, संस्कार' अशी बाष्कळ भाषणबाजी करत फिरतात, म्हणून हा विशेष उल्लेख.)
  हे प्रसंग लहान मुलांनी पाहण्यासारखे नाहीत आणि प्रौढ प्रेक्षक (आपल्या वा इतरांच्या) लहान मुलांबरोबर ते धड `एंजॉय' ही करू शकणार नाहीत.
  बरं, या ज्ञानेश्वरीवर तथाकथित सुसंस्कारांचा जो काही मारा सुरू असतो, तो पाहून प्रेक्षक हतबुद्धच होतो. तिचे आई, वडील, आजी, आजोबा, नाच शिकवणारे गुरू ही सगळी मोठी माणसं `जीवन, आयुष्य, धैर्य, शौर्य, त्याग, प्रेरणा' असल्या जडजंबाल शब्दांचा माराच करत असतात. तिचे गुरुजी नृत्य म्हणजे काय, हे अशा भाषेत समजावतात की, आपण करतो तो साधा नाच इतका भयंकर काही तरी आहे, अशा विचारानं एखाद्या मुलीला भोवळच यावी. शाळेत सर्वांसमोर गाणं म्हणायला घाबरणाऱया ज्ञानेश्वरीची भीती घालवण्यासाठी तिचे आजी-आजोबा एकदम पुराणं-इतिहासातल्या शूरवीरांचेच दाखले देतात. आजी तर `तो नंदुरबारचा शिरीषकुमार, त्याचे (`त्यांचं' नाही हां, `त्याचे') हौतात्म्य' अशी आठवण करून देते. पुस्तकी भाषेचा कळस म्हणजे पोलिस आयुक्त एका वाक्यात `अमुक होईल `' आम्ही त्यांना पकडू,' म्हणतात.
  सगळ्यात गंमत म्हणजे एरवी जी भाषा प्रौढांना उमगणं कठीण, ती छोटी ज्ञानू मात्र सहज समजून घेते, तसंच पोक्तासारखं बोलतेही. आई-वडील, आजी-आजोबांनी घेतलेली समाजसुधारणेची जबाबदारी आपल्याही खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरते.
  असं पात्र सिनेमात रेखाटणं हा काही गुन्हा नाही. पण, गुंडांना जिंकून घेण्याचा जो कथाभाग या सिनेमाचा गाभा आहे, तो या `सखाराम गटणे' स्टाईल नायिकेमुळं निष्प्रभ होतो. मुळात रंगपंचमीच्या पिचकाऱया धरल्यासारखे बंदुका धरणारे अज्या आणि कंपनी हे खरतनाक गुंड वाटतच नाहीत. त्यांच्याकडून ज्ञानूचा काही छळ होण्याच्या आतच हिंदुराव तिच्या कथित लाघवीपणामुळे पाघळू लागतो. मग, शाळेतून पळवलेली ज्ञानू (दप्तरातून की काय, देव जाणे) वेगवेगळे मॅचिंग ड्रेस घालून शंकराच्या पिंडीपुढे पूजा करते. तिला आई-वडिलांची आठवण सतावत नाही. हिंदूला डसायच्या तयारीत आलेल्या नागाला ती नमस्कार करते की तो आपोआप जातो. कुणालाही सहजी सापडू नये, अशा ठिकाणी या मुलीला लपवलेलं असावं, अशी आपली समजूत. पण, ज्ञानू गणेशचतुर्थीला थेट गणेशमूर्तीच घेऊन येते. हे लोक घरात मखर मांडतात. दिवाळीत आरास करतात. मिष्टान्न भोजनही करतात. `हे सर्व कोठून येते,' असा प्रश्न आपल्याला पडतो.
  अनेकदा संधी मिळूनही ज्ञानेश्वरी पळून जात नाही. तिचे अपहरणकर्ते तिचे रक्षक बनल्यानंतर तिला तिच्या घरी पोहोचवावं, असं त्यांना वाटत नाही. तिला त्यांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्यावरही ते तिला आई-वडिलांकडे नेऊन सोपवत नाही. तिला कधी घरची फार आठवणही येताना दिसत नाही.
  ज्ञानेश्वरीनंच आपल्याला पकडून दिलंय, असं नाटक करून तिला 50 लाख रुपयांचं बक्षीस हे गुंड मिळवून देतात. ते तिला घरी पोहोचवून जमलं असतंच की ज्ञानू आणि तिचे `काका' यांच्या एकत्र असण्यालाच काही सयुक्तिक कारण नाही आणि त्यांच्या सहवासाचं कथानकही फुलत नाही. सिनेमा काढायचा म्हणजे तर्कबुद्धी बासनात गुंडाळून ठेवायची, अशा समजुतीतून हा सिनेमा तयार झालाय. अतर्क्य सिनेमाही उत्तम मनोरंजन करू शकतो, पण त्यासाठी त्या धाटणीची हाताळणी हवी.
  रमेश भाटकर, सुहास पळशीकर, सयाजी शिंदे, नंदू माधव हे मराठीतले गुणवान कलाकार आपल्या परीनं भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. पण या भूमिकाचं पसरट, त्यात कुणी किती जीव ओतावा? निशिगंधा वाड, स्मिता ओक आणि उषा नाईक सराईत अभिनय करतात. कुलदीप पवारांचा बेरकी खलनायक आणि त्याच्या किडक्या सेक्रेटरी त्यातल्या त्यात लक्ष वेधून घेतात.
  ज्ञानेश्वरीची शीर्षकभूमिका करणारी अक्षता नाईक चुणचुणीत आहे. ती कॅमेऱयासमोर न बुजता वावरते. स्पष्ट उच्चारात संवाद बोलते. पण सभाधीटपणा, पाठांतरकौशल्य आणि स्पष्ट वक्तृत्व म्हणजे अभिनय नाही. हे समजण्याचं तिचं वय नाही आणि तिला कुणी समजावून सांगितलेलं दिसत नाही. ती ठरल्या ठिकाणी उभी राहून वा ठरलेल्या हालचाली करून एका उच्चारशैलीत आपले संवाद म्हणून मोकळी होते आणि पुढचा संवाद जो बोलेल त्याच्याकडे `ब्लॅक' चेहऱयानं पाहात राहते. अभिनयासाठीचा कच्चा माल असलेले तिचे गुण दिग्दर्शकानं पैलू न पाडल्यानं वाया गेले आहेत.
  सुरेश वाडकर यांनी मराठीत प्रथमच दिलेलं सुरेल संगीत हीच या सिनेमाची एकमेव जमेची बाजू आहे. `मी, संसाराचा वारकरी' हे भजन, `हे देशसेवा तुझी प्रार्थना' आणि `गजानना तुझी कृपा' ही गाणी मनात रेंगाळत राहतात.

