Tuesday, January 10, 2012

वीरुजींचं स्वप्न, प्रेक्षकांसाठी दु:स्वप्न (हिंदुस्थान की कसम)


`हिंदुस्थान की कसम'च्या श्रेयनामावलीपूर्वी या सिनेमातून दिग्दर्शनक्षेत्रात पदार्पण करणारे दिग्दर्शक वीरु देवगण प्रेक्षकांना सांगतात की, हा सिनेमा म्हणजे त्यांचं एक स्वप्न आहे, प्रेक्षकांच्या सहकार्याविना त्याची पूर्तता होणार नाही.
  त्यांच्या या भावनिक आवाहनानं द्रवून कुणी संपूर्ण सिनेमा पाहण्याचं `सहकार्य' केलंच, तर वीरुजींचं स्वप्न अशा प्रेक्षकासाठी भीषण दु:स्वप्न ठरतं.
  नेमकं काय आहे हे स्वप्न?
 `हिंदुस्थान की कसम' पाहून हेही कळत नाही, हा खरा वांधा आहे.
   हा सिनेमा भारतीय सैनिकांची शौर्यगाथा सांगतो. भारत आणि पाकिस्तान या `भावंडा'मधला दुरावा संपून स्नेहभाव प्रस्थापित व्हावा, अशी भाबडी कल्पना मांडतो. लहानपणीच बिछडलेल्या दोन जुळ्या भावांची फॉर्म्युलेबाज नाटय़मय कथा सांगतो. एका देशाच्या पंतप्रधानाचा दुसऱया देशाच्या भूमीवर हत्या करण्याच्या प्रयत्नाची थ्रिलरसदृश कहाणीही याच सिनेमात आहे. शिवाय दोन नायक म्हणून दोन नायिका, त्यांची प्रेमप्रकरणं, गाणी वगैरेही या सिनेमात आहे. थोडक्यात काय, तर एक ना धड भाराभर चिंध्या!
  वर उल्लेखलेल्या प्रत्येक घटकामध्ये एका उत्तम मनोरंजक पठडीपटाची (का होईना!) बीजं आहेत. पण, पटकथाकार जनक- हृदय यांची सरधोपट हाताळणी यामुळं या घटकांचं धड मिश्रणही होत नाही, मग संयुग होणं दूरच!
  अजय मल्होत्रा (अजय देवगण) हा भारतातला एक बेस्टसेलर कादंबरीकार. तो आपल्या थरारकथांसाठी जी कथाबीजं निवडतो, ती भारतीय गुप्तचर अधिकाऱयांवर ओढवलेल्या वास्तवातील संकटांशी कमालीचं साधर्म्य सांगणारी असतात. भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱयांना त्याचा संशय येऊ लागतो. एका कारवाईमध्ये मारला गेलेला भारतीय अधिकारी मारेकरी म्हणून अजयचं नाव सांगतो, तेव्हा संशयाचं धुकं दाट होतं. अजयवर संमोहनाच्या प्रयोगांमधून असं निष्पन्न होतं की, त्याचा (जत्रेऐवजी पण जत्रेसारख्याच) युद्धात हरवलेला जुळा भाऊ राजू हा पाकिस्तानात तौहिद बनून भारतविरोधी कारवाया करतो आणि त्याच अजयला स्वप्नात दिसतात. हा तौहिद भारताशी मैत्री करू पाहणाऱया पाकिस्तानी पंतप्रधानाला भारताच्या भूमीवर ठार करण्याच्या मिशनवर भारतात येतो. मग दोन भावांची भेट, संघर्ष, मनोमीलन वगैरे वाटचाल नेहमीचीच.
 `हिंदुस्थान...'मध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं मांडण्याजोगा कथाभाग इतकाच आहे. तोही पटकथाकारांनी बटबटीत मांडला आहे. मग इतर फाफटपसाऱयाची गोष्ट तर विचारायलाच नको.
