भाऊराव
कऱ्हाडे या तरुण दिग्दर्शकाच्या बाबतीत, निदान ‘ख्वाडा’ या त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या
संदर्भात हे अगदीच स्पष्ट आहे... बहुतेक कलावंतांच्या पहिल्या धारेच्या कलाकृतींच्या
बाबतीत असतं तसंच.
गंमत म्हणजे
भाऊरावाच्या सिनेमाची गोष्ट ही ‘त्याची’ गोष्ट नाही. साधारणत: लेखक-दिग्दर्शक जेव्हा
आत्मचरित्रातून स्फुरलेली गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांचा नायक हे त्यांचंच प्रतिरूप
असतं. त्यांनी जे केलेलं असतं, ते हे नायक करत असतात किंवा त्यांना जे करायचं होतं,
ते या नायकांमार्फत करवून घेतलं जातं. भाऊरावच्या गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे तो या
गोष्टीचा नायक नाही. किंबहुना त्याने आपल्या बालजीवनातून स्फुरलेली गोष्ट निवडताना
ती आपल्या समाजाचीही निवडलेली नाही. त्यासाठी त्याने लहानपणी जवळून पाहिलेला धनगर समाज
निवडला आहे. हा या सिनेमाचा पहिला विशेष.
‘कोर्ट’
आणि ‘ख्वाडा’ या दोन अत्यंत वेगवेगळ्या जातकुळीच्या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या मराठी
सिनेमांच्या लेखक-दिग्दर्शकांमध्ये आश्चर्यकारक साम्य आहे, ते या विषयनिवडीचं. मराठीत
लेखक आणि अन्य कलावंतांची मजल आपल्या भावविश्वाच्या पलीकडे जात नाही, कोणी कसला अभ्यास
करून काही काम करत नाही, अशी रडकथा सांगितली जाते. त्यात सिनेमा ही तर यशस्वी ठोकताळ्यांची
कला. त्यात अभ्यासबिभ्यास कोण करत बसतो, अशी लाडकी समजूत. सामाजिक वास्तवापासून तुटलेली,
तिचे कंगोरे घासूनपुसून गुळगुळीत केलेली मनोरंजनाची गोड गुटिका म्हणजे सिनेमा. सुदैवाने
‘कोर्ट’चा दिग्दर्शक चैतन्य ताम्हणे आणि ‘ख्वाडा’कार भाऊराव कऱ्हाडे यांच्यासारख्या
दिग्दर्शकांना सिनेमाची ही व्याख्याच मान्य नाही. दोघांनीही आपल्या परिचयाच्या परीघात
सिनेमाचा घाणा ओढून मनोरंजनाचा सरकारीनिर्मिती उद्योग चालवणं नाकारलेलं दिसतं. दोघेही
त्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलेले दिसतात. चैतन्यने चळवळींच्या शाहिरी
जगाचा अभ्यास करण्यासाठी वर्ष घालवलं आणि त्यात आपल्या मनातली कथा नेऊन बसवली. भाऊरावाने
लहानपणापासून पाहिलेल्या धनगरी जीवनावर आधारलेला सिनेमा बनवण्यासाठी धनगरांच्या पालांसोबत
अनेक महिने प्रवास केला, त्यांच्याबरोबर राहिला. त्यांच्या ताटात खाल्लं. त्यांचं आयुष्य
जगून पाहिलं.
या सगळ्या
उद्योगाचा परिणाम असा झालाय की, मेंढरांच्या शेणामुताच्या, धनगरांच्या घामाच्या आणि
गावगणंग पुढाऱ्यांच्या पावडरलेपित खाकांच्या संमिश्र वासाचा सिनेमा तयार झालेला आहे.
एरवी मुख्य धारेतला सिनेमा हा जसा माणसांचं बहुमित जगणं द्विमित म्हणजे टू डायमेन्शनल
म्हणजे सपाट करून सादर करतो, तसाच हा सिनेमा इतक्या नियंत्रित वातावरणात घडतो की अगदी
ग्रामीण परिसरही काल्पनिक वाटायला लागतात आणि तिथली माणसंही रामानंद सागरकृत मालिकांमधल्या
देवदेवतांप्रमाणे गुळगुळीत आणि मिळमिळीत बनून जातात. कोणत्याही परिसरातल्या गंधाची
संवेदनाच या डेटॉली सिनेमांमध्ये साफ पुसून काढलेली असते. ‘ख्वाडा’चं मात्र तसं नाही.
संपूर्ण सिनेमाभर या सिनेमातल्या व्यक्तिरेखा, परिसर आणि जनावरं यांचा गंध घमघमत राहतो.
