बंगालची एकेकाळची चित्रपटसम्राज्ञी सुचित्रा सेन हिच्याविषयी
ब्रिटिश चित्रपट समीक्षक डेरेक माल्कम यांनी लिहिलं होतं, ‘काही लोकांनी तिच्या कमालीच्या घरंदाज सौंदर्यामुळे तिला भारताची ग्रेटा गार्बो
अशी उपाधी दिली होती.’ खरंतर या दोघींमध्ये तेवढंच साम्य नव्हतं,
स्वीडनमध्ये जन्मलेल्या ग्रेटा गार्बोप्रमाणेच सुचित्राभोवतीही कायम
गूढ वलय राहिलं, हे त्याचं कारण होतं. ग्रेटाने
एकेकाळी हॉलिवुडवर राज्य केलं होतं, सुचित्राही १९५०च्या दशकापासून
तीन दशकं बंगाली सिनेमाची सम्राज्ञी होती आणि ग्रेटाप्रमाणेच तिनेही अखेरच्या दिवसांत
स्वत:ला लोकांच्या नजरांपासून दूर केलं. दोघींचं जराजर्जर रूप दृष्टीस न पडल्याने चाहत्यांच्या मनावर दोघींचीही चिरतरूण
प्रतिमाच कायमस्वरूपी कोरली गेली आहे.
‘ग्रेटा गार्बो’
१९४१ साली एक टीकात्मक परीक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर गार्बोने चंदेरी पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि प्रेक्षकांना धक्काच बसला. सुचित्राने अभिनय केलेल्या ६० चित्रपटांपैकी २२ ब्लॉकबस्टर हिट होते आणि डझनभर सिनेमे सुपरहिट होते. १९७८ साली तिचा ‘प्रणयपाशा’ हा सिनेमा फ्लॉप झाला आणि एवढ्या देदीप्यमान कारकीर्दीनंतर तिने एवढ्याशा निमित्ताने सगळ्या फिल्मी जीवनातूनच निवृत्ती पत्करली. ती नवे सिनेमे स्वीकारेनाशी झाली, लोकांना खासगीत किंवा सार्वजनिक समारंभात भेटणं तिने बंद करून टाकलं होतं. देव आनंदने तिच्याबरोबर ‘बंबई का बाबू’सह काही सिनेमांमध्ये काम केलं होतं, आपल्या आत्मचरित्रात त्याने तिचं वर्णन ‘हरीणाक्षी’ असं केलं होतं. त्याने तिच्या या संन्यासानंतर कोलकात्यात तिच्या घरी तिला भेटण्याचा प्रयत्न केला. त्याने लिहिलंय, ‘मी तिला भेटायचा प्रयत्न केला. पण, ती आता कुणालाही भेटत नाही, असं सांगून लोकांनी मला परावृत्त केलं. काही काळाने मीही तो नाद सोडला’
सर्वश्रेष्ठ ‘पारो’
शरतचंद्रांच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित ‘देवदास’पटांमधली ती सर्वात संस्मरणीय ‘पारो’ होती. दिलीप कुमारच्या
‘देवदास’ची पारो. संजय लीला
भन्साळीपर्यंत अनेकांनी या साहित्यकृतीवर पुन:पुन्हा चित्रपट
निर्माण केले असले तरी ‘देवदास’च्या सर्व
आवृत्त्यांमधली ती सर्वश्रेष्ठ पारो होती. तिच्या हिंदी सिनेमांची
संख्या फारशी नाही. पण, ज्या काही मोजक्या
हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं, त्यांत तिने लक्षवेधी कामगिरी
केली. त्या काळातल्या सर्व उत्तम हिंदी अभिनेत्यांबरोबर तिने
भूमिका साकारल्या. दिलीप कुमार आणि देव आनंद यांच्याव्यतिरिक्त
तिने गुलजार-दिग्दर्शित ‘आँधी’मध्ये संजीव कुमारबरोबर काम केलं. ती भूमिका इंदिरा गांधींवर
बेतलेली असल्याच्या समजुतीमुळे हा सिनेमा भलताच वादग्रस्त ठरला होता. धर्मेंद्रबरोबर तिने ‘ममता’मध्ये
काम केलं. पण, हिंदीमध्ये ती अवघडलेली दिसायची,
बंगाली सिनेमांमध्येच ती कमालीच्या सहजतेने वावरायची. तिने साकारलेल्या भूमिकांमधलं वैविध्य अफाट आहे. जिवंतपणीच
दंतकथा बनलेला बंगालचा सुपरस्टार उत्तम कुमार याच्याबरोबर तिने ३० चित्रपटांमध्ये भूमिका
साकारल्या आणि ती बंगालची ‘रोमँटिक डार्लिंग’ बनली.