ना धग, ना आग... नुसतीच राख! (अंगारे)


एखादा सिनेमा किती चुकीच्या वेळी यावा? अगदी ठरवूनही `अंगारे'च्या रिलीजइतका वाईट मुहूर्त मिळवता येणार नाही.
   हा सिनेमा `ऍक्शन' आणि `इमोशन'ची सांगड घालून पाहणारा. हेच करणारा `गुलाम' नुकताच रिलीज होऊन धो धो गल्ला गोळा करून गेलाय.
  `अंगारे'ची पार्श्वभूमी गँगवॉरची. तीच चित्रित करणारा `सत्या' हा `ऑफबीट' असूनही देशभर प्रचंड यशस्वी झालाय आणि `सत्या' पाहिल्यानंतर `अंगारे' पाहणं म्हणजे खऱयाखुऱया भायलोकांनी एखाद्याचा `गेम' केलेला पाहिल्यानंतर गल्लीत गोटय़ा खेळणाऱया पोरांमधली हमरीतुमरी पाहण्यासारखं आहे... एकदम पिळपिळीत.
  गँगवॉरवरच्या सिनेमांमधला `सत्या' हा काही अंतिम शब्द नाही. यापुढे त्याहून प्रत्ययकारी सिनेमा कुणी काढू शकेलही. पण `अंगारे' तसा नाही; कारण, महेश भटची विचारपद्धती पूर्णपणे फिल्मी आहे.
  एकेकाळी स्वत:च्या आणि इतरांच्या अंतरंगांमध्ये डोकावून त्यातून अफलातून चिजा काढून मनोव्यापारांची उलथापालथ दाखविणारे सिनेमे या दिग्दर्शकानं दिले आहेत. पण, हल्ली तो ईझीचेअर विचारवंतांसारखा `ईझीचेअर दिग्दर्शक' झालाय. सिनेमा बनवण्यासाठी तो इकडेतिकडे किंवा स्वत:च्या आतही डोकावत नाही. तो इतर तयार सिनेमेच पाहतो. (तेही बहुधा इतरांचे नव्हे तर स्वत:चेच.) त्यामुळे, `अंगारे'मध्ये सगळी फिल्मी माणसं भेटतात. गँगस्टर, त्यांच्या मारामाऱया, गरीब वस्ती, तिच्यातले लोक आणि त्यांची दु:खं... सगळी तद्दन फिल्मी.
  रॉबिन भट आणि जावेद सिद्दीकी या `ईझीचेअर लेखकां'नी ही मुंबईच्या बदनाम गल्ल्यांमधल्या माणसांची गोष्ट घरबसल्या लिहिली आहे. अक्षयकुमार, नागार्जुन असे (शरीरानं) तगडे नट आणि पूजा भट, सोनाली बेंद्रे या ग्लॅमरस नटय़ांना `गरीब' बनवून स्टुडिओतल्या झोपडपट्टीच्या सेटवर महेश भट पद्धतींचा वेगळा `दिसणारा' खलनायक, त्याचा विचित्र विक्षिप्त घर- कम - अड्डाही आहेच.
  एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर लहानपण घालवलेला अनाथ अमर (अक्षयकुमार) बंगलोरमध्ये पोलिस इन्स्पेक्टर बनतो. मुंबईत बडय़ा मंडळींचा पैशासाठी खात्मा करणाऱया टोळीचा बिमोड करण्यासाठी त्याची खास नेमणूक करण्यात येते. तो इन्स्पेक्टर असल्याचं लपवून या अंडरवर्ल्डच्या काळ्या दुनियेत शिरकाव करतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की हे सगळे त्याचे बालपणीचे जीवश्चकंठश्च मित्रच आहेत. त्यातला राजा (नागार्जुन) हा तर त्याचा जिगरी यार. सूर्या (इरफान कमाल) आणि जग्गूभाई (परेश रावळ) हे मित्र आणि राजाही लाला (गुलशन ग्रोव्हर) या बडय़ा भाईसाठी काम करताहेत. सूर्याची बहीण पूजा (पूजा भट) ही अमरची बालपणापासूनची प्रेयसीही त्याला भेटते.
  अमर आपल्या मित्रांना या काळ्या धंद्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू करतो. पोलिस कमिशनरना तो सांगतो, की ही फक्त प्यादी आहेत. ही विषवल्ली नष्ट करायची असेल, तर फक्त फांद्या मोडून चालणार नाही, मुळावर म्हणजे लालावर धाव घालायला हवा. पुढच्या घटनाक्रमात लालाला अमरचा संशय येऊ लागतो. लालाने आखलेले काही `गेम' फसतात. त्यातून लाला सूर्याची हत्या घडवून आणतो. अखेरीस लालाला संपवून अमर आपल्या उरलेल्या मित्रांना कसा वाचवतो, याची ही गोष्ट.
 गोष्टीत कसलंही नावीन्य नाही आणि दमही नाही. तच गत पटकथेची- संवादांची आणि दिग्दर्शनाची. महेश भटचं त्याच्या शैलीतलं गुन्हेगारी विश्वाचं चित्रण `नाम', `सडक', `सर'च्या काळात वेगळेपणामुळे लक्षवेधी ठरलं होतं. पण, पुढे प्रेक्षक मोठे झाले. गुन्हेगारांच्या पद्धती बदलल्या. भटभाऊ मात्र होते तिथेच (म्हणजे मागे) राहिलेले दिसतात. त्यांचय सिनेमातला `डॉन' अजूनही लांब केस, कपाळाला टिळा, चेहऱयावर विक्षिप्त भाव आणि विचित्र काळे कपडे घालून वावरतो.
  अक्षयकुमारचे जबरदस्त स्टंटसीन आणि संयत अभिनय वगळता `अंगारे'मध्ये कसलीच धग नाही. बहुमजली इमारतीवरून उडी, गच्चीच्या कठडय़ावरून पळत जाऊन घेतलेली झेप, धावत्या मोटीरी, डबलडेकरवर उभे राहणे, असे डेरिंगबाज स्टंटसीन अक्षयकुमारनं स्वत: (डुप्लिकेट न वापरता) केलेले दिसतात. त्याहीपेक्षा त्याच्या भावदर्शनात आणि संवादोच्चारातही कमालीची सुधारणा जाणवते. इतर मंडळींमध्ये चक्क सोनाली बेंद्रे भाव मारून जाते. नागार्जुनच्या प्रेयसीच्या भूमिकेत तिनं ठसकेबाज अदाकारी दाखवली आहे.