  संपूर्णतया पिटातला प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून पटकथाकार दिग्दर्शकांनी सर्व घटना- प्रसंगांचं बाळबोधीकरण केलंय. भारत-पाक संबंध, गुप्तचर कारवायांमधला थरार आणि जुळ्या भावांमधला अदृश्य पण पक्का धागा हे या सिनेमाचे मुख्य पैलू आहेत. पैकी दोन भावांमधल्या टेलिपथीची, याच्या कारवायांनी त्याला स्वप्न पडणं, पॅरासायकॉलॉजीचं भारूड वगैरे ऊटपटांग भानगडी करून, फॉर्म्युलेबाज मांडणी करण्यात आली आहे.
  थ्रिलरचा भाग वीरु देवगण यांना हे `स्वप्न' 25-30 वर्षांपूर्वी पडलं असावं, अशी शंका निर्माण करतो. या काळात जग बदललं, सिनेमा बदलला. प्रेक्षक बदलले पण वीरूजी आणि त्यांचं स्वप्न यात मात्र काडीभर फरक पडलेला नाही. साठच्या दशकात प्रमोद चक्रवर्ती, रामानंद सागर यांच्यापासून रवी नगाईच वगैरे मंडळींच्या देशभक्तीपर थरारपटांमध्ये विचित्र वेशभूषेतला कुणी परदेशी `बॉस' असायचा, कुठल्या तरी कपाटाआड लाल-पिवळे दिवे गणपतीच्या लायटिंगसारखी उघडझाप करायचे, तो कन्ट्रोल केबिन किंवा छुपी संपर्कयंत्रणा असायची, `दुश्मन देशा'ला फितलेल्या भारतातल्या एजंटाचा अड्डा, सोबत एखादी मदनिका मोना, असला निरुपद्रवी जामानिमा असायचा. `हिंदुस्थान...'मध्ये हे घटक अगदी अशाच रंगरुपात नाहीत, पण आशयात्मक दृष्टय़ा मांडणी मात्र अगदी तशीच, त्याच सामान्य वकुबाची.
 एका देशाच्या पंतप्रधानाची दुसऱया देशात हत्या घडवून आणण्याचा कट आखणारे, त्याची अमलबजावणी करणारे आणि तो रोखणारे उभय देशांतले उच्चपदस्थ लष्करी अधिकारी निव्वळ विदूषक वाटतात या सिनेमात.
 सगळ्यात गंभीर भाग आहे तो भारत-पाक संबंधांचा. कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर तर त्याचं गांभीर्य अधिकच वाढतं. या दोन देशांमधील सर्वसामान्य माणसांना एकमेकांशी युद्ध नकोय, भाईचारा हवाय आणि काही मूठभर राजकारणी, लष्करशहा, अतिरेक्यांचाच भारत-पाक शत्रुत्वात रस आहे, अशी भाबडी मांडणी हिंदी सिनेमानं अनेकवार केली आहे. `युद्धाचा फायदा घेऊन सगळा पाकिस्तान ताब्यात घ्यायला पाहिजे भारतानं, या xx ना धडा शिकवला पाहिजे कायमचा,' असं तावातावानं लोकलच्या खेचाखेचीत बोलणारे भारतीय सामान्यजनच असतात. आणि भारताबद्दल सौम्य भूमिका घेणाऱया पाकिस्तानी नेत्यांना निवडणुका हरण्याची खात्री असते ती लोकभावना भडकण्याच्या भीतीपोटीच, हे वास्तव या सिनेमावाल्यांच्या गावीही नाही.  
एकमेकांविषयी इतक्या त्वेषानं बोलणारी, द्वेष बाळगणारी सगळीच माणसं भाबडी मानणं हा भंपकपणा आहे. तोच `हिंदुस्थान...'मध्ये घडतो. इथे नवाज शरीफांसारखा दिसणारा पाकिस्तानी पंतप्रधान पत्रकार परिषदेत भारताची इतकी तारीफ करतो आणि स्वत:च्या देशाला एवढी दूषणं देतो की, वास्तवात असं करणाऱया पंतप्रधानाला मारण्यासाठी कुणी कटही करायची गरज नाही. तिथली जनताच त्याला ठेचून मारेल.