‘सप्तपदी’मध्ये या दोघांची मोटरसायकलवरची
अवखळ, उत्फुल्ल सवारी कोण विसरू शकेल? ‘हरानो सुर’ या सिनेमात सुचित्राने साकारलेली सायकियाट्रिस्ट
उत्तम कुमारची हरवलेली स्मृती परत आणते. त्या सिनेमातली ‘तुमी जे आमार’ या गाण्याची झपाटून टाकणारी धुनही विसरता
येणारी नाही. ‘देवदास’बरोबरच सुचित्राने
शरद्चंद्रांच्या किमान तीन साहित्यकृतींमध्ये भूमिका साकारल्या. ‘राजलक्ष्मी ओ श्रीकांता,’ ‘कमललता’ आणि ‘गृहदाह’- तिन्हीमध्ये नायक
होता उत्तम कुमार. ‘गृहदाह’ ही एक् गुंतागुंतीची
प्रेमत्रिकोणकथा होती, त्यात दुसरा नायक होता हिंदी चित्रपटसृष्टी
गाजवलेला प्रदीप कुमार.
सुचित्रा-उत्तम जोडी
अग्निपरीक्षा, हारानो सुर,
पाथे होलो देरी, इंद्राणी, सबर उपोरे, सूर्यतोरण, शारे चुआत्तोर,
सदानंदेर मेला, जीबोनतृष्णा, एकटी रात, चावा पावा, बिपाशा,
नबोराग, त्रिजामा, हर माना
हर, आलो आमार आलो, ‘ओरा ठाके ओधारे,
गृहप्रबेश हे उत्तम-सुचित्रा जोडीचे काही प्रमुख
सिनेमे. यांत सिनेमाचे सर्व प्रकार होते, विनोदी सिनेमे होते, गंभीर सिनेमे होते, भडक मेलोड्रामापटही होते. मात्र, या सगळ्या सिनेमांची कथानकं समकालीन मध्यमवर्गीय बंगाली समाजात घडणारी होती
आणि सगळयाच सिनेमांमध्ये या जोडीची प्रणयरम्य प्रेमगाथा असायचीच. वास्तव आणि प्रणयरम्य कल्पित यांच्या मधुर मेळामुळे हे सिनेमे एवढे प्रचंड
लोकप्रिय झाले होते.
सप्तपदी
‘सप्तपदी’ या सिनेमाचीच कथा
पाहा. ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतरच्या कोलकात्यात घडणाऱ्या
या गोष्टीच्या केंद्रस्थानी होतं एक अँग्लो इंडियन कुटुंब. हे
तेव्हाचं बंगाली वास्तव होतं. या सिनेमात उत्तम आणि सुचित्रा
हे दोघेही मेडिकलचे विद्यार्थी दाखवले आहेत. सुचित्रा ही श्रीमंत
अँग्लो-इंडियन कुटुंबातली मुलगी आणि उत्तम कुमारने साकारलेला
कृष्णेंदू हा मध्यमवर्गीय हिंदू मुलगा यांच्यातली ही प्रेमकहाणी आपोआपच वर्गसंघर्षाची
कहाणी बनते. हे दोघे जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा तेव्हा
भांडतात आणि सुचित्राने साकारलेली रिना ब्राऊन नेहमी सरंजामी तोरा दाखवत राहते.
मात्र, कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘ऑथेल्लो’च्या प्रयोगात कृष्णेंदू ऑथेल्लो साकारतो आणि
रिना डेस्डिमोना साकारते, तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.