  आदेश श्रीवास्तव, अनु मलिक आणि राजू सिंग या तीन संगीतकारांनी मिळून `तनहा, तनहा', `ओ मेहेरबाँ' आणि `आंदे आंदे आंदे 'ही तीनच बरी गाणी दिली आहेत. समीर आर्यसारख्या गुणी छायालेखकाकडून घिसीपिटी कामगिरी करवून घेण्यात भटसाहेब यशस्वी झाले आहेत.
  भटसाहेबांनी लवकरच दिग्दर्शनातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय म्हणे! हा निर्णय (खूपच उशिरा घेतला असला तरी) किती स्तुत्य आहे, ते `अंगारे' पाहिल्यावर पटतं.

Monday, December 26, 2011

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं... (प्यार तो होनाही था)


सिनेमाचं नावच किती वेगळं... `प्यार तो होनाही था' `प्यार किया तो डरना क्या', `प्यार ही प्यार', `जब प्यार किसीसे होता है', `प्यार झुकता नहीं'... सगळीकडे `प्यार' होऊन गेलंय, सिनेमांचा भर नंतरच्या घडामोडींवर.
  `प्यार तो होनाही था' या नावातूनच सिनेमा प्रेमात पडण्याबद्दलचा, प्रेम फुलण्याविषयीचा आहे, हे स्पष्ट होतं.
 सिनेमाचं कथानकही नावाला साजेसं. इथे नायक-नायिका जवळपास सिनेमाभर एकत्र आहेत, पण प्रेमाचा `इकरार' होतो शेवटच्या रिळात, शेवटच्या मिनिटाला. असं होणार हे आपल्याला सिनेमाच्या नावामुळे आणि हिंदी सिनेमे पाहण्याच्या तगडय़ा अनुभवामुळे आधीच ठाऊक असतं. अशाच कथानकावरचे `रोमन हॉलिडे', `चोरी, चोरी', `दिल है के मानता नहीं' आपण पाहिलेले असतात. तरीही `प्यार तो...' आपण शेवटपर्यंत पाहतो आणि जगात अजूनही काही बऱया गोष्टी आहेत, अशा भावनेसह बाहेर पडतो. अशा प्रकारच्या `फील गुड' सिनेमांचं उद्दिष्टच मुळी प्रेक्षकाला ही भावना देण्याचं असतं. ते `प्यार तो...' चोख पूर्ण करतो.
 सिनेमात शेवटी एक मुख्य पात्र असलेला पोलिस इन्स्पेक्टर (ओम पुरी) म्हणतो, `प्रत्येक माणसानं आयुष्यात एकदा तरी प्रेम करावंच. प्रेम माणसाला खूप चांगलं बनवतं.' हे या सिनेमाचं सूत्र आहे, हीच त्याची शिकवण आहे.
 सिनेमा सुरू होतो तेव्हा नायिका संजना (काजोल) आधीच प्रेमात पडलेली आहे. नायकाच्या नव्हे तर राहुल (बिजय आनंद) या भलत्याच माणसाच्या. फ्रान्समध्ये नोकरी करणाऱया, तिथलीच नागरिक असणाऱया संजनाचा राहुलशी वाङनिश्चयही झालाय. अनाथ संजनानं पैसे साठवून एक टुमदार घरही भावी संसारासाठी खरेदी करायचं ठरवलंय.
 पण, तिच्या नशिबात नियतीनं काही वेगळंच वाढून ठेवलंय, याची जाणीव होते राहुल कामानिमित्त भारतात आल्यावर. इथे तो भलत्याच मुलीच्या (कश्मिरा शाह) प्रेमात पडतो, तिच्याशी लग्न करायचा निर्णय घेतो आणि तो संजनाला फोनवरून कळवतोही.
  राहुल आणि त्याच्याशी करायचा संसार यांनी भावविश्व व्यापलेल्या संजनाला हा धक्का सहन होत नाही. ती राहुलला कसंही करून परत मिळवण्याच्या उद्देशानं भारताकडे येणाऱया विमानात बसते. या विमानातच तिची गाठ पडते शेखर (अजय देवगण) या अट्टल चोराशी. तो एका राजकुमारीचा हिऱयांचा हार चोरून भारताकडे निघालाय. विमानात त्यांची ओळख होते आणि फुटकळ भांडणंही. विमानतळावर पोलिसांकडून पकडले जाण्याच्या भीतीनं शेखर तो हार संजनाच्या सामानात दडवतो आणि एका गंमतीशीर प्रवासाची सुरुवात होते.
  संजनाला राहुल परत मिळवायचाय म्हणून ती त्याच्यामागे आणि शेखरला हार परत मिळवायचाय म्हणून तो तिच्यामागे, अशी यात्रा सुरू होते. या यात्रेत (योगायोगानं) दोघे शेखरच्या गावी जातात. तिथे `सरसों'च्या शेतात वसलेल्या शेखरच्या एकत्र कुटुंबाकडून संजनावरही प्रेमाचा, वात्सल्याचा वर्षाव होतो. आपल्या हृद्रोगग्रस्त पुतण्याच्या उपचारासाठी, कर्जामुळे गहाण पडलेली शेतीवाडी सोडविण्यासाठी शेखरनं चोरीचा मार्ग पत्करलाय, हे संजनाला समजतं. ती शेखरची मैत्रीण बनते.
  तोवर शेखरला संजनाबद्दल `वेगळं काही' वाटू लागलेलं असतं; पण ती इथे राहुलला परत मिळवण्यासाठी आलीये, याचं भान ठेवून तो मानतलं प्रेम उघडपणे व्यक्त करत नाही. उलट, तिला तिचं प्रेम मिळवून देण्याचं वचन देतो आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करतो.
  शेखरच्या योजनेनुसार संजना राहुलला जळवण्याचा प्रयत्न करते. आपण शेखरच्या प्रेमात पडलो आहोत, असं राहुलला भासवते. पण, राहुल तिच्याकडे परतेपर्यंत तिला राहुलचा स्वार्थीपणा उमगलेला असतो. तिचं त्याच्यावरचं प्रेम उद्ध्वस्त झालेलं असतं आणि नि:स्वार्थीपणे मदत करणाऱया, तिला जिवापाड जपणाऱया शेखरवर तिचा जीव जडलेला असतो.
  तीही शेखरपाशी प्रेम व्यक्त करू धजत नाही. फ्रान्समध्ये परतण्याची वेळ आल्यावर शेखरला न कळू देता ती आपल्या घरासाठी जमा केलेली रक्कम त्याला मिळेल, अशी व्यवस्था करते. स्वप्न पाहण्याचा, ते उद्ध्वस्त होण्याचं दु:ख भोगल्याचा अनुभव तिला शहाणी करून गेलेला असतो. निदान शेखरचं स्वप्न तरी पूर्ण व्हावं, म्हणून तिनं हा त्याग केलेला असतो.