हा अस्सल
वातावरणनिर्मितीचा गंध आहे. सिनेमाचा पिंड लक्षात घेतला, तर तो आश्चर्यकारक आहे. कारण,
ख्वाडा हा धनगर जीवनावरचा ताणून मोठा केलेला लघुपट नाही. खरं तर तो व्यावसायिक सिनेमाचे
सगळे घटक असलेला सिनेमा आहे.
‘ख्वाडा’ची
कथा ही कोणत्याही कमर्शियल ‘मद्रासी’ सिनेमाची कथा म्हणून सहज खपून जाईल. या सिनेमाच्या
रिमेकसाठी तमिळमधून विचारणा झाली, हा योगायोग नाही. नायक आणि खलनायक अशी रचना आली की
आपल्या नकळत आपल्या मनातून तद्दन व्यावसायिक असा शिक्का आपोआपच एखाद्या सिनेमावर बसून
जातो. त्यामुळेच, प्रायोगिक आणि कलात्मक सिनेमाच्या प्रेक्षकांना हा सिनेमा प्रच्छन्नपणे
व्यावसायिक क्लृप्त्यांचा वाटू शकतो. पण, भाऊराव त्याही बाबतीत अतिशय स्पष्ट आहे. मला
हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचाय, त्यांना भिडवायचाय, त्यांना जे भिडतं
ते या सिनेमात आपणहून येतंय, ते मी नाकारणार नाही.
मला हाच परिणाम अपेक्षित आहे, असं
हा एरवी मवाळ भासणारा दिग्दर्शक अगदी ठामपणे सांगतो. त्याच्या कथेच्या रचनेशी, आकृतीबंधाशी
तो प्रामाणिक आहे आणि त्याने निव्वळ कमर्शियल यशाची गणितं न मांडता आधी धनगरी जीवनाचं
दर्शन घडवत हळूच त्यात एका लग्नाची गोष्ट सुरू केलेली आहे. आता हा पालावरचा ‘हम आप
के है कौन’ आहे की काय, अशी शंका येईपर्यंत प्रेक्षकाला पिदवल्यानंतर या भटक्या जीवनातला
संघर्ष पायरीपायरीने त्यात घुसवला आहे. सिनेमातला सगळा गोग्गोड भासणारा भाग झपाट्याने
मागे पडत जातो आणि धनगरांचा धगधगता जीवनसंघर्ष सगळ्या पडद्याचा ताबा घेतो, तेव्हा त्या
ज्वाळांच्या चटक्यांनी अवाक व्हायला होतं. आपल्या लक्षात यायला लागतं की, हा दिग्दर्शक
धनगरांचं रूपक वापरून सगळ्या जगभरात गेल्या पाऊण शतकभरात सुरू असलेल्या स्थलांतरांची,
स्थलांतरितांचीच वैश्विक गोष्ट सांगतो आहे. तीही अगदी परिचयाचा आकृतिबंध वापरून.
जगभरातला
वेगवेगळ्या शैलींचा सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकाला सहसा व्यावसायिक सिनेमांमधला कृतक
संघर्ष भिडत नाही. ‘ख्वाडा’ ही लिटमस टेस्ट पार करतो आणि आपल्याला झक मारत नायकाशी
तादात्म्य पावायला लावतो. पहिल्याच सिनेमात हे रचनाकौशल्य साधणं ही मोठीच कामगिरी आहे.
पण, लहान
वयात सिनेमा पाहण्यासाठी आठ किलोमीटरची पायपीट करणाऱ्या, सिनेमा बनवण्यासाठी बारावीत
सुटलेलं शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करणाऱ्या, फिल्म इन्िस्टट्यूटमध्ये प्रवेश
मिळवण्यात अपयश आल्यानंतर घरची जमीन विकून मनाजोगता सिनेमा बनवण्यासाठी पुरेपूर मेहनत
घेणाऱ्या भाऊरावाच्या डोक्यातल्या सिनेमाच्या कल्पनेत कसलाच ख्वाडा म्हणजे खोडा नव्हता...
त्यामुळेच ही अवघड गोष्ट सहजसाध्य झालेली दिसते. या सिनेमाने त्याची जमीन हिरावून घेतली
आणि त्यालाही त्याच्या कहाणीतल्या धनगरांप्रमाणे स्थलांतर करायला भाग पाडलं...
रूढार्थाने आत्मकथा सांगणं भाऊरावाने कटाक्षाने टाळलंय
खरं... पण कलावंताच्या भागधेयापासून तो पळून पळून पळणार किती?...
त्याचं भवितव्य त्याच्याच सिनेमाने लिहून दाखवलंच.
अप्रतिम
ReplyDelete