(चित्रपटात डेस्डिमोनाच्या मृत्यूचा नाटकातला जवळपास आठ मिनिटांचा प्रसंग
चित्रित करण्यात आला आहे. त्यात या जोडीने कायिक अभिनयाची कमाल
केली आहे, मात्र, या दोघांना इंग्रजीत
‘प्लेबॅक’ दिला गेला आहे. डेस्डिमोनाचे संवाद जेनिफर कपूरच्या आवाजात आहेत आणि ऑथेल्लोचे संवाद उत्पल
दत्त यांच्या आवाजात आहेत. त्यांनीच हा नाटकाचा भाग सिनेमातही,
अंगावर काटा आणणाऱ्या पद्धतीने दिग्दर्शित केला आहे.) या दोघांचं प्रेमप्रकरण अल्पजीवी ठरतं. रिनाला समजतं
की ती ब्रिटिश वडिलांच्या एका मोलकरणीशी असलेल्या अनैतिक संबंधांतून जन्मलेली अनौरस
मुलगी आहे. ती कृष्णेंदूच्या आयुष्यातून अचानक निघून जाते आणि
तो तिचा शोध घेत राहते. आता दुसऱ्या महायुद्धाचा काळ सुरू होतो
आणि कृष्णेंदू लष्करात डॉक्टर म्हणून सेवा बजावताना दिसतो. कृष्णधवल
युगातला सिनेमा असूनही अतिशय वेगाने उलगडत जाणाऱ्या कथानकात रिना स्वयंसेवक नर्सच्या
रूपात दिसते. ती एका जखमी रुग्णाला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये घेऊन
येते आणि तिथे तिची कृष्णेंदूशी पुन्हा भेट होते. आता रिना दारूच्या
आहारी गेली आहे आणि पूर्णपणे अश्रद्ध बनली आहे. कृष्णेंदूने ख्रिश्चन
धर्म स्वीकारलेला आहे. रिना कृष्णेंदूशी पुन्हा पहिल्यासारख्या
मग्रुरीने वागू लागते. कृष्णेंदूच्या खोलीतल्या येशू ख्रिस्ताच्या
तसबिरीवर ती गोळी झाडते, तेव्हा तिला कळतं की ख्रिस्ताच्या छबीमागे
तिचा फोटो आहे. सुचित्राने या प्रसंगात अवाक् करणारी अतुलनीय
ऊर्जा दाखवली आहे. बाहेर बाँबहल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजू
लागलेले असताना ती खोलीतून बाहेर धावते. कृष्णेंदू तिच्यामागोमाग
बाहेर धावतो आणि तिचा जीव वाचवतो. सिनेमा सुखान्त शेवटावर संपतो.
ही कथा मेलोड्रामॅटिक वाटते, मात्र, अँग्लोइंडियन समाज, वर्गविग्रह, महायुद्धातला संघर्ष, धर्मांतरं, बाँबहल्ल्याच्या सूचना देणारे भोंगे या सगळ्या ५० आणि ६०च्या दशकातल्या बंगालच्या
आठवणी आहेत.
सुचित्रा आणि उत्तम हे बंगाली सिनेमाच्या पडद्यावरचेच
आदर्श प्रेमिक नव्हते तर त्यांच्या प्रेमकहाणीच्या चघळचर्चा स्टुडिओंमध्येही व्हायच्या. या दोघांच्या प्रेमकहाणीवर आधारलेल्या महानायक या टीव्ही सिरीयलला
(प्रोसेनजितने यात उत्तम कुमार झोकात साकारला आहे) बंगाली प्रेक्षकांचा इतका नकारात्मक प्रतिसाद मिळाला की ती मालिका झटपट उरकावी
लागली. असं म्हणतात की उत्तम कुमारने त्यांच्या नात्याला विवाहबंधनाचं
स्वरूप देण्यासाठी तिला अनेक वेळा लग्नाची मागणी घातली होती. पण, समाजात आपल्या नैतिक प्रतिमेवर काय परिणाम होईल,
या विचाराने विवाहित स्त्री आणि एका मुलीची आई असलेल्या सुचित्राने त्याला
कधीच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. उत्तरायुष्यात उत्तम अनेकदा
कुटुंबातून बाहेर पडून इतर अभिनेत्रींबरोबर राहिला. (सुप्रिया
देवी या त्याच्या १७ वर्षांच्या जोडीदार होत्या.) मात्र,
वैधव्याची कुऱ्हाड कोसळल्यानंतरही सुचित्रा त्याच्याबरोबर राहिली नाही,
ती मुलगी मूनमून हिच्याबरोबर एकटी राहिली.
उत्तम
आणि सुचित्रा यांच्यात नेहमीच एक खोल अशारीर नातं होतं, दोघे
घट्ट मित्र होते (रोमा या सुचित्राच्या मूळ नावाने हाक मारण्याचा
अधिकार उत्तमला होता आणि दोघे एकमेकांना ‘तुई’ म्हणजे ‘तू’ म्हणायचे, म्हणजे अरेतुरे करायचे. सगळ्यांना ‘आप’ आणि ‘आपन’ म्हणणाऱ्या बंगालीत अरेतुरे हे फारच जवळच्या नात्यात केलं जातं.) सुचित्रा आयुष्याच्या अखेरीपर्यंत रामकृष्ण मठाशी जोडली गेलेली होती.