  शेखरच्या हितचिंतक इन्स्पेक्टरमुळं ऐनवेळी शेखरला संजनाचं प्रेम समजतं आणि विमानतळावर विमान रोखून तो तिला योग्य वेळी अडवतोच, हे काही सांगायला नको.
  मेग रायन आणि केव्हिन क्लाईनच्या `फ्रेंच किस' या हॉलिवूडपटावर लेखक-दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी `प्यार तो...' बेतला आहे. त्याचं भारतीयीकरण करण्याच्या नादात (विशेषत: पूर्वार्धात) त्यांनी सिनेमात काही फुटकळ उपकथानकं आणि असंबद्ध प्रसंगही घुसवलेले आहेत. पिटातला प्रेक्षक गृहीत धरून काही बाष्कळ विनोदही केले आहेत.
  फ्रान्सकडून भारताकडे निघालेल्या विमानात अचानक बिघाड झाल्यावर सहप्रवाशांची भीती घालवण्यासाठी नायकानं गायलेलं समूहगीत हा तर आचरटपणाचा कळसच. (ते सिनेमातून कापून टाकलं तरी काही बिघडणार नाही.) अगदी पुस्तकातल्यासारखं (किंवा `दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधल्यासारखं) शेखरचं घर आणि अगदी साच्यातनं काढलेले आई, वडील, भाऊ, वहिनी, बहीण हे कुटुंबीयही सिनेमात उपरे वाटतात, त्यात शेखरनं आपल्या कुटुंबियांच्या सुखासाठी चोरीचा मार्ग पत्करणं हाही अगदी साचेबंद घटक. शेखर आणि संजना मिळून राहुलला जळवतात, हा भाग तर (त्यातल्या गाण्यासह) अत्यंत बालिश. राहुलला परत मिळवण्यासाठी संजना श्रीमंताची मुलगी असल्याचा बनाव रचते, हेही खूप परंपरागत झालं. शिवाय सिनेमाचा जो भाग भारतात घडतो, असं सिनेमात सांगितलं जात; तो सरळसरळ सेशल्स आणि स्वित्झर्लंडला चित्रीत केलाय... सिनेमा `नेत्रसुखद' करण्यासाठी.
 काढायचे झाले तर या सिनेमात आणखी ढीगभर दोष निघतील. तरीही तो अगदीच टुकार वाटत नाही; कारण या सिनेमात काही गुणही आहेत. आणि गुणदोषांचा मेळ घातला तर तो पाहण्याचा अनुभव जमेच्या बाजूकडे झुकणारा आहे.
  एकतर उपरोल्लेखित प्रसंग बाज्मींनी एखा लयीत हाताळल्यामुळे सराईत प्रेक्षकांच्या ते अगदी अंगावर येत नाहीत. सिनेमाच्या गाभ्याशी प्रामाणिक राहून चित्रित केलेले नायक- नायिकेच्या प्रेमात पडण्याशी संबंधित प्रसंग अतिशय संयत आणि तरल मांडणीमुळे आकर्षक झालेले आहेत. प्रेमात पडल्यावर माणसात जसा चांगुलपणा येतो, तसा प्रेमात पडण्याचं चित्रण करताना बाज्मींमधला उत्तम लेखक-दिग्दर्शक जागा झालाय बहुतेक. विशेषत: आपल्या मनातली राहुलची जागा नकळत शेखरनं घेतलीये, हे संजनाला उमगणं; ते उमगल्यावर होणारी तगमग आणि उलघाल तर बाज्मींनी अप्रतिमच चित्रित केलीये. नायक- नायिकेतल्या हळुवार प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर `थीम म्युझिक'सारखं वाजणारा गिटारचा तुकडाही बाज्मींनी सुरेख वापरून घेतलाय.
  शेखरचं `ऐसाही हूँ मै' हे पालुपद आणि काजोलचा निरागसपणा अधोरेखित करण्यासाठी तिला दिलेली वेंधळेपणाची लकबही लक्षणीय.
  मात्र, या सिनेमाचा हुकुमाचा एक्का आहे. काजोल. सिनेमा शेवटपर्यंत पाहायला भाग पाडते ही बाई! काय जबरदस्त अभिनेत्री आहे ही; आणि किती सहजपणे इतक्या विविधरंगी भावछटांचा कल्लोळ उमटतो तिच्या चेहऱयावर. संपूर्ण सिनेमा केवळ आपल्या लोभस अभिनयाच्या बळावर खेचून नेण्याची किमया काजोलनं पुन्हा एकदा करून दाखवली आहे. इतरांना एखादी भूमिका `जगण्या'साठी जे कष्ट घ्यावे लागतात ते पाहून आपली दमछाक होते.  
ही मुलगी त्या भूमिकेचं व्यक्तिमत्त्व एखाद्या कपडा चढवावा इतक्या सहजतेनं स्वत:मध्ये भिनवून घेते. तिच्यासारखी ए-वन अभिनेत्री बरोबर असल्यानंतर अजय देवगण काहीसा झाकोळून जातो खरा! पण, शेखरच्या भूमिकेत तोही फिट बसतो.
  काजोलबरोबरच्या (विशेषत: हळुवार) प्रसंगांमध्ये तो कुठेही कमी पडत नाही.
  अजय देवगणला `हीन' लेखण्याची हल्ली एक फॅशन आहे. (त्यात अनेक पुरुषप्रेक्षकांना काजोलचा `मित्र' म्हणून त्याच्याबद्दल वाटणारा दुस्वासही अनेकदा मिसळतो.) `काय कळकट्ट दिसतो तो', असं म्हणून `शी।़।़' किंवा `ई।़।़' म्हणणारे हे विसरतात की सिनेमा ही तथाकथित `मदनाच्या पुतळ्यां'ची मक्तेदारी नाही. त्यांच्यासाठी `मॉडेलिंग'ची सिनेमापेक्षाही तकलादू दुनिया आहे. अजय दिसतो कसा यापेक्षा तो अभिनय कसा करतो, हे जास्त महत्त्वाचं असायला हवं. `प्यार तो...'मध्ये तो निगरगट्ट चोर ते हळवा प्रेमिक हा प्रवास व्यवस्थित दाखवतो. बिजय आनंद आणि कश्मिरा शाह यांची पात्रंच लेखकानं दुय्यम करून टाकली आहेत. कश्मिराला शरीरसौष्ठव दाखवण्याचं नेहमीचं काम आहे. ते ती आहे तसं दाखवते. ओम पुरी, टिकू तलसानिया वगैरे बुजुर्ग नट आपापली कामं चोख बजावतात.
