Sunday, March 6, 2011

फिल्म- ए- आझम (मुघल-ए-आझम)



चव्वेचाळीस वर्षापूर्वी मुघल-ए-आझमचा प्रिमिअर मुंबईत, मराठा मंदिरमध्ये झाला होता, त्या दिवशी, ‘फर्स्ट डे फर्स्ट शोच्याही आधीच, पुढच्या सात आठवडय़ांचे सगळेच्या सगळे खेळ अ‍ॅडव्हान्समध्ये हाऊसफुल्ल होते.. तो प्रदिर्शित झालेल्या प्रत्येक थिएटरात सगळे खेळ सलग तीन वर्ष अखंड चालते.. हा विक्रम आजवर मोडला गेलेला नाही..
..११ वर्षाच्या निर्मितीकाळात आणि पुढच्या ४४ वर्षाच्या प्रथमायुष्यात या सिनेमाशी जेवढय़ा सुरस कथा, दंतकथा जोडल्या गेल्या, तेवढय़ा खचितच दुस-या कुठल्या सिनेमाशी जोडल्या गेल्या असतील..
.. आणि म्हणूनच रंगीत स्वरुपात पुनर्जन्म होण्याचं, दुस-यांदा शाही प्रिमिअरकेला जाण्याचं भाग्यही भारतवर्षात पहिल्यांदा लाभलं ते मुघल-ए-आझमलाच..
.. आणि आता..
 ..आताही थिएटरांबाहेर ब्लॅकवाल्यांचा पुकारा सुरू असतो, ‘पचहत्तर का डेढ सौ, सौ का तीन सौ’.. सुटीच्या दिवशी एक तिकीट पाचशे रुपयांनाही विकलं जातं.. ऐन दिवाळीत, नव्याकोऱ्या करकरीत सिनेमांच्या बरोबरीनं तो शाही थाटात उतरलाय आणि इतरांच्या दशांगुळे वर उरलाय..
..आजही थिएटरांत जाऊन पाहा..
..संगमरवरी पुतळ्याच्या रुपात एन्ट्री घेतलेली मधुबाला जेव्हा मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रेमध्ये नितळ, आरसपानी रुपात प्रथमदर्शन देते, तेव्हा ऐश्वर्या, करीना, प्रीटी, रानीच्या जमान्यातलं पब्लिक मॅड होऊन शिटय़ांनी थिएटर दुमदुमवून टाकतं.. आजच्या निकषांवर अंमळ स्थूलच भासणारी मधुबाला पाठ फिरवून गजगामिनीच्या ऐटीत तालावर ठुमकत नुस्ती चालत पुढे जाते, तेव्हा थिएटरमध्ये सुस्कारे सुटतात..
..राजपुत्र सलीमनं अनारकलीच्या, एका य:कश्चित कनीजच्या मोहात अडकणं खरतनाक ठरेल, असा इशारा त्याचा मित्र त्याला देतो; तेव्हा अनारकलीची मैत्रीण सुरय्या त्या मित्राला खटय़ाळपणे सांगते, ‘मुहब्बत कीजीएगा.. सारा डर निकल जाएगा’.. तेव्हा थिएटरात हशाच्या लाटा फुटतात..
..सलीमवर एकतर्फी प्रेम करणारी बहार अनारकलीबरोबर कव्वालीचा मुकाबला घडवून आणते.. त्याचा निकाल देताना सलीम गुलाबाचं फूल बहारला देतो आणि काटे अनारकलीला. तेव्हा ती शांतपणे म्हणते, ‘काँटो को मुरझाने का खौफ नही रहता..या लाजवाब जवाबावर फिदा झालेलं पब्लिक टाळ्यांचा कडकडाट करतं..
..प्रेमाखातर मरण पत्करलेली अनारकली केवळ सलीमचं वचन खोटं ठरू नये म्हणून अंतिम इच्छा व्यक्त करते ती मलिकाबनण्याची! उपकार केल्याच्या थाटात ही इच्छा पूर्ण करण्याचं वचन अकबर देतो, तेव्हा ती तेजस्विनी उत्तरते, ‘शहंशाहच्या दानशूरतेच्या बदल्यात मी मोहम्मद जलालुद्दीन अकबरला माझा खून माफ करते’.. आणि सगळं थिएटर थरारून जातं..
..प्रजाहितापुढे हतबल झालेला न्यायी अकबर बादशाह, प्रेमापुढे कशाचीच मातब्बरी न मानणारा अधीर, अविचारी सलीम आणि प्रेमाची अखेर कशात होणार आहे, याची पुरेपूर कल्पना असताना त्यात झोकून देणारी, जळता जळता या दोन बाप्यांना काळवंडवत लख्ख उजळून निघणारी अनारकली यांच्यातल्या ताण्याबाण्यांचं समर्थ घडवणारा हा सिनेमा एका टप्प्यावर या घुसळणीचं दिलवाले व्हर्सेस दौलतवालेअसं ढोबळ विश्लेषण करतो, ‘ऐ मोहब्बत झिंदाबादसारख्या खोटय़ा गाण्यात गुरफटतो आणि सलीम- अनारकली यांची कायमची ताटातूट घडवण्यासाठी विस्मरणाचं फूल हुंगवण्याची फिल्मी क्लृप्ती शोधतो.. तेव्हा सगळं थिएटर आजही अवाक् होतंच.. (आणि अकबराकडे कशाचाही कायमचा विसर पाडणारं गुंगीचं ओषध होतंच, तर मग सलीम आणि अनारकलीला पहिल्याछुटच डोस देऊन टाकायचा. रंगेल सलीमसाठी तर डेली डोसही ठरवून ठेवता आला असता) .. 