तिच्यावर या मठाच्या महंतांचा एवढा प्रभाव होता की तिने सिनेमातून संन्यासही
त्यांच्याच सांगण्यावरून घेतला, असं म्हणतात.
सत्पाके बाधा
सुचित्राने उत्तम कुमारबरोबरच बंगालच्या अनेक नामांकित
अभिनेत्यांसोबत भूमिका साकारल्या होत्या… सौमित्र चटर्जी हे
त्यांतलं उत्तम कुमारच्याच तोलामोलाचं नाव. सौमित्रबरोबर तिने
सातपाको बाधा (विवाहचक्र) या सिनेमात नायिका
साकारली. इथेही सामाजिक विषमतेचं दर्शन आहे. या सिनेमात सौमित्रने साकारलेला नायक हा सुशिक्षित अनाथ युवक आहे आणि तो कॉलेजात
शिक्षक आहे. तो एका पार्टीत लाडावलेल्या श्रीमंत मुलीच्या प्रेमात
पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. ही गुंतागुंतीची कथा सुखात्मिका
नव्हती. सुचित्राने साकारलेल्या अर्चना या श्रीमंत मुलीची आई
संसारात सतत हस्तक्षेप करत असल्यामुळे लग्नानंतर अर्चना नवऱ्याच्या परिस्थितीशी जुळवून
घेऊ शकत नाही. तिचं नवऱ्यावर खूप प्रेम असतं आणि त्याच्यासोबत
सुखाचा संसार करण्याची इच्छा असते, पण हे नातं नवऱ्याच्या कठोर
वर्तनामुळेही हळुहळू तुटत जातं. अखेरच्या प्रसंगात अर्चना नवऱ्याला
सोडून जाताना त्याचा कुर्ता फाडते, हा प्रसंग अतिशय संस्मरणीय
होता. पतीपत्नीच्या संत्रस्त मनांमधल्या उलघालींचं जबरदस्त दर्शन
या जोडीने घडवलं होतं. या चित्रपटातल्या भूमिकेने सुचित्राला
मॉस्कोच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळवून
दिला. कोणाही भारतीय अभिनेत्रीला त्याआधी आंतरराष्ट्रीय सन्मान
मिळाला नव्हता.
दीप ज्वेले जाय
या सिनेमात सुचित्राने अंतर्यामी जळत असलेल्या, मनोरुग्णालयातल्या नर्सची भूमिका केली होती. (‘खामोशी’
या हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका वहिदा रहमाननेही ताकदीने केली होती.)
बसंता चौधरी या लोकप्रिय नायकाबरोबर तिने या सिनेमात भूमिका केली होती.
मनोरुग्णांवरच्या उपचारांचा एक भाग बनलेली ही नर्स प्रेमात अपयशी ठरलेल्या
रुग्णाबरोबर प्रेमाचं नाटक करून, त्याला मानसिक आधार देत त्याचं
मानसिक संतुलन मिळवून देते, पण दरम्यानच्या काळात त्याच्यात मनाने
गुंतल्याने तो बरा होऊन घरी जायला निघतो तेव्हा, ती उद्ध्वस्त
होते अशा आशयाचं कथानक होतं या सिनेमाचं. ज्या वॉर्डमध्ये त्या
युवकावर उपचार झालेले असतात, त्याच वॉर्डमध्ये तिला दाखल केलं
जातं. तिचे शेवटचे शब्द असतात, ‘मी अभिनय
करत नव्हते, मी तो करू शकले नसते.’ एका
नर्सचा उपचारपद्धतीत निव्वळ साधनासारखा उपयोग करणाऱ्या वैद्यकीय जगताच्या क्रूर बाजूचा
वेध या सिनेमात घेतला गेला होता. तो लोकप्रिय झाल्यानेच
‘खामोशी’च्या रूपाने त्याचा रिमेक करण्यात आला
होता.
उत्तोर फाल्गुनी
उत्तोर फाल्गुनी हा सुचित्राचा आणखी एक श्रेष्ठ सिनेमा. यात तिने दुहेरी भूमिका साकारली होती. देबजानी
(सुचित्रा सेन) हिचं राकीश राखाल याच्याशी जबरदस्तीने
लग्न लावून देण्यात येतं आणि तो तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करतो.