  या समजुतीच्याच घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानानं भारतात येताना `वायूदूत'च्या `हवेतली येस्टी' पद्धतीच्या विमानातून प्रवास करणं वगैरे प्रसंगात्मक बाष्कळपणा किरकोळच मानायला हवा.
  देशभक्तीची भंपक भाषणबाजी, इतिहासाचं, वास्तवाचं अनाकलन दर्शविणारं आणि विडंबन करणारं कथानक, पाचकळ विनोद, भडक नाटय़ आणि एकूण संगतीचा अभाव यांचा भडिमार असलेल्या `हिंदुस्थान...'मध्ये काही जमलेले दृक्परिणाम आणि हवाई स्टंटदृश्यं वगळता काहीही बघणीय, श्रवणीय वा मननीय नाही. वीरु देवगण हे जुनेजाणते स्टंट दिग्दर्शक असल्यानं `हिंदुस्थान...'मध्ये किमान त्या आघाडीवर तरी नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, स्फोटांमध्ये हवेत उडणारे रणगाडे दाखवणाऱया लुटुपुटुच्या लढायांशिवाय देवगण काही चमक दाखवत नाहीत.
अजय देवगण दुहेरी भूमिका, विशेषत: तौहिद प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न करतो. पण, तो काही केल्या कादंबरीकर वाटत नाही. अमिताभ बच्चनला अजयच्या घरावर छत्रछाया धरणाऱया एका माजी सैनिकाची भूमिका देण्यात आली आहे. ही मुळातली पाहुणी भूमिका पाणी घालून वाढवलेली वाटते. फकिरासारखा मूर्ख वेश घालून भोचकपणा आणि देशभक्तीची बडबड करणे हे त्याचं मुख्य काम. अमिताभ बिइभग अमिताभ ते समरसून करतो, पण परिणाम शून्य! बाकी मनीषा कोईराला, सुश्मिता सेन, फरिदा जलाल, शाहबाज खान वगैरे मंडळी बेतास बात पाटी टाकून जातात.
  ईश्वर बिद्री यांचं छायालेखन आहे, हे श्रेयनामावली वाचणाऱयालाच कळतं, सिनेमा पाहून खात्री पटत नाही. `छैया छैया' प्रसिद्ध सुखविंदर सिंगनं दिलेल्या संगीतात `जलवा' आणि `मेरे दिल के पास' ही दोन गाणी ठाकठीक बाकी सगळा पंजाबी ठेक्याचा एकसुरी मामला वाटतो.
  इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, सिनेमाच्या कॅसेटमध्ये `मैं तेरा जिस्म हूँ तू मेरी जान है, मैं हिंदुस्थान हूँ तू पाकिस्तान है' अशी आजच्या परिस्थितीत प्रक्षोभक ठरेल, अशी शब्दरचना असलेलं गाणं आहे. ते अजय आणि शौहिद यांनी एकदिलानं क्लायमॅक्सला पार पाडलेल्या कामगिरीच्या वेळी पार्श्वसंगीत म्हणून वापरण्याचा दिग्दर्शकाचा इरादा असावा. मात्र, लोकभावनेच्या उद्रेकाच्या भीतीनं सिनेमात हे गाणं बहुधा घेतलेलं नाही.
  जो दिग्दर्शक आपल्या आयुष्यभराच्या स्वप्नाशीलसुद्धा प्रामाणिक राहत नाही, परिस्थिती पाहून कन्व्हिक्शन्स' बदलतो, त्याच्या सिनेमाकडून कसल्या अपेक्षा बाळगणार, कप्पाळ!

No comments:

Post a Comment