  छायालेखक निर्मल जानींना प्रेमकथेसाठी आवश्यक अशी `नेत्रसुखद' छायाचित्रणाची जबाबदारी उत्तम पार पाडली आहे. रेमो आणि जसपिंदर नरुलानं जोशात गायलेलं शीर्षकगीत, `जब किसी की तरफ दिल'हे कुमार सानूचं गाणं, आशाबाइभचं `अजनबी' आणि `आज हे सगाई' हे लग्नगीत ही गाणी किमान थिएटरात तरी श्रवणीय आहेत.
  त्यातही, गीतकार समीरनं `जब किसीकी तरफ `हे गाणं सुरेख लिहिलंय. `जब किसी की तरफ दिल झुकने लगे/ बात आकर जुबांपर रुकने लगे/ आंखोआंखोंमे इकरार होने लगे/ बोल दो अगर तुम्हे प्यार होने लगे' हा मुखडा सोप्या शब्दात सिनेमाचं सार सांगून जातो. `चाहने जब लगे दिल किसी की खुशी/ दिल्लगी ये नहीं ये है दिल की लगी' या अंतऱयाच्या ओळींमधून या सिनेमातल्या प्रेमाची जातकुळी तो सहज मांडून दाखवतो.
  याच गाण्यात एक अंतरा असा आहे... `उसकी खुशबू अगर अपनी साँसोंमे हो/ उसका सपना अगर अपनी आँखोमें हो/ जब ना दिल के बहलने की सूरत लगे/ जब कोई जिंदगी की जरुरत लगे'... असं कुणी खास माणूस आयुष्यात असेल तर `प्यार तो...' अवश्य पाहा.
  `तसं' कुणी नसेल आणि यावंसं वाटत असेल तरी हरकत नाही. कारण, `इट कुड बी युवर लव्ह स्टोरी' असं या सिनेमाचं `ब्रीद' वाक्यच आहे.

मुरली मोहनांची पिचकी सुरावट (बंधन)


पत्नी ही पतीची चरणांची दासी असते. एकदा `डोली'त बसून नवऱयाच्या घरी गेलेल्या मुलीची तिथून `अर्थी'च बाहेर निघावी.
  पती कितीही बदफैली, दुर्जन, नालायक असला तरी पत्नीनं त्याच्या आज्ञेत राहायचं असतं.
    हे विचार तुम्हाला पटतात' तुम्हाला पटत नसेल तरी याच कालबाह्य समजांना कवटाळून बसलेले, उघडपणे छुपेपणे त्यांचं समर्थन आणि पालन करणारे, त्यांना साभिमान `सनातन भारतीय मूल्ये' मानणारेच आपल्या समाजात बहुसंख्येने आहेत, हे तुम्ही मान्य करता? त्यांना त्यांची मूल्ये ठरवण्याचा अधिकार आहे, हे मान्य असेल आणि त्या मूल्यांचं विकृत उदात्तीकरण करून पैसे कमावण्याचं चित्रपटकारांचं स्वातंत्र्यही तुम्ही मनात असाल, तर आणि तरच `बंधन'च्या वाटेला जा.
  कारण कपडय़ांवरून, भाषेवरून हा सिनेमा आधुनिक काळात घडतोय, असा आभास निर्माण होत असला तरी त्यातली मनोवृत्ती आणि विचारपद्धती मध्ययुगीन म्हणावी, इतकी मागासलेली दिसते. इथे एक गरीब घरातली बहीण (आश्विनी भावे) एका श्रीमंत ठाकुराशी (जॅकी श्रॉफ) लग्न करताना आपल्या लहान भावाला (सलमान खान) घेऊन सासरी जाते. मेव्हण्याच्या घरात लहानाचा मोठा झालेला हा राजू त्याचा प्रत्येक शब्द झेलतो, त्याची हरएक आज्ञा पाळतो. शहरात शिकून परतलेली ठाकुरची धाकटी बहीण (रंभा) या राजूची प्रेमिका.
  या हसऱयाखेळत्या घरात आग लावते वैशाली (श्वेता मेनन) ही नौटंकीवाली. आपल्या मादक अदेनं बडय़ाबडय़ा जमीनदारांना घायाळ करून त्यांची संपत्ती बळकावणारी ही नागीण ठाकुरावरही मायाजाल फेकते. त्यात तो फसतो. त्यातून सगळ्या नात्यांची बंधनं तटातट तुटतात. वैशाली, तिची दलाली करणारा तिचा भाऊ (मुकेश ऋषी). आणि तिच्यावर लट्टू होऊन शेवटी तिचे चाकर बनलेले दोन आचरट जमीनदार (अशोक सराफ, शक्ती कपूर) यांच्या षडयंत्रातून प्रेमाचं बंधनं कसं अतूट राहत, याची ही के.मुरली मोहन राव कथित कहाणी.
  के. मुरली मोहन राव हे खरंतर या सिनेमाचे फक्त दिग्दर्शक. पण, कथा-पटकथा यांचं श्रेयच कुणाला न दिल्यानं ही, सगळी मुरली मोहनांच्याच (पिचक्या) बासरीतून उमटलेली सुरावट असावी.
   याआधी `प्रेमकैदी' आणि `अनाडी'सारखे हिट सिनेमे देणाऱया मुरली मोहन यांनी खास मद्रासी कौटुंबिकपटांचा सगळा मालमसाला या कथानकात ठासून भरलाय. भाऊ-बहिणीचं प्रेम, नवरा-बायकोचं प्रेम, पालक-मुलांचं प्रेम, प्रियकर-प्रेयसीचं प्रेम यात आहे. श्वेता मेननची अंगप्रदर्शक, उत्तान नृत्ययुक्त मादक अदा आहे. शिवाय स्वप्नगीतांच्या रेलचेलीत नायिका रंभाच्या अंगप्रत्यंगांचं झटकेबाज दर्शन आहे. सुरुवातीलाच सांगितलेली `मूल्यं' आहेत, त्यांचं उदात्तीकरण करणारे संवाद आहेत. पार्श्वभागांवरच्या लाथा आणि परस्पर निर्भर्त्सनाकारी संवादांमधून फुलणारा गटारी विनोद आहे. हवेत गरगरगरगरगर फिरून आपटणाऱया गुंडांबरोबरच्या नायकांच्या धुमश्चक्री आहेत. मालकाला सलाम करणारा, मानेनं होकार-नकार दर्शवणारा, लॉकअपचं कुलूप लाथा घालून तोडणारा बुद्धिमान इमानी घोडा आहे.