राखालचं मूल पोटात असताना ती त्याच्यापासून पळ काढते आणि ट्रेनमधून उडी
टाकून आत्महत्येचा प्रयत्न करते. तिला एक बाईजी वाचवते आणि लखनौच्या
कोठ्यावर घेऊन येते. तिथे ती सुपर्णा या मुलीला जन्म देते आणि
पन्नाबाई या नावाने मशहूर कोठेवाली बनते. राखाल तिला शोधून ब्लॅकमेल
करायला लागतो तेव्हा ती तिथून पळून कोलकात्यात येते आणि सुपर्णाला एका मिशनरी शाळेत
दाखल करून तिच्यापासून दूर राहते. मुलीने स्वच्छ आणि चांगल्या
वातावरणात वाढावं यासाठी ती तिच्यापासून स्वेच्छेने दूर जाते.
काही काळाने तिला तिचा जुना प्रेमिक बॅरिस्टर मनीष रॉय (बिकाश रॉय या आणखी एका आघाडीच्या नायकाने साकारलेली भूमिका) भेटतो, तिची दर्दभरी कहाणी ऐकल्यावर तो तिच्याशी लग्न
करण्याची इच्छा प्रदर्शित करतो. पण, देबजानीला
त्याच्या नावावर बट्टा लावायची इच्छा नसते. ती त्याला सुपर्णाची
देखभाल करण्याची विनंती करते. मनीष त्याला रूकार देतो,
सुपर्णाचा पालक बनतो. अनेक वर्षांनी वृद्ध पन्नाबाईला
हृद्रोग जडतो. मनीषने स्वत:ची पुतणी म्हणून
वाढवलेली मोठी झालेली सुपर्णा (अर्थातच दुहेरी भूमिकेतली सुचित्रा)
विलायतेतून वकील बनून परतते.
सुपर्णा ही आपलीच मुलगी आहे, हे लक्षात आल्यावर तिची असलियत तिला सांगण्याची धमकी देऊन राखाल देबजानीला
पुन्हा ब्लॅकमेल करू लागतो. देबजानी गोळी झाडून त्याची हत्या
करतो. कोर्टात मनीष तिचा बचाव करतो. अशा
चरित्रहीन कलंकितेचा खटला मनीषने लढू नये, असं सुपर्णा सांगते.
अखेर मनीष तिला देबजानीची खरी कहाणी सांगतो आणि ती देबजानीची मुलगी आहे,
हेही उघड करतो. तेव्हा ती देबजानीच्या बचावार्थ
उभी राहते आणि साश्रुनयनांनी आपल्या मातेचा स्वीकारही करते.
सुचित्राने स्त्रीची दोन भिन्न रूपं अतिशय समर्थपणे
साकार केल्यामुळे ही गुंतागुंतीची कथा अतिशय नाट्यमय बनली होती. एकीकडे मवाळ आणि प्रेमळ स्वभावाची देबजानी आणि दुसरीकडे आक्रमक, आधुनिक मुलगी या दोन्ही भूमिकांमध्ये सुचित्रा सेन सिनेमावर अशी काही
‘छा गयी थी’ की तिच्यापुढे इतर भूमिकांमधले पुरुषही
झाकोळून गेले होते.
हाच सिनेमा नंतर ‘ममता’
या नावाने हिंदीत बनवला गेला. त्यात नायिकेची दुहेरी
भूमिका सुचित्रानेच साकारली होती आणि नायक होता धर्मेंद्र. हा
चित्रपटही इतका लोकप्रिय ठरला की नंतर त्याचे तामीळमध्ये काव्य थलैवी आणि मल्याळममध्ये
पुष्पांजली या नावांनी रिमेक झाले. (तामीळमध्ये सावकार जानकी
या त्या काळातल्या सुपरस्टार अभिनेत्रीने या सिनेमाची निर्मिती केली होती. के. बालचंदर यांनी हा सिनेमा नव्याने लिहिला आणि दिग्दर्शित
केला होता. सावकार जानकी यांची या सिनेमातली दुहेरी भूमिका त्यांच्या
सगळ्यात गाजलेल्या भूमिकांपैकी एक होती, तरी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट
अभिनयाचा पुरस्कार मात्र प्रियकराच्या सहभूमिकेतल्या जेमिनी गणेशनला मिळाला,
यावरून सिनेमाचं पुनर्लेखन कशा प्रकारे झालं असेल, याचा अंदाज येतो. त्यावरचा षटकार ‘पुष्पांजली’मध्ये मारला गेला. तिथे
नायिकेची दुहेरी भूमिका बदलून दोन नायिका घेतल्या गेल्या आणि नायिकेचा छळणारा नवरा,
तिचा प्रियकर आणि तिच्या मुलीचा प्रियकर या सगळ्या भूमिका प्रेम नझीर
या तत्कालीन सुपरस्टारने साकारल्या आणि उत्तोर फाल्गुनीची उत्तरक्रियाच करून टाकली.)