मुद्दा असा की तब्बल ४४ वर्षानंतरही हे सगळं जसंच्या तसं होतंय.. हा महासिनेमा, ‘फिल्म-ए-आझम४४ वर्षानंतरही म्हाताराझालेला नाही.. हा चमत्कारच आहे.. तो घडवलाय त्याच्या रंगीत आवृत्तीनं. हेच त्याचं आजघडीचं प्रमुख आकर्षण आहे. पण, ‘ब्लॅक अँड व्हाइटची ती जादू या रंगांमध्ये विरून तर गेली नाही ना, अशी श्ों को अनेकांना आहे. त्यांना इतकंच सांगता येईल की, रंगांनी मुघल.. चा बेरंग केलेला नाही. 
कारण के. आसिफनी तो कृष्णधवल बनवला, ते केवळ रंगीत सिनेमाचं खात्रीशीर तंत्र तेव्हा उपलब्ध नव्हतं म्हणून. त्यांनी आणि त्यांच्या तंत्रज्ञांनी कृष्णधवल छायालेखनाचं, फक्त त्याच रंगसंगतीत खुलून येईल असं तंत्र वापरलेलं नव्हतं. (प्यासारंगीत करणं कसं फसेल, किंवा प्रकाशाच्या शलाकेनं अंधार घोळवणारं वक्त ने किया क्या हँसी सितमहे अजरामर गाणं रंगीतकसं होऊच शकत नाही, याचा विचार करून पाहा.) 
मुघल-ए-आझमच्या मूळ स्वरुपातच तो रंगीतहोण्याच्या सगळ्या शक्यता होत्या. (प्यार किया तोहे पहिल्यापासून रंगीतच असलेलं गाणं आठवा.) आणि मुघल-ए-आझमच्या चित्रिकरणाच्या वेळी जे रंग होते, तेच आपण फक्त प्रकटकेले आहेत, असा हा सिनेमा रंगवणाऱ्यांचादावा आहेच.
मूळ मुघल-ए-आझमच्या चाहत्यांचा खरो रोष ओढवेल, तो मुहब्बत की झूठी कहानी पे रोये’, ‘हमे काश तुमसे मुहब्बत ना होती’, ‘बेकस पे करम किजिये’, ‘ये दिल की लगीही गाणीच सिनेमातून कटाप करण्यात आल्याबद्दल. या गाण्याशिवाय सिनेमाला अर्थच काय, अशीच भावना असेल, तर ती (पैसे देऊन) दुखावून कशाला घ्या! पहिल्यांदाच सिनेमा पाहणाऱ्याच्या दृष्टीनं मात्र त्यानं कथानकाच्या ओघात फरक पडत नाही. 
भव्य, नेत्रदीपक आणि भावना उचंबळवून टाकणारं काहीतरी वेगळ्याच जगातलं पाहतो आहोत, असा अननुभूत आनंद त्याला लाभतो. मुघल-ए-आझमसाठी के. आसिफनी किती आणि कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला, याच्या कथा आजही चवीनं चघळल्या जातात. पण, पैसा तर काय, भरतभाई शाह पण खर्च करतातच की! आणि (पोकळ) भव्यतेत तरी आजचा सिनेमा कुठे मागे आहे? (उपऱ्या भव्यतेचा बडजात्यापट, चोप्रापट, जोहरपटही आठवायला हरकत नाही.) त्यामुळे खर्च हे काही के. आसिफचं धाडस नाही. 
उडत्या चालींना सोकावलेल्या प्रेक्षकाला डायरेक्ट बडे गुलाम अली खाँची प्रेमजोगन बन केही अव्वल शास्त्रीय चीज (तीही भरभक्कम) ऐकायला लावण्याची मिजास केली होती या माणसानं.. हे त्याचं खरं धाडसं.. आणि आजचा रिमिक्सपोषित प्रेक्षकही मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्यातला अस्फुट पण दाहक, ‘क्लासिकश्रंगार पाहताना ती चीज त्याच्याही नकळत भोगतोच!.. मुघलकाळाचं राजेशाही ऐश्वर्य आणि कलात्मक समृद्धी दर्शवणारा माहौल, एका दंतकथेतलं नाटय़ आणि काव्य अचूक पकडणारी चुस्त पटकथा, उर्दू भाषेची सारी नजाकत आणि श्रीमंती एकवटलेले, फटाक्यांच्या माळेसारखे फुटून मनावर कोरले जाणारे संवाद, आजच्या काळात लाऊड भासणारा, पण सिनेमाच्या भरजरी पोताला साजेसा अभिनय आणि या सगळ्यावर साक्षात जगन्नियंत्यासारखी पकड ठेवणारं दिग्दर्शन.. या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर नवा मुघल-ए-आझमचुकवून चालायचं नाही..
..मात्र, तो थिएटरातच जाऊन अनुभवायला हवा.. रंगीत मुघल-ए-आझमची सीडी चोरबाजारात आली की बघूच, असा भुरटा विचार तुमच्या मनात आला असेल, तर परमेश्वर ते महान स्वप्न पाहणाऱ्या के. आसिफच्या आत्माला शांती देवो..
..आणि तुम्हाला..?
.. तुम्हाला आत्माच नाही, हे तर आत्ताच सिद्ध केलंयत तुम्ही..

(महाराष्ट्र टाइम्स)

4 comments:

  1. या 'बुट्टेदार' लेखासमोर नंतर आलेले 'मुगले आझम'वरचे सगळे लेख म्हणजे प्लास्टिक जरीची भगभगीत, ढोबळ नक्षी असल्यासारखे वाटतात....!! :-)))

    Mithila Subhash

    ReplyDelete