  एरवी या सगळ्या तर्कदुष्ट घटकांची भट्टी जमली तर असले सिनेमे चार घटकांची निर्बुद्ध करमणूक हमखास पुरवतात. पण `बंधन'मध्ये मुरली मोहनांची खिचडी काही धड शिजलेली नाही. मध्यंतरापर्यंत बऱयापैकी सुसह्य वाटणारा `बंधन' उत्तरार्धात मात्र सहनशक्तीचा अंत पाहतो. बंदिस्त पटकथेचा अभाव हे याचं प्रमुख कारण आहे. पत्नी, मेहुणा आणि बहिणीवर अमाप प्रेम करणारा ठाकूर वैशालीसारख्या चंचलेसमोर इतक्या सहजगत्या पाघळतो कसा, हे नीट पटवून देण्यात दिग्दर्शक अपयशी ठरतो. सज्जन माणसाचाही पाय घसरू शकतो, पण तशा प्रसंगानंतर तो सगळं घरदार एखाद्या छम्मकछल्लोच्या नावावर करू देईल, हे काही संभवनीय वाटत नाही. ठाकूरला आपल्या कृत्याबद्दल कुठे पश्चात्ताप झाल्याचंही दिसत नाही. त्याचं हे विसविशीत पात्र भावनिक संघर्षनाटय़ाचा गाभाच भुसभुशीत करून टाकतं.
  तीच गत नायक- नायिकेच्या प्रेमकहाणीची. नायिकेनं दाखवलेल्या राजूच्या सहवासासाठीचा हपापलेपणा तिच्या प्रेमाला ग्राम्य शारीर आकर्षणाच्या बीभत्स पातळीवर आणून ठेवतो. त्यात भार तोकडय़ा मिनीस्कर्टांमध्ये केलेल्या नृत्यगीतांची. दिग्दर्शकाचा स्वप्नगीतांचा हा कवायती साचा `तेरे नैना मेरे नैनोंकी क्यों भाषा बोले' या सुरेख चालीच्या, उत्कट शब्दरचनेच्या गाण्याचं पार मातेरं करून टाकतो.
  सलमान खानचा कमालीचा आत्मविश्वासपूर्ण मोकळा वावर हे `बंधन'चं एकमेव बलस्थान आहे. भाबडा, निरागस राजू सलमाननं झक्क रंगवलाय आणि विनोदाचा उत्तम सेन्सही दाखवलाय. त्याच्या उत्साही वावरामुळेच सिनेमाचा पूर्वार्ध बऱयापैकी मजा आणतो. उत्तरार्धात त्यालाही मळलेली रक्तरंजित वाट चालायला लागते. जॅकी आपली एकांगी भूमिका नेहमीच्या रुबाबात सफाईदारपणे पार पाडतो. श्वेता आणि रंभा यांची जबाबदारी `कायिक' अभिनयाची. ती त्यांच्या काया पार पाडतात. अशोक सराफ आणि शक्ती कपूर यांच्यातला वाह्यातपणाची स्पर्धा शक्ती कपूर जिंकतो पण अशोक सराफ भावदर्शनात बाजी मारतो.
  तीन गीतकार आणि दोन संगीतकार असूनही `बंधन'मध्ये `तेरे नैना मेरे नैनोंकी' वगळता सांगितिक खडखडाटच जाणवतो. `मै दिवानी, मै मस्तानी' हे श्वेतावर चित्रित झालेलं उन्मादक गाणं थोडंफार चालेल ते संगीतेतर आकर्षणांमुळं.
  सलमान किंवा जॅकीचा प्रत्येक सिनेमा आपण पाहिलाच पाहिजे, अशा कट्टर फॅनच्या निष्ठेचं `बंधन' नसेल, तर या बंधनात न अडकलेलंच उत्तम.

नाव Z पण ए-ग्रेड (द मास्क ऑफ झोरो)


एखादी गोष्ट खूप जुनी असल्यामुळं खूप नवी वाटण्याचा अनोखा अनुभव घेतलाय कधी? नसेल तर `द मास्क ऑफ झोरो' आवर्जून पाहा. हॉलिवुडचे सिनेमे विशेषत: ऍक्शनपट म्हणजे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची, संगणकीय दृक्चमत्कृतींची रेलेचल, असं समीकरण रुजलेलं असताना केवळ जिगर आणि तलवारबाजीचं अद्भुत कौशल्य या बळावर दुष्टांचा नि:पात करणारा, तलवारीच्या टोकानं शत्रूच्या कंठमण्यावर `झेड' (z) ही आपली खूण कोरणारा जुनापुराणा झोरो दणक्यात परतलाय. `स्पेशल इफेक्टस्'च्या गदारोळात हा मानवी नायक अगदी नवा आणि हवाहवासा वाटतो.
 या चमत्कारिक नाविन्यपलीकडे सिनेमात फ्रेमभरही नावीन्य तसं सापडायचं नाही. `फॉर्म्युला फिल्म'चे सगळे लोकप्रिय आणि चिरपरिचित घटक `झोरो'मध्ये आहेत. इतके परिचित की `कोलंबिया-ट्रायस्टार'नं हा सिनेमा हिंदीत डब करण्याचे पैसे वाया घालवले आहेत असंच वाटावं. कारण, इंग्रजी सिनेमाच्या वाऱयालाही न उभ्या राहणाऱया कुठल्याही भारतीय प्रेक्षकाला इंग्लिश झोरोही कुठेही न अडखळता सहज समजेल. काय घडतंय, हे तर सोडाच; पण पुढे काय घडणार आहे, हेही तो अचूक सांगू शकेल, असा या सिनेमाचा साचेबद्ध सांगाडा आहे. पण, तरीही हा सिनेमा अथपासून इतिपर्यंत निखळ प्रेक्षणीय आहे, धमाल मनोरंजक आहे, पैसावसूल आहे.
 कमाल आहे की नाही? एक सर्वपरिचित फॉर्म्यलाही किती आकर्षकपणे मांडता येतो, याचा `झोरो' हा आदर्श वस्तुपाठ आहे.
  याचं एक कारण अगदी सरळसोपं आहे. झोरो हा नायकच मुळी अफलातून आहे. 1919 मध्ये जॉन्स्टन मॅकली या पोलिस रिपोर्टरच्या डोक्यातून कागदावर उतरलेला झोरो हा इंग्लंडच्या सुप्रसिद्ध स्कार्लेट पिंपर्नेलचा स्पॅनिश अवतार. मॅकुलीनं स्कार्लेटच्या साहित्यिक व्यक्तिरेखेला वास्तवातल्या काही बदनाम पण सामान्यजनांना `हीरो' वाटलेल्या व्यक्तींच्या व्यक्तितत्वांची जोड देऊन झोरो घडवला. डोळ्यावर काळी पट्टी बांधलेला, काळ्या वेषातला, तिरकी टोपीधारी झोरो नियमानुसार दुष्टांशी लढून सामान्यजनांच्या हिताची काळजी वाहतो. पण, त्याच्याकडे `स्पायडरमॅन' `सुपरमॅन', `बॅटमॅन'सारख्या दैवी शक्ती नाहीत. आहे ती कुशाग्र बुद्धीमत्ता आणि तलवारीवर अद्भुत प्रभुत्व.