हॉस्पिटल
या सिनेमात सुचित्राने हिंदी चित्रपटसृष्टीचे दादामोनी
अशोक कुमार यांच्याबरोबर काम केलं होतं. सरबरी आणि सैबाल हे
दोघे यशस्वी डॉक्टर असतात आणि एकमेकांच्या प्रेमात असतात. सैबाल
श्रीमंत घराण्यातला असतो, सरबरीवर मात्र दारिद्र्यात खितपत पडलेल्या
कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असते. तिचे अतिशय तत्त्वनिष्ठ
वडील अपंग असतात. या जबाबदारीमुळे ती सैबालच्या लग्नाच्या मागणीला
प्रतिसाद देत नाही. तिला डॉ. चौधरी या सिनियर
शिक्षकांच्या हाताखाली हॉस्पिटलमध्ये ओव्हरटाइम करावा लागत असतो. सैबाल आणि सरबरी यांच्या प्रेमवेलीवर फूल उमलण्याची वेळ येते. सरबरीची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. चौधरी सैबालला तिच्याशी
लग्न करायला सांगतात. त्याला तो तयार असतोच, पण त्याआधी समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तो तिला गर्भपात करून घ्यायला
सांगतो.
सरबरी याला तयार होत नाही. ती त्याच्यापासून वेगळी होते आणि आपल्या मुलाला जन्म देऊन स्वत:च्या नावाने वाढवते. हा सैबालचा मुलगा आहे हे ती कोणालाही
कळू देत नाही. तिच्या वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतर सरबरी डॉ.
चौधरींची मदत घेते. ते कोळशाच्या खाणींमध्ये दवाखाना
चालवत असलेल्या बिजॉन साहा या डॉक्टरकडे तिला पाठवून देतात. डॉ.
साहा तिला अगदी मुलीप्रमाणे वागवतात.
दरम्यान, पश्चात्तापदग्ध सैबाल
सरबरीला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो विफल ठरतो. आपण कुठे आहोत, हे कोणालाही सांगायचं नाही, असं वचनच सरबरीने डॉ. चौधरी आणि डॉ. साहा यांच्याकडून घेतलेलं असतं. अखेर हताश सैबाल इंग्लंडला
निघून जातो. अनेक वर्षांनी सरबरीचा मुलगा मोठा होतो. तिच्या छातीत कळा येत असतात. ते दुखणं ती लपवते.
डॉ. साहा तिला मुंबईत नोकरी मिळवून देतात.
सैबाल इंग्लंडहून परतला आहे आणि त्याने कोलकात्यात नर्सिंग होम काढलेलं
आहे, हे तिला कळतं. वडिलांचं नाव नसल्यामुळे
तिच्या मुलाला मुंबईच्या शाळेत प्रवेश मिळत नाही. ती आजारी पडते
आणि तिला फुप्फुसांचा कॅन्सर झाल्याचं निष्पन्न होतं. ती कोलकात्यात
उपचारासाठी येते ती सैबालच्या दवाखान्यात. अनेक वर्षांनी भेट
झाल्यावर सगळे राग गळून पडतात. सैबाल तिच्यावर स्वत: ऑपरेशन करायचं ठरवतो, पण ऐनवेळी गळाठतो. डॉ. चौधरी त्याला धीर देतात, मदत
करतात आणि सरबरीला कॅन्सरमुक्त करतात.
गीता दत्तच्या आवाजातली गाणी आणि सुचित्राचा चेहरा असा
एक दुग्धशर्करा योगही या सिनेमात जुळून आला होता. अशोक कुमार
आणि सुचित्रा सेन यांच्यावर बोटीत चित्रित झालेलं ‘ए शुंदोर शोर्नाली
शोंध्या’ हे गाणं आजच्या तरुण पिढीनेही कव्हर व्हर्जनच्या रूपाने
जपलेलं आहे. शिवाय हे गाणं फक्त एक आयटेम म्हणून येत नाही,
त्याला सिनेमाच्या कथानकात खास स्थान आहे. या बोटसफरीनंतर
अशोक कुमारची गाडी नादुरुस्त होते आणि दोघांना रात्र एकत्र काढावी लागते (त्या रात्रीत काय होतं ते सांगायला नकोच.)
सत्यजित राय आणि राज कपूर यांना नकार
वास्तव आयुष्यात सुचित्रा भयंकर मूडी स्वभावाची होती. तिचे जवळचे मित्र असलेल्या गोपाल रॉय या पत्रकाराने तिचं चरित्र लिहिलं आहे.
ते म्हणतात, ‘ती खूपच मूडी होती आणि तिच्या मनाला
जेव्हा जे येईल ते करून मोकळी व्हायची. मात्र, ती अतिशय प्रेमळ आणि आनंदीही होती.’ इतर अभिनेत्यांना
सत्यजित राय आणि राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये संधी मिळण्याची प्रतीक्षा असायची.
सुचित्राने दोघांनाही नकार दिला होता. सुचित्राचं
स्वर्गीय सौंदर्य आणि अभिनयाचा आवाका यांची भुरळ या दोन्ही दिग्दर्शकांना पडली होती,
दोघांनीही तिला सिनेमे ऑफर केले, पण दोघांनाही
तिने नम्र नकार दिला. सत्यजित राय यांच्यासाठी तिच्याकडे तारखा
नव्हत्या आणि राज कपूरने ज्या फिल्मी पद्धतीने तिच्यापुढे सिनेमाचा प्रस्ताव ठेवला,
ते तिला बिलकुल आवडलं नाही.
१९६०च्या दशकात सत्यजित राय यांनी बंकिमचंद्रांच्या
देवी चौधुरानी या कादंबरीवर सिनेमा बनवायचं ठरवलं तेव्हा त्यांनी त्या भूमिकेसाठी सगळ्यात
आधी सुचित्राला गाठलं. मात्र, तिने या
सिनेमाच्या चित्रिकरणाच्या काळात इतर कोणत्याही सिनेमात काम करू नये, सगळ्या तारखा ब्लॉक कराव्यात, अशी त्यांची मागणी होती.
सुचित्राने त्याच काळात दोन सिनेमांसाठी तारखा दिल्या होत्या.
त्या जुन्याजाणत्या निर्माता-दिग्दर्शकांची अडचण
करणं तिला प्रशस्त वाटलं नाही. ‘ज्यांनी सुचित्रा सेनला ओळख दिली,
त्यांच्याशी सुचित्रा प्रतारणा कशी करू शकेल,’ असा तिचा सवाल होता. राय यांनी या भूमिकेसाठी तिचा लुक
बदलण्याचाही घाट घातला होता. ते तिला मान्य नव्हतं. शेवटी बोलणी फिस्कटली आणि राय यांनी या सिनेमाचा विचारच मनातून काढून टाकला.
शोमॅन राज कपूर तिला आर. के. फिल्म्सच्या सिनेमात काम करण्याची गळ घालण्यासाठी
तिच्या कोलकात्यातल्या घरी पोहोचला होता. त्याने तिच्या पायाशी
बसून पुष्पगुच्छ सादर करून एकदम ‘आशिकाना’ अंदाजमध्ये तिला प्रस्ताव स्वीकारण्याची गळ घातली. राजला
सिनेमा काढताना प्रत्येक नायिकेच्या ‘प्रेमात पडण्याची’
खोड होतीच. एखाद्या पुरुषाने बाईच्या पायाशी बसून
असला काहीतरी आचरटपणा करणं सुचित्राला अजिबात पसंत पडलं नाही. तिने राजला नम्रपणे बाहेरचा दरवाजा दाखवला.
पूर्वायुष्य
आताच्या बांगलादेशात असलेल्या पाबनामध्ये १९३१ साली
सुचित्राचा जन्म झाला. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याआधी तिचं
मूळ नाव होतं रोमा दासगुप्ता. तीन भाऊ आणि पाच बहिणी यांच्या
कुटुंबात तिचा पाचवा नंबर होता. तिचं लहान वयातच दीनानाथ सेन
यांच्याबरोबर लग्न झालं. दीनानाथ हे एकत्र कुटुंबात राहणारे श्रीमंत
गृहस्थ होते. त्यांनी कुटुंबातल्या कर्मठ वातावरणाच्या विरोधात
जाऊन रोमाला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी उत्तेजन दिलं. उभयतांचा विवाह फार सुखाचा नव्हता. सुचित्राने लग्नानंतर
आणि एका मुलीला जन्म दिल्यानंतर सिनेमात पदार्पण केलं.
सिनेमात बस्तान बसवणं मात्र तिच्यासाठी फार सोपं नव्हतं. ती बांगलादेशाच्या ग्रामीण भागातल्या पद्धतीने बांगला भाषा बोलायची.
कोलकात्यात आल्यानंतर तिला तिथली ‘शुद्ध’
उच्चारणशैली आत्मसात करावी लागली, राहणीमानही बदलावं
लागलं. मात्र हे सगळे बदल तिने अगदी सहज आत्मसात केले.