  त्याच्या दिलेरी, धाडस आणि शौर्याबरोबरच दोन महत्त्वाची अस्त्रं आहेत... विवेक आणि विनोद. तो खलनायकांचा आसुरी नि:पात करत सुटत नाही; बुद्धी वापरून दुष्टांना हतबल करतो. त्यांची रेवडी उडवतो. गरज पडेल तेव्हाच एखाद्याला कंठस्नान घालतो. त्याचे लढेही इतर महानायकांप्रमाणे `फँटसी'च्या पातळीवरचे नसतात तर भूतलावरचे, सच्चे भासणारे लढे असतात. या गुणांमुळे डग्लस फेअरबँक्सच्या `द मार्क ऑफ झोरो' या मूकपटापासून ऍलन डिलनच्या झोरोपटापर्यंत रजतपटावर झोरोनं कमालीची लोकप्रियता मिळवली.
 स्टीव्हन स्पीलबर्गच्या `अँबलिन'साठी टेड इलियट, टेरी रॉसो, रँडल जॉन्सन आणि जॉन एस्को यांनी `झोरो'चं पुनरुज्जीवन करताना झोरोसारखीच कुशाग्र बुद्धीमत्ता दाखवली आहे. त्यांनी `झोरो' हा निव्वळ ऍक्शनपट बनवलेला नाही. एखाद्या भव्य ऑपेरासारखी लय असलेला, प्रणय, साहस, प्रेम, वात्सल, द्वेष, अन्याय आणि अन्यायाविरुद्धचा लढा यांचा विलक्षण संयोग साधणारा भव्यपट लिहीलाय.
  एकेकाळी स्पॅनिश वसाहत असणाऱया मेक्सिकोनं स्पेनच्या जुलुमी राजवटीपासून स्वातंत्र मिळवण्यासाठी दिलेल्या कडव्या लढय़ाची पार्श्वभूमी या `झोरो'ला आहे. हा `झोरो' आहे डॉन डिएगो ड ला व्हेगा (अँथनी हॉपकिन्स) हा मध्यमवयीन सरदार. तो अल्टा कॅलिफोर्नियाचा स्पॅनिश गव्हर्नर डॉन राफाएल मॉन्टेरो (स्टुअर्ट विल्सन) याच्याशी लढा देतोय.
  सिनेमा सुरू होतो तेव्हा हा लढा यशस्वी होऊन स्पेनची राजवट संपुष्टात येण्याची घटना जवळ आलेली असते. जाताजाता तीन निरपराध शेतकऱयांना फासावर लटकावून `निषेध' नोंदवण्याचा मॉन्टेरोचा मनसुबा झोरो आपल्या `क्लासिक' शैलीत उधळतो. त्या धुमश्चक्रीत दोन किशोरवयीन पोरं `झोरो'चा जीव वाचवतात.
  या अपमानाचा बदला मॉन्टेरो लगेचच घेतो. तो डॉन डिएगोच्या महालावर छापा मारून डॉन डिएगोच झोरो होता हे पुराव्यानिशी सिद्ध करतो. मॉन्टेरोला एकेकाळी खूप आवडणारी एस्पेरान्झा) ज्युलिएट रोझेन) ही डिएगोची बायको असल्यानं मॉन्टेरोची खुन्नस जुनीच आहे. डिएगोला मारण्याच्या प्रयत्नात मॉन्टेरोच्या हातून एस्पेरान्झाच मरते. तो डॉनला कैदेत टाकून त्याची पाळण्यातली मुलगी एलेना हिला पळवून नेतो.
  डिएगोच्या तुरुंगवासाला 20 वर्षे पूर्ण होत असताना मॉन्टेरो पुन्हा कॅलिफोर्नियाला परततो. इतर जमीनदार डॉन्सच्या साह्यानं मेक्सिकोचा अध्यक्ष जनरल सांता ऍना याच्याकडून समृद्ध कॅलिफोर्निया `खरेदी' करण्याचा त्याचा डाव आहे. तो उधळून लावण्यासाठी म्हातारा डिएगो कैदेतून धाडसानं सुटका करून घेतो. पण वयानं वाढलेला, शरीरानं थकलेला डिएगो हे काम आपल्या आवाक्यातलं नाही, हे ओळखतो. मॉन्टेरोचा नि:पात करायला पुन्हा एकदा `झोरो'चाच अवतार व्हायला हवा, हे त्याला उमगतं.
  अशा वेळी त्याला भेटतो अलेजांड्रो म्युरिएटा (ऍन्टोनिओ बॅन्डेरास) हा भुरटा चोर. हा चोर म्हणजे `झोरो'च्या शेवटच्या साहसात त्याचा प्राण वाचवणाऱया दोन भावांपैकी एक भाऊ. तलवारबाजीचा गंधही नसलेल्या अलेजांड्रोकडे तारुण्याची ताकद, त्वेष, बुद्धिमत्ता, जिगर आणि सख्ख्या भावाला कपटानं मारणाऱया राज्यकर्त्यांबद्दलचा तिरस्कार हे गुण असतात. भडक-तापट स्वभाव आणि रांगडा-खेडवळ बाज हे त्याचे दोष. त्याला प्रशिक्षण देऊन `झोरो' बनवण्याची योजना डिएगो आखतो. `झोरो'चा किताब पेलण्याची पात्रता त्याच्यात निर्माण केल्यावर नकली डॉन बनवून त्याला तो मॉन्टेरोच्या गोतावळ्यात घुसवतो. डिएगोची आता तरूण झालेली सुंदर मुलगी एलेना (कॅथरिन झेटा-जोन्स) अलेजांड्राच्या प्रेमात पडते. कॅलिफोर्निया खरेदीसाठी मेक्सिकोच्याच भूमीवर सोन्याच्या बेकायदा खाणी काढून वेठबिगारांकरवी सोन्याच्या राशी गोळा करणाऱया मॉन्टेरोचा नवा `झोरो' कसा नि:पात करतो, याची कथा म्हणजे `द मास्क ऑफ झोरो.'