१९५२ साली तिने शेष कोथाई या सिनेमात पहिल्यांदा अभिनय केला.
मात्र, हा सिनेमा प्रदर्शितच झाला नाही.
मात्र, उत्तम कुमारबरोबरचा तिचा दुसरा सिनेमा होता
‘सारे चुयात्तोर’. तो सुपरहिट झाला. या सिनेमात तुलसी चक्रवर्ती, जव्हार रॉय आणि भानू बॅनर्जी
यांच्यासारखे बंगालीतले विनोदी अभिनयाचे एक्के होते. हा सिनेमाही
खळखळून हसवणारा हलकाफुलका कॉमेडी सिनेमा होता. या सिनेमाने बंगाली
चित्रपटांमधल्या सुचित्रा-उत्तम युगाची मुहूर्तमेढ रोवली आणि
सुचित्राला पुढे कधीच मागे वळून पाहावं लागलं नाही.
असं म्हणतात की भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या
प्रत्येकासाठी
सर्वोच्च सन्मान मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सुचित्राने चक्क
नाकारला होता. सुचित्राला हा पुरस्कार द्यावा अशी तेव्हाचे माहिती
व प्रसारण मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची फार इच्छा होती. मात्र, मृणाल सेन आणि अदूर गोपालकृष्णन यांचा समावेश
असलेल्या निवड मंडळाला हा पुरस्कार सुचित्राला देणं पसंत नव्हतं. यातून मंत्रालय आणि निवड समिती यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि मंत्रालयाने
आपला हेका चालवला तर आपण राजीनामा देऊ, अशी धमकी मृणाल सेन यांनी
दिली. प्रियरंजन दासमुन्शीही खमके होते. त्यांनी सुचित्राची मुलगी मूनमून सेन हिच्याशी संपर्क साधून सुचित्राला दिल्लीला
येऊन पुरस्कार स्वीकारण्यासाठी राजी करावं, अशी गळ घातली.
मात्र, तोवर सुचित्राने विजनवास स्वीकारला होता
आणि तिला पुन्हा सार्वजनिक जीवनात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिनेच नकार दिल्यामुळे निवड समितीचीही सुटका झाली. मृणाल
सेन यांनी सुचित्राबरोबर एकही सिनेमा केलेला नाही हेही इथे लक्षात घ्यायला हवं. सिनेमात कार्यरत असताना तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला होता आणि तो तिने
स्वीकारलाही होता. बंगविभूषण हा बंगालचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार
मात्र तिच्यावतीने तिच्या मुलीने स्वीकारला.
सुचित्रा नावाचं गूढ
भारतीय सिनेमात सुचित्राची ओळख मात्र एक न उलगडणारं
कोडं किंवा एक धूसर आकर्षक गूढ व्यक्तिमत्व अशीच राहिली आहे. सिनेमाच्या जगातल्या फुटकळ गॉसिपचा किंवा वादविवादांचा स्पर्शही तिला कधीच
झाला नाही. ती मनाने चांगली होती आणि स्टुडिओंमध्ये काम करताना
आनंदात असायची. पण, एकलकोंड्या स्वभावामुळे
तिने फारसे मित्र जोडले नाहीत. ती घरात खोलीत एकटी असताना रायमा
आणि रिया या तिच्या नातींनाही कधी विनापरवानगी आत शिरता आलं नाही किंवा तिच्याशी बोलता
आलं नाही. तशी मुभाच नव्हती त्यांनाही.
२०१४च्या जानेवारीत, वयाच्या ८२व्या
वर्षी सुचित्राचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिच्यावर
सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्ययात्रेला
तुफान जनसागर उसळला होता. सगळ्यांना तिचं अंतिम दर्शन घेण्याची
उत्सुकता होती. पण, सुचित्रा तेव्हाही पडद्याआडच
राहिली. तिचं गूढ कायम राहिलं…
…तिला जाऊन आता बराच काळ लोटला आहे, पण तरीही तरूण पिढीतही तिची चर्चा होते. शालीनता आणि
सौंदर्य यांचा मापदंड म्हणजे सुचित्रा. एखाद्या मुलीला कुणी
‘सुचित्रासारखी सुंदर आहेस’ असं म्हटलं,
तर त्याहून मोठी प्रशंसा आजही बंगालमध्ये दुसरी नाही.
(अनुवाद आणि अतिरिक्त लेखन – मुकेश माचकर)
(बुरोशिवा दासगुप्ता हे कोलकात्यातले एक पत्रकार आहेत
आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातले विद्वान आहेत.)
No comments:
Post a Comment