  झोरो या काल्पनिक नायकाला ऐतिहासिक वास्तवाशी हलकीशी डूब देऊन पटकथाकारांनी संघर्षाला अस्सल छटा दिली आहे. नवा झोरो घडवण्याच्या प्रक्रियेत एका गावंढळ मावळ्याचा `शिवाजी' बनण्यापर्यंतचा प्रवासही प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखणारा. त्यांच्यात बाप-लेकाच्या नात्यासारखं गंमतीदार भावुक आणि कठोर नातंही आपसूक निर्माण होत जातं. मादक सौंदर्य आणि तीक्ष्ण बुद्धी यांचा संगम असलेली एलेना आणि रांगडा अलेजांड्रो यांच्यातलं आवेगी झटापटीचं प्रेमही त्यांच्यातल्या `क्लास डिफरन्स'मुळं प्रेक्षकाला चटकन भावतं. अलेजांड्रो हा `झोरो'चा जीव वाचवणारा मुलगाच निघणं, एलेनाला डिएगोचा आवाज परिचयाचा भासणं वगैरे योगायोग फॉर्म्युल्याची चौकट भक्कम करतात. मॉन्टेरोलाच बाप समजणारी एलेना आणि तिला आपली ओळख न देऊ शकणारा असहाय्य डिएगो हे तर मनमोहन देसाइभच्या सिनेमातलेच वाटावे, इतके `युनिव्हर्सल.'
 या सगळ्या मसाल्याला `गोल्डन आय'फेम दिग्दर्शक मार्टिन कॅम्पबेलनं सफाईदार आणि कल्पक दिग्दर्शनाची खमंग फोडणी दिली आहे. `झोरो'च्या `एन्ट्री'तच त्याचं श्रेष्ठत्व निर्विवादपणे प्रस्थापित करणारा साहसप्रसंग त्यानं ग्रेटच चित्रित केलाय. अक्षरश: एखादं नृत्य सादर होतो आणि मॉन्टेरोचं नाक कापून (लाक्षणिक अर्थानं) झोरो आपल्या देखण्या अश्वावर विराजमान होऊन गढीच्या बुरुजावर ढळत्या सूर्यबिंबासमोर अश्वारूढ सलामी देतो तेव्हाच दिग्दर्शक प्रेक्षकांचा संपूर्ण ताबा घेतो. एलेना आणि अलेजांड्रो याचं कमालीचं सेन्शुअस, आक्रमक फ्लॅमेन्को नृत्यही बहारदार वठलंय. मॉन्टेरोच्या महालातून महत्त्वाचा नकाशा लंपास करून पळणाऱया अलेजांड्रोला एलेना घोडय़ांच्या पागेत गाठते. तिथे त्यांच्यातल्या लुटूपुटीच्या तलवारद्वंद्वात तिचा एकेक कपडा चिरून देहावेगळा होत जातो आणि या प्रसंगाच्या अंती ती त्याच्या मिठीत विसावते हा प्रसंग तर ऍक्शन, विनोद आणि प्रणयाची टेसदार सांगड घालतो. झोरोपटांमध्ये यादगार `क्लासिक' म्हणून गणला जाईल, अशा वकुबाचा हा प्रसंग आहे.
  ऍक्शनबरोबरच भावनाटय़ालाही समान महत्त्व देणाऱया कॅम्पबेलनं ऍक्शनचे प्रसंग `उरकलेले' नाहीत. त्यातली तलवारबाजी, झेपा, उडय़ा, मुष्टीप्रहार यांची `कोरिओग्राफी'च करून घेतली आहे. काही प्रसंगांना अभावितपणे घडणाऱया विनोदाची चपखल जोडही दिली आहे. नव्या झोरोचा नाठाळ घोडा हे पडद्यावरच पाहावं असं अस्सल विनोदी पात्र. झोरोचीही जिरवणारा हा घोडा झोरोमधला माणूस दर्शवतो.
 अँथनी हॉपकिन्स आणि अँटोनिओ बॅन्डेरास या नायकांचं सादरीकरणही कॅम्पबेलची कल्पकता दाखवून जातं. हॉपकिन्स आधी दिसतो `झोरो'च्या वेशात. मग घरात सरदाराच्या जाम्यानिम्यात. म्हाताऱया हॉपकिन्सचा चेहरा सुरुवातीला दाढीमिशांच्या जंजाळात हरवलेला असतो. नंतर त्यातली `झोरो'कट मिशी शिल्लक राहते. तिलाही चाट बसून शेवटी प्रेक्षकांना परिचित हॉपकिन्सचा चेहरा दिसतो. बॅन्डेरासही सुरुवातीला गलिच्छ कपडय़ांमध्ये दाढीमिशा वाढवलेल्या रुपात भेटतो तेव्हा फारच किरकोळ भासतो. नकली डॉन बनल्यावर तो तत्कालीन फॅशनची मिशी राखतो. झोरोच्या रुपात मिशीही गायब होतो तेव्हा तो राजबिंडा, ताकदवान `झोरो' दिसू लागतो. या साध्या भासणाऱया रंगभूषा-वेशभूषेतल्या बारकाव्यांचाही ही दोन पात्रं उभी राहण्यात मोठा हातभार लागतो.
 रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन आणि छायालेखनातून एक काळ यथातथ्य उभा करणाऱया `झोरो'ची ताकद जबरदस्त अभिनयानं दुणावली आहे. अँथनी हॉपकिन्स असल्या मसालापटात काय करताहेत, असा प्रश्न पडणाऱयानं त्यांचा डिएगो पाहायलाच हवा. जातिवंत अभिनेता अभिनयाच्या विविध शैली आत्मसात करून पठडीबाज भूमिकाही किती ताकदीनं साकारतो, याचं डिएगो हे उदाहरण आहे. हॉपकिन्स यांच्यामुळे डिएगोच्या भूमिकेला आवश्यक राजबिंड रुप, मर्दानी शरीर, चपळ हालचाली आणि उत्तम विनोदबुद्धीची मागणी ऍन्टोनिओ बॅन्डेरास शंभर टक्के पूर्ण करतो हॉपकिन्सच्या बरोबरीनं उभा राहतो. मॉन्टेरो साकारणारा स्टुअर्ट विल्सनही खास शैलीबाज व्हिलन झोकात साकारतो. एलेना साकारणारी कॅथरिन झेटा-जोन्स पदार्पणातच लक्ष वेधून घेते. आपल्या झीनत अमानची आठवण करून देणारी चेहरेपट्टी लाभलेली कॅथरिन म्हणजे मादकता आणि बुद्धिमत्ता यांचं विलक्षण आकर्षक रसायन आहे.
  `द मास्क ऑफ झोरो' हा उच्च दर्जाच्या निखळ मनोरंजनासाठी आचवलेल्या प्रेक्षकांकरता `मस्ट सी' सिनेमा आहे. हिंदी सिनेमाच्या () प्रेक्षकांनीही मूळ इंग्लिश `झोरो'सुद्धा बिनधास्तपणे पाहावा कारण, हा सिनेमा ना इंग्लिश भाषेत आहे ना हिंदी. तो जगाच्या पाठीवरच्या यच्चयावत मनुष्यमात्रांना समजणाऱया सिनेमाच्या भाषेतला सिनेमा